Pages

Showing posts with label यवतमाळ. Show all posts
Showing posts with label यवतमाळ. Show all posts

Monday, 5 January 2015

घाटंजीच्या अंजलीने उंचावली यवतमाळ जिल्ह्याची मान !

भारतीय विज्ञान परिषदेत कौतुकाचा वर्षाव 
डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम, कैलाश सत्यार्थींसह 
मान्यवरांकडून प्रयोगाची दखल

अमोल राऊत
भारतातील सर्वात मोठा विज्ञान समारंभ...वैविध्यपुर्ण अविष्कारांच्या स्टॉल्सने गजबजलेला परिसर...पंचतारांकीत शाळांच्या विद्यार्थ्यांच्या अत्याधुनिक प्रयोगांची रेलचेल...दरम्यान देशाचे माजी राष्ट्रपती तथा ख्यातनाम वैज्ञानिक डॉ.अब्दुल कलाम कार्यक्रमाच्या उद्घाटनास येतात. देशातील सर्वोत्तम विजान अविष्कार असलेल्या या परिसरात त्यांची नजर पडते ती सायकलवरील स्वयंचलीत फवारणी यंत्रावर. ते तिथे जातात. प्रयोग साकारणा-या विद्यार्थीनीकडून प्रयोगाची माहिती घेतात. त्या प्रयोगाचा उद्देश व विद्यार्थीनीची पार्श्वभूमी जाणुन घेतल्यावर त्या विद्यार्थीनीच्या पाठीवर कौतुकाने हात फिरवतात. हा प्रसंग घडला मुंबई येथे सुरू असलेल्या भारतीय विज्ञान परिषदेच्या कार्यक्रमात. अन ती विद्यार्थीनी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्याची. शहरालगत असलेल्या खापरी या लहान खेड्यातील शेतकरी संजय गोडे यांची मुलगी अंजली. घाटंजीतील शि.प्र.मं.कन्या शाळेतील दहाव्या वर्गाची विद्यार्थीनी. राष्ट्रीय स्तरावर तिच्या प्रयोगाची मान्यवरांनी दखल घेतल्याने घाटंजी तालुकाच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्याचाही गौरव वाढला आहे.
मुंबई येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय स्तरावरील इंडीयन सायन्स कॉंग्रेस या विज्ञान प्रदर्शनात घाटंजी येथिल शि.प्र.मं. कन्या शाळेची विद्यार्थीनी अंजली संजय गोडे हिने सादर केलेल्या सायकलवरील स्वयंचलीत फवारणी यंत्र या प्रयोगाने अनेक मान्यवरांचे लक्ष वेधले. या प्रदर्शनीमध्ये अंजलीचा हा अभिनव व शेतक-यांसाठी उपयोगी असलेला हा प्रयोग चर्चेचा विषय ठरला आहे. 
देशाचे माजी राष्ट्रपती व ख्यातनाम वैज्ञानिक डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते चिल्ड्रन सायन्स कॉंग्रेसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी अंजलीच्या प्रयोगाची पाहणी केली. या प्रयोगाची संपुर्ण माहिती त्यांनी घेतली. शेतक-यांसाठी अत्यंत उपयोगी ठरू शकणा-या या प्रयोगासाठी अंजली गोडे व तिचे मार्गदर्शक शिक्षक अतुल ठाकरे यांचे डॉ.कलाम यांनी विशेष कौतुक केले. त्याच प्रमाणे नोबेल पारितोषीक विजेते कैलाश सत्यार्थी यांनीही या प्रयोगाची पाहणी करून अंजलीला शाबासकी दिली.
मुंबई येथे सुरू असलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान परिषदेचे ३ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मान्यवर यावेळी उपस्थित होते. या परिषदेमध्ये नोबेल पारितोषीक विजेते मान्यवर, प्रसिद्ध वैज्ञानिक, विवीध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला आहे. या विज्ञान मेळाव्यात देशभरातील प्रतिभावान विद्यार्थी सहभागी झाले असुन अंजली संजय गोडे हि महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करीत आहे. जिल्हा, राज्य, व राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये उल्लेखनिय कामगिरी केल्याने भारतीय विज्ञान परिषदेत तिला निमंत्रित करण्यात आले आहे. घाटंजी तालुक्यातील खापरी या छोट्याशा गावातील शेतकरी कन्येने राष्ट्रीय स्तरावर केलेली कामगिरी कौतुकाचा विषय ठरली आहे.


कृषी क्षेत्रातच करीयर करणार
भविष्यात कृषी विज्ञान क्षेत्रातच शिक्षण घेऊन शेतक-यांसाठी उपयोगी ठरणारे संशोधन करण्याचा मानस अंजली गोडे हिने सकाळ शी बोलतांना व्यक्त केला. वडील शेतकरी असल्याने आधी पासुनच शेतीविषयी आवड आहे. या प्रयोगासाठी वडील संजय गोडे यांनी त्यांच्या अनुभवातून केलेले मार्गदर्शन खुप उपयोगी ठरले. राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान परिषदेत येऊन बरेच काही शिकायला मिळाले तसेच प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशिर्वाद मिळाला असे ती म्हणाली. शेतक-यांनी निसर्गाच्या लहरीपणामुळे खचुन न जाता आधुनिक तंत्रजानाच्या मदतीने शेती करण्याला प्राधान्य द्यावे. तसे झाल्यास शेतक-यांवर आत्महत्येची पाळी येणार नाही.
अंजली गोडे

खुप काही शिकायला मिळाले
अंजलीच्या या प्रयोगाला मार्गदर्शन करीत असतांना माझ्याही जानात भर पडली. जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात सहभागी होता आले. शिवाय या ठिकाणी अनेक नामवंत मान्यवरांचे मार्गदर्शन मिळाले. अंजलीमध्ये आता प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला आहे. या दरम्यान आलेल्या अनुभवांचा फायदा भविष्यात शाळेतील ईतर विद्यार्थीनींसाठी करता येईल
अतुल ठाकरे
मार्गदर्शक शिक्षक


शाळेसाठी गौरवाचा क्षण !
अंजलीने विजान क्षेत्रात घेतलेली भरारी शाळेसाठी गौरवास्पद आहे. या प्रयोगाची संकल्पना प्रथम दर्शनी जरी साधी वाटत असली तरी त्याची उपयोगीता खुप आहे. भविष्यात शेतक-यांसाठी हे संशोधन महत्वाचे राहील. अंजलीच्या या यशामुळे शाळेतील विद्यार्थीनींना प्रेरणा मिळेल.
सौ.के.पी.महाकाळकर
मुख्याध्यापीका, शि.प्र.म.कन्या शाळा

अंजलीच्या यशाचा अभिमान वाटतो

आमची वर्गमैत्रिण आज राष्ट्रीय स्तरावर गेली असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. अंजलीची जिद्द, परिश्रम व प्रयोगाचा उद्देश कौतुकास्पद आहे. आम्हालाही तिच्याकडून खुप काही शिकता येईल.
नेहा अवचित
वर्गमैत्रिण


स्वयंचलीत फवारणी यंत्र शेतक-यांसाठी वरदान
सायकलवर चालणारे हे स्वयंचलीत फवारणी यंत्र शेतक-यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. अवघ्या अडीच ते ३ हजार रूपयात हे यंत्र तयार होते. शिवाय र्इंधन विरहित असल्याने पैश्याच्या बचतीसोबतच पर्यावरणासाठीही हानीकारक नाही. सायकलच्या पॅडल द्वारे दाब निर्माण करून वेगवेगळ्या १० नोझल्स द्वारे फवारणी करता येऊ शकते. विषेश म्हणजे सायकलची गती कमी असली तरी फवारणी होऊ शकते. केवळ एक व्यक्तीच सायकल चालवुन फवारणी करू शकत असल्यामुळे मजुराची गरज नाही. तसेच फवारणी मागील बाजुस होत असल्यामुळे रासायनिक द्रव्य अंगावर पडण्याचा धोका कमी आहे. फवारणीसाठी शेतक-यांना ईलेक्ट्रीक फवारणी यंत्राचे भाडे, र्इंधन व मजुरी असा खर्च लागतो. मात्र या अत्यल्प खर्चातील स्वयंचलीत यंत्राने शेतक-यांना किफायतशीर दरात फवारणी करता येऊ शकते.

