Pages

Friday, 16 March 2012

श्री समर्थ विद्यालयात विवीध कार्यक्रम




 घाटंजी येथिल श्री समर्थ विद्यालयात नुकतेच विवीध कार्यक्रम घेण्यात आले. ईयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना निरोप, महिला दिनानिमित्य रॅली, वृक्षपुजन करून पर्यावरण पुरक होळी हे कार्यक्रम घेण्यात आले. या सर्व कार्यक्रमांना शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या सर्व कार्यक्रमांची ठळक छायाचित्रे खास आपल्यासाठी........!

Thursday, 15 March 2012

घाटंजी पं.स.सभापतीपदी शैलेश इंगोले अविरोध सुवर्णा निकोडे उपसभापती


पंचायत समिती सभापती व उपसभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत घाटंजी पं.स.सभापतीपदी कॉंग्रेसचे शैलेश महादेव इंगोले व उपसभापतीपदी कॉंग्रेसच्याच सुवर्णा राजेश निकोडे यांची अविरोध निवड झाली.
सहा सदस्यीय घाटंजी पंचायत समिती मध्ये कॉंग्रेसचे ४ तर भाजपाकडे २ सदस्य आहेत. कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत असल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग सोपा झाला. कॉंग्रेसमधीलच पारवेकर गटाने रूपेश कल्यमवार यांच्यासाठी सुरूवातीला जोर दिला. मात्र चर्चेअंती ठराविक कालावधीनंतर सभापतीपद पारवेकर गटाकडे जाणार असल्याने कल्यमवार यांचे नामांकन दाखल करण्यात आले नाही.
विरोधी पक्ष भाजपाच्यावतीने सभापतीपदासाठी नामांकन दाखल करण्यात न आल्याने निवडणुक अविरोध झाली. यावेळी नवनिर्वाचीत पंचायत समिती सदस्य सुमित्रा पेंदोर, रूपेश कल्यमवार, भाजपाचे रमेश धुर्वे, रत्नमाला कोंडेकर यांची उपस्थिती होती. पीठासीन अधिकारी म्हणुन तहसिलदार संतोष शिंदे, सहाय्यक एस.व्ही.भरडे यांनी काम पाहिले.
साभार :- देशोन्नती 



शेतक-यांच्या हितासाठी घाटंजी बाजार समिती कटीबद्ध - अभिषेक ठाकरे



शेतक-यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांच्या मुलभूत गरजांच्या पुर्ततेसाठी घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती सदैव तत्पर राहिल असे आश्वासन सभापती अभिषेक ठाकरे यांनी दिले. बाजार समिती मार्केट यार्डावर आयोजीत विवीध विकासकामांच्या भुमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. पायाभुत सुविधांची उभारणी होताच बाजार समितीला ‘ऑनलाईन’ करून शेतक-यांना जगभरातील बाजारभावाची माहिती देण्याची सुविधाही कार्यान्वयीत करण्यात येईल असे ते म्हणाले. शासनाने वारंवार कापुस उत्पादक शेतक-यांची थट्टा करू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कापुस पणन महासंघाचे संचालक अण्णासाहेब पारवेकर होते. तर जिल्हा बँकेचे संचालक सुरेश लोणकर, पांढरकवडा बाजार समितीचे उपसभापती जानुसेठ जिवानी, भुविकास बँकेचे अध्यक्ष शंकर ठाकरे, माजी नगराध्यक्ष श्याम बेलोरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी बोलतांना लोकनेते सुरेश लोणकर यांनी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर सडकुन टिका केली. शेतकरी आत्महत्या का होत आहेत याचा अभ्यास करण्यासाठी संसदीय समिती जिल्हा दौ-यावर असताना कापुस निर्यातबंदीचा निर्णय घेऊन शासनाने आपली बौद्धीक दिवाळखोरीच सिद्ध केली असे ते म्हणाले. सांसदीय समितीचा अहवाल जाण्यापुर्वीच कापुस निर्यातबंदीचा निर्णय घेणे म्हणजे दाक्षीणात्य राज्यातील भांडवलदारांचा गल्ला भरण्याचा डाव असल्याचे त्यांनी सांगीतले. कृषी क्षेत्राशी संबंधीत एवढा महत्वाचा निर्णय घेतांना देशाचे कृषी मंत्री शरद पवार यांनाही कल्पना देण्यात आली नव्हती याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. देशातील एकुण ९० टक्के कापसाचे उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. मात्र राज्यात केवळ १० टक्के मिल आहेत. तर ज्या केरळ राज्यात १० टक्के कापुस उत्पादन होत नाही तिथे ९० टक्के मिल आहेत. त्यामुळेच वस्त्रोद्योग मंत्र्यांनी कापुस उत्पादक शेतक-यांवर निर्यातबंदीची कु-हाड चालवली असे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात अण्णासाहेब पारवेकर यांनी शेतक-यांच्या होत असलेल्या मुस्कटदाबीबद्दल निषेध नोंदविला. शेतक-यांना आपले हक्क मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले. सी.सी.आय.ने यावेळी कापुस खरेदी का केली नाही असा प्रश्न त्यानी उपस्थित केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विकासकामांचे भुमीपूजन करण्यात आले. घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीला महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत २ कोटी ८ लाख ८७ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामध्ये मुलभूत सुविधांमध्ये लिलाव ओटा (धान्य यार्ड) करीता ११.७० लाख, पिण्याच्या पाण्याची सुविधा १ लाख, संरक्षण भिंत २४.१५ लाख, सिमेंट रस्ते २७.६४ लाख, ईलेक्ट्रीक सुविधा ३.५३ लाख, पाण्याची टाकी १२.९७ लाख, सांडपाण्याची व्यवस्था ३.१४ लाख, तर उत्पादीत सुविधांमध्ये धान्य चाळणी यंत्र ३०.६८ लाख, घनकचरा व्यवस्थापन १५.४८ लाख, गोदाम (धान्ययार्ड) २२.७० लाख, गोदाम (कापुस यार्ड) ४५.४१ लाख, भुईकाटा (५० मेट्रीक टन) १०.४२ लाख असा निधी बाजार समितीला प्राप्त झाला आहे. ही सर्व कामे ९ महिन्यांच्या कालावधीत पुर्ण होतील असा विश्वास सभापती अभिषेक ठाकरे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती सचिन पारवेकर यांनी केले. संचालन बाजार समितीचे सचिव कपील चन्नावार व आभार प्रदर्शन प्रकाश डंभारे यांनी केले.
साभार :- देशोन्नती

