Pages

Saturday, 9 March 2013

९७ गावातील किशोरवयीन मुलींनी घेतली अत्याचाराविरूद्ध लढा देण्याची शपथ

घाटंजी तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह रोखण्याचा ठराव
सर्वत्र महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज जागतिक महिलादिनी घाटंजी तालुक्यातील ९७ गावांमध्ये हजारो किशोरवयीन मुलींनी अन्यायाचा प्रतिकार करण्याची शपथ घेतली. समाजाच्या विवीध चालीरितींमुळे महिलांची होणारी कुचंबना रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. उल्लेखनिय म्हणजे तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ठराव घेण्यात आले.
वयाची १८ वर्ष पुर्ण झाल्याशिवाय माझे लग्न होऊ देणार नाही, एखाद्या मैत्रिणीचे लग्न १८ वर्षाआधी होणार असेल तर आईवडीलांच्या मदतीने ते थांबविण्याचा प्रयत्न करेन, मी जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करेन, शिकत असतांना मजुरीला जाणार नाही, कोणीही त्रास दिला तर न घाबरता आई वडील व घरच्या मंडळींना सांगेन अशी शपथ ९७ गावातील किशोरवयीन मुलींनी आज घेतली. युनिसेफ मुंबई, यशदा पुणे, महिला व बाल विकास कार्यालय यवतमाळ, विकासगंगा समाजसेवी संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रेरणादायी उपक्रम तालुक्यात राबविण्यात आला. सुमारे २ वर्षांपासुन या क्षेत्रात घाटंजी काम सुरू आहे. तसेच मुलांची काळजी व गावपातळीवर संरक्षीत वातावरण निर्माण व्हावे यासाठी २८ गावांमध्ये बाल संरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या. 
आज तालुक्यातील १०५ गावांमध्ये जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. बालमजुरी, किशोरवयीन मुलींच्या समस्या, महिला अत्याचार, स्त्री भ्रुणहत्या, यासह विवीध समस्यांवर यानिमित्तांनी चर्चा करण्यात आली. अनेक गावातील ग्रामसभांमध्ये महिलांनी मनमोकळेपणाने आपल्या अडचणी मांडल्या. 
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालहक्क संरक्षण व अधिकार प्रकल्पाचे तालुका समन्वयक अरूण कांबळे, विकासगंगा संस्थेचे संचालक रंजित बोबडे, युनिसेफचे जिल्हा समन्वयक परेश मनोहर यांच्या मार्गदर्शनात सचित्रा पिलावन, पुजा गुडपल्लिवार, नैना रावळे, निता सुरसकार, अर्चना तुरे, शितल ठाकरे, राहुल प्रधान, ज्ञानेश्वर घोम, मारोती वेलादे यांचेसह विकासगंगा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 
अमोल राऊत
साभार :- देशोन्नती 

अतिक्रमणावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार?

