Pages

Wednesday, 12 December 2012

गुप्तधन व नरबळी प्रकरणी हयगय करणा-यांची ‘वाट’ लावू - निता केळकर

पोलीस तपासाबाबत व्यक्त केले आश्चर्य

गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न व सपना पळसकर या चिमुकलीच्या अपहरण प्रकरणी तपासात हयगय करणा-या पोलीस अधिका-यांची वाट लावू अशा संतप्त शब्दात भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निता केळकर यांनी तपासाबाबत आपली नाराजी व्यक्त केली.
राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांना प्रत्यक्ष भेटून या प्रकरणात कार्यवाहीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चोरांबा येथे पळसकर कुटूंबीयांना दिलेल्या भेटीच्या वेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. हे प्रकरण अतिशय गंभिर असुन पोलीसांनी अद्याप या प्रकरणी केलेला तपास प्रथमदर्शनी संशयास्पद दिसत असल्याचे त्या म्हणाल्या. जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या नकारात्मक भुमिकेबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. हा सर्व प्रकार गृहमंत्र्यांच्या कानावर घालणार असुन भाजपाच्यावतीने अधिवेशनात हा मुद्दा उचलण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. या घटनेच्या तपासात जाणीवपुर्वक विलंब करणा-या पोलीस अधिका-यांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांचेवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पळसकर यांचे घरी जाऊन त्यांची विचारपुस केली व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांचेसोबत भाजपा महिला मोर्चाच्या राज्य सरचिटणीस उमा खापरे, माधवी नाईक, देवयानी फरोडे, वनीता कानडे, शैला सामंत, मंजु वैष्णव, शिल्पा गणपते, शैला साळवी, रेखा कोठेकर यांची उपस्थिती होती.
साभार :- देशोन्नती 

बेपत्ता सपनाच्या पालकांचे अखेर देवालाच साकडे !


दिड महिन्यात पोलीस तपास शुन्य

बेपत्ता सपनाचा शोध घेऊन थकलेल्या पळसकर कुटूंबीयांनी पोलीस तपासातील अपयश बघता अखेर देवालाच तिला  वाचविण्यासाठी साकडे घातले आहे. त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या अजनसरा येथिल भोजाजी महाराज देवस्थानाला जाऊन पळसकर कुटूंबीयांनी सपनासाठी नवस केला. सपनाच्या काळजीपोटी चिंतातूर तिचे आईवडील अजुनही आपल्या परिने शोध घेत आहेत.
अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेले मुरली येथिल गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न व सपना पळसकर बेपत्ता प्रकरण पोलीसांच्या दिरंगाईमुळे तपासशुन्य ठरले आहे. दस-याच्या दिवसापासुन चोरांबा येथिल सपना पळसकर ही चिमुकली बेपत्ता आहे. तर गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न १७ नोव्हेंबरला झाला. ग्रामस्थांनी पकडून दिलेले २ आरोपी व ईतर दोघे असे अटकेत असलेल्या चार आरोपींच्या पलिकडे प्रकरण सरकलेच नाही. गेल्या विस दिवसांपासुन केवळ बयाण घेणे, गावोगावी तपास पथक पाठविणे अन फिर्यादी, वकील, पत्रकार यांची चौकशी यापलीकडे पोलीस तपास झाल्याचे दिसत नाही.
संशय हे पोलीसांचे प्रमुख शस्त्र. मात्र या प्रकरणात पोलीसांनी हे शस्त्रच म्यान केले की काय अशी परिस्थिती आहे. कारण पोलीस अधिक्षक, एस.डी.पी.ओ. व ठाणेदार यांनी सुरूवाती पासुनच या प्रकरणातील आरोपींवर साधा संशय घेतला नाही. त्यांच्या जवळ मुलगी नव्हतीच हिच गोष्ट पोलीस विश्वासाने सांगत आहेत. कदाचीत तसे असेलही. मग सपना कुठे आहे? प्रकरणातील आरोपींविषयी घटनेच्या दिवसापासुन पोलीसांना असलेली सहानुभूती चर्चेचा विषय ठरली आहे. थातूर मातूर चौकशी करून सोडून देणे, जाणिवपुर्वक एकाच दिवसाचा पी.सी.आर, न्यायालयीन कोठडीत पाठवितांना आरोपींना ‘व्हर्टीगो’ ही आलिशान कार वापरण्याची देण्यात आलेली मुभा पोलीसांविषयी संशय निर्माण करण्यास पुरेसे आहे. 
केवळ प्रसार माध्यमे व विवीध संघटना यांचा दबाव आहे म्हणुनच पोलीस तेवढ्यापुरता तपास करीत असल्याचे दिसत आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, विवीध आदिवासी संघटना, रा.कॉं.चे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर, महिला कॉंग्रेस, यवतमाळ यांनी या प्रकरणात प्राधान्याने लक्ष दिले आहे. जनमानसात सध्या केवळ याच प्रकरणाची चर्चा आहे. मात्र तरिही तपास सुरू आहे यापलिकडे कोणतेही उत्तर पोलीस देऊ शकले नाहीत.
बेपत्ता सपना व गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न या दोन्ही प्रकरणात तपासामध्ये दिरंगाई करणा-या पोलीस अधिका-यांवर कोणतीही कार्यवाही झाली नाही. ते पोलीस स्टेशनला असतांना तपास योग्य रितीने होईल का? सध्याचे तपास अधिकारी भालचंद्र महाजन यांनाही अद्याप प्रकरणातील एकही धागा सापडला नाही. त्यामुळे केवळ दबाव आहे म्हणुन तपास करीत असल्याचे  दाखवायचे असा प्रकार तर सुरू नाही ना? याच पद्धतीने तपास सुरू राहिला तर सपनाचा शोध लागणार का? व पैशाच्या लालसेने झपाटलेले गुप्तधन प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीसांच्या तावडीत सापडणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
साभार :- देशोन्नती 

