Pages

Tuesday 11 September 2012

नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांविरोधात विद्यार्थी व पालकांचा एल्गार

पालक सभेत प्रचंड गोंधळ



तालुक्यातील बेलोरा येथे असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात आज झालेल्या पालक सभेत विद्यार्थी व पालकांनी विद्यालयाच्या प्राचार्या सुमन बैलमारे यांच्या मनमानी कारभाराविषयी एल्गार पुकारला. अनेक विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या विचित्र वागणुकीचे पुरावेही यावेळी मांडले. केंद्र शासनाच्या अख्त्यारीत असलेल्या या जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थी अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. पालकसभेत विद्यार्थ्यांनी या समस्या सर्वांसमोर मांडल्या. ही परिस्थिती ऐकुन पालकही संतप्त झाले. काही पालकांनी प्राचार्यांना याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, तुम्ही माझी बदली करून टाका मी जाण्यास तयार आहे असे उद्धट उत्तर दिले. येथे वर्ग ६ ते १२ पर्यंतचे शिक्षण घेण्याची सुविधा आहे. मात्र शिक्षकां अभावी १२ वी ची तुकडीच चंद्रपुरला हलविण्यात आल्याची धक्कादायक माहीती विद्यार्थ्यांनी दिली. सध्या या विद्यालयात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित विषय शिकवायला शिक्षक नाहीत. यासाठी प्राचार्यानी अद्याप कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही. यावेळी तर चक्क निधी कमी आल्याने तुम्हाला वरण भातच खावा लागेल असे वक्तव्य प्राचार्यानी केल्याचे विद्यार्थी यावेळी म्हणाले. 
वसतीगृहातील काही भागात दोन वर्षांपासुन पंख्यांची व्यवस्था नाही. त्यामुळे विद्यार्थी बिछाने सरकवुन झोपतात. अशावेळी क्वचीत प्रसंगी त्यांच्यात वाद होतात. मात्र प्राचार्यानी त्याना समज देण्या ऐवजी १० वीच्या ५ विद्यार्थ्यांना १ महिन्यासाठी निलंबीत केले. विद्यार्थी एखादी समस्या घेऊन प्राचार्यांकडे गेले तर त्या थेट विद्यार्थ्यांना धमकावतात की, पालकांना अथवा बाहेर कुणाला सांगितले तर गाठ माझ्याशी आहे.
अशा अनेक समस्यांचा पाढाच विद्याथ्र्यानी पोटतिडकीने मांडला. यामुळे पालकसभेत चांगलाच गोंधळ निर्माण झाला. प्रचार्या सुमन बैलमारे यांना हटवा असे नारे विद्यार्थ्यांनी लगावले.

नवोदयच्या विद्यार्थ्यांचा लढा यशस्वी
प्राचार्या बैलमारे यांची हकालपट्टी
जवाहर  नवोदय विद्यालयाच्या प्राचार्या सुमन बैलमारे यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन यशस्वी झाले. वरिष्ठांनी विद्यार्थ्यांच्या संतापाची तातडीने दखल घेत प्राचार्यांना तातडीने कार्यमुक्त करून उपप्राचार्य मोहम्मद शाकीब यांचेकडे तात्पुरता प्रभार देण्यात आला आहे. प्राचार्यांना हटविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी काल पालकसभेत संताप व्यक्त केला. मात्र प्राचार्या सुमन बैलमारे यांनी आपला तोरा सोडला नसल्याने विद्यार्थ्यांनी आज सकाळपासुन अन्नत्याग आंदोलन सुरू केले. जोवर प्राचार्यांना हटविण्यात येत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला. नवोदयचे सहाय्यक आयुक्त पी.के.शर्मा हे विद्यालयात आले. मात्र त्यांनाही  विद्यार्थ्यांच्या संतापाला सामोरे जावे लागले. पी.के.शर्मा गो बॅक अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी त्यांना येण्यास मज्जाव केला. त्यानंतर उपायुक्त के.एस.भट्ट यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा केल्यावर त्यांनी एका तासात प्राचार्यांच्या कार्यमुक्तीचा आदेश देण्याचे आश्वासन दिल्यावरच विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन थांबविले. विद्यार्थ्यांनी भर पावसात जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रशासनाचा निषेध नोदविला. 

साभार :- देशोन्नती  


No comments:

Post a Comment