Pages

Monday, 18 June 2012

अवैध वाहतुकीने घेतला नवयुवकाचा बळी

पारवा पोलीसांच्या नाकर्तेपणाचा परिणाम

पारवा पोलीस स्टेशन हद्दीसह संपुर्ण घाटंजी तालुक्यात बिनबोभाटपणे सुरू असलेल्या अवैध वाहतुकीमुळे 
१५ वर्षीय नवयुवकाचा बळी घेतला. आयता येथुन घाटंजीकडे येताना अज्ञात काळी पिवळीने दुचाकीला धडक दिल्याने अभिजीत अशोक खडसे (१५) याचा उपचाराकरीता यवतमाळला नेतांना दुर्दैवी मृत्यू झाला. सदर युवक आपल्या मित्राच्या दुचाकीवर दुपारी १२ वाजताच्या सुमारास घाटंजीकडे येत होता. यादरम्यान पाटापांगरा गावाजवळ काळी पिवळीने दुचाकीला धडक दिली. या भिषण धडकेत जखमी झालेल्या दोन्ही युवकांना उपचारासाठी यवतमाळला नेण्यात आले. मात्र अभिजीत याचा रूग्णालयात नेतांना वाटेतच मृत्यू झाल्याची माहिती आहे. उल्लेखनिय म्हणजे अपघाताला ६ तास लोटुनही पारवा पोलीसांकडे घटनेची नोंद झाली नव्हती. यावरूनच पोलीस याबाबत किती गंभिर आहेत याची प्रचिती येते. घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर व पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंजाब वंजारे यांनी अवैध वाहतुकीला खुली सुट दिल्याने प्रवाशी वाहनांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशी नेण्यात येतात. गाडीच्या टपावर व अवतीभवती बिलगुन असलेले प्रवाशी वाहने घाटंजी तालुक्याच्या प्रत्येक रस्त्यावर आढळतात. पोलीस प्रशासनाचा कुठलाही वचक त्यांचेवर असल्याचे दिसत नाही. घाटंजी व पारव्याच्या बसस्थानकासमोर नेहमीच अवैध वाहतुकदारांचा गराडा असतो. अनेकदा वाहतुक पोलीसांच्या नजरेसमोर बसस्थानक परिसरातून प्रवाशी घेतल्या जातात. मात्र त्याकडे पोलीसांकडून दुर्लक्ष केल्या जात असल्याची माहीती आहे. ठाणेदारांकडून जसा आदेश मिळतो त्याचेच पालन करावे लागत असल्याचे एका वाहतुक पोलीसाने खासगीत सांगीतले. अवैध वाहतुकदारांकडून पोलीसांना महिन्याकाठी मिळणा-या मलिद्यामुळेच बेशिस्त वाहतुकीला मोकळीक दिल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. 
मात्र त्यामुळे सर्वसामान्यांचा जीव धोक्यात आला असुन यावर वेळीच नियंत्रण न आणल्या गेल्यास यापेक्षाही गंभिर घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अवैध वाहतुकीला चालना देणा-या ठाणेदारांवर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
साभार :- देशोन्नती 

Thursday, 14 June 2012

वन्यजीव संरक्षण कायदा धाब्यावर बसवुन होतात सापांचे खेळ

वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष





वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये साप व तत्सम जीवांना पकडणे, त्यांचे प्रदर्शन करणे, खेळ करणे हा गंभिर गुन्हा आहे. मात्र असे असले तरी घाटंजी तालुक्यातील विवीध भागांमध्ये दुर्मीळ जातीच्या सापांचे खेळ करण्याचा प्रकार हल्ली चांगलाच फोफावला आहे. वनविभाग, पोलीस यंत्रणा यासह वन्यजीवप्रेमींचेही  याकडे दुर्लक्ष होत आहे. घाटंजी शहरातील प्रमुख चौकांमध्ये सध्या सापांचा खेळ करण्याचा प्रकार नित्यनेमाने सुरू आहे. विशेष म्हणजे असे खेळ करतांना चिमुकल्या बालकांचाही वापर होत असुन या लहान मुलांच्या हातात साप देऊन लोकांना खेळाकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो.
नाग, धामण, पाणदिवड यासह विवीध जातीच्या सापांचा खेळात उपयोग केल्या जातो. हा खेळ करणा-यांना सापांविषयी पुरेशी माहिती नसते. त्यामुळे ते हाताळतांना कोणत्याही प्रकारची काळजी घेतल्या जात नाही. कापडी पिशव्यांमध्ये सापांना कोंबुन ठेवल्या जाते. त्यामुळे अनेकदा साप चार दोन दिवसातच दगावतात. सापांच्या खेळामध्ये चिमुकल्या मुलांचा वापर करण्याचा प्रकारही वाढ़ल्याने साप हाताळताना या मुलांच्या जीवाला धोका होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सध्या बालमजुरी विरोधातील अभियान सुरू आहे. मात्र भर चौकामध्ये लहान बालकांचा जीवघेण्या प्रयोगामध्ये उपयोग होत असतांना यंत्रणा मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे हे अभियान केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसुन येत आहे. 
वन्यजीवांचे संरक्षण व्हावे व त्यांचे कुठेही खेळ अथवा प्रदर्शन होऊ नये यासाठी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ हा कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यान्वये साप व अन्य वन्यजीवांना पकडून त्यांचे प्रदर्शन करणा-यांवर गुन्हा दाखल करता येतो. या कायद्याचे पालन व्हावे याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासन, वनविभाग व पोलीस यंत्रणेवर असते. मात्र याबाबत कोणीही गंभिर असल्याचे आढळत नाही. अनेकदा काही जागरूक नागरीक असे खेळ सुरू असतांना वनविभागाला कळवितात मात्र वनविभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनाच या कायद्याबाबत पुरेशी माहीती व गांभिर्य नसल्याने या कायद्याचे खुलेआम उल्लंघन होते. गेल्या काही वर्षात या कायद्यान्वये वनविभागाने तालुक्यात अपवादात्मक स्थितीतही कुणावर गुन्हा दाखल केल्याचे ऐकीवात नाही. नागरीकांनीच याबाबतीत सतर्क राहुन वन्यजीवांचे खेळ सुरू असल्यास वनविभाग अथवा पोलीसांना कळवुन कार्यवाही करण्यास भाग पाडण्याची गरज व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती 

