Pages

Wednesday, 9 January 2013

माळी समाज उपवर वधु परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद



अ.भा.माळी महासंघ तालुका घाटंजीच्या वतीने आयोजीत जिल्हास्तरीय माळी समाज सर्वशाखेय उपवर वधु परिचय मेळाव्याला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यवतमाळ जिल्ह्यातील विवीध भागांसह नांदेड जिल्ह्यातील किनवट व माहुर तालुक्यातूनही अनेक उपवर वधु व त्यांचे पालक मेळाव्यासाठी आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अ.भा.माळी महासंघाचे विदर्भ मार्गदर्शक ज्ञानेश्वर गोबरे यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र महाडोळे होते. तसेच कार्याध्यक्ष मधुकर उडाखे, पं.स.उपसभापती सुवर्णा निकोडे, ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर, उत्तम खंदारे, आत्माराम जाधव, डॉ.हेमंत म्हात्रे, वसंत निरपासे, झिबल वाढई, प्रा.काशिनाथ लाहोरे, गजानन चौधरी, रामभाऊ किरणापुरे, दत्ता सोनुले, श्री.बेलसरे, दिपक वाघ, अविनाश घाटे, कार्तिक शेंडे, राम भेंडारे, राजेश निकोडे, वासुदेव गुरनूले, संदिप चौधरी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.
उपवर वधु परिचय मेळावे तसेच सामुहिक विवाह मेळावे ही काळाची गरज झाली असुन त्यामुळे सर्वांचाच वेळ व पैसा वाचतो. शिवाय समाज या निमित्ताने संघटीत होत असल्याने एकोप्याची भावना निर्माण होते असा एकमुखी विचार मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. ईतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना व्हावी यासाठी सामाजीक जनजागृती व्हायला पाहिजे. समाजाला आज महात्मा ज्योतीबा फुलेच्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी यावेळी केले.
मानोली येथे विहिरीत पडून मृत्यू पावलेल्या तिन बालकांना सर्व सभागृहाने दोन मिनिटांचे मौन पाळुन श्रद्धांजली अर्पण केली. तसेच राष्ट्रीय क्रिकेट संघामध्ये निवड झालेल्या अतुल गजानन शेंडे याचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान माळी समाज दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. सुभाष मोहुर्ले व भाग्यश्री लेनगुरे यांनी परिचय देऊन कार्यक्रमाची सुरूवात केली. यानंतर अनेक उपवर वधु तसेच त्यांच्या पालकांनी परिचय दिला. कार्यक्रमात नोंदणी झालेल्या उपवर वधुंची यादी सोयरीक या पुस्तक रूपाने प्रकाशीत करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष पांडूरंग निकोडे व संचालन अशोक मोहुर्ले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अ.भा.माळी महासंघाचे झोलबाजी लेनगुरे, श्रीराम बोरूले, रमेश वाडगुरे, चंद्रभान चौधरी, रामकृष्ण सोनुले, देवानंद गाऊत्रे, भारत वाडगुरे, मनोहर वाडगुरे, गजानन लेनगुरे, बंडू निकोडे, संतोष सोनुले, संजय ठाकरे, विठ्ठल चौधरी, किसन गाऊत्रे, नरसिंग गुरनूले, गणेश मोहुर्ले, अजाब लेनगुरे, संतोष गुरनूले, चंद्रभान शेंडे, पुंडलिक वाढई, मोहन कोटरंगे, नागोराव लेनगुरे, मनोहर चौधरी, गुणवंत लेनगुरे, दिगांबर चौधरी, संजय ठाकरे, संतोष मोहुर्ले, रविंद्र शेंडे, पुरूषोत्तम गाऊत्रे, तेजस प्रधान, नामदेव चौधरी, रामेश्वर आदे, दत्ता मोहुर्ले, वासुदेव कावडे, किसन बोरूले, अतुल पेटकुले, शंकर लेनगुरे, प्रविण गुरनूले, रमेश वाडगुरे, प्रकाश मोहुर्ले, सदाशिव ठाकरे यांनी परिश्रम घेतले. 
साभार :- देशोन्नती 