Thursday, 6 December 2012

मुरली येथिल गुप्तधन प्रकरणाची ईलेक्ट्रॉनिक माध्यमांनी घेतली दखल


मुरली येथिल गुप्तधनासाठी नरबळीचा झालेला प्रयत्न वृत्तपत्रांनी प्रखरतेने मांडल्यावर ईलेक्ट्रॉनिक मिडीयानेही त्याची प्राधान्याने दखल घेतली. 
झी २४ तास, ए.बी.पी.माझा, आय.बी.एन.लोकमत, टि.व्ही.९ मराठी यासह विवीध चॅनल्सवर या घटनेच्या बातम्या झळकल्या. त्यापैकी ए.बी.पी.माझा वरील बातमी व टि.व्ही.९ मराठीवरील चर्चासत्राचे व्हीडीओ घाटंजी न्युजच्या वाचकांसाठी.........


ए.बी.पी.माझा

टि.व्ही.९ मराठी चर्चासत्र
सहभाग ( डॉ.नरेंद्र दाभोळकर, कार्यकारी अध्यक्ष, समिती, अंधश्रद्धा निर्मुलन समिती),
शितल करदेकर ( पत्रकार व सामाजीक कार्यकर्त्या ) , मैथिली जावकर (अभिनेत्री)  





