Pages

Wednesday, 7 March 2012

कापसाचे भाव पडल्याने शेतक-यांचे अवसान गळाले

घाटंजीत शेकडो वाहने यार्डातून परतली



केंद्र शासनाने कापुस निर्यातबंदी केल्याने कापसाच्या भावात झालेल्या लक्षणीय घसरणीमुळे मार्केट यार्डामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आर्थिक वर्षाचा अखेरचा महिना असल्यामुळे शेतक-यांनी भाव वाढण्याच्या अपेक्षेने 
आजवर संग्रहीत ठेवलेला कापुस विक्रीस काढला होता. आज सुमारे ३०० ते ४०० कापसाची वाहने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात लागलेली होती. मात्र आज कापुस खरेदी करणारे व्यापारीच यार्डात आले नसल्याने पेच निर्माण झाला होता. बाजार समिती कर्मचा-यांनी परिस्थिती शेतक-यांसमोर सांगताच काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले. गतवर्षी यार्डामध्ये झालेल्या तोडफोडीच्या घटनेमुळे तातडीने पोलीसांना पाचारण करण्यात आले. महसुल विभागाच्या अधिका-यांनी यार्डावर येऊन शासनाच्या निर्णयामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगीतल्यावर तणाव निवळला. त्यानंतर मोठ्या अपेक्षेने शेतक-यांनी विक्रीस आणलेला कापुस घरी परत नेला. कर्जफेडीच्या महिन्यातच शेतक-यांवर कोसळलेल्या या संकटामुळे शेतक-यांचे अवसान गळाले असुन कापुस परत न्यावा लागल्याने गाडी भाड्याचा आर्थिक भुदंड शेतक-यांना नाहक सहन करावा लागल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता.
साभार :- देशोन्नती  

Sunday, 4 March 2012

हजारो घाटंजीकरांच्या साक्षीने ‘एच.एम.टी.’ च्या जनकाचा सन्मान








एच.एम.टी.तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांना यावर्षीचा वीर राजे संभाजी पुरस्कार देऊन शिवजयंती उत्सवात गौरविण्यात आले. यावेळी सुमारे १५ हजार घाटंजीकरांनी उभे राहुन दादाजींच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा केला. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी श्यामकांत मस्के होते. याप्रसंगी संपुर्ण खोब्रागडे कुटूंबीयांचाही सत्कार करण्यात आला. मराठमोळा वेश परिधान केलेल्या युवक युवतींनी गौरवचिन्ह सभामंडपात आणले तेव्हा सर्वांच्याच नजरा त्याकडे खिळल्या होत्या. राजेश उदार यांनी मानपत्राचे वाचन केले. पुरस्काराला उत्तर देताना दादाजी खोब्रागडे यांनी संशोधनाची प्रामाणीक भुमिका विशद केली. शासन शेतक-यांच्या समस्यांकडे कधीच गांभीर्याने लक्ष देत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात उपजिल्हाधिकारी श्यामकांत मस्के म्हणाले की, आजची पिढी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहे. या पिढीचा बुध्यांक मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता मात्र भावनांक वाढविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पुर्वीच्या काळी किती लढाया जिंकल्या यावर एखाद्या परिवाराला महत्व दिले जात असे. आज किती सॉफ्टवेअर इंजीनियर कुटूंबात आहेत याला महत्व आले आहे. त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना फाजील गोष्टींऐवजी लॅपटॉप घेऊन द्यावे असे आवाहन त्यांनी केले. वीर राजे संभाजी पुरस्कारासाठी एका संशोधकाची निवड करून शिवजयंती उत्सवात विज्ञाननिष्ठतेला सुरूवात केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. याप्रसंगी प्रा. डॉ. प्रदीप राऊत यांचा पी.एच.डी. मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन राजेश उदार  व आभार प्रदर्शन दिपक महाकुलकर यांनी केले.
साभार :- देशोन्नती  

Saturday, 3 March 2012

समुहनृत्य स्पर्धेतून घडले विवीधांगी संस्कृतीचे दर्शन







 























जोगवा, लावणी, गोंडी लोकनृत्य यासह अनेक नृत्यप्रकारांनी शिवतिर्थावर उपस्थित हजारोंच्या संख्येत असलेल्या प्रेक्षकांना ठेका घ्यायला लावले. औचीत्य होते शिवजयंती निमित्य आयोजीत जिल्हास्तरीय समुहनृत्य स्पर्धेचे. 
या स्पर्धेत तब्बल १६ चमुंसह ११९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. वैविध्यपुर्ण गितांच्या तालावर सादर झालेल्या नृत्यांनी वातावरणात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. येथिल विघ्नराज ग्रुपने मोरया मोरया हे गित सादर केले. सुशांत बाडे, ओमप्रकाश दर्शनवार यांच्या शा अ‍ॅन्ड ग्रूपने सादर केलेल्या रोबोटिक्स डान्सने प्रेक्षकांना एका वेगळ्याच दुनियेत नेले. तर दिव्या कठाणे, शिवाणी निस्ताने, समिक्षा वाकपैंजन यांच्या राधिका ग्रूपने सादर केलेल्या राधा कैसे ना जले या नृत्यातून राधा कृष्णाचे नटखट नाते दाखविण्यात आले. युगंधरा अ‍ॅन्ड ग्रुपने सादर केलेल्या लल्लाटी भंडार या नृत्यात युगंधरा मानकर हिच्या अदाकारीने सर्वांनाच खिळवुन ठेवले तसेच याच नृत्यावर जेसिस कॉलनी मधील गजानन महाराज ग्रुपनेही उत्कृष्ट नृत्य सादर केले. यामध्ये अनुश्री उपलेंचवार हिच्यासह चिमुकल्या मुलींनी आपल्या पदलालित्याने प्रेक्षकांना जिंकले. नटराज अ‍ॅन्ड निमु ग्रुपने सादर केलेल्या देवा श्री गणेशा या नृत्याला तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. या व्यतिरिक्त लावणी ग्रुपचे उचकी (रिमिक्स) नृत्य, महालक्ष्मी ग्रुपने सादर केलेला आई भवानी तुझ्या कृपेने हा रिमिक्स गोंधळ, मैय्याराणी ग्रुप (नमो नमो), नवचैतन्य ग्रुप (श्री गणेशा देवा), नृसिंह ग्रुप (गोंधळ), सिद्धीविनायक ग्रुप (रिमिक्स), गवळण ग्रुप (गवळण), श्री गणेश ग्रुप (देश रंगीला रंगीला), श्री ग्रुप (गोंडी नृत्य) या समुहनृत्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ही स्पर्धा पाहण्यासाठी सुमारे २० हजार प्रेक्षकांची उपस्थिती होती.
या स्पर्धेत नटराज अन्ड निमु ग्रुपला प्रथम पारितोषीक देण्यात आले. या ग्रुपमध्ये नवनित ढोणे, स्वराज भगत, यश दिकुंडवार, शुभम राठोड, शुभम दुल्लरवार, विवेक सिंगणवार, विवेक गडे यांचा सहभाग होता. यवतमाळचा युगंधरा ग्रुप द्वितीय पारितोषीकाचा मानकरी ठरला. या ग्रुपमध्ये युगंधरा मानकर, चांदणी बिसमोरे, सुहासिनी देशभ्रतार, निकीता डोंगरे, अंकिता डोंगरे, अनुराधा डोंगरे यांनी सहभाग घेतला. प्रोत्साहनपर पारितोषीक विघ्नराज ग्रुपला देण्यात आले यामध्ये सचिन झाडे, रोहन त्रिपाठी, गौरव मडावी, साक्षी दिडशे, पुनम वाढई, दिक्षा बाकमवार, साक्षी वाढई हे सहभागी झाले होते.
स्पर्धेचे परिक्षण रूपेश कावलकर व आकाश कवासे यांनी केले. तर संचालन संतोष राऊत यांनी केले.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राजे छत्रपती सामाजीक संस्था व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती  

बांधकाम करतांना शेतात कंत्राटदाराचा हैदोस

बंधारा फोडला, झाडांची कत्तल
घाटंजी सा.बां.विभागाचे अभय


शहराला लागुनच असलेल्या घाटी मोहदा रस्त्याचे बांधकाम करतांना कंत्राटदाराने नियमांची पायमल्ली करीत धिंगाणा घातल्याने सा.बां.विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियमबाह्य कामाच्या पद्धतीमुळे रस्त्याच्या बाजुला असणा-या शेतमालकांना त्याचा फटका बसत आहे. अशाच आशयाची तक्रार अनिल भोयर व सरस्वताबाई भोयर यांनी जिल्हाधिकारी तसेच संबंधीतांना केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घाटी ते मोहदा रस्ता व नाल्यावरील सिमेंट पुलाच्या बांधकामाचे कंत्राट यवतमाळ येथिल गादेवार नामक कंत्राटदाराला देण्यात आले आहे. बांधकामादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुने नाली खोदुन ती माती रस्त्यावर भर म्हणुन टाकण्यात आली. त्यामुळे रस्त्याच्या बाजुला असलेल्या शेतक-यांना शेतात जाणेही शक्य होत नाही. बांधकाम करतांना सदर कंत्राटदाराने सिमेंटचे पाईप टाकुन रहदारीची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. सदर शेतक-याने याबाबत बांधकाम विभागाचे अभियंता बाराहाते यांना कळविले असता त्यांनी कंत्राटदाराचीच पाठराखण केल्याचा भोयर यांचा आरोप आहे. 
या शेतामधुन वाहात असलेल्या नाल्यावर जि.प.मार्फत बांधण्यात आलेला जलधारा बंधारा पुलाच्या बांधकामास पाण्याचा अडथळा होत असल्याने फोडून टाकण्यात आला. तो दुरूस्त करण्यात आलेला नाही. तसेच शेतामध्ये असलेली सुमारे २० ते २५ वर्षांपुर्वीची सागवानाची झाडे वनविभाग अथवा शेतक-यांची परवानगी न घेता कंत्राटदाराने परस्पर तोडून टाकली. त्यामुळे सदर शेतक-याचे आर्थिक नुकसान झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला खोदण्यात आलेल्या नाल्यांची पातळी सारखी आहे. त्याचा योग्य उतार काढण्यात आलेला नाही. शेतामधुन जात असलेला नाला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहतो. त्याचे पाणी या नाल्यांमधुन येण्याची शक्यता असल्याने पाणी थेट शेतात घुसणार आहे. त्यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भिती व्यक्त केल्या जात आहे. घाटी-मोहदा रस्त्याचे करण्यात येत असलेले डांबरीकरण अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असुन नियमाला अनुसरून साहित्याचा वापर होत नसल्याचाही आरोप होत आहे. या सर्व नियमबाह्य बाबींकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सपशेल दुर्लक्ष करीत असल्याने कंत्राटदारांचा मनमानीपणा बिनदिक्कतपणे सुरू आहे. याकडे वरीष्ठांनी लक्ष देऊन गुणनियंत्रण विभागातर्फे पाहणी करावी अशी मागणी होत आहे. विनापरवानगी सागवान वृक्षांची तोड करण्यात आल्याबद्दल कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी अनिल भोयर यांनी केली आहे.
साभार :- देशोन्नती  

Friday, 2 March 2012

५० लाखांच्या अपात्र बांधकामांना शासनाने दिली मान्यता

सार्वजनिक बांधकाम विभागाचा पराक्रम

सार्वजनिक बांधकाम विभाग, यवतमाळ यांच्या तब्बल ५० लाखांच्या अपात्र बांधकामास महाराष्ट्र शासनाने नुकतीच मान्यता दिली असुन घाटंजी सोनखास मार्गावर ४ रपट्यांचे बांधकामही जोरात सुरू झाले आहे. या कामांकरिता जिल्हा नियोजन व विकास मंडळाची मान्यता नाही. शिवाय रस्ते विकासासाठी अग्रक्रम नसतांनाही हे काम सुरू केल्याने हे बांधकाम अवैध ठरणारे आहे. असे असताना सा.बां.विभागाच्या अधिका-यांनी अशा बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडून मंजुर करून घेण्याची किमया कशी साधली हा प्रश्न सध्या चर्चील्या जात आहे.
घाटंजी येथिल प्रा.डॉ.प्रदिप रामकृष्ण राऊत यांनी माहितीच्या अधिकारान्वये प्राप्त केलेल्या माहितीतून हा प्रकार उघडकीस आला असून सार्वजनिक बांधकाम खाते, प्रादेशिक विभाग अमरावतीचे मुख्य अभियंता, सा.बां.विभाग यवतमाळचे कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता व उपविभागीय अधिकारी सा.बां.विभाग घाटंजी अशा उच्च अधिका-यांच्या एकत्रीत संगनमतानेच रस्ते विकासाची बोगस योजना आखून शासनाला गंडा घातला व त्यामुळेच अनावश्यक बांधकामापोटी लाखो रूपयांचा भुदंड शासनाला सहन करावा लागला असल्याचा आरोप त्यांनी  प्रसिद्धीपत्रकातून केला आहे.
घाटंजी सोनखास मार्गावरील रपट्यांच्या बांधणीसाठी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय क्रं.रामा/३५१०/सीआर/१६४९/ दि.२०.०३.२०१० रोजी ५० लाख रूपयांच्या १२ रपट्यांसाठी एकाचवेळी प्रशासकीय मान्यता प्रदान केली. त्यानुसार निविदा बोलावून दि.१६.१२.२०१० ला एस.पी.जिरापुरे यांना एकाचवेळी १२ रपट्यांचे काम देण्यात आले. मात्र जिल्हा नियोजन मंडळाच्या शिफारशी शिवाय अशा कामास मंजुरीच प्रदान केल्या जाऊ शकत नाही, अशी शासनाच्या पत्रात स्पष्ट नोंद असूनही या कामास मात्र अशी मंजुरी कशी मिळाली? असा प्रश्न प्रा.राऊत यांनी उपस्थित केला आहे. ज्याअर्थी नियोजन मंडळाची गत ३ वर्षांपासून एकही शिफारस नाही त्यानुसार हे काम अनावश्यकच होते हे स्पष्ट होत आहे. अग्रक्रमाच्या जिल्हा रस्ते विकासाच्या कामाचा अनुशेष बाकी असतांनाही असे बांधकाम त्वरेने करण्यासाठी अधिका-यांची धावपळ का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. 
विशेष म्हणजे घाटंजी सोनखास मार्गावर सद्यस्थितीत जे चार रपटे बांधले जात आहेत ते रपटे भुईसपाट करून पुन्हा नव्याने दुसरे रपटे बांधण्याची मुळी गरजच नव्हती. कारण १९७६ मध्ये कठीण अशा दगडाने बांधलेले हे रपटे अत्यंत मजबूत स्थितीत होते. शिवाय गेल्या ३५ वर्षातही पाणी अडल्याने या रपट्यांमुळे बाहतुकीस कधीच अडचण आली नाही. असे असतांनाही १०० वर्षांपेक्षा अधिक आयुष्य असणारे हे रपटे अवघ्या ३५ वर्षातच का उखडून टाकण्यात आले? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महत्वाचे म्हणजे हे रपटे उखडण्यापुर्वी कोणत्याही अभियंत्याकडून या रपट्यांची पाहणी करण्यात आली नाही. माहितीच्या अधिकारान्