दहावीच्या निकालात घाटंजी तालुका जिल्ह्यात अव्वल


महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शालांत परिक्षेच्या निकालात घाटंजी तालुक्याने ७०.७४ टक्के सरासरी निकालासह जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. 
यावर्षी दहावीच्या परिक्षेसाठी १ हजार ६९६ नियमित व ३३५ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार ६९२ नियमित व ३३५ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी परिक्षेला बसले. यामधुन १ हजार २७१ नियमित व १६३ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ७५.१२ टक्के असुन सरासरी टक्केवारी ७०.७४ टक्के आहे. 
तालुक्यातून रा.चि.उपलेंचवार विद्यालय आमडी या शाळेचा सर्वाधीक ९६.५५ टक्के निकाल लागला असुन शिवाजी माध्यमिक विद्यालय देवधरी या शाळेचा सर्वात कमी ९.९ टक्के निकाल लागला आहे.
समर्थ विद्यालयातील सुजाता वसंत शेलुकार हिला ९४.९१ टक्के गुण मिळाले आहेत. याच विद्यालयातील शिवाणी विजय पातालबंसी हिला ९०.३७ टक्के व माधुरी शंकर डंभारे हिला ९० टक्के गुण मिळाले आहेत. 
तालुक्यातील ईतर शाळांचा निकाल खालील प्रमाणे आहे. शि.प्र.मं.विद्यालय घाटंजी ७३.३३ टक्के, श्री समर्थ विद्यालय घाटंजी ६३.३७ टक्के, शि.प्र.मं.कन्या शाळा घाटंजी ५८.६५ टक्के, बा.दे.विद्यालय पारवा ७७.०२ टक्के, वसंत आदिवासी विद्यालय पार्डी नस्करी ७८.४३ टक्के, बा.दे.विद्यालय शिरोली ६३.४१ टक्के, शासकीय आश्रमशाळा झटाळा ६८.०९ टक्के, जगदंबा विद्यालय सायतखर्डा ८६.९६ टक्के, शासकीय आश्रमशाळा जांब ५५.१० टक्के, कै.मंजी नाईक विद्यालय किन्ही ९२.३१ टक्के, न.प.उर्दू विद्यालय घाटंजी ६४.७१ टक्के, बा.दे.विद्यालय कुर्ली ६८.५७ टक्के, विवेकानंद विद्यालय पांढुर्णा ९२.४२ टक्के, म.ज्यो.फुले विद्यालय एरंडगाव ६७.४४ टक्के, कै.माधवराव नाईक विद्यालय शिवणी ६९.२३ टक्के, कै.किसनसिंग सिद्धु विद्यालय राजुरवाडी ४८.०८ टक्के, मनोहर नाईक विद्यालय मोवाडा ५६.८६ टक्के, बा.दे.विद्यालय साखरा ८२.२६ टक्के, कै.किसनसिंग सिद्धु विद्यालय सावरगाव ७६ टक्के, गुरूदेव आश्रमशाळा चांदापुर ७१.८८ टक्के, श्यामाप्रसाद मुखर्जी विद्यालय घोटी ७५ टक्के, आदर्श विद्यालय ताडसावळी ९१.६७ टक्के, मजीद पटेल उर्दू विद्यालय चिखलवर्धा ८१.८२ टक्के, शासकीय आश्रमशाळा कारेगाव ८३.३३ टक्के, आबासाहेब देशमुख पारवेकर आश्रमशाळा जरूर ९१.६७ टक्के, जिजाऊ आश्रमशाळा खापरी ५० टक्के, शासकीय आश्रमशाळा मोवाडा ४४.४४ टक्के, शासकीय आश्रमशाळा रामपुर ८६.६७ टक्के, दत्त माध्यमिक विद्यालय अंजी ८१.८२ टक्के, श्री. गजानन महाराज विद्यालय कोळी ८०.४९ टक्के.
शहरी भागातील शाळांपेक्षा ग्रामिण भागातील शाळांचा निकाल चांगला लागला असुन कॉपी सेंटर म्हणुन कुप्रसिद्ध असलेल्या काही शाळांचा निकालही घसरला आहे.
साभार :- देशोन्नती 

Friday, 8 June 2012

पारवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची तिव्रता दडपण्याचा प्रयत्न

सव्वा लाखांची चोरी ७२ हजारात दडपली
ठाणेदार वंजारेंचा मनमानीपणा
पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

घरात झालेल्या १ लाख ३१ हजार रूपयांच्या चोरीची तक्रार घेताना केवळ ७२ हजार रूपयांचीच चोरी झाल्याची नोंद घेणा-या ठाणेदार पंजाब वंजारेंची पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे. पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्याची तिव्रता कमी करून  बर्किंगचे प्रकार वाढल्याचे या घटनेतून प्रकर्षाने दिसुन येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील वघारा येथिल रहिवासी शेख मोईन शेख हुसेन हे एका कौटूंबीक कार्यक्रमानिमित्य ३ दिवस बाहेरगावी गेले होते. दि.२८ मे रोजी घरी परत आल्यावर घराचे कुलूप तुटून होते, सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाट फोडून लॉकरमधील ३५ हजार रूपये रोख, मोबाईल तसेच आणखी दुस-या कपाटातील ९३ हजार रूपये असा एकुण १ लाख ३१ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. वघारा हे गाव पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने तक्रारकर्ते चोरीची फिर्याद नोंदविण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले. तोंडी तक्रारीवरून फिर्याद दाखल करतांना ठाणेदार पंजाब वंजारे यांच्या सांगण्यानुसार संबंधीत कर्मचा-याने तक्रारीत केवळ ७२ हजार रूपयेच चोरीस गेल्याचा उल्लेख केला. तक्रारकत्र्यांनी वारंवार सांगीतले की, आमच्या घरी १ लाख ३१ हजार रूपयांची चोरी झाली आहे. त्यामुळे तेवढीच रक्कम तक्रारीत नोंद करा. मात्र आपल्याच गुर्मीत वावरणारे ठाणेदार वंजारे यांनी तक्रारकर्त्यांना ‘तुम्हाला काही समजत नाही, आम्ही बरोबर करतो, तुम्ही चुप बसा’ असे बजावले. त्यानंतर एकदा घरी येऊन थातुरमातुर चौकशी केली. मात्र अद्याप चोरट्यांना पकडण्यात पोलीसांना यश आलेले नाही. गेल्या काही कालावधीत पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीच्या अनेक घटना झाल्या असुन बहुतांश घटनांमधील आरोपी पोलीसांच्या हाती लागलेले नाही. जवळजवळ प्रत्येक घटनेमध्ये गुन्ह्याची तिव्रता कमी करण्याचा प्रकार पोलीस स्टेशनमध्ये वाढला आहे.
चोरीच्या घटनेचा तपास करण्यासाठी बोलाविण्यात येणा-या श्वानपथकासाठी खर्च लागतो असे कारण देऊन फिर्यादींकडून पैसे उकळल्या जात असल्याची खासगीत चर्चा आहे.
ठाणेदार पंजाब वंजारे यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आश्रय देण्याच्या कार्यपद्धतीमुळे पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध व्यवसाय बळावले आहेत. त्यामुळे ठाणेदार वंजारेंची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
साभार :- देशोन्नती 

तालुका कृषी अधिकारी घुलेंच्या भ्रष्टाचाराची सि.आय.डी. चौकशी करा

घाटंजीत शेतक-यांच्या धरणे आंदोलनातील मागणी



येथिल तालुका कृषी अधिकारी पी.पी.घुले यांनी केलेल्या लाखोंच्या भ्रष्टाचाराची सि.आय.डी.मार्फत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी घाटंजी तहसिल कार्यालयासमोर शेकडो शेतक-यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले. विदर्भ जन आंदोलन समितीचे मोरेश्वर वातिले यांचे नेतृत्वात तहसिलदारांना विवीध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधीत करतांना वातिले यांनी तालुका कृषी अधिकारी पी.पी.घुले यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीवर सडकुन टिका केली. ज्या कार्यालयात शेतक-यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अधिकारी कर्मचा-यांनी तत्पर राहावयास हवे तिथे नेहमीच शेतक-यांना अपमानास्पद वागणुक दिल्या जाते. तसेच शासनातर्फे शेतक-यांसाठी राबविण्यात येणा-या बहुतांश योजना घाटंजी तालुक्यात कागदोपत्रीच राबविल्या जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. कृषी विस्तारासाठी साहाय्य देण्यासाठी असलेल्या ‘आत्मा’ या योजनेत शेतक-यांना लाभ देतांना लाखो रूपयांचा गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे या योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणीच झालेली नाही असे वातिले यांनी यावेळी सांगितले. घाटंजीच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कोणत्याही योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर अधिका-यांच्या आशिर्वादाने वावरणा-या एजंटांच्या माध्यमातूनच संपर्क करावा लागतो. अन्यथा लाभ देण्यास टाळाटाळ करण्यात येते. राजकीय पुढा-यांच्या चेल्याचपाट्यांना पात्र नसतांनाही योजनांचे लाभ दिल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे पी.पी.घुले यांच्या घाटंजी तालुक्यातील कार्यकाळा दरम्यानच्या कारभाराची सि.आय.डी.मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी लावुन धरली. जयवंत भोयर, राजु राठोड, संदिपसिंग ढालवाले, राजु राठोड, संदिपसिंग ढालवाले, यांनीही यावेळी उपस्थितांना संबोधीत करतांना कृषी विभागाच्या भोंगळ कारभारावर तिव्र शब्दात नाराजी व्यक्त करून चौकशीची मागणी केली. कृषी विभागाने शेतक-यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, योजना राबवितांना ग्रामसभेच्या ठरावामध्ये मंजुर कराव्या अशा विवीध मागण्या यावेळी देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. या मागण्यांची दखल न घेतल्यास विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती यांच्या कार्यालयासमोर ५ जुलै पासुन आमरण उपोषण करण्याचा ईशाराही देण्यात आला आहे.
या आंदोलनात  किरण जवादे, विष्णु कोरवते, अमरदिपसिंग ढालवाले, संदिप खवास, रमेश पडलवार, अमोल पडलवार, विकास धुर्वे, अरूण कुडमते, लक्ष्मण आत्राम, अमुत करमनकर, अरूण सिडाम यांचेसह अनेक शेतक-यांनी सुमारे तिन तास धरणे दिले.

साभार :- देशोन्नती