Wednesday, 5 December 2012

सपना अपहरण व गुप्तधन प्रकरणी गुप्तचर विभागाकडून चौकशीची मागणी

१२ डिसेंबरला गोंडवाना गणतंत्र पार्टीचा घाटंजीत धडक मोर्चा 

गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न व दिड महिन्यांपासुन बेपत्ता असलेली सपना पळसकर हिचा शोध घ्यावा. तसेच संपुर्ण प्रकरणाची गुप्तचर विभागामार्फत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी गोंडवाना गणतंत्र पार्टी व लोकसंग्राम पक्षाच्या वतीने दि.१२ डिसेंबरला दुपारी १२ वाजता तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष निरंजन मसराम यांचे नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सपनाचे अपहरण होऊन तब्बल दिड महिना उलटला तरी देखिल पोलीस विभागाला तिचा शोध घेण्यास यश आलेले नाही. एक गरिब आदिवासी कुटूंबातील मुलगी असल्याने पोलीस या तपासात गंभिर दिसत नाहीत. शिवाय गुप्तधन प्रकरणात देखिल पोलीस तपास संशयास्पद आहे. त्यामुळे या प्रकरणाची गुप्तचर विभागामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी या आंदोलनातून केल्या जाणार आहे. अशा प्रवृत्तीना वेळीच पायबंद न घातल्या गेल्यास भविष्यात हा प्रकार आणखी वाढु शकतो. यावेळी एका गरिब आदिवासी मुलीचे अपहरण झाले आहे. 
भविष्यात आपल्याही मुलाबाळांचे अपहरण अशा विकृत कामांसाठी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आदिवासी बांधवांसह सर्वांनीच या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. या मोर्चाला गों.ग.पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीराम तलांडे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव धानोरकर, महासचिव बंडू मसराम, जिल्हा उपाध्यक्ष निमपाल राजगडकर, अनिल गेडाम, तालुकाध्यक्ष महादेव चिकराम, तालुका सचिव महादेव वेट्टी, जितेंद्र धुर्वे, मोहन कोटरंगे, देवजी गेडाम, सहाय्यक सचिव दत्ता मडावी, लोकसंग्राम पक्षाचे सरचिटणीस विनोद सिंघानिया, नानाजी कोवे, लेतूजी जुनघरे, उरकुंडा जांभुळकर, माजी तहसिलदार रामचंद्र मडावी हे मार्गदर्शन करणार आहेत. या मोर्चामध्ये सर्व समाजबांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन घाटंजी तालुका कार्यकारी अध्यक्ष महादेव मैंद, नाना धुर्वे, कवडू मरापे, बाबुराव कोवे, शंकर कोरवते, कर्णूजी नैताम महाराज, कृष्णा आडे, गुलाब घोडाम, अमृत पेंदोर, अनिल गेडाम, संभा कोवे, नागोराव शेडमाके, लक्ष्मण अनाके, मारोती पेंदोर, शंकर वेलादी, नामदेव मरापे, अजय ताडपेल्लीवार, कवडू पेंदोर, खुशाल देडाम, विजय मेश्राम, बंडू सिडाम, देवजी गेडाम, विजय मसराम, नारायण कुळसंगे, प्रमोद ईळपाते, श्रावण किनाके, दत्ता मडावी, नानाजी किनाके, शंकर गेडाम, ज्ञानबा मसराम, शत्रुघ्न पेंदोर, सिताराम पराचे, काशिनाथ कनाके, संतु पेंदोर, अभिमान कातले, लक्ष्मण अनाके, भगवान उईके, राजु मडावी, अजाब सलाम, कवडू सुरपाम, शालिक मडावी, भानुदास सुरपाम, भाऊराव मेश्राम, शंकर अनाके, पुरूषोत्तम मडावी, अर्जुन कोरवते, गोकुल मेश्राम, मुनीरोद्दीन, ज्ञानेश्वर सिडाम, शेषराम आत्राम, हरिभाऊ सलाम, पुरूषोत्तम मडावी, दामोधर ऊईके, रामदास ऊईके, गुलाब कोडापे, शंकर कोरवे, अनिल गेडाम, जितेंद्र धुर्वे, रायबा आत्राम, रमजान जाटू, विलास चांदुरकर, सुबान जाटू, तुकाराम नेहारे, गोविंद तिरमानवार, दिलीप पेगर्लावार, ज्ञानेश्वर चितकुंटलवार, दत्तू पालेपवार, शरद खोडपे, मज्जीद बैलीम, दत्ता मडावी, कवडू मरापे, शंकर सोयाम, सलिम मनियार, शंकर गेडाम यांनी केले आहे.
साभार :- देशोन्नती 

तंटेबखेटे निस्तरायला महापंचायत मग बेपत्ता सपनासाठी काय?