रा.यु.कॉं. घाटंजी शहराध्यक्षपदी संजय ढगले



राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या घाटंजी शहराध्यक्षपदी संजय ढगले यांची नियुक्ती करण्यात आली. यवतमाळ येथे आमदार संदिप बाजोरीया यांच्या कार्यालयात जिल्ह्यातील तालुका व शहर कार्यकारीणींचे गठण करण्यात आले. यावेळी आमदार संदिप बाजोरीया, रा.कॉं.चे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर, रा.यु.कॉं.चे जिल्हाध्यक्ष आशिष मानकर, सुरेश चिंचोळकर, नानाभाऊ गाडबैले, बाळासाहेब इंगोले, क्रांती धोटे यांची उपस्थिती होती.
संजय ढगले हे आपल्या निवडीचे श्रेय ना.मनोहर नाईक, आ. संदिप बाजोरीया, जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर, जि.प.अध्यक्ष प्रविण देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष पाटील, अण्णासाहेब पारवेकर, आशिष मानकर, शंकर ठाकरे, प्रकाश डंभारे, गौतम चौधरी, अण्णाजी ढगले, नामदेव आडे, राम खांडरे, अकबर तंव्वर यांना दिले आहे.
या निवडीचे बाजार समिती सभापती अभिषेक ठाकरे, आशिष लोणकर, संजय राऊत, संजय गोडे, नेताजी राऊत, प्रशांत भुरे, मुन्ना साठे, करण चौधरी, किशोर हेमके, किशोर तेलंग, मोहन ठाकरे व एकविरा मित्र मंडळाने स्वागत केले आहे.
साभार :- देशोन्नती 

घाटंजी तालुक्यात कर्मचा-यांअभावी आरोग्यसेवेचे भिजतघोंगडे


नर्स, एम.पी.डब्ल्यू., वाहनचालक, शिपाई अशी अनेक पदे रिक्त असल्याने घाटंजी तालुक्यात आहे त्या परिस्थितीत आरोग्यसेवेचा गाडा ओढणे सुरू आहे. शिवणी, पारवा, रामपुर व भांबोरा या चार प्राथमिक आरोग्य केंद्रावर ग्रामिण भागातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी आहे. यापैकी एकाही प्रा.आ.केंद्रामध्ये कायमस्वरूपी वाहनचालक नाही. त्यामुळे रूग्णकल्याण समितीच्या निधीमधुन कंत्राटी तत्वावर चालक नेमुन काम निभावून नेल्या जात आहेत. शासन आरोग्य सेवेवर प्रचंड खर्च करीत असले तरी ग्रामिण भागापर्यंत अजुनही आवश्यक त्या प्रमाणात सुविधा निर्माण झाल्या नाहीत. केवळ कर्मचा-यांना ‘टारगेट’ देऊन आकडेवारी गोळा करण्यातच प्रशासन धन्यता मानत आहे. तालुक्यातील काही आरोग्य केंद्रामध्ये पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. ग्रामिण भागात नेहमीच भारनियमन असते. त्यामुळे या काळात दवाखान्यात विजेची पर्यायी व्यवस्था असणे गरजेचे असते. मात्र तशी सुविधा उपलब्ध नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिला व पुरूष आरोग्य सेवकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामिण भागात कार्यरत असणा-या आरोग्य कर्मचा-यांनाच तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करून सेवा देण्याची कसरत वैद्यकीय अधिका-यांना करावी लागते. विवीध शासकीय योजनांमधुन गरोदर स्त्रियांना ने आण करण्यासाठी वाहन उपलब्ध करून देण्यात येते. मात्र प्रा.आ.केंद्राच्या वाहनाच्या इंधनासाठी पुरेसा निधी नसतो. प्रसुतीदरम्यान सिझेरीयन ची वेळ आल्यास रक्ताची व्यवस्था नसल्याने प्रा.आ.केंद्रात सिझेरीयन करणे शक्य होत नाही. अशावेळी रूग्णाला यवतमाळला पाठवावे लागते. अनेकदा औषधांच्या कमतरतेमुळे कर्मचा-यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. खोकल्याच्या औषधाची सर्वाधीक मागणी असतांना त्याचा पुरवठा मात्र कमी असतो. बहुतांश आरोग्य केंद्र गावापासुन दुर आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथे सेवा देणा-या कर्मचा-यांना प्रसंगी दारूडे व गुंडप्रवृत्तीच्या लोकांपासुन त्रास होतो. काही महिन्यांपुर्वी शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एका गुंडाने अपंग महिला आरोग्य सेविकेला मारहाण करून कार्यालयात प्रचंड तोडफोड केली होती. मात्र राजकीय दबावामुळे त्याचेवर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे मुख्यालयी राहुन सेवा देणे बंधनकारक करणा-या शासनाने कर्मचा-यांच्या सुरक्षेचा विचार करायला नको का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
साभार :- देशोन्नती 

Tuesday, 8 January 2013

घाटंजी नगराध्यक्षपदी किशोर दावडा



नगर परिषद अध्यक्षपदाच्या आज झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे किशोर दावडा यांची बिनविरोध निवड झाली. एक वर्ष नगराध्यक्षपद सांभाळुन जगदिश पंजाबी यानी राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले होते. घाटंजी नगर परिषदेमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये आघाडी आहे. सत्तास्थापनेच्या वेळी झालेल्या करारानुसार जगदिश  पंजाबी एक वर्ष, किशोर दावडा सहा महिने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राम खांडरे एक वर्ष व त्यानंतरच्या अडीच वर्षासाठी आरक्षणानुसार नगराध्यक्ष निवडण्यात येणार आहे. घाटंजी नगरपरिषदेमध्ये कॉंग्रेस ८, राष्ट्रवादी ४ तर शिवसेना ५ नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे. सुरूवातीचे अडीच वर्ष नगराध्यक्षपद खुले आहे. तर त्यानंतर अनुसूचित जाती (महिला) करीता आरक्षण निघाले आहे. त्यामुळे कॉंग्रेस रा.कॉं.आघाडीमध्ये एकमेव असलेल्या चंद्ररेखा रामटेके यांचेकडेच नगराध्यक्षपद येणार आहे.
आज झालेल्या निवडणुक प्रक्रीयेत सेनेचे संतोष शेंद्रे यानीही नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र किशोर दावडा यानी केलेल्या विनंतीनुसार अर्ज मागे घेऊन बिनविरोध निवड करण्यात आली असे शेंद्रे यानी सांगितले.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी प्रेरणा देशभ्रतार व मुख्याधिकारी गिरिष बन्नोरे यानी काम पाहिले.
साभार :- देशोन्नती 

रस्त्याच्या कडेला सावली देणा-या झाडांची बेसुमार कत्तल

सा.बां.विभागाचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष

जंगलातील रस्त्यावरून जातांना आजुबाजूची झाडे वाहनधारकांना सावली देतात. बाभुळ, पळस व तत्सम झाडे निसर्गाचे संतुलन कायम ठेवण्यासाठीही उपयोगी आहेत. मात्र आता सागवान वृक्षांपाठोपाठ ईतर वृक्षांकडेही ठेकेदारांची नजर वळली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या रस्त्यांच्या कडेवरील झाडांची बेसुमार कत्तल करण्याचे सत्र सध्या सुरू आहे. घाटंजी तालुक्यात सर्वत्र हा प्रकार दिसत आहे. घाटंजी यवतमाळ रस्त्यावरील झाडे तोडल्या जात असल्याने निसर्ग प्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांनी याबाबत संबंधीतांना विचारणा केली असता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबतचे कंत्राट घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर परिसर सा.बां.विभागाच्या यवतमाळ उपविभागांतर्गत येतो. या कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रांर्गत यापुर्वीही अनेकदा असे प्रकार घडल्याची माहिती आहे. जीर्ण झालेली व वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी झाडेच तोडण्याची परवानगी सार्वजनिक बांधकाम विभाग देऊ शकते अशी माहिती सा.बां.विभागातील एका वरिष्ठ अधिका-याने दिली. मात्र सध्या हिरवीकंच झाडे तोडण्याचे सत्र परिसरात सुरू असल्याने याला अटकाव कोण करणार असा प्रश्न निर्माण होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी या प्रकाराची दखल घ्यावी अशी मागणी आहे.
साभार :- देशोन्नती