Pages

Saturday, 13 October 2012

शेतक-यांना अत्याधुनिक सोयीसुविधा पुरविण्यास वचनबद्ध - सभापती अभिषेक ठाकरे


बाजार समितीच्या उत्पन्नात जास्तीत जास्त वाढ करून शेतक-यांना अत्याधुनिक सोयीसुविधा पुरविण्यास वचनबद्ध असल्याचे बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे यांनी समितीच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून बोलतांना सांगितले. या सभेला प्रमुख अतिथी म्हणुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर, विशेष अतिथी म्हणुन भुविकास बँकेचे माजी अध्यक्ष शंकर ठाकरे, बाजार समितीचे सर्व संचालक तसेच घाटंजी न.प.चे उपाध्यक्ष अकबर तंव्वर, सभापती राम खांडरे, संजय इंगळे, माणिक मेश्राम, श्याम बेलोरकर, गौतम चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना सभापती ठाकरे पुढे म्हणाले की, बाजार समितीला जास्तीत जास्त प्रमाणात  शेतकरीभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावर्षी गुरांच्या बाजाराचा लिलाव पद्धतीने  कंत्राट देऊन समितीच्या उत्पन्नात तिपटीने वाढ झाली आहे. जुलै महिन्यात महापुराने तालुक्यात झालेल्या नुकसानानंतर कोळी, कवठा, कोपरी या गावात सर्वप्रथम मदतीचा हात देण्यात घाटंजी बाजार समिती पुढे होती असे ते म्हणाले. शेतक-यांना दिलेल्या आश्वासनानुसार बाजार समितीचे संगणकीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात असुन शासनाच्या मंजुराती नंतर लवकरच समितीचे कार्यालय संगणकीकृत होईल अशी माहिती त्यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासुन तालुक्यातील शेतक-यांसाठी बाजार समितीत योग्य सोयी उपलब्ध नाहीत. अवघ्या एका वर्षाच्या कार्यकाळातच शेतक-यांच्या सुविधेसाठी कोट्यवधी रूपयांची बांधकामे सुरू झाल्याचे पाहुन पोटशुळ उठलेल्या विरोधकांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करून ही कामे बंद पाडण्याचे उद्योग सुरू केले आहेत. अशावेळी शेतक-यांनी संघटीत होऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे भावनिक आवाहन बाजार समितीचे उपसभापती प्रकाश डंभारे यांनी केले.
वार्षीक सर्वसाधारण सभेचे अहवाल वाचन व आभार प्रदर्शन समितीचे सचिव कपील चन्नावार यांनी केले. सभेचे संचालन र.मा.देशमुख यांनी केले. या सभेला तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, त्यांचे प्रतिनिधी, विवीध कार्यकारी संस्थांचे अध्यक्ष तथा शेतक-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
साभार :- देशोन्नती  

अतिक्रमणधारकांची ४० वर्षांपासुन जमिनीच्या पट्ट्यांसाठी भटकंती


तालुक्यातील मौजा भांबोरा परिसरातील फासे पारधी व विमुक्त भटक्या जमातीतील सुमारे ३४ कुटूंब गेल्या ४० वर्षांपासुन शेतजमिन व घरकुलाच्या कायम पट्ट्यापासुन वंचीत आहेत. जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे मिळावेत यासाठी तहसिल कार्यालयाचे उंबरठे झिजवीत आहेत. या जमिनीच्या महसुल रेकॉर्ड प्रमाणे वनविभागाची असल्याचे हक्क नोंदणी व ईतर सकृत दर्शनी पुराव्यावरून सिद्ध होते. मात्र या जमिनीवर घाटंजी व केळापुर महसुल विभागाने १९७९ ते १९९० पर्यंत दंड वसुल केला आहे. याच कालावधीत अतिक्रमणधारकांना सातबारे सुद्धा देण्यात आले आहेत. मात्र जमिनीचे कायम पट्टे देताना ही जमिन वनविभागाची असल्याचे सांगण्यात येत असल्याने अतिक्रमणधारक संभ्रमात आहेत. या समस्येमुळे २०१० मध्ये ग्रामपंचायत भांबोरा येथे वनहक्क समिती व ग्रामसभेची मान्यता घेऊन उपविभागीय अधिका-यांकडे प्रकरण सादर करण्यात आले. परंतु उपविभागीय कार्यालयाकडून वनविभागाचे अतिक्रमण असल्याबाबतचे पुरावे मागण्यात येत आहेत. तर वनविभागाच्या माहितीनुसार गट नं.४३, सव्र्हे नं.१६० यामधील पार्ट क्षेत्रफळ ४६ हेक्टर २२ आर असुन महसुल विभागाच्या ७/१२ व हक्क नोंदणीवर याच गट नंबरचे क्षेत्रफळ १०० हेक्टर ९० आर आहे. त्यामुळे ही अतिक्रमीत जमिन महसुल विभागाची की, वनविभागाची याबाबत प्रशासकीय स्तरावरही संभ्रम आहे. मात्र त्यामुळे अतिक्रमणधारकांचे नुकसान होत आहे. गेल्या चाळीस वर्षांमध्ये फासे पारधी, वडार, बंजारा जमातीतील कुटूंबे या पडीक जमीनीला आपल्या कष्टाने सुपीक बनवुन त्यातून पिके घेत आहेत. मात्र कायमस्वरूपी पट्टे नसल्याने या जमिनीवर त्यांना बँकेमार्फत कोणतेही कर्ज मिळत नाही. शिवाय शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही. एकीकडे फासे पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न चालु आहे. मात्र घाटंजी या आदिवासी तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणारे राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनी यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले नाही सामाजीक न्याय मंत्र्यांनी भटक्या जमातीतील लोकांना जागा मिळावी यासाठी प्रयत्न न करता निम्न पैनगंगा धरणाला महसुल विभागाची पर्यायी जागा मिळावी यासाठी प्रयत्न केले आहेत  असा आरोप सहदेव राठोड यांनी केला आहे.
ग्रामपंचायत भांबोरा येथिल २१ फासेपारधी कुटूंबांना सन २०११ मध्ये इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुल मंजुर झाले असुन हे २१ कुटूंब सुमारे ६० ते ७० वर्षांपासुन स्वतंत्र पारधी बेड्यावर राहात आहेत. येथिल गट नं. ४६ मधील जमिन महसुल विभागाने शेतीसाठी पारधी कुटूंबाना वाटप केली आहे. याच परिसराच्या मध्यभागातील बेड्यावरील जमिन त्यांना घरकुल बांधकामाकरीता देण्यास टाळाटाळ करीत आहे. घाटंजी पंचायत समितीने सदर कुटूंबांकडे गाव नमुना ८ अ नसल्याने धनादेश दिलेले नाहीत. या ठिकाणी विद्युतीकरण, घरगुती मिटर तसेच यापुर्वी काही कुटूंबांचे इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकाम झाले आहे. शिवाय या कुटूंबांकडून ग्रा.पं.ने घरटॅक्स वसुलीही केली आहे.  असे असतांना तालुका व स्थानिक पातळीवरील यंत्रणा मात्र घरकुलासाठी जागा देण्यास टाळाटाळ करीत आहे. या सर्व कुटूंबाना घरकुलाचे पट्टे तातडीने वाटप करण्यात न आल्यास आंदोलन करण्याचा ईशारा माजी पं.स.सदस्य तथा रा.यु.कॉ.चे तालुकाध्यक्ष सहदेव राठोड यांनी दिला आहे.
साभार :- देशोन्नती  

