Pages

Friday 29 July 2011

खुर्चीच्या प्रेमासाठी पत्नीला दिली ‘सोडचिठ्ठी'



प्रेम कधी कुणावर होईल याची शाश्वती कुणीच देऊ शकत नाही असे म्हणतात. मग त्यापुढे सामाजीक संकेताचीही पर्वा केल्या जात नाही. आपल्या सभोवताल असे किस्से घडतच असतात. मात्र कुणी सत्तेच्या खुर्चीवर बसण्यासाठी जन्मजन्मांतरीच्या बंधनालाच कात्री लावत असेल त्याला काय म्हणावे. मात्र आजच्या युगात हे घडतंय हि आत्मचिंतनाची बाब आहे. घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत नामांकन रद्द झालेल्या उमेदवारांनी निवडणुक रिंगणात राहण्यासाठी अशा युक्त्या वापरल्याने ‘सत्तेसाठी वाट्टेल ते' चा प्रत्यय येत आहे. बाजार समितीत विद्यमान संचालक असलेल्या एका उमेदवाराचा नामांकन अर्ज छाननी दरम्यान रद्द झाला. पत्नीच्या नावाने अडत परवाना असल्यामुळे त्यांनी जुन्या मुद्रांकाच्या आधारे पत्नीशी एक वर्षापुर्वीच घटस्फोट झाल्याचे दाखविले. त्याचप्रमाणे एकेकाळी बाजार समितीच्या सभापतीपदी असलेल्या एका उमेदवाराचा अर्ज मुलाच्या नावे अडत परवाना असल्याने अवैध ठरविण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी अविवाहीत मुलाला कागदोपत्री चक्क घराबाहेर काढले. एकंदरीतच मानवी भावनांना छेद देणा-या अशा घटनांमुळे समाजात एक वेगळाच संदेश जात आहे. एखादी गोष्ट कायद्याच्या चौकटीत बसविण्यासाठी अशा पळवाटा शोधणा-या वकीली मेंदुचे कौतुकच करावे लागेल. कागदोपत्री घटस्फोटाने ते वेगळे झाले नाहीत किंवा त्या मुलाने वेगळा संसार थाटला नाही. परंतु या कागदी उठाठेवीमुळे आपला वैचारीक स्तर किती खालावलेला आहे याचा प्रत्यय येतो.  नातेसंबंधाला काटेकोरपणे जपणा-या आपल्या समाजात आता अशा घटना होऊ लागल्याने येणा-या काळात आणखी काय बघावे लागेल 
याचा नेम नाही.

अखेर बाजार समितीच्या दिग्गजांना दिलासा

घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत नामांकन अर्ज छाननीदरम्यान दोन्ही प्रमुख गटांची भिस्त असलेल्या दिग्गज उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. निवडणुकीबाहेर झालेल्या १७ पैकी ८ उमेदवारांनी त्याविरोधात अपील केले होते. जिल्हा उपनिबंधकांनी निवडणुक निर्णय अधिका-यांचा आदेश रद्द करून त्यांचे अर्ज कायम ठेवल्याने मोघे-लोणकर व पारवेकर गटाला दिलासा मिळाला आहे. आशिष लोणकर, प्रकाश डंभारे, सुरेश भोयर, चंद्रप्रकाश खरतडे, पांडूरंग सिदुरकर, माया पवार, इकलाख खान हे निवडणुकीत कायम राहिल्याने दोन्ही प्रमुख गटांवर आलेले संकट टळले आहे. सचिन पारवेकर व सैय्यद रफिक यांचे अर्ज छाननीमध्ये मंजुर झाले होते. मात्र त्यांच्या उमेदवारीविरोधात जिल्हा उपनिबंधकांकडे अपील करण्यात आले होते. मात्र ते फेटाळण्यात आले. आता १ ऑगस्टला नामांकन परत घेण्याची अंतिम तारीख असुन त्याचदिवशी चिन्ह वाटप होणार आहे.

No comments:

Post a Comment