Pages

Wednesday, 21 November 2012

अखेर गुप्तधन प्रकरणी चार आरोपींवर गुन्हा दाखल

श्वानपथकही घुटमळले
तपास अद्याप जैसे थे
मुख्य सुत्रधार मोकळेच  





गुप्तधनासाठी नरबळी देण्याच्या गंभिर प्रकरणात अखेर काल (दि.२०) ला रात्री घाटंजी पोलीसांनी चार आरोपींविरूद गुन्हा दाखल करून अटक केली. 
अशोक गंगाराम दर्शनवार रा.घाटंजी, लक्ष्मण सिताराम एंबडवार रा.बेलोरा, राजेश उर्फ  राजु पांडूरंग ताकसांडे, अरूण हरिभाऊ ताकसांडे दोघेही रा.मुरली यांचेविरूद्ध अप.क्र.९५/१२ कलम ३६३, ३६४, ३४ भा.दं.वि.अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. आज सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान आज दुपारी यवतमाळ येथुन श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. पोलीसांना या प्रकरणात तपासाची दिशा गवसली नाही की, त्यांना तपासच करायचा नाही याबाबत संभ्रम अजुनही कायम आहे. चार आरोपी अटकेत आहेत. ग्रामस्थांनी सांगितल्या प्रमाणे घटनेत दहा ते बारा आरोपी होते. मात्र ते कोण होते याची अटकेत असलेल्या आरोपींकडून माहिती घेतल्याचे दिसत नाही. त्यातही पोलीसांना आरोपीची केवळ एकाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. एक मुलगी बेपत्ता असल्याचा संशय असतांना चार दिवसात पोलीसांनी ज्या आरोपींकडून एक शब्दही वदवून घेतला नाही ते एका दिवसात काय सांगणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे आरोपी न्यायालयीन कोठडीत गेल्यावर पोलीस या तपासात कोणता ‘उजेड’ पाडणार हे स्पष्ट आहे. घटनेपासुन काही लोक पोलीस स्टेशनच्या आवारात घाबरलेल्या अवस्थेत घुटमळताना दिसत आहेत. जमानत घेण्याची हमी देऊन आरोपींना घरून आणताहेत. ते नेमके कशासाठी? या प्रकरणात त्यांना एवढा जिव्हाळा का निर्माण झाला याबाबत चर्चेला ऊत आले आहे.  या घटनेतील मुख्य आरोपी कोणी वेगळेच असल्याचा संशय असुन पकडल्या गेलेल्या आरोपींनी त्यांची नावे घेऊ नयेत याची ‘खबरदारी’ पोलीसांकडून घेतल्या जात असल्याची खासगीत चर्चा आहे. ग्रामस्थांनी सांगितल्या प्रमाणे गुप्तधन शोधणा-या या टोळीच्या ताब्यात जर खरंच कोणी मुलगी असेल तर तिचा जीव अद्यापही धोक्यात आहे. मात्र ती मुलगी कोठे आहे याबाबत पोलीसांनी आरोपींना किमान विचारणा तरी केली असेल की नाही ही सुद्धा शंकाच आहे. समाजमन ढवळून टाकणा-या या घटनेवर पोलीसांच्या ‘नॉर्मल’ भुमिकेबद्दल संतापाचे वातावरण आहे.  या संपुर्ण प्रकारावर सामाजीक संघटना, आदिवासी संघटना, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र पुढे आल्याचे दिसले नाही.
साभार :- देशोन्नती 


Tuesday, 20 November 2012

पोलीसांचा तपास फिर्यादीच्या चौकशीवरच खोळंबला

घाटंजी तालुक्यातील गुप्तधन प्रकरण
मुख्य सुत्रधार अद्याप मोकळेच
फिर्यादीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न
पोलीसांविषयी नागरिकांमध्ये प्रचंड संताप