रस्ता तिथे अतिक्रमण अशी परिस्थिती सध्या सर्वत्र आहे. केवळ शहरी भागातच नव्हे तर अगदी ग्रामिण परिसर व जंगलात देखिल अतिक्रमणाने आपले पाय पसरले आहेत. बेरोजगारी या गोंडस नावाखाली कोट्यवधींची जमिन अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. घाटंजी तालुकाही त्याला अपवाद नाही. घाटंजी शहरात तर रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण आहे. अवघ्या काही महिन्यांपुर्वीच शहरात अतिक्रमण हटाओ मोहिम राबविण्यात आली. बहुतांश अतिक्रमण हटविण्यात आले. यंत्रणेचा यामध्ये प्रचंड खर्चही झाला. मात्र काही महिने जात नाही तोच अतिक्रमणाची स्थिती जैसे थे झाली.
अतिक्रमणाचे समर्थन नक्कीच केल्या जाऊ शकत नाही. मात्र ते हटविल्यावर हजारो बेरोजगारांवर कोसळणारी बेरोजगारीची कु-हाड व त्यावर अवलंबुन असणा-या कुटूंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे. यंत्रणेने योग्य नियोजन केले तर बेरोजगारांचा प्रश्न व अतिक्रमणाची समस्याही निकालात निघेल. शहरात नगर परिषद कार्यालय ते राम मंदिर रोड, शि.प्र.मं.कन्या शाळा, बसस्थानक, आठवडी बाजार परिसर यासह विवीध भागात किरकोळ व्यावसायीकांनी अतिक्रमण केले आहे. नगर परिषद तसेच खासगी व्यक्तींची कॉम्प्लेक्स आहेत. मात्र त्याची किंमत सर्वसाधारण व्यावसायीकांच्या आवाक्या बाहेरची आहे. मोहिमेदरम्यान त्याच जागेवर व्यावसायीकांसाठी दुकाने काढण्यात येतिल असा प्रस्ताव विचाराधीन होता. मात्र त्या दृष्टीने अद्याप कोणतीही पावले उचलल्या गेली नाहीत. त्यामुळे प्रचंड खर्च करून मोकळी झालेली जागा पुन्हा अतिक्रमणाने व्यापली. त्याच जागेवर दुकाने दिल्यास अतिक्रमणधारक त्यासाठी भाडे देण्यासही तयार आहेत. नगर परिषदेसाठी हे एक उत्पन्नाचे साधन होऊ शकते. मात्र ही बाब दुर्लक्षील्या गेली हे दुर्दैवच.
शिवाजी चौकाकडे जाणा-या रस्त्यावर बड्या व्यावसायिकांचे अतिक्रमण आहे. त्यांच्या दुकानांच्या पाय-या अगदी रस्त्यापर्यंत आल्या आहेत. वाहतुकीला त्याचा प्रचंड अडथळा होतो. मात्र प्रत्येक अतिक्रमण हटाओ मोहिमेत या ‘श्रीमंत’ अतिक्रमणाकडे कानाडोळाच करण्यात आला आहे. केवळ कोणी आक्षेप घेऊ नये म्हणुन थातुरमातुर कार्यवाही केल्या जाते. या भागात मुख्यत्वेकरून सराफांची दुकाने आहेत. तसेच काही गोदाम सुद्धा या भागात असल्याने आधीच अरूंद असलेल्या रस्त्यांवर जेव्हा एखादा ट्रक अथवा वाहन साहित्य नेण्यासाठी उभे केल्या जाते तेव्हा वाहतुकीचा खोळंबा होतो. या रस्त्याची भुमी अभिलेख विभागामार्फत मोजणी करून रस्ता अतिक्रमणमुक्त करावा अशी अनेकांची मागणी आहे. पोलीस स्टेशन चौकात अतिक्रमणाच्या जागेत असलेले फ़ेब्रीकेटर्स व मिरचीची गिरणी वाहतुकीस अडचणीची ठरत आहे. मिरचीही पुड रस्त्यावरून जाणा-यांच्या डोळ्यात जात असल्याने या मार्गावर अनेकदा अपघातही होतात. तसेच फ़ेब्रीकेटर्सचे साहित्य रस्त्यावरच पडून राहत असल्याने वाहतुकीस अडथळ्याचे ठरते. भर चौकात असलेल्या या  वेल्डींगच्या दुकानाकडे प्रशासन डोळेझाक का करते असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या नगर परिषदेवर अतिक्रमण काढण्याची व प्रतिबंध करण्याची जबाबदारी आहे त्या नगर परिषदेचे एक प्रवेशद्वारच अतिक्रमणाने व्यापले आहे. दर दोन तिन वर्षांनी राबविण्यात येणारी अतिक्रमण हटाओ मोहिम केवळ एक औपचारीकताच होऊन बसली आहे. एकदा अतिक्रमण काढल्यावर ते पुन्हा होऊ नये यासाठी प्रशासनाने दक्ष राहुन बेरोजगारांना त्याच ठिकाणी व्यवसायासाठी योग्य मोबदला घेऊन जागा दिल्यास अतिक्रमणाचा प्रश्न कायमचा सुटू शकेल.
साभार :- देशोन्नती 

घाटंजी तालुक्यातील चार क्रिकेटपटू पोहचले आंतरराष्ट्रीय पातळीवर

बांग्लादेशात होणा-या आशियायी सामन्यात सहभाग

जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपल्या चमकदार कामगिरीने तालुक्याचे नाव उंचावणा-या घाटंजी तालुक्यातील चार क्रिकेटपटुंनी आता देशाची सिमा ओलांडली आहे. दि.२० एप्रील ते २ मे या कालावधीत बांग्लादेशात होणा-या आशियायी सामन्यांकरीता या क्रिकेटपटूंची निवड झाली आहे. 
तालुक्यातील प्रणित यशवंत घुगरे, राहुल उनकेश्वर राठोड, रत्नदिप दिलीप नगराळे व रविसिंग प्रेमसिंग राठोड हे या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये योटी ग्रुपमार्फ़त भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. फरिदाबाद (हरीयाणा) येथे झालेल्या निवड चाचणीत देशभरातील २०० खेळाडूंमधुन १९ वर्ष वयोगटातील १५ सदस्यीय संघात घाटंजी तालुक्यातील चार क्रिकेटपटूंची निवड होणे ही तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे. या खेळाडूंनी जालना, रत्नागिरी येथे झालेल्या राज्यस्तरीय सामन्यात उत्कृष्ट खेळ केला. त्यामुळे त्यांची कुरूक्षेत्र (हरीयाणा) व दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीच्या सामन्यांसाठी निवड झाली. येथेही त्यांनी चमकदार कामगिरी केल्याने निवडचाचणीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी योटी ग्रुपच्या संघात त्यांची निवड करण्यात आली आहे. या संघात वेगवान गोलंदाजाची भुमिका बजावणारा प्रणित यशवंत घुगरे हा घाटंजीतील ईस्तारी नगर भागात राहतो. तो शि.प्र.मं.विद्यालयात ईयत्ता १० वीचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील जि.प.शाळेत शिक्षक आहेत. श्री.समर्थ विद्यालयातील ईयत्ता १०वीचा विद्यार्थी व संघातील उत्कृष्ट फलंदाज राहुल उनकेश्वर राठोड हा नेहरू नगर भागात राहतो. त्याचे वडील शेती करतात. तडाखेबाज फलंदाजीने राष्ट्रीय सामन्यांमध्ये मॅन ऑद द मॅच पुरस्कार पटकाविणारा रत्नदिप नगराळे हा तालुक्यातील ससाणी गावचा आहे. तो शि.प्र.मं.शाळेत दहाव्या वर्गात शिकत असुन वसतीगृहात राहतो. त्याचे वडील शेतकरी आहेत. तर मुळचा आर्णी तालुक्यातील बोरगावचा रहिवासी व आर्णीतील सावित्रीबाई फ़ुले विद्यालयाचा १२ वीचा विद्यार्थी रविसिंग प्रेमसिंग राठोड हा संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे. तसेच तो उत्कृष्ट फलंदाजही आहे. तो मुळचा आर्णी तालुक्यातील असला तरी सरावासाठी तो घाटंजी येथे असतो. त्याचे वडीलही शेती करतात. 
दि.२० एप्रील ते २ मे या कालावधीत बांग्लादेशाची राजधानी ढाका यासह विवीध शहरात होणा-या आशियायी सामन्यांमध्ये भारतातून जाणा-या संघामध्ये तालुक्यातील चार खेळाडूंचा समावेश असणार आहे. नुकतेच या दौ-यासाठी निवड झाल्याबाबतचे अधिकृत पत्र त्यांना योटी रूरल क्रिकेट असोशिएशन तर्फ़े पाठविण्यात आले आहे. या सर्व क्रिकेटपटूंना शिरोली ता.घाटंजी येथिल राष्ट्रीय पातळीवरील धावपटू व क्रिडा मार्गदर्शक राजन भुरे यांचे मार्गदर्शन लाभले.
अमोल राऊत
साभार :- देशोन्नती 

Sunday, 3 March 2013

राजकीय कुरघोडीत शेतक-यांच्या सुविधा दावणीला


गेल्या अनेक वर्षांपासुन घाटंजी तालुक्याच्या सहकारी क्षेत्राच्या दृष्टीने महत्वाची भुमिका निभावणारी घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती शेतक-यांसाठी मात्र असुविधेचीच ठरली आहे. कापुस व धान्याच्या मार्केट  यार्डावर शेतक-यांसाठी कोणत्याही सुविधा नसल्याने आजवर बाजार समितीची सत्ता काबिज करणा-यांनी काय केले असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. कधी नव्हे तो एक महत्वाकांक्षी प्रकल्प शेतक-यांसाठी सुरू झाला होता. शिदोरी मंडपापासुन ते गोदामापर्यंत सर्व सुविधांनी युक्त अशा २ कोटी ८ लाखांच्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले. 
आजवर तुरळक अपवाद वगळता कोणतेच विकासकाम न झालेल्या बाजार समितीमध्ये शेतक-यांसाठी शिदोरी मंडप, ईलेक्ट्रॉनिक वजनकाटा, गोदाम, स्वच्छतागृह, मुक्कामाची सोय, स्वच्छ पिण्याचे पाणी यासह विवीध सुविधा एकाच वेळी मिळण्याची आशा निर्माण झाली होती. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू झाले. मात्र तांत्रिक मुद्द्यांवरून या प्रकल्पाच्या तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे प्रकल्पाचे काम खोळंबले. यंदाच्या कापुस हंगामात शेतक-यांना या सुविधांचा लाभ होणार असे चित्र दिसत असतांना या तक्रारींमुळे शेतक-यांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले. केवळ काही तांत्रिक मुद्दे सोडले तर तक्रारीत आक्षेप घेण्यासारखे काही नसल्याचे निदर्शनास येते. मात्र हातात सत्ता नसलेल्यांना कदाचित शेतक-यांसाठी होत असलेल्या सुविधा पाहवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्या तक्रारी झाल्या. ईलेक्ट्रॉनिक वजनकाट्या अभावी व्यापा-यांना वजनात दांडी मारण्याची मिळत असलेली संधी बाजार समिती मार्केट यार्डात होऊ घातलेल्या ४०० मेट्रीक टनाच्या वजनकाट्यामुळे मिळाली नसती. बाजार समितीचे त्यावर नियंत्रण राहिले असते. मात्र या तक्रारींमुळे हंगामाच्या वेळेपर्यंत काटा उभारल्या जाऊ शकला नाही. सध्या बाजार समितीच्या मार्केट यार्डावर शेतक-यांसाठी कोणत्याही सुविधा नाहीत. टिनाच्या शेडमध्येच समितीचे कर्मचारी बसतात. तशीच स्थिती शिदोरी मंडपाचीही आहे. 
धान्य यार्डावर अनेकदा शेतक-यांचा माल बाहेर तर व्यापा-यांचा माल गोदामात अशी स्थिती असते. यावर्षी बाजार समितीने शेतमाल तारण योजना राबविली. गोदामा अभावी अनेक शेतक-यांना या योजनेपासुन वंचीत राहावे लागले. नाफेडची खरेदी तालुक्यात सुरू झाल्याने शेतक-यांच्या मालाला चांगला भाव मिळाला. काही जिनिंग मध्ये वजनकाट्यात तफावत असल्याचे आढळुन आले. बाजार समितीने या तक्रारींची दखल घेऊन काट्यांची तपासणी केली. मात्र बाजार समितीचा वजन काटा उभारल्या गेल्यास भविष्यात ही समस्या उद्भवणार नाही असे बाजास समिती सभापती अभिषेक ठाकरे यांनी सांगितले. शेतक-यांसाठी सुविधा निर्माण करणा-या महत्वाकांक्षी प्रकल्पातील अडचणी दुर होऊन हा प्रकल्प लवकरच कार्यान्वयीत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
साभार :- देशोन्नती 

पांढरकवडा नांदेड महामार्गावर मनसेचा रास्तारोको

अहमदनगर येथिल ‘त्या’ दगडफेकीचा निषेध
मनसे तालुकाध्यक्ष स्थानबद्ध
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या ताफ्यावर अहमदनगर येथे झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ पारवा येथिल मनसे कार्यकर्त्यांनी पांढरकवडा नांदेड महामार्ग रोखुन धरला. सुमारे दोन तास या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. उल्लेखनिय म्हणजे मनसेचे घाटंजी तालुका प्रमुख राजु बल्लुरवार यांना पारवा पोलीसांनी सकाळीच स्थानबद्ध केले होते. तरी देखिल पारवा परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पारवा येथुन निषेध मोर्चा काढत महामार्गावर ठिय्या दिला. यावेळी मनसे कार्यकर्ते रमेश इंगोले, संजय कुडमते, गजानन चौधरी, रविंद्र शेंडे, हर्षल राऊत, संतोष चिल्लावार, विजय नेरूद्रवार, ज्योतीराम कुसरे, पुंजाराम धानोरकर, गणपत म्हरस्कोल्हे, देवीदास मंगाम, उमेश कुडमते, गोवर्धन मडावी, संजय जाधव, प्रकाश बावणे, बळवंत कुमरे या कार्यकर्त्यांना पोलीसांनी अटक करून जामिनावर सुटका करण्यात आली.
साभार :- देशोन्नती