सपनाच्या निर्धन मायबापाचा सवाल

गुप्तधनासाठी नरबळी...माणुसकीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार. मात्र पैशाच्या लालसेने तोंडाला पाणी सुटणा-या व चुकीने मनुष्य योनित जन्मलेल्या त्या लांडग्यांना त्याचे काय? अंधश्रद्धेचे भुत मानगुटीवर घेऊन ते एक चिमुकला जीव संपवायला निघाले होते. माणुसपण जीवंत असलेल्या ग्रामस्थांनी तो प्रकार हाणुन पाडला.
हे प्रकरण जेवढे घृणास्पद आहे त्यापेक्षा जास्त त्यानंतर झालेल्या घडामोडींनी संपुर्ण समाजाला कोड्यात टाकले आहे. एक आदिवासी समाजातील मुलगी दिड महिन्यापासुन बेपत्ता होते. त्यातच गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न उजेडात येतो. मात्र पोलीस एवढ्या गंभिर प्रकरणातही नेहमीची ‘रफादफा’ भुमिका घेतात. आधी तर आरोपी गुप्तधनासाठी गेलेच नव्हते असा पवित्रा पोलीस घेतात. पण प्रकरण अंगलट आल्यावर गुप्तधनाचा प्रयत्न कबुल होतो. मात्र बेपत्ता सपनाच्या बाबत सर्वच कानावर हात ठेवतात. खुनासाठी अपहरणाचा प्रयत्न असा गंभिर गुन्हा, बेपत्ता मुलीचा नसलेला सुगावा व गुप्तधन प्रकरणातील पुढे न आलेले आरोपी अशी परिस्थिती असतानांही पोलीसांना केवळ एकाच दिवसाची कोठडी मिळवता येते. आरोपींच्या वकीलाने केलेल्या युक्तीवादावर पोलीस गप्प बसतात. आरोपींना न्यायालयीन कोठडीत नेतांना खासगी वाहनातून नेण्यात येते. गुप्तधन प्रकरण हाणुन पाडणारे ग्रामस्थ, फिर्यादी, मुलीच्या आईला तक्रार लिहुन देणारे वकील, पोलीस तपासात मदत व्हावी या दृष्टीने वृत्तांकन करणारे पत्रकार या सर्वांची पोलीस सखोल चौकशी करतात. मात्र आरोपींचीही अशा प्रकरणी प्रसंगी पोलीसी खाक्या दाखवुन ऊलटतपासणी करायची असते ही गोष्ट सोयीस्कररित्या दुर्लक्षीत केल्या जाते. गुप्तधन शोधणा-या टोळ्यांमध्ये केवळ चार पाच सदस्य नसतात ही गोष्ट पोलीसांना सांगण्याची गरज नसावी. दस-याच्या दिवशी चोरांबा येथिल विज बंद होते, कोणीतरी डि.पी.वरील फ्युज काढुन ठेवतो. अन त्याच दिवशी सपना बेपत्ता होते. 
हा केवळ एक योगायोग की कटाचा भाग याचा तपास करणेही पोलीसांना गरजेचे वाटू नये का? फिर्यादीचे वारंवार बयाण घेऊन त्यातील विसंगती शोधण्यापलिकडे तपास गेलेला नाही. अशीच भुमिका राहिली तर यापुढे कोणी अशा घटनांमध्ये पोलीसांची मदत करायला पुढे येणार का?
पोलीस अधिक्षकांपासुन ते ठाण्यातील शिपायापर्यंत सर्वच याप्रकरणी नकारात्मक विचार करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलीसांना नेमके सिद्ध काय करायचे आहे? गुप्तधनाची घटनाच झाली नाही का? पण आरोपींनी तर त्यासाठीच गेलो होतो अशी कबुली दिली आहे. सपना नावाची चिमुकली बेपत्ता नाही का? जर या आरोपांrनी तिला नेले नाही तर मग ती कुठे आहे? या दोन्ही प्रकरणातील किमान एकतरी बाजु पोलीसांनी स्पष्ट करून त्यांचे अस्तित्व आहे हे दाखवायला नको का? असे प्रश्न आता जनसामान्यांमध्ये चर्चिल्या जात आहे. सामाजीक न्यायमंत्री ना.शिवाजीराव मोघेंना पत्रपरिषदेत या विषयावर छेडल्यावर त्यांनी थेट पोलीस अधिक्षकांना या प्रकरणाचा गंभिरतेने तपास करण्याचे आदेश दिले. मात्र त्याचाही फारसा उपयोग झाल्याचे दिसत नाही. तालुका कॉंग्रेस मधील काही कार्यकर्ते या प्रकरणात गुंतले असल्याचीही चर्चा आहे. पण ते अद्याप चौकशीच्याही फे-यात आले नाहीत. ऊलट फिर्यादी व सपनाच्या परिवाराला तक्रार मागे घेण्यासाठी दडपणात आणल्या जात आहे. पोलीसांशी संबंधीत एक व्यक्ती पळसकर परिवाराला तुम्हाला मुलगी पाहिजे की पैसा असा प्रश्न विचारतो याचा अर्थ काय? घटनेच्या संशयास्पद तपासाची सुरूवात करणारे पोलीस अधिकारी अरूण गुरनूले तणावात का आहेत? हे सर्व प्रश्न तपासाबाबत संशय निर्माण करणारे आहेत.
सर्वसामान्यांना न्यायासाठी भटकावे लागू नये यासाठी उद्या घाटंजी येथे महापंचायत आयोजीत केली आहे. तर संपुर्ण राज्याला सामाजीक न्याय देण्याची जबाबदारी असलेले ना.शिवाजीराव मोघे व जिल्ह्याचे पालकत्व स्विकारलेले ना.नितिन राऊत याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. यावेळी तरी दिड महिन्यांपासुन न्यायासाठी वणवण भटकणा-या त्या मातेला दिलासा मिळणार का? गरिब असल्याने दुर्लक्षीत असल्याची तिची खंत दुर होणार का? याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
साभार :- देशोन्नती