अंजलीच्या प्रयोगाची राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी घेतलेली दखल
( बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा )

The Indian Express
Teen invents pump on cycle for farmers, gets a pat from Abdul Kalam


Hindustan Times
Yavatmal schoolgirl's agricultural innovation appreciated by Dr Abdul Kalam


DNA ( Daily News & Analysis )
Yavatmal girl receives praise from former president Dr APJ Abdul Kalam for her project


The Asian Age
‘Create technology for welfare’

The Hindu
A scientist demonstrates her project to former President A.P.J. Abdul Kalam


महाराष्ट्र टाईम्स
पिकांवर फवारणीसाठी ‘सायकल पंप’
गरजू शेतकऱ्यांसाठी यवतमाळच्या अंजलीचा अविष्कार

लोकसत्ता
देशाला दर्जेदार नेतृत्त्वाची गरज

सकाळ
कल्पनांच्या पंखावर घ्या भरारी !

लोकमत
पैशासाठी विज्ञान अभ्यास नको

दैनिक ट्रिब्युन
छोटा पंप करे कमाल

IBN Lokmat

Friday, 28 December 2012

घाटंजी येथे शिक्षक मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन



यवतमाळ जि.प.प्राथमिक शिक्षक संघ र.न.२३५ शाखा घाटंजीचे वतीने तालुकास्तरीय शिक्षक मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन दि.३० डिसेंबरला स्थानिक जलाराम मंदिरात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजुदास जाधव राहतील. यावेळी पं.स.सभापती शैलेष इंगोले, जि.प.सदस्य योगेश पारवेकर, उषा राठोड, पं.स.उपसभापती सुवर्णा निकोडे, सदस्य रूपेश कल्यमवार, रमेश धुर्वे, सुमित्रा पेंदोर, रत्नमाला कोंडेकर, गटविकास अधिकारी अजय राठोड, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके, विनोद गोडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात शिक्षकांच्या विवीध प्रलंबीत समस्यांवरही चर्चा होणार आहे. तालुक्यातील सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाला आवर्जुन हजर राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत, दिपक चौधरी, विजय डंभारे, शेख जलिल, नारायण भोयर, संजय इंगोले, काशिनाथ आडे, ज्ञानेश्वर पुसनाके, लक्ष्मण कुडमेथे, राजु हेमके, रामेश्वर भांडारवार, अशोक जिल्लडवार, सुभाष ठाकरे, किशोर मुनेश्वर, बाळु पवार, दिलीप संगनवार, मोहम्मद खान, आकाश ठाकरे, महादेव सोनटक्के, सुरेश वरगंटवार, अविनाश खरतडे यांनी केले आहे.
साभार :- देशोन्नती 

Saturday, 15 September 2012

आठवडाभरापासुन बेपत्ता युवकाच्या तपासात पोलीसांना यश नाही

घाटंजीवासियात तिव्र संताप

गेल्या आठवडाभरापासुन बेपत्ता असलेल्या यश बाबाराव लिंगणवार याच्या प्रकरणात पोलीस कमालीचा दुर्लक्षीतपणा करीत असुन अजुनही त्या युवकाचा शोध लागलेला नाही. या प्रकरणात संशयाची सुई असलेल्या आरोपी युवकांच्या तपासणीतूनही काहीही निष्पन्न झाले नसल्याने अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. आठ दिवसांपासुन यशचा ठावठिकाणा पोलीसांना लागलेला नाही. या प्रकरणात पोलीस तपासात अजिबात गांभिर्य नसुन कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचलेले नाहीत. यश हा यवतमाळ येथिल बाजोरीया नगरातून बेपत्ता झाला आहे. तो मुळचा घाटंजी येथिल रहिवासी आहे. त्यामुळे घाटंजी वासियांमध्ये पोलीस तपासाबाबत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. घाटंजी येथिल नाभिक संघटना तसेच व्यापारी संघटना याप्रकरणी आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
साभार :- देशोन्नती