देवानंद पवार समर्थकांनी सतिश मलकापुरे यांच्या घरात केलेली तोडफोड
दोन गटात हाणामारी : राजकीय वैमनस्यातून घटनेला हिंसक वळण
येथिल तहसिल कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीची नामनिर्देशन प्रक्रीया सुरू असतांना जातवैधता प्रमाणपत्र स्विकारण्याच्या वेळेबाबत निर्माण झालेल्या वादाला ता.६ ला रात्री उशिरा हिंसक वळण मिळाले. जि.प.सदस्य देवानंद पवार यांना मारहाण झाल्यावर दोन गटात हाणामारी होऊन काही ठिकाणी जमावाकडून दगडफेकही झाली. माजी नगरसेवक सतिश मलकापुरे यांच्या घरात घुसून जमावाने प्रचंड तोडफोड केली. या संपुर्ण घटनाक्रमात दोन्ही गटाच्या तक्रारींवरून घाटंजी पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या वादामुळे शहरात तणावपुर्ण शांतता आहे.
घाटंजी तहसिल कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीची नामनिर्देशन प्रक्रीया सुरू होती. दरम्यान जात वैधता प्रमाणपत्र स्विकारण्याची वेळ गेल्याचे सांगुन संबंधीत लिपिकाने काही लोकांचे प्रमाणपत्र स्विकारले नाही. तर देवानंद पवार समर्थकांचे प्रमाणपत्र स्विकारल्या जात आहे असा आरोप करून माजी नगरसेवक सतिश मलकापुरे यांचा संबंधीत लिपिकाशी वाद झाला. हि घटना कळताच त्या लिपिकाचा मुलगा कार्यालयात आला. परिस्थिती पाहुन त्याची प्रकृती बिघडली. त्याला पवार व त्यांच्या सहका-यांनी खासगी दवाखान्यात नेले. तेवढ्यात तिथे सतिश मलकापुरे, भरत दलाल व अन्य काहीनी येऊन देवानंद पवार यांना मारहाण करायला सुरूवात केली. हि घटना रात्री ९ वाजताच्या सुमारास नेहरू नगर परिसरात घडली.
घटनेची माहिती मिळताच देवानंद पवार यांचे शेकडो समर्थक घटनास्थळी गोळा झाले. पोलीस स्टेशनसमोर तुरळक दगडफेकही झाली. त्यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास हा जमाव सतिश मलकापुरे यांच्या घराकडे वळला. घराचा दरवाजा तोडून घरातील वस्तुंची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. यावेळी मलकापुरे यांच्या घरी कुणीही नव्हते. शिवाय परिसरातील काही नागरिकांनाही जमावातील काहीनी मारहाण केल्याची माहिती आहे.
घरात तोडफोड करत असतांना मलकापुरे यांच्या समर्थकांनीही या जमावावर दगडफेक केली. त्यामुळे तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही गटातील समर्थकांमध्येही हाणामारी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सतिश मलकापुरे यांच्या तक्रारीवरून देवानंद पवार, अशोक पवार, अमोल मुत्यलवार, अरविंद चौधरी व इतर आठ जणांविरूद्ध भा.दं.वि. कलम १४३, १४९, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
तर मारहाण केल्याबद्दल देवानंद पवार यांच्या फिर्यादीवरून सतिश मलकापुरे, वैभव मलकापुरे, भरत दलाल यांचेविरूद्ध भांदवि ३९४, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. शिवाय भरत दालाल यांच्या फिर्यादीवरून देवानंद पवार यांचे विरोधात भांदवि ३९४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सतिश मलकापुरे यांचे घर फोडून तोडफोड केल्या प्रकरणी मलकापुरे यांच्या तक्रारीवरून देवानंद पवार, साहेबराव पवार, अशोक पवार, अनिल एंबडवार, संदिप जाधव यांचेसह एकुण २३ जणांविरूद्ध भांदवि १४३, १४७, १४८, ५०४, ५०६, ३९५ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. राजकीय दबावातून गुन्हे दाखल केल्या गेल्याचा पवार गटाचा आरोप आहे. तर ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रीयेत पवार यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप मलकापुरे गटाने केला आहे.
तणावपुर्ण परिस्थितीमुळे यवतमाळ येथुन पोलीसांची अतिरिक्त कुमक बोलविण्यात आली असुन उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन घाटंजीत तळ ठोकुन आहेत. या घटनेच्या पाश्र्वभुमिवर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुक तणावपुर्ण वातावरणात होण्याची चिन्हे दिसत असुन निवडणुका घेण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.
त्या लिपिकाला कारणे दाखवा नोटीस
या संपुर्ण वादाचा केंद्रबिंदू असलेल्या तहसिल कार्यालयातील लिपिक कैलासवार यांना काही जातवैधता प्रमाणपत्र न स्विकारल्याच्या कारणावरून प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सदर लिपिकाने वेळ गेल्याचे सांगून जातवैधता प्रमाणपत्र स्विकारले नव्हते. तर विशिष्ट लोकांचे प्रमाणपत्र स्विकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
पोलीसांची जरब संपली !
दोन गटात निर्माण झालेल्या तणावात घाटंजी पोलीसांनी नरमाईची भुमिका घेतल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. प्रकरण गंभिर होत असल्याचे निदर्शनास येऊनही पोलीसांनी तातडीने पावले उचलली नाही. जमावातील अनेकजण पोलीस स्टेशनच्या परिसरात काठ्या, रॉड, मिरचीपुड घेऊन असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हाणामारी, दगडफेक व तोडफोड होत असतांना पोलीस कुठेच प्रतिबंध करतांना दिसले नाही. पोलीसांची अतिरिक्त कुमक रात्री उशिरा आली. एकंदरीतच घाटंजी पोलीसांची तालुक्यात जरबच नसल्याचे बोलल्या जात आहे.