घाटंजी तालुक्यातील पुरग्रस्तांपुढे आता मोठ्या समस्या नाहीत - ना.शिवाजीराव मोघे


तालुक्यातील पुरग्रस्त आता आता ब-याच अंशी सावरले असुन त्यांच्यापुढे कोणतेही ‘मेजर प्रॉब्लेम्स’ नाहीत अशी माहिती राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनी पत्रपरिषदेत दिली. घाटंजी तालुक्यातील पुरग्रस्त गावांचा दौरा केल्यावर येथिल शासकीय विश्रामभवनात ते पत्रपरिषदेला संबोधीत करीत होते.
यावेळी तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष ईकलाख खान पटेल, घाटंजीचे नगराध्यक्ष जगदिश पंजाबी, तहसिलदार प्रकाश राऊत यांची उपस्थिती होती. सध्याच्या परिस्थितीत पुरामुळे वाहुन गेलेल्या विजेच्या खांबांना उभारणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी आधी विज वितरण वंâपनीच्या नियमानुसार विज बिल भरावे लागेल असे ते म्हणाले. पुरामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण पुर्ण झाले असुन मदतीबाबत कॅबिनेट मध्येच निर्णय होईल त्यावर आता काहीही बोलता येणार नाही असे एका प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले. तालुक्यात जाहिर झालेला दुष्काळ हा ओला होता की कोरडा यावर ते म्हणाले की याबाबत आपल्याला वर्तमानपत्राच्या बातमीवरूनच माहिती मिळाली. नेमक्या कोणत्या माहितीच्या आधारे हा दुष्काळ जाहिर करण्यात आला याबद्दल अनभिज्ञ असल्याचे त्यांनी सांगितले. 
उपविभागीय कार्यालय आर्णीला होणार असल्याच्या निर्णयावर ते म्हणाले की तो निर्णय शासनाच्या नियमाला अनुसरूनच होत असुन त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नाही. घाटंजी नगर परिषदेत कॉंग्रेसच्या नेतृत्वातील सत्ता असुनही आवश्यक त्या प्रमाणात निधी उपलब्ध होत नाही यावर ते म्हणाले की नगर परिषदेने मागणी केल्यास निधीची कमतरता पडू दिल्या जाणार नाही. मात्र याबाबत नगराध्यक्ष जगदिश पंजाबी यांना छेडले असता निधीची मागणी सुरूच आहे. तडकाफडकी सर्व कामे शक्य नाहीत. साहेबांकडून गेल्या तिस वर्षात काही घडले नाही ते आता काय घडणार ? असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी ना.मोघेंनी तालुक्यात प्रस्तावीत असलेल्या विवीध विकासकामांची माहिती दिली. त्यामध्ये निवासी शाळा, मोवाडा आश्रमशाळेचे जांब येथे स्थानांतरण, अनुसूचीत जमातीच्या मुलामुलींसाठी वस्तीगृह, घाटंजी येथे क्रिडा संकुल तसेच विवीध सहा ठिकाणी पुल बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
साभार :- देशोन्नती  

विभागीय संघटकपदी संजय पवार अविरोध


महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी संघटना पुणे च्या अमरावती विभागीय संघटकपदी घाटंजी पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय पवार यांची अविरोध निवड करण्यात आली. संघटनेच्या नांदेड येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष बी.बी.तिकांडे (नगर), सरचिटनिस मिलिंद चौधरी (रायगड), गोपाल बोंडे (अकोला), श्री.व्यास (औरंगाबाद), श्री पवार (नाशिक), प्रकाश भक्ते (चंद्रपुर), अमरावती विभागाचे उपाध्यक्ष किरण गावंडे यांचेसह महाराष्ट्राच्या २८ जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्या या निवडीचे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद्द कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेच्या यवतमाळ शाखेचे सर्व कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी स्वागत केले आहे.
साभार :- देशोन्नती  

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी सहदेव राठोड


जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी घाटंजी पंचायत समितीचे माजी सदस्य सहदेव राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री ना. मनोहर नाईक, आमदार संदिप बाजोरीया, जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर यांच्या उपस्थितीत राठोड यांची या पदावर सर्वानुमते नेमणुक करण्यात आली. राठोड यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांचेसह सर्व जेष्ठ नेत्यांना दिले आहे.
यापुर्वी त्यानी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी कार्य केले असुन एक अभ्यासु पंचायत समिती सदस्य अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या नियुक्तीचे बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, उपसभापती प्रकाश डंभारे, अमोल कोटरंगे, दिलीप मडावी यांचेसह तालुक्यातील कार्यकत्र्यांनी स्वागत केले आहे. या पदाच्या माध्यमातुन राष्ट्रवादी कॉंग्रेसला ग्रामिण भागातील तळागाळातल्या माणसापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार असुन पक्ष नेतृत्वाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणार असल्याची प्रतिक्रीया सहदेव राठोड यांनी दिली.
साभार :- देशोन्नती