Pages

Showing posts with label मदत. Show all posts
Showing posts with label मदत. Show all posts

Monday, 10 September 2012

सा.बां.विभागाच्या सदोष सर्वेक्षणामुळे पुरग्रस्त मदतीपासुन वंचीत



जुलै महिन्यात आलेल्या पुरानंतर पडझड झालेल्या घरांचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सदोष सर्वेक्षण केल्याने सुमारे ४१ कुटूंबे मदतीपासुन वंचीत राहणार असल्याची तक्रार कोळी (बु.) येथिल ग्रामस्थांनी केली आहे. महापुरामुळे भयभित झालेल्या ग्रामस्थांनी अंगावरच्या कपड्यावरच बाहेर पडून जीव वाचवला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री, विरोधी पक्ष नेते, जिल्ह्यातील आमदार मंत्री, खासदार,  आमदार तात्काळ येऊन पाहणी करून गेले. शासनाची मदत मिळावी यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार तलाठी चंदु भोयर यांनी पंचनामे केले. घरांच्या पडझडीचे मुल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले. मात्र सदोष पद्धतीने मुल्यांकन करण्यात आल्याने सुमारे ४१ कुटूंब पडझड नुकसानापासुन वंचीत राहिले. ही माहिती मुख्यमंत्र्यांच्या दौ-यापुर्वी तहसिलदारांना देण्यात आली होती. नुकसान झालेल्या सर्वांना मदत मिळेल असे महसुल विभागामार्पâत सांगण्यात आले होते. मात्र अद्याप पर्यंत मदत मिळालेली नाही. कोळी (बु.) या गावात आपत्तीमुळे झालेली हानी मोठ्या प्रमाणात आहे. 
मुख्यमंत्र्यांच्या दौ-यानंतर कुणीही अधिकारी भेट देण्यास आला नाही. एकंदरीतच शासन प्रशासनाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे पुरग्रस्त वा-यावर आहेत. या सर्व समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात या मागणीचे निवेदन कोळी (बु.) येथिल ग्रामस्थांनी उपसरपंच चंद्रप्रकाश खरतडे यांच्या नेतृत्वात तहसिलदारांना दिले. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट देऊन पुरग्रस्तांच्या व्यथा त्यांच्यापुढे मांडणार असल्याचे खरतडे यांनी सांगितले.
साभार :- देशोन्नती  

Wednesday, 15 August 2012

कोठारी परिवारातर्फे पुरग्रस्तांना मदतीचा हात


तालुक्यात पुराच्या पाण्यामुळे आपले सर्वस्व गमावलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे येत आहेत. भांबोरा येथिल कोठारी परिवारानेही सामाजीक दायीत्व जपत गरजूंना ब्लँकेट व चादरींचे वाटप केले. भांबोरा ग्रा.पं.चे उपसरपंच निलेश कोठारी यांनी पुरग्रस्तांशी आस्थेने विचारपुस करून त्यांना भेडसावत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी आपल्या पातळीवर योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अनेक पुरग्रस्तांनी आपल्या व्यथा त्यांच्यापुढ़े व्यक्त केल्या. दोन वेळचे जेवण व कपड्यांची व्यवस्था दानशुरांच्या मदतीमुळे होत आहे. मात्र कायमस्वरूपी निवासाचा प्रश्न या पुरग्रस्तांपुढे असुन भविष्यात राहायचे कुठे अन शेती खरडून गेल्याने आता पोटाचा प्रश्न कसा सोडवायचा असे एक ना अनेक प्रश्न पुरग्रस्तांनी त्यांच्यापुढे मांडले. या समस्या तातडीने निकाली काढण्यासाठी प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, मंत्री यांनी प्रथम प्राधान्याने प्रयत्न करावे असे आवाहन निलेश कोठारी यांनी केले. कोळी, कापसी कोपरी, चिंचोली, कवठा, चांदापुर या गावांमध्ये कोठारी परिवारातर्फे अंथरूण साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी नितिन कोठारी, जितेंद्र कोठारी, रामधन नाईक, श्रावण राठोड, दत्ता पवार, रवि दत्ताणी, मनोज राठोड, अनिल चव्हाण, अविनाश भगत, दिलिप जाधव हे उपस्थित होते.
साभार :- देशोन्नती  