Wednesday, 14 March 2012

ना.मोघेंच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना धनादेश वाटप



नगर परिषदे अंतर्गत राबविण्यात येणा-या घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना नुकतेच मंजुर झालेल्या घरकुलाच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले. घाटंजी नगर परिषदेच्या सभागृहात आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन जि.प.सदस्य देवानंद पवार, नगराध्यक्ष जगदिश पंजाबी, उपाध्यक्ष अकबर तंव्वर, बांधकाम सभापती परेश कारीया, शिक्षण सभापती राम खांडरे, महिला व बालकल्याण सभापती शोभा ठाकरे, नगरसेवक किशोर दावडा, संदीप बिबेकार, स्विकृत सदस्य सुभाष गोडे, पं.स.सदस्य शैलेष इंगोले यांचेसह सर्व नगरसेवकांची उपस्थिती होती यावेळी बोलतांना ना.शिवाजीराव मोघे यांनी घाटंजी नगर परिषदेला निधीची कमतरता भासू देणार नाही असे आश्वासन दिले. नागरिकांच्या मुलभूत समस्यांवर प्रामुख्याने लक्ष देऊन त्या सोडविण्यावर भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणा-या घरकुल योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळावा यासाठी यंत्रणेने काटेकोरपणे योजनांची अंमलबजावणी करावी असेही ते म्हणाले.
याप्रसंगी १५ लाभार्थ्यांना घरकुलाच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले. मान्यवरांची समायोचीत भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन संजय भोंग व  आभार प्रदर्शन महादेव डंभारे यांनी केले.
साभार :- देशोन्नती 

ससाणी येथे पर्यावरण जनजागृती पदयात्रा





तालुक्यातील ससाणी येथे पर्यावरण मंत्रालय भारत सरकार, बायफ पुणे, नवचैतन्य बहुउद्देशीय विकास युवा मंडळ शिरोली व जिल्हा परिषद उच्च प्राथमीक मराठी शाळा ससाणी याच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जि.प. शाळेच्या आवारातून पदयात्रेला सुरूवात झाली.  संपुर्ण गावात या पदयात्रेच्या माध्यमातून पर्यावरणाच्या महत्वाविषयी ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्याथ्र्यांना झाडांची रोपटी दत्तक देण्यात आली. या कार्यक्रमाला घाटंजी केंद्राचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी (बायफ मित्र) संजय बाभुळकर, गुलाब शिसले, राहुल जिवने यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश गायकवाड होते. तर माधव कातकडे, प्रमोद ढवळे, संजय काळे, आर.बी.गोलाईत यांची प्रमुख उपस्थिती होती. ससाणी शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एस.डोमाळे यांचे या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले. संचालन बि.एन.राठोड तर आभार प्रदर्शन रूपेश बेलसरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रविण सहारे, प्रफुल्ल राऊत, तुषार सिसले, जिव्हाळा मित्र मंडळाचे मिलींद लोहकरे यांनी परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती