Pages

Saturday, 21 July 2012

उपविभागीय कार्यालय घाटंजीतच करण्याची सर्वस्तरातून मागणी


नव्याने होऊ घातलेले उपविभागीय कार्यालय घाटंजीमध्येच व्हावे अशी मागणी तालुक्यातून होत आहे. राजकीय पक्ष, सामाजीक कार्यकर्ते, व्यापारी, पत्रकार, कर्मचारी अशा सर्वच स्तरातून या मागणीला मोठा पाठींबा मिळत असुन अनेकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसिल कार्यालयामार्फत संबंधीतांना पाठविले आहे. तसेच काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या मागणीसाठी आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत. 
राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ग्राहक पंचायत, विदर्भ जन आंदोलन समिती, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समिती, प्राऊटीस्ट ब्लॉक इंडीया, विद्यार्थी संघटना तसेच अनेक कार्यकत्र्यांनी या संदर्भात निवेदन दिले आहे.
सध्या घाटंजी तालुका पांढरकवडा उपविभागीय कार्यालयाशी संलग्न आहे. तर नव्याने होणा-या उपविभागात घाटंजीला आर्णीशी जोडून आर्णीमध्येच महसुल उपविभागीय कार्यालय स्थापन होण्याची शक्यता आहे. घाटंजी तालुक्यातील नागरिकांसाठी आर्णी अत्यंत गैरसोयीचे ठरणार असुन प्रशासकीय दृष्टीने सक्षम असतांना घाटंजीला डावलल्या जात असल्याबद्दल तालुक्यात प्रचंड संताप आहे. यापुर्वीही नव्यानेच स्थापन झालेल्या विधानसभा मतदार संघाला आर्णी विधानसभा मतदार संघ असे नामकरण करून घाटंजी तालुक्यावर अन्याय करण्यात आला. घाटंजी तालुका १९८१ मध्ये स्थापन झालेला आहे. तर घाटंजीत १९४८ पासुन नगर परिषद अस्तित्वात आहे. घाटंजी तालुक्यात जवळपास सर्वच शासकीय कार्यालये, सहकारी संस्था, राष्ट्रीयीकृत बँका, उच्च शिक्षण देणारी महाविद्यालये, जिल्ह्यात एकाच ठिकाणी असलेले केंद्र शासनाचे जवाहर नवोदय विद्यालय, विवीध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले अग्रगण्य औद्योगीक केंद्र तसेच सामाजीक क्षेत्रात नावाजलेल्या स्वयंसेवी संस्था आहेत. घाटंजी शहर हे पांढरकवडा व आर्णी शहराच्या मध्यभागी असल्याने ईतर दोन्ही तालुक्यांसाठी सोयीस्कर ठरणार आहे. 
त्यामुळे उपविभागीय कार्यालय घाटंजी शहरातच स्थापन करण्यात यावे अशी आग्रही मागणी तालुक्यातून होत असुन अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा अनेक संघटनांनी दिला आहे.


उपविभागीय कार्यालयाच्या मागणीसाठी घाटंजी बंद

प्रस्तावीत उपविभागीय कार्यालय घाटंजी शहरातच व्हावे या मागणीसाठी घाटंजीतील व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. सकाळी ११ वाजताच्या सुमारास शहरातील व्यापा-यांची मोर्चा काढुन बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानंतर तहसिल कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तहसिलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आर्णी पेक्षा जास्त सोयीस्कर असुन देखिल घाटंजीला डावलुन नव्याने होत असलेल्या महसुल उपविभागाचे कार्यालय आर्णी मध्ये स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे कार्यालय आर्णीला झाल्यास घाटंजी तालुक्यातील ग्रामिण जनतेला प्रचंड आर्थिक व मानसिक ताण सोसावा लागणार आहे. त्यामुळे घाटंजी तालुक्यातील काही पक्षांचे कार्यकर्ते, व्यापारी, सामाजीक कार्यकर्ते तसेच विवीध संघटनांनी यापुर्वीच याबाबत निवेदने दिली आहेत.
आज घाटंजीतील व्यापारी व अनेक नागरीकानी बंद मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. वाहतुक, शैक्षणीक प्रतिष्ठाने व जिवनावश्यक वस्तुंच्या व्यवसायांना या बंद मधुन वगळण्यात आले होते.
साभार :- देशोन्नती 


घाटंजी बाजार समितीच्या गोदामावर व्यापा-यांचा कब्जा

मनसेच्या धडकेत पितळ उघडे



शेतक-यांचे धान्य साठविण्यासाठी असलेल्या गोदामात फक्त व्यापा-यांचीच धान्य पोती ठेवून असल्याचे सत्य मनसेने धान्य यार्डावर दिलेल्या धडकेत समोर आले.
काही शेतक-यांच्या तक्रारीनंतर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांनी कार्यकत्र्यांसह धान्य यार्डावर जाऊन पाहणी केली असता शेतमाल तारण योजनेचे धान्य ठेवण्यासाठी असलेल्या गोदामात नामदेव आडे व अविनाश भुरे या व्यापा-यांच्या मालकीचे सुमारे ७५० धान्याची पोती या गोदामात असल्याचे आढळले. तसेच इतरही गोदामात फक्त व्यापा-यांचाच माल ठेवून असल्याचे निदर्शनास आले. उल्लेखनिय म्हणजे नामदेव आडे हे घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आहेत. ते स्वत:च बाजार समितीच्या गोदामावर कब्जा करीत असतील तर शेतक-यांनी आपले धान्य कुठे ठेवायचे असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. 
जे गोदाम शेतक-यांनी आणलेले धान्य ठेवण्यासाठी वापरल्या जाणे अभिप्रेत आहे तिथे व्यापारीवर्ग जागा काबिज करून ठेवत असल्याने शेतक-यांची प्रचंड हेळसांड होते. बाजार समिती प्रशासनही व्यापारी व त्यांना संरक्षण देणारे राजकीय नेते यांच्या दबावाखाली राहुन व्यापा-यांना खुली सुट देत असल्याचे दिसुन येत आहे.
शेतक-यांच्या गोदामावर मालकी हक्क समजणारे बाजार समितीचे संचालक नामदेव आडे यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून कोणतेही भाडे न देता गोदाम वापरल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी प्रशांत धांदे यांनी यावेळी केली.
यासंदर्भात बाजार समितीचे सचिव कपिल चन्नावार यांना विचारणा केली असता शेतक-यांचा माल सध्या उपलब्ध नसल्याने काही व्यापा-यांना दोन महिन्यांसाठी या गोदामात धान्य ठेवण्याची मुभा देण्यात आल्याची बाब त्यांनी कबुल केली.
मात्र शेतक-यांची तक्रार असेल तर तिन चार दिवसात गोदाम रिकामे करून घेतल्या जाईल असे त्यांनी सांगितले. घाटंजी बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे यांची प्रतिक्रीया घेतली असता ते म्हणाले की, व्यापा-यांमध्ये स्पर्धा टिकवून ठेवण्याकरीता समितीला अनेकदा परिस्थितीनुरूप लवचिक धोरण अवलंबावे लागते. मात्र हे करतांना शेतकरी डावलल्या जातात हा आरोप साफ चुकीचा आहे. व्यापारी असतील तरच शेतक-यांचा माल योग्य दरात विकल्या जाईल. व्यापा-यांना झिडकारून चालणार नाही असे ते म्हणाले. शेतक-यांच्या मालाची आवक नसल्याने व व्यापा-यांनी विनंती केल्याने काही कालावधीसाठी गोदाम देण्यात आल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
साभार :- देशोन्नती 

Friday, 13 July 2012

घाटंजी न.प.च्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांचा ‘तो’ ठराव जिल्हाधिकाऱ्यांनी ठरविला अवैध

सार्वजनिक उपक्रमाची जागा प्रार्थनास्थळाला दिल्याचे प्रकरण
मुख्याधिका-यांच्या भुमिकेवरही ताशेरे

नगर परिषद निवडणुक डोळ्यापुढे ठेवुन ले आऊट मधील सार्वजनिक उपक्रमाची जागा विशिष्ट समाजाच्या प्रार्थनास्थळाला देण्याबाबतचा घाटंजी न.प.चा वादग्रस्त ठराव जिल्हाधिका-यांनी अवैध ठरवुन तहकुब केला.
येथिल दत्ता बापुराव दातारकर व ईतर तिघांनी नगर परिषदेच्या या निर्णयाविरूद्ध जिल्हाधिका-यांकडे दाद मागितली होती. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घाटंजी नगर परिषदेच्या तत्कालीन पदाधिका-यांनी जलाराम प्रभाग क्रं.१ मधील बापुराव खांडरे यांच्या ले आऊट मधील सार्वजनिक उपक्रमाकरीता असलेली खुली जागा प्रार्थनास्थळाकरीता दिली होती. महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती, व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ३०८ अंतर्गत ८ डिसेंबर २०११ रोजी सर्वसाधारण सभेमध्ये विषय पटलावर नसतांना अध्यक्षांच्या परवानगीने हा ठराव मांडून पारित करण्यात आला. यानुसार वात्सल्य बहुउद्देशीय विकास संस्थेला प्रार्थनास्थळासाठी ही जागा मंजुर करण्यात आली होती. मात्र परिसरातील मुलांना खेळण्यासाठी अथवा ईतर सार्वजनिक उपक्रमासाठी असलेली जागा विशिष्ट समाजाच्या प्रार्थनास्थळाला दिल्यामुळे या भागातील नागरिकांनी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी तसेच निवडणुक आयोगाकडे तक्रारी केल्या.
तसेच जिल्हाधिका-यांकडे याप्रकरणी दाद मागण्यात आली. अर्जदारांच्या वतीने अ‍ॅड कोडापे यांनी सर्वसाधारण सभेतील ठराव क्रं.२ व न.प.मुख्याधिका-यांच्या आदेशाची अंमलबजावणी व कार्यवाही स्थगीत ठेवण्याबाबत युक्तीवाद केला. न.प.ने ही जागा देतांना त्या परिसरातील भुखंडधारकांची संमती घेतली नव्हती. तसेच खुली जागा ज्या कारणासाठी दिली जावी त्यासाठी न देता विशिष्ट समाजाच्या धार्मिक कारणास्तव देण्यात आल्याने बांधकाम उपविधी व महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ च्या तरतुदींचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिका-यांनी या आदेशास स्थगिती दिली. उल्लेखनिय म्हणजे नगर परिषदेने जिल्हाधिका-यांकडे सादर केलेल्या लेखी उत्तरात ले आऊटमधील जागेच्या १० टक्के जागा सार्वजनिक उपक्रमासाठी अनुज्ञेय असुन प्रार्थना स्थळाला देणे अपेक्षीत नाही असे स्पष्ट नमुद केले आहे. तसेच हा ठराव पारित करतांना नियमांचे पालन झाले नसल्याचे कबुल केले आहे.
मुख्याधिका-यांनी सदर आदेश पारित करतांना ठरावातील सर्व बाजु नियमातील तरतुदीस धरून पडताळून पाहिल्या नसल्याने हा आदेश अवैध ठरत असल्याचे जिल्हाधिका-यांनी आपल्या आदेशात नमुद केले आहे. शिवाय विशिष्ट समाजाच्या धार्मिक स्थळाकरीता सार्वजनिक उपक्रमाची जागा दिल्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असेही आदेशात म्हटले आहे. 
घाटंजी नगर परिषदेच्या तत्कालीन पदाधिका-यांनी केवळ न.प.निवडणुकीत फायदा व्हावा या उद्देशाने हा ठराव घेतला होता. त्यावेळी देशोन्नतीने हे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध केले होते. अशा प्रकारचे अनेक बेकायदेशीर ठराव त्या काळात नगर परिषदेने घेतले असुन त्याची सविस्तर चौकशी झाल्यास अनेक गैरप्रकार पुढे येण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.
साभार :- देशोन्नती 


