Pages

Thursday, 28 June 2012

महिला शेतक-याच्या नावाने परस्पर उचलले विहीरीचे अनुदान


रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर न खोदताच विहीरीचे अनुदान लाटल्याचा प्रकार तालुक्यातील टिटवी येथे उघडकीस आला. मौजा टिटवी येथिल गट क्र.१०७/५ या शेतात महिला शेतकरी पंचफुला किसन आत्राम यांच्या नावाने परस्पर अनुदान उचल करण्यात आल्याबाबत काही ग्रामस्थांनी तक्रार केली होती. त्यानुषंगाने नायब तहसिलदार एस.ए.जयस्वाल यांचेसह मंडळ अधिकारी, तलाठी यांनी सदर शेतामध्ये जाऊन पाहणी केली असता तिथे विहिरीचे खोदकाम झाल्याचे आढळले नाही. उल्लेखनिय म्हणजे हे शेत ज्या आदिवासी महिलेच्या नावाने आहे तिला विहीर अथवा त्यासाठी मिळालेल्या अनुदानाबद्दल कोणतीही कल्पना नव्हती. पंचायत समितीच्या अभियंत्याच्या संगनमताने ही फसवणुक करण्यात आल्याचा आरोप आहे. ग्रामस्थांच्या उपस्थितीत शेतामध्ये पंचनामा करण्यात आला. यावेळी उपसरपंच प्रमोद गंडे, किशोर कळसकर, किसन आत्राम, वामन हजारे, प्रकाश काळे, गोपाल उमरे यांचेसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रकाराबाबत अधिक माहिती घेण्यासाठी गटविकास अधिकारी रामचंद्र गेडाम यांचेशी संपर्क केला असता त्यांना सदर विहिर कोणत्या योजनेतील आहे, त्यासाठी देण्यात आलेले अनुदान किती याबाबत कोणतीही माहिती नव्हती. संबंधीतांना विचारून माहिती सांगतो असे बेजबाबदार उत्तर त्यांनी दिले.
साभार :- देशोन्नती 


राज्य माहिती आयोगाची वनविभागास चपराक


वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय घाटंजी अंतर्गत वनपाल बी.आर.पवार यांच्या कार्यकाळात विदर्भ पाणलोट विकास मिशन अंतर्गत झालेल्या कामाची माहिती उशिरा दिल्याबद्दल वनपालावर कार्यवाही तर अपीलीय अधिका-याला अर्जदारास ३ हजार नुकसान भरपाई देण्याचे आदेश राज्य माहिती आयोगाने दिले. येथिल दिनकर मानकर यांनी सहाय्यक वनसंरक्षक पी.एस.वगारे तथा जनमाहिती अधिकारी, यवतमाळ यांचेकडे दि.१८ जानेवारी २०१० रोजी माहितीसाठी अर्ज केला होता. विहित मुदतीत माहिती देणे बंधनकारक असतांनाही संबंधीतांनी ११ महिन्यानंतर माहिती दिली. त्यामुळे अर्जदाराने राज्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठ यांचेकडे अपील दाखल केले होते. त्यानुसार तत्कालीन सहाय्यक माहिती अधिकारी तथा वनपाल बी.झेड.पवार यांना कलम २०(२) नुसार दोषी ठरवून त्यांचे विरोधात ३ महिन्यांचे आत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश मुख्य वनसंरक्षक, यवतमाळ यांना देण्यात आले आहेत. तसेच राज्य माहिती आयुक्तांच्या आदेशाची अवहेलना करणा-या प्रथम अपीलीय अधिकारी तथा उपवनसंरक्षक यवतमाळ यानाही या प्रकरणात दोषी ठरवुन अर्जदाराला झालेल्या त्रासाबद्दल ३ हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश राज्य माहीती आयुक्त भास्कर पाटील यांनी दिले आहेत.
साभार :- देशोन्नती 

