Pages

Monday, 7 November 2011

घाटंजीतील पक्षांतराच्या पार्श्‍वभूमीने निवडणुकीची उत्सुकता शिगेला

नगरपरिषद निवडणुकीची चाहुल लागताच शहरात पक्षांतराच्या फैरी सुरू झाल्या. ही पार्श्‍वभूमी निवडणुकीपूर्वी तयार झाल्याने अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशा स्थितीत उमेदवार शोधताना नेत्यांची दमछाक होत असल्याचे दिसून येते.
नगरपरिषदेत १७ सदस्यांसाठी निवडणूक होत असून अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असल्याने अध्यक्षपदावर दावेदारी करणार्‍यांमध्ये घमासान होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. सध्या पालिकेत काँग्रेसकडे दोन, राष्ट्रवादी सहा, भाजप सहा व शिवसेनेचे तीन नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाची युती होऊन अडीच वर्ष भाजपने वर्चस्व गाजविले. नंतरचे अडीच वर्ष राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष असेल असे युतीत ठरले होते. परंतु अध्यक्षपदाचे आरक्षण बदलले आणि शिवसेनेच्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील वच्छलाबाई धुर्वे यांना संधी मिळाली. भाजपा व राकाँ युती केवळ आकड्यांपुरतीच र्मयादित राहिली. सदस्यांचे मनोमिलन न झाल्यामुळे या काळात विकासाला प्रचंड खिळ बसला. यापूर्वी घाटंजी पालिका ही काँग्रेस आणि उदयास आलेल्या विविध आघाड्यांच्या ताब्यात होती. परंतु मागच्या निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारली. तसेच राष्ट्रवादीनेही संख्याबळ वाढवून दिले. मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. ना. शिवाजीराव मोघे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश लोणकर राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्यामुळे वेळेवर तयार होणार्‍या समीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालिकेत काँग्रेसच्या गटनेत्या संगीता भुरे व भाजपच्या माजी नगराध्यक्ष शांताबाई खांडरे यांचाही राष्ट्रवादी प्रवेश होणार अशी चिन्हे दिसू लागली आहे. नव्या समीकरणात तालुक्यातील दोन दिग्गज नेते माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर व सुरेश लोणकर एकत्र आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अशी सरळ लढत होण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर काँग्रेसची कमान जगदीश पंजाबी व सुभाष गोडे तर राष्ट्रवादीमधून जितेंद्र ठाकरे, अरविंद भुरे यांच्याकडे आहे. शिवसेनेचा धनुष्य शैलेश ठाकूर यांनी उचलला आहे. तसेच भाजपची धुरा राजू सुचक, मधुसुदन चोपडे सांभाळीत आहेत. काही दिवसांपूर्वी घाटंजी येथे भाजपा खासदार हंसराज अहीर यांनी पालिका निवडणूक भाजप-सेना युती लढवेल असे सांगितले. त्यासंदर्भात भाजपचे वरिष्ठ नेते भाऊसाहेब फुंडकर व आमदार दिवाकर रावते यांच्या बैठकी झाल्या. सध्या राष्ट्रवादीतून श्याम बेलोरकर, शांताबाई खांडरे, भाजपमधून दुर्गा साखरकर, काँग्रेसमधून माया मंगाम, सुभाष गोडे व जगदीश पंजाबी, अर्चना गोडे, मधुकर पेटेवार, दादा चिव्हाणे, चंदू तुराळे, शिवसेनेतून वच्छलाबाई धुर्वे आदी माजी नगराध्यक्ष उतरणार असल्याचे दिसून येते. तसेच काँग्रेसतर्फे किशोर दावडा, परेश कारिया, संदीप बिबेकार, शोभा ठाकरे, मो. मोफीन, नंदू धनरे, राष्ट्रवादीकडून संगीता भुरे, प्रकाश भोरे, महेश गुप्ता, बेबी तलमले, चंद्रकांत ढवळे, अजय पालतेवार, राम खांडरे, ओम बाजपेयी, विठ्ठल बिजेवार, ताई भोंग, ताई धांदे, अकबर तंवर, ताई खोब्रागडे, ताई परतेकी, शर्मीला उदार, सिंधु सिरपुरे, ताई ठाकरे, आनंद मडावी, संतोष गेडाम, सेनेकडून शैलेश ठाकूर, सरोज पडलवार, संदीप बुल्ले, स्वरूप नव्हाते, ताई रामटेके, ताई कोडापे, सैयद फिरोज, ताई गिनगोले, संतोष शेंदरे, दिनेश उईके यांची नावे चर्चेत आहेत. असे असले तरी अनेक प्रभागांमध्ये राजकीय नेत्यांना अपेक्षित उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे शोध मोहीम जोमाने सुरू असल्याचे पहावयास मिळते.
विठ्ठल कांबळे 
साभार:- दै.लोकमत

Saturday, 5 November 2011

click to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own text

"घाटंजी न्युज"ला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद.....!
अवघ्या काही महिन्यात "घाटंजी न्युज" ब्लॉगने तब्बल ११ हजार वाचकांचा पल्ला ओलांडलाय. आपल्या घाटंजीतील प्रत्येक घडामोडींची बातमी आपल्यापर्यंत अशाच प्रकारे यापुढेही येत राहील. "घाटंजी न्युज" वरील आपल्याला आवडलेल्या "लिंक्स" Like व Share करून ते ईतरांच्याही वाचनात येईल याचा प्रयत्न करा. तसेच Facebook, Orkut, Twitter वरील आपल्या मित्राना "घाटंजी न्युज"शी Connect करा.
ब्लॉगवर त्यासाठी सुविधा देण्यात आली आहे. 

घाटंजीकर व ईतर सर्व हितचिंतकांचे मनस्वी आभार............!

Friday, 4 November 2011

शेती नसतांनाही दिले पिक कर्ज....!

घाटंजी तालुक्यात ‘लोन रॅकेट’ सक्रिय?
नावावर शेती नसतानांही येथिल स्टेट बँकेच्या शाखेतुन पिक कर्ज दिल्याची बाब पुढे आल्याने घाटंजी तालुक्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज मिळवुन देणारी टोळी सक्रीय असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
आकपुरी (ता. यवतमाळ) येथिल त्रिवेणी विजय सातपुते या महिलेला तिच्या नावे शेती नसतांनाही चक्क ५५ हजार रूपयांचे पिक कर्ज देण्यात आले. भारतीय स्टेट बँकेच्या घाटंजी शाखेत फिल्ड ऑफिसर पदावर कार्यरत राहुल लेंडारे यांचेकडे कर्ज वितरणाची संपुर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून बनावट सातबा-याच्या आधारावर पिक कर्ज मंजुर करून दिले असा आरोप करण्यात येत आहे. उल्लेखनिय म्हणजे सौ.सातपुते व लेंडारे हे आकपुरी येथिल निवासी आहेत. त्यामुळे लेंडारे यांना सातपुते यांच्या शेतीबाबत माहिती नसेल असे नाही. कर्ज प्रकरणासाठी सादर करण्यात आलेला आकपुरी येथिल गट क्रं. १२२/१ या शेताचा सातबारा दुर्गादास शामराव मार्कंड यांच्या नावे तर मौजा झुली येथिल गट क्र. १२२/१चा सातबारा सोमन्ना पेठकर चव्हाण यांच्या नावाचा आहे. या सातबा-याच्या सत्यतेबाबत कोणतीही पडताळणी न करता राहुल लेंडारे यांनी हे कर्ज तातडीने मंजुर करून दिले. या बनवाबनवीची पोलीस स्टेशनला तक्रार करताच त्रिवेणी सातपुते यांनी या सर्व प्रकाराची कबुली देऊन उचललेल्या रकमेचा भरणा केला. असे असले तरी बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज उचलणे तसेच त्यासाठी सहकार्य करणे या आरोपाखाली त्रिवेणी सातपुते अथवा राहुल लेंडारे यांचे विरोधात घाटंजी पोलीसांनी गुन्हा सुद्धा दाखल केलेला नाही. ग्रामिण भागात अशा प्रकारे कर्ज मिळवुन देणा-या एजंटांचे मोठे नेटवर्क  तयार झाले असुन त्यांचे जवळ बनावट कागदपत्रे तयार करण्याचे तंत्र उपलब्ध आहे. तलाठ्यापासुन तहसिलदारापर्यंत सर्वांचे बनावट शिक्के या टोळ्यांजवळ उपलब्ध आहेत. त्या आधारेच बँक कर्मचा-यांच्या माध्यमातुन कर्ज मिळवुन देण्याचा प्रकार आता राष्ट्रीयीकृत बँकामध्ये सुद्धा फोफावला आहे. या प्रकरणात पोलीसांनी राहुल लेंडारे याची सखोल चौकशी केल्यास मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता आहे.
साभार :- देशोन्नती

घाटंजी नगर परिषदेत अस्तित्व टिकविण्यासाठी शिवसेनेची ‘केविलवानी’ धडपड

अखेर बहुप्रतिक्षीत नगर परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले. येत्या ८ डिसेंबरला नागरीक आपले शहर कोणाच्या हातात द्यायचे याचा निर्णय घेणार आहे. सर्वच राजकीय पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले असुन आपापल्या स्तरावर प्रयत्न करीत आहेत. गेली अडीच वर्षे सत्ता उपभोगलेल्या शिवसेनेने न.प.निवडणुकीत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी अत्यंत केविलवानी धडपड सुरू केल्याचे निदर्शनास येत आहे. घाटंजी शहरासाठी व येथिल नागरीकांसाठी गेली दोन अडीच वर्षे जे केले नाही ते अवघ्या एका महिन्यात करण्याचा खटाटोप नगर परिषदेतील शिवसेनेचे पदाधिकारी करीत आहेत. आचार संहिता लागण्याच्या महिनाभर आधी शहरातील विवीध भागात रस्ते व नाल्यांची कामे एवढ्या वेगाने सुरू करण्यात आली की, मतदान करायला नागरीक त्या रस्त्यावरूनच जाईल की काय अशी परिस्थिती आहे. या धडपडीत बांधण्यात येत असलेल्या रस्त्याचा दर्जा काय असेल याचा विचार न केलेलाच बरा. निवडणुक तोंडावर आल्यामुळे गेल्या काही दिवसात शिवसेनेने वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्याची वर्तमानपत्रातुन प्रसिद्धी करण्याचा सपाटाच लावला आहे. जनतेच्या मनात खदखदत असलेल्या या संतापाला प्रसिद्धीची पुंâकर घालण्याचा खटाटोप सध्या सुरू आहे. या नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडे उमेदवारांचीही कमतरता आहे. मागील महिन्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेची उमेदवारी घेण्यास ईच्छुक असलेल्यांना बोलाविण्यात आले होते. मात्र त्याला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे आमदार संजय राठोड यांनीही नाराजी व्यक्त केली होती. ही निवडणुक शिवसेना भाजपासोबत लढणार की स्वतंत्र लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात घाटंजीकरांनी आजवरचे सर्वात निष्क्रीय पदाधिकारी पाहिले. जनतेचे प्रश्न, शहरातील विवीध समस्या व विकास याचेशी काहीही देणेघेणे न ठेवता एकमेकांचे पाय ओढुन आपल्या पदरात मिळेल ते पाडुन घेण्यातच या पदाधिका-यांनी पाच वर्षे घालवली. आता जनतेच्या समोर जाण्याची वेळ आल्याने या ‘आणीबाणीच्या’ विकासकामांचा बेगड लावुन जनतेची दिशाभुल करण्याच्या या प्रयत्नाला मतदार कितपत भिक घालतात हे लवकरच स्पष्ट होईल.
साभार :- देशोन्नती

Wednesday, 2 November 2011

यवतमाळ जिल्ह्यात कापसावर आधारीत उद्योगांची उभारणी व्हावी

खासदार हंसराज अहिर यांचे प्रतिपादन
कापुस उत्पादनात अग्रगण्य असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात कापसावर आधारीत उद्योगांची उभारणी व्हावी याकरीता कॉटनसेझ होणे अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन खासदार हंसराज अहिर यांनी केले.
घाटंजी येथे भा.ज.प. कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी आहे. मात्र त्यांना त्या तुलनेत मोबदला मिळत नाही. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. घाटंजी नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत शिवसेना व मित्रपक्षांशी समन्वय राहीला तर एकत्र निवडणुक लढवु अन्यथा स्वतंत्र निवडणुक लढण्यास भाजप सक्षम आहे असा दावा त्यांनी केला.
घाटंजी नगर परिषद जुनी असुनही त्या तुलनेत प्रगतीच्या दृष्टीने बरीच मागे असल्याचे ते म्हणाले. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीही पक्ष सज्ज असल्याचे त्यांनी सांगीतले. घाटंजी शहराच्या सौंदर्यीकरणासाठी उद्यानांची निर्मिती करण्यावर भर देणे गरजेचे असुन त्यासाठी आपण दहा लाख रूपयांचा निधी दिला व आणखी दहा लाख रूपये देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पत्रकार परिषदेला भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्ता कोंडेकर, शहराध्यक्ष राजु सुचक, मधुसूदन चोपडे, सतिष मलकापुरे, मुकुंद कदम, वासुदेव महल्ले, अरविंद बोरकर यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.