आत्महत्येस प्रवृत्त करणा-या आरोपीला पारवा पोलीसांचे संरक्षण

तक्रार होऊनही गुन्हा दाखल नाही

कौटुंबिक वादातून सोळा वर्षीय युवतीस शिविगाळ व मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त करणा-या आरोपीविरूद्ध पारवा पोलीसांनी अद्याप कार्यवाही न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 
पारवा पोलीसांच्या या मनमानी कारभाराबाबत फिर्यादींनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. गुन्ह्याची तिव्रता दडपण्यात हातखंडा असलेल्या ठाणेदार पंजाब वंजारे यांनी या प्रकरणात आरोपीविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल न करता ‘मर्ग’ नोंद करण्याची किमया केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, छाया संजय राठोड (१६) रा.भंडारी ता.घाटंजी ही युवती दि.८ जुलै रोजी विहिरीवर पाणी भरण्यास गेली असता आरोपी विनोद मोहन जाधव याने कौटुंबिक वादातून सदर युवतीला अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली. हा अपमान सहन न झाल्याने तिने विष प्राशन केले. प्रकृती गंभिर झाल्याने तिला आर्णी ग्रामिण रूग्णालय व त्यानंतर यवतमाळ येथिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती गंभिर असुन तिचेवर उपचार केल्या जात आहेत. या प्रकरणी तक्रार दाखल होऊनही पारवा पोलीसांनी घटनेची चौकशी न करता मर्ग दाखल केला. आश्चर्याची बाब म्हणजे मरणासन्न अवस्थेत असलेल्या युवतीचे अद्याप बयाण देखिल नोंदविण्यात आले नाही असे तिचा पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यांनी या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. 
घटनेतील आरोपीची पत्नी मिरा विनोद जाधव ही आत्महत्येचा प्रयत्न करणा-या युवतीची आत्या आहे. विनोद जाधव हा त्याच्या पत्नीचा शारिरीक व मानसिक छळ करीत असल्याने ती माहेरी राहात आहे. पतीकडून होत असलेल्या छळाबाबत तिने याआधी पारवा पोलीस स्टेशनमध्ये दि. १७ ऑक्टोबर २०१० व १७ नोव्हेंबर २०१० रोजी लेखी फिर्याद दाखल केली आहे. मात्र पारवा पोलीसांनी सदर आरोपीविरूद्ध कोणताही गुन्हा दाखल केला नाही हे विशेष. 
सावळी येथे कार्यरत ‘गणेश’ नामक पोलीस शिपाई या आरोपीला पाठीशी घालीत असल्याचा आरोप होत आहे. पारवा ठाणेदाराचा ‘वसुली अधिकारी’ म्हणुन परिचीत असलेल्या या गणेशने आजवर या आरोपीवर गुन्हा दाखल होऊ दिल्या नसल्याचेही बोलल्या जात आहे. 
महिन्याभरापुर्वीच सव्वा लाखांची चोरी ७० हजारात दडपण्याचा प्रकार ठाणेदार पंजाब वंजारेनी केला होता. तर आता आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल न करता चक्क ‘मर्ग’ नोंद करण्याचे ‘धाडस’ त्यांनी दाखविले आहे. आता या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक नेमकी काय कार्यवाही करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
साभार :- देशोन्नती 




घाटंजी पं.स.चे संजय पवार यांना उत्कृष्ट कृषी अधिकारी सन्मान



येथिल पंचायत समिती कार्यालयात कार्यरत कृषी अधिकारी संजय पवार यांना कृषीदिनी उत्कृष्ट कृषी अधिकारी म्हणुन सन्मानीत करण्यात आले. 
यवतमाळ येथिल वैद्यकीय महाविद्यालयाच्या श्रोतुगृहात कृषीदिनानिमित्य आयोजीत एका भव्य समारंभात त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष प्रविण देशमुख होते. तर उपाध्यक्ष ययाती नाईक, बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, आरोग्य सभापती मनमोहनसिंग चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती प्राजक्ता मानकर, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा कृषी अधिक्षक काशिनाथ तरकसे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमोद यादगिरवार, कृषी विकास अधिकारी अनिल इंगळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. संजय पवार यांनी घाटंजी तालुक्यात शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने सजग राहुन कार्य केल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल घाटंजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रामचंद्र गेडाम, शाखा अभियंता आर.एच.लभाने, कृषी विस्तार अधिकारी राहुल डाखोरे, कार्यालय अधिक्षक  श्री. लतिफ, विस्तार अधिकारी योगेश उडाखे, डॉ.विलास देशमुख, ए.के.राजुरकर यांचेसह पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी वर्गाने कौतुक केले आहे.
साभार :- देशोन्नती