सर्वोच्च भारतीय निवडण्याची जनमत चाचणी रद्द करा

आंबेडकरी युवा मंचाची मागणी

सी.एन.एन. आय.बी.एन. व हिस्ट्री १८ या वाहिन्यांवर १९४७ नंतर महात्मा गांधी यांच्या नंतरचे सर्वोच्च भारतीय ही जनमत चाचणी घेण्यात येत आहे. एका राष्ट्रीय व्यक्तीमत्वाची आधीच सर्वोच्च ठरवून नंतर इतर व्यक्तीमत्वांची निवड करण्याची ही दोषपुर्ण जनमत चाचणी रद्द करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन येथिल आंबेडकरी युवा मंचच्या वतीने तहसिलदारांना देण्यात आले. असा प्रकार जगात प्रथमच होत आहे. यामुळे इतर महापुरूषांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या जात आहेत. या प्रकारामुळे सामाजीक शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या चाचणीमुळे समाजात अनावश्यक वैचारीक संघर्षाला खतपाणी घातल्या जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या जनमत चाचणीवर तातडीने निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

Monday, 25 June 2012

वनविभागाच्या इमारतीचे ना.मोघेंच्या हस्ते लोकार्पण

तालुक्यातील वाढोणा(खु) येथे 'कॅम्पा' अंतर्गत वनविभागाची इमारत आणि सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळा इमारतीचे  उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते नुकतेच झाले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशीक) डॉ. दिनेशकुमार त्यागी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पांढरकवडाचे उपवनसंरक्षक अ.पा. गि-हेपुंजे, जि. प. सदस्य योगेश पारवेकर, देवानंद पवार, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष इकलाख खान पटेल, पं.स. सभापती शैलेश इंगोले, रफिक पटेल,  स्वामी काटपेल्लीवार,  संजय आरेवार, रूपेश कल्यमवार, किशोर दावडा, प्रजय कडू पाटील, रमेश आंबेपवार, शालिक चवरडोल आदी उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा संयुक्त वनव्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि वनविभागाच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 
रामू पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष गोडे, राजू निकोडे, श्रीकांत देशमुख, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके, नायब तहसीलदार जयस्वाल, बाबाराव उदार आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन दीपक महाकुलकर, प्रास्ताविक पारवा वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मणराव गाडे तर आभार प्रदर्शन चिखलवर्धाचे वनरक्षक शांतीदूत मुळे यांनी केले. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बळीराम उईके, भाऊराव कोवे, सूर्यभान मेश्राम, सज्जनराव कुडमेथे, हॉफिज पठाण, गजानन भोयर, पारवाचे क्षेत्र सहायक शकील खान, विजय कडू (पहापळ), वाढोणा बीट गार्ड वसंतराव लामतुरे, वैजनाथ बांगर, संजय जिरकर, नरेंद्र मस्के, राजू गोटे, पवन बाजपेयी, विलास पतंगे, गजानन गहुकार, श्रीकृष्ण येसनसुरे, विजय शुक्ला, पाटापांगराचे क्षेत्र सहायक जगदीश पेंदोर यांनी परिश्रम घेतले.
     

साभार :- देशोन्नती 

Tuesday, 19 June 2012

प्रा.कमलेश मुणोत अपघातात गंभिर जखमी


येथिल शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे जेष्ठ प्राध्यापक कमलेश मुणोत यांच्या वाहनाचा नागपुर येथून येतांना अपघात झाला. या अपघातात प्रा. कमलेश मुणोत व त्यांची पत्नी गंभिर जखमी झाले. तर त्यांच्या मुलीला किरकोळ दुखापत झाली. काल (दि.१८) ला रात्री ८ वाजेदरम्यान नागपुर पांढरकवडा मार्गावर वडकी जवळ हा अपघात झाला. ते कुटूंबासह सिंगापुरला सहलीसाठी गेले होते. तिथुन परतल्यावर नागपुरवरून ते घाटंजीकडे येत होते. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीचे संतुलन गेले. रस्ता दुभाजकाला धडकल्याने गाडी पलटी झाली. त्यांना गंभिर अवस्थेत सावंगी मेघे येथिल वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून प्रा. मुणोत यांना नागपुरच्या सिम्स रूग्णालयात व त्यांच्या पत्नीला अन्य एका रूग्णालयात हलविण्यात आले. दोघांचीही प्रकृती गंभिर परंतु स्थिर आहे. प्रा. मुणोत यांनी अनेक वर्ष घाटंजी येथे पत्रकारीतेच्या क्षेत्रातही कार्य केले आहे.