Saturday, 11 August 2012

पुरग्रस्तांच्या जखमांवर केवळ ’ फुंकर’ पुरेशी नाही

१ हजार कुटूंबे बेवारस
६ हजार हेक्टर शेती उध्वस्त















जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस आला ते सर्वस्व घेऊन जाण्यासाठीच. घरदार, शेती सगळं काही पावसात वाहुन गेलं. जिथे हक्काचं डौलदार घर होतं तिथे पावसानंतर उरला केवळ मलबा. अंकुरायला आलेली शेतपिके पुराच्या पाण्याने पार खरडून नेली. पावसाच्या तडाख्याने शारिरीक, मानसिक व आर्थिकदृष्ट्या घायाळ झालेल्या पुरग्रस्तांच्या जखमांवर फुंकर घालायला अनेकजण आले. सामाजीक संस्था, दानशुर लोक, राजकीय नेते, कार्यकर्ते या सर्वांनी येऊन आपापल्या परिस्थितीनुसार मदत केली, जखमांवर फुंकर घातली. मात्र निसर्गाच्या फटक्याने भळभळणा-या या जखमा केवळ पुंâकर घातल्याने ब-या होणार नाहीत. त्यासाठी भरीव मदतीचे ’बँडेज’च गरजेचे आहे. हा उपाय केवळ मुख्यमंत्रीच करू शकतात. २८ जुलैला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा नियोजीत दौरा खराब हवामानामुळे रद्द झाल्याने पुरग्रस्तांचे तर अवसानच गळाले होते. आता उद्या मुख्यमंत्री येणार या आशेने त्यांना एक आधार मिळाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जखमांवर फुंकर घालावी ही अपेक्षा अगदीच तोकडी आहे. पुराच्या पाण्याने तालुक्यातील सुमारे १ हजार कुटूंबे उघड्यावर पडली आहेत. स्वत:चे असे काहीच त्यांच्या जवळ उरले नाही. नदीकाठची शेती तर पुर्णपणे खरडून गेली आहे. आज हाती आलेल्या आकडेवारीनुसार सुमारे ९६४ हेक्टर शेतीचे ५० टक्केच्या आत व ४८१७ हेक्टर शेतीचे ५० टक्केच्या वर नुकसान झाले आहे. तर सुमारे ८४७ हेक्टर शेती पुर्णपणे खरडून गेली आहे. हे नुकसान कोटवधींच्या घरात आहे. शासकीय आकड्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान तालुक्यात झाले आहे. प्रशासनाच्या वतीने ५० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान वाटप झाले आहे. ठराविक गावांमध्ये आरोग्य कॅम्प व्यतिरिक्त कोणतीही ठोस मदत प्रशासनाकडून झालेली नाही. हजारो पुरग्रस्त कुटूंबांनी आपापल्या परिने विवीध ठिकाणी आश्रय घेतला आहे. त्यांच्या तात्पुरत्या निवा-याची व्यवस्था सुद्धा अद्याप झालेली नाही.
काही गावांमध्ये नागरीक स्वत: खर्च करून पुरग्रस्त गावांमध्ये पिण्याचे पाणी टँकरने पुरवित आहेत. मात्र तिथे भारनियमन आडवे येत आहे. पुरग्रस्त गावांनाही भारनियमनातून तात्पुरते वगळण्यात आलेले नाही. गावात साचलेल्या चिखलावर केवळ मुरूमाचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. ते पसरविण्यात आले नाही. ज्या काही थोड्या थोडक्या उपाययोजना झाल्यात त्या केवळ मुख्यमंत्री येण्याच्या वार्तेमुळेच झाल्या आहेत.
मंत्री, आमदार असलेल्या तालुक्यातील नेत्यांनी पुरग्रस्तांच्या जखमेवर केवळ सहानुभूतीची फुंकर घालण्यापलीकडे काही केल्याचे दिसत नाही. अशा अवस्थेत आता सर्व पुरग्रस्तांच्या आशाळभूत नजरा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेच लागलेल्या आहेत.

सर्वस्व गमावलेल्या सरपंचाचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
अतिवुष्टीमुळे पुराच्या पाण्यात सर्वस्व गमावलेल्या कवठा (खुर्द) येथिल सरपंच उदेभान रायबाजी घरडे (५५) यांचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. जुलै महिन्यात झालेल्या पावसामध्ये घरडे यांचे घर पुर्णपणे वाहुन गेले आहे. तसेच शेतपिकांचेही नुकसान झाले आहे. आता आयुष्य कसे जगावे याच विवंचनेत असलेल्या घरडे यांना हा ताण सहन झाला नाही व हदयविकाराच्या झटक्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शिक्षकांचा मदतनिधी गेला कुठे?
घाटंजी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षकांनी आपल्या नक्षलग्रस्त भत्त्याची एका महिन्याची रक्कम पुरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वास्तविकत: एका जि.प.सदस्याच्या तोंडी आदेशावरून शिक्षण विभागाने सर्व शिक्षकांना नक्षलग्रस्त भत्त्याची रक्कम बंधनकारक केले होते. गटशिक्षणाधिका-यांनी तसा आदेशही  केंद्र प्रमुख व मुख्याधापकांना लेखी स्वरूपात कळविला होता. त्यानुसार सुमारे ५ लाखांच्या वर निधी गोळा होणार होता. मानवतेच्या दृष्टीने कोणीही यासाठी विरोध केला नाही. मात्र त्यानंतर या निधीचे काय झाले? त्याचा विनियोग कुठे करण्यात आला याबाबत माहिती द्यायला कुणीच तयार नाही. उल्लेखनिय म्हणजे नक्षलग्रस्त भत्त्याची रक्कम जुलै महिन्याच्या वेतनातून कपात करण्यात येणार होती. मात्र अद्याप जुलै महिन्याचे वेतनच निघाले नाही. तर मग ही लाखो रूपयांची रक्कम कुठून अ‍ॅडजस्ट करण्यात आली हे गुलदस्त्यातच आहे. ही रक्कम पुरग्रस्तांसाठीच वापरण्यात आली असेल तर मग त्याचा कुठे वापर झाला हे सांगायला कुणीच का तयार नाही असा प्रश्न आता शिक्षकांमध्येच चर्चील्या जात आहे.
साभार :- देशोन्नती 


Friday, 10 August 2012

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ससाणी शाळेतील चिमुकले सरसावले


तालुक्यातील जि.प.उच्च प्राथमिक शाळा ससाणी येथिल विद्यार्थ्यांनी पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी रॅलीचे आयोजन केले होते. या चिमुकल्यांनी संपुर्ण गावातून मदतनिधी गोळा केला. तालुक्यातील अनेक गावांमध्ये अडाण नदीच्या पुरामुळे अक्षरश: थैमान घातले. यामध्ये अनेक जण बेघर झाले. अनेकांचे सर्वस्व पुरात वाहुन गेले. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी या शाळेतील चिमुकल्यांनीही आपला खारीचा वाटा उचलुन एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे. शाळेचे शिक्षक गुलाब शिसले यानी पुरात सर्वाधीक नुकसान झालेल्या कोळी या गावाची भयावह स्थिती उपस्थितांसमोर कथन केली. त्यानंतर संपुर्ण गावातून मदत फेरी काढण्यात आली. सुमारे एका तासात ससाणी या  छोट्याशा गावातून ३ हजार रूपयांची मदत गोळा झाली. हा उपक्रम छोटासा असला तरी समाजमन जर जागृत झाले तर मोठ्या नैसर्गीक आपत्तीवर सुद्धा मात करता येते हे या चिमुकल्यांनी दाखवुन दिले. शालेय विद्यार्थ्यांच्या या रॅलीसोबत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश राठोड, उपसरपंच झोलबाजी लेनगुरे, मुख्याध्यापक विलास डोमाळे, शिक्षक आर.डी.गायकवाड, गुलाब शिसले, राहुल गोलाईत, रूपेश बेलसरे, भुपेंद्र गोहणे, शंकर सालवटकर, जयकुमार सोनडवले सहभागी झाले होते. गटविकास अधिकारी रामचंद्र गेडाम यांनी निधी स्विकारून विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
साभार :- देशोन्नती 

Saturday, 28 July 2012

पाणी ओसरले ; अन आता वेदनांची भरती

राजकारण्यांच्या भेटी फोटोसेशनसाठी
दानशुरांच्या मदतीवरच पुरग्रस्त अवलंबुन

जिंदगी बित जाती है ईक आशिया बनानेमे !!
पर हाय ए कुदरत; तरस नही खाती, बस्तीया उजाडनेमे !!
सिमेंट मातीच्या खोल्याना घर बनविण्यासाठी माणसाला आयुष्य वेचावे लागते, मात्र माणसावर ओढवणारी नैसर्गिक आपत्ती क्षणात असे अनेक घरे जमीनदोस्त करते. अशावेळी काळाच्या पडद्याआड आपत्ती दडून जाते मात्र ती निघुन गेल्यावरही वेदना कायम राहतात. याची प्रचिती जिल्हावासियांना आज होत आहे.
अनेक दिवस चातकासारखी ज्या पावसाची सर्वजण वाट पाहात होते तो अचानक २२ जुलै रोजी अवतरला. मात्र सुजनाचे प्रतिक असलेल्या या पावसाने आपले विध्वंसक रूप घेतल्याने सारेच काही गंगेला मिळाले अशी परिस्थिती घाटंजी तालुक्यातील हजारो पुरग्रस्तांवर ओढवली आहे. अनेकांचे संसार डोळ्यादेखत बुडाले, कवडी कवडी जमवुन बांधलेले घर क्षणार्धात कोसळले.  खाण्याची सोय नाही, पाण्याने सर्वस्व नेले मात्र आता प्यायलाही पाणी नाही, अंगावरचे कपडेच तेवढे शिल्लक राहिलेत. त्यामुळे आता घालायचे काय हा मोठा प्रश्न. अख्खे गावच पाण्याखाली गेल्याने आता झोपायचे कोठे ही समस्याही आ वासुन उभी. अशी भिषण परिस्थिती गेल्या अनेक वर्षात प्रथमच घाटंजी तालुक्यावर ओढवली आहे. शासकीय यंत्रणेची ईतर मदत तर सोडाच पण बहुतांश गावांमध्ये शासनाचे पाणीही पोहचले नाही. सारेच राजकीय नेते, मंत्री, आमदार येऊन सांत्वना करून गेले. मात्र त्यांची सांत्वना व तोकडी मदत ही केवळ फोटोसेशन करण्यापुरतीच असल्याचे आता निदर्शनास येत आहे. सर्व आपदग्रस्त केवळ दानशुरांनी पुरविलेल्या अन्न पाण्यावरच जगत आहेत. नैसर्गीक आपत्तीग्रस्तांना देण्यात येणारी सानुग्रह राशी सुद्धा अजुन पर्यंत एकाही कुटूंबापर्यंत पोहचली नाही. 
सर्वाधीक नुकसान झालेल्या गावांमध्ये कवठा खुर्द येथे २०० घरे पुर्णपणे उध्वस्त झाले तर ८० घरे अंशत: बाधीत झाली.
कोळी बु.येथे १५५ घरे पुर्णत: ४० घरे अंशत:, कोपरी येथे ८० घरे पुर्णत: २० घरे अंशत:, डांगरगाव येथे ४० घरे पुर्णत: २० अंशत:, माणुसधरी येथे ६० घरे पुर्णत: १५ घरे अंशत:, चांदापुर येथे ३० घरे पुर्णत: व १५ अंशत:, चिंचोली येथे ३५ पुर्णत: १५ अंशत:, निंबर्डा ३६ पुर्णत: १८ अंशत:, तर घाटंजी शहरात १२५ घरांचे पुर्णत: व २०० घरांचे अंशत:, घाटी भागात २५ घरांचे पुर्णत: तर ५० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. शेतपिकाला तर पावसाचा चांगलाच फटका बसला असुन ५० गावातील तब्बल २ हजार ४०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा शासकीय यंत्रणेचा प्राथमिक अंदाज असुन हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मात्र प्रशासनाचा हा प्राथमिक अंदाज चुकीचा असुन प्रत्यक्षात झालेली हानी प्रचंड आहे. या सर्वेक्षणातही राजकारण शिरण्याची भीती असुन आपल्या राजकीय फायद्यासाठी स्थानिक नेते आपापल्या जवळच्या लोकांची नावे यामध्ये घुसविण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हे सर्वेक्षण राजकारण विरहीत व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.
अनेक गावांना जोडणारे नदी नाल्यांवरील पुल पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याने त्या गावांचा संपर्वâच तुटला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप या दुष्टीने कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही.
पावसात उध्वस्त झालेल्या सर्व गावांमध्ये इतर गावांमधुन तसेच घाटंजी शहरातुन शिजवलेले अन्न, कपडे व ईतर साहित्य पुरविण्यात येत आहे.
अमोल राऊत


साभार :- देशोन्नती