गुप्तधनासाठी ‘नरबळी’ देण्याचा प्रयत्न झाल्या प्रकरणी पोलीस तपासात वृत्त लिहिस्तोवर कोणताही निष्कर्ष निघाला नाही. घाटंजी पोलीसांनी दडपलेले हे गंभिर प्रकरण प्रसिद्धी माध्यमांनी पुढे आणल्याने पोलीस दलात खळबळ उडाली. वरिष्ठांनी याची दखल घेत घटनेचा तपास पांढरकवड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांच्याकडे सोपवला. मात्र तरी देखिल घटनेच्या रात्री जामिनावर सोडण्यात आलेल्या आरोपींचे बयाण घेण्यापलीकडे पोलीसांचा तपास पुढे गेला नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी सुद्धा केवळ फिर्यादीचीच खडसावून चौकशी करीत असल्याचे दिसुन येत आहे. घटनास्थळी आरोपींना नेऊन त्यांची चौकशी करण्या ऐवजी तपास अधिका-यांनी आज फिर्यादीचीच ‘परेड’ घेतली. एस.डी.पी.ओ.महाजन यांनी आज फिर्यादी विजय चव्हाण याला घटनास्थळी नेले. त्या ठिकाणी त्याची पुन्हा विचारपुस करण्यात आली. आरोपींना कसे पकडले? घटना नेमकी कशी घडली? हा सर्व घटनाक्रम त्याच्या कडून जाणुन घेण्यात आला. उल्लेखनिय म्हणजे सदर फिर्यादीला आज सकाळपासुनच पोलीस स्टेशनला बसवुन ठेवण्यात आले होते. या उलट आरोपी पोलीस स्टेशनच्या मैदानात मोकळ्या हवेत बसलेले होते. पोलीसांच्या या उलट वागणुकीमुळे आरोपी कोण व फिर्यादी कोण याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. स्वत:ची पर्वा न करता चिमुकला जीव वाचविण्यासाठी गुप्तधन शोधणा-या टोळीशी दोन हात करणा-यांवरच पोलीस तपासाच्या नावाखाली दबाव निर्माण करीत असतील तर अशा प्रकरणात कोणी फिर्याद देण्यासाठी पुढे येईल का याचाही विचार करणे गरजेचे आहे. या संपुर्ण प्रकरणात घाटंजीचे प्रभारी ठाणेदार अरूण गुरनुले यांची भुमिका सुरूवाती पासुनच आरोपींना ‘सुरक्षीत’ ठेवण्याचीच राहिली आहे. एवढा गंभिर आरोप असलेल्या आरोपींना घटनेच्या रात्रीच जामिनावर सोडणे, तांत्रिक अडचणी दाखवुन तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल न करता केवळ प्रतिबंधक कार्यवाही करणे, अप्रत्यक्षपणे फिर्यादीवर दबाव टाकणे, घटनास्थळी ग्रामस्थांना दिसलेला सुरा, पुजेचे ताट व हातमोजे पोलीस पंचनाम्यात न आढळणे व घटनास्थळावरील परिस्थितीकडे पुर्णपणे दुर्लक्ष करणे यामुळे सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनुले हे घटनेचा तपास करताहेत की आरोपी कसे निसटतील यासाठी प्रयत्न करीत आहेत असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपी व संबंधीतांसह गुरनुले यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासुन त्यांचीही कसुन चौकशी करण्याची गरज व्यक्त केल्या जात आहे. या घटनेतील मुख्य आरोपी कोणी वेगळेच असल्याचा संशय असुन पकडल्या गेलेल्या आरोपींनी त्यांची नावे घेऊ नयेत याची ‘खबरदारी’ पोलीसांकडून घेतल्या जात असल्याची खासगीत चर्चा आहे. पोलीस तपासाबाबत माहिती घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांचेशी संपर्वâ केला असता ‘अजुन चौकशी सुरू आहे’ अशी थंड प्रतिक्रीया त्यांनी दिली. ग्रामस्थांनी सांगितल्या प्रमाणे गुप्तधन शोधणा-या या टोळीच्या ताब्यात जर खरंच कोणी मुलगी असेल तर तिचा जीव अद्यापही धोक्यात आहे. मात्र ती मुलगी कोठे आहे याबाबत पोलीसांनी आरोपींना किमान विचारणा तरी केली असेल की नाही ही सुद्धा शंकाच आहे. समाजमन ढवळून टाकणा-या या घटनेवर पोलीसांच्या नॉर्मल भुमिकेबद्दल संतापाचे वातावरण आहे.

चोरांब्याच्या ‘त्या’ बेपत्ता मुलीचे गुढ कायम

दस-याच्या दिवसापासुन बेपत्ता असलेल्या घाटंजी तालुक्यातील चोरांब्याच्या सपना गोपाल पळसकर (वय ७ वर्ष) हिच्या बाबतीतही पोलीसांना कोणताही सुगावा लागला नाही. तिच्या आईने काल पोलीस स्टेशनला लेखी तक्रार देऊन गुप्तधन प्रकरणातील आरोपी अशोक दर्शनवार रा.घाटंजी, लक्ष्मण सिताराम एंबडवार रा.बेलोरा व राजु ताकसांडे रा.मुरली यांचेसह ईतर अज्ञात आरोपींनीच मुलीला पळवुन नेऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र पोलीसांनी या प्रकरणात सुद्धा सदर आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला नाही. या संपुर्ण प्रकारावर सामाजीक संघटना, आदिवासी संघटना, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र पुढे आल्याचे दिसले नाही.
साभार :- देशोन्नती 

ग्रामस्थांच्या सतर्कतेने गुप्तधनासाठी ‘नरबळी’ देण्याचा प्रयत्न फसला

घाटंजी तालुक्यातील मुर्ली तांड्यावरील घटना
गावक-यांकडून टोळीतील सदस्यांना चोप
‘त्या’ अज्ञात चिमुकलीचा जीव धोक्यातच
राजकीय दबावातून पोलीसांचे आरोपींना ‘अभय’





पैशाच्या लालसेने निष्ठुर झालेल्यांनी गुप्तधन मिळविण्यासाठी एका चिमुकल्या मुलीचा बळी देण्याचा केलेला प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेने हाणून पडला. दि.१७ नोव्हेंबरला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ही मन विषन्न करणारी घटना घडली. मात्र  टोळीतील सदस्य त्या अज्ञात मुलीला घेऊन पसार होण्यात यशस्वी झाले. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घाटंजी लगत असलेल्या मुर्ली तांड्याजवळील एकहात्या मारोती मंदिरापुढे सुमारे ६ ते ८ लोक संशयास्पद स्थितीत वावरत असल्याचे त्या भागात शौचास गेलेल्या विजय चव्हाण नामक युवकास दिसले. त्यातच लहान मुलाच्या किंचाळण्याचा आवाज आल्याने त्याचा संशय बळावला. त्याने लगेच तांड्यावरील नातेवाईकांना भ्रमणध्वनी करून बोलावुन घेतले. अवघ्या काही वेळातच २० ते २५ लोक तेथे आले. लोकांचा जमाव येत असल्याचे दिसताच त्या टोळीतील सदस्यांची पळापळ सुरू झाली. 
त्यातील एकाने त्या लहान मुलीला घेऊन पळ काढला. त्या भागात अंधार असल्यामुळे तो पळुन जाण्यात यशस्वी झाला. या दरम्यान टोळीतील तिन सदस्य ग्रामस्थांच्या हाती लागले. घटनास्थळावरील प्रकार पाहुन संतापलेल्या नागरिकांनी त्यांना येथेच्च झोडपून काढले. त्यानंतर पोलीसांना सुचना देण्यात आली. पोलीस येईपर्यंत तिन आरोपींपैकी एकजण निसटण्यात यशस्वी झाला. दोन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले.
अशोक दर्शनवार (३६) रा.घाटंजी, लक्ष्मण सिताराम एंबडवार (५२) रा.बेलोरा ता.घाटंजी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर ताकसांडे नामक दोन ईसम व ईतर अज्ञात आरोपी फरार आहेत. मात्र अटक केलेल्या आरोपींवर केवळ गावातील शांतता भंग केल्या बद्दल प्रतिबंधात्मक कार्यवाही करून रात्रीच जामिनावर मुक्तता करण्यात आली.
पोलीसांनी घटनास्थळावरून एम.एच. २९ क्यु.१९७७ व ए.पी.१० ए.टी.५१६४ क्रमांकाच्या दोन दुचाकी, कुदळ, फावडे, हळदीने माखलेला दगड, लिंबु, दोरी जप्त केले. मात्र ग्रामस्थांनी सांगितल्या प्रमाणे सुरा, पुजेचे ताट व हातमोजे पोलीस पंचनाम्यात आढळले नाहीत हे विषेश. 
या घटनेत ताब्यात घेतलेले आरोपी मंदिरात हनुमान चालीसा वाचण्यासाठी आले होते असे आता पोलीस सांगत आहेत. मात्र नजरेसमोर अघोरी पुजा सुरू असताना हे दोन आरोपी खरंच हनुमान चालीसा वाचत होते काय? त्यांना त्या चिमुकल्या जीवाची किंकाळी ऐकु आली नाही का? घटनास्थळावरील परिस्थिती व आरोपींचे बयाण यामध्ये पोलीसाना संशय का आला नाही? जर आरोपी फक्त हनुमान चालीसा वाचण्यासाठी आले होते तर त्यांनी ग्रामस्थांना पोलीस तक्रार न करण्यासाठी १ लाख रूपये का देऊ केले? एरवी क्षुल्लक माहितीवरून घटनेचा तपास लावणा-या पोलीसांना एवढी गंभिर परिस्थिती डोळ्यापुढे दिसतांना गुन्हा दाखल करून गांभिर्याने तपास करण्याचीही गरज वाटू नये ही बाब संशयास्पद आहे. घटनेचा तपास करणारे पोलीस अधिकारी, आरोपी, फिर्यादी व संबंधीतांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासल्यास या प्रकरणात नेमके कोण कोण गुंतले आहेत ? पोलीस कोणाच्या दबावात काम करीत आहेत ? याचा सहज उलगडा होऊ शकतो. घाटंजी पोलीस सदर घटनेत आरोपींना थेट पाठीशी घालत असल्याने वरिष्ठानीच या प्रकरणी तपास करावा अशी मागणी होत आहे. या घटनेतील ती अज्ञात मुलगी अद्यापही या टोळीतील सदस्यांच्याच ताब्यात असल्याची भिती आहे. उल्लेखनिय म्हणजे तालुक्यातील चोरांबा येथिल सपना गोपाल पळसकर ही सात वर्षाची मुलगी दस-याच्या दिवसांपासुन बेपत्ता आहे. त्यामुळे या घटनेतील मुलगी तिच तर नाही ना अशीही भिती व्यक्त करण्यात येत आहे. पोलीसांनी या प्रकरणात सुद्धा अद्याप योग्य तपास केलेला नाही. तालुक्यातील काही राजकीय धेंड या प्रकरणी आपल्या हस्तकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याने घाटंजी पोलीसांकडून नि:पक्ष तपास होईल याबाबत साशंकता आहे.

साभार :- देशोन्नती 


Saturday, 17 November 2012

शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी घाटंजी तालुक्यातून प्रातिनिधीक प्रतिक्रीया !



आम्ही ‘पोरके’ झालोय !

बाळासाहेब समस्त शिवसैनिकांसाठी वडीलांसमान होते. त्यांच्या जाण्याने प्रत्येक शिवसैनिक पोरका झालाय. मात्र त्यांचे ज्वलंत विचार आम्हाला प्रत्येक क्षणी प्रेरणा देत राहिल. त्यांच्या विचारांशी ईमान राखत आम्ही अशीच वाटचाल करीत राहु. बाळासाहेबांच्या निधनाने देशाच्या राजकारणाची व वैचारीकतेची झालेली हानी कधीच भरून निघणार नाही.
भरत दलाल
शिवसेना तालुका प्रमुख, घाटंजी


बाळासाहेबांच्या विचारांनीच खुप काही शिकविले

बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक व्यक्तीमत्व नव्हे तर एक झंजावात होते. त्यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरीत होऊन माझ्यासारख्या अनेक तरूणांनी त्या काळी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. केवळ बाळासाहेबांच्या तेजस्वी विचारांच्या बळावरच शिवसेनेने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले. त्या विचारांमुळेच आज कोणापुढेही न झुकता भ्रष्ट व्यवस्थेशी लढा देता येतोय.
मधुकर निस्ताने
सामाजीक कार्यकर्ता, घाटंजी



एका युगप्रवर्तकाचा अंत

कोणतेही सत्ताकेंद्र नसतांना स्वत:भोवती राजकीय, सामाजीक व वैचारीक वलय निर्माण करणारे बाळासाहेब म्हणजे एक युग होते. त्यांचे जाणे म्हणजे एका युगाचा अंत आहे. त्यांचे विचार प्रखर होते. परिणामांची चिंता न करता ते आपले विचार प्रकट करायचे. बोललेल्या गोष्टीवर ठाम राहण्याचे सामथ्र्य खुप कमी राजकारण्यांमध्ये असते.
मोरेश्वर वातिले
सामाजीक कार्यकर्ता, घाटंजी

साभार :- देशोन्नती 


Friday, 16 November 2012

घाटंजीच्या तिरूपती जिनींग मध्ये वजनकाट्यात तफावत

मनसेच्या हस्तक्षेपानंतर वजनकाटा बंद
कापसाच्या सौदा पट्टीतही खोडतोड

कापसाच्या खरेदीचा हंगाम जेमतेम सुरू झाला असतांना घाटंजीच्या तिरूपती कॉटन मॉडर्न जिनिंगमध्ये शेतक-यांची लुट करण्याचा सुरू असलेला कार्यक्रम मनसेच्या हस्तक्षेपामुळे उधळल्या गेला. 
शेतक-यांनी घरून मोजुन आणलेल्या वजनात व जिनिंगमध्ये केलेल्या मोजणीत वजनामध्ये सुमारे ४५ किलोची तफावत असल्याचे काही शेतक-यांच्या निदर्शनास आले. संबंधीतांनी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांना याबाबत कळविल्यावर त्यांनी जिनिंगमध्ये येऊन सर्वांसमक्ष वजनकाट्याची तपासणी करण्याची मागणी केली. मापारी व बाजार समितीच्या उपस्थितीत प्राथमिक तपासणी केली असता ४६ किलोची तफावत दिसुन आली. तसा पंचनामाही यावेळी करण्यात आला. मात्र काही कालावधी नंतर पुन्हा काट्याची तपासणी करून पंचनामा करण्यात आला त्यावेळी ही तफावत केवळ १ ते २ किलोंची होती. त्यामुळे बाजार समितीचा कोणता पंचनामा योग्य होता याबाबत साशंकता निर्माण झाली असल्याचा आरोप धांदे यानी केला. 
जिनिंगच्या कर्मचा-याने वजनकाट्याला विशिष्ट ठिकाणी छेडछाड करताच वजनात असलेली तफावत अत्यंत कमी झाल्याचा आरोप शेतकरी व मनसेच्या वतीने यावेळी करण्यात आला. हा प्रकार उघड झाल्यावर संतापलेल्या जिनिंग मालकाने मी आता एकाही गाडीचा कापुस घेणार नाही. सगळ्या परत घेऊन जा अशी दर्पोक्ती केली. यावेळी मनसे कार्यकर्ते व जिनिंग मालक यांच्यात शाब्दीक बाचाबाची सुद्धा झाली. बाजार समितीच्या मार्वेâट यार्डावर लिलाव झाल्यानंतर कापसासाठी ठरविण्यात आलेला भाव कापुस सौदा पट्टीवर लिहिण्यात येतो. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची खोडतोड नियमानुसार करता येत नाही. मात्र व्यापारी व जिनिंग मालक बहुतांश शेतक-यांच्या सौदा पट्टीवरील ठरविलेला कापसाचा दर खोडून त्यामागे त्यापेक्षा कमी दर लिहितात. त्यामुळे शेतक-यांची आर्थिक फसवणुक होत असल्याचा आरोप धांदे यांनीr केला. पुराव्यादाखल त्यांनी काही शेतक-यांच्या खोडतोड केलेल्या कापुस सौदा पट्या सुद्धा दाखविल्या.
केवळ तिरूपती कॉटन जिनिंगमध्येच नव्हे तर तिरूपती अ‍ॅग्रोसह ईतरही जिनिंगच्या वजनकाट्यांमध्ये तफावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी व संबंधीत विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी ही बाब गंभिरतेने घ्यावी अशी शेतक-यांची मागणी आहे. तांत्रिक बिघाडाच्या गोंडस नावाखाली होत असलेल्या शेतक-यांच्या फसवणुकीची तज्ञांमार्पâत चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
याबाबत बाजार समितीचे सचिव कपील चन्नावार यांची प्रतिक्रीया घेतली असता सदोष वजनकाट्याची दुरूस्ती होई पर्यंत या जिनिंगमधील वजनकाटा बंद करण्यात आला असुन शेतक-यांची फसवणुक होणार नाही यासाठी दक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

साभार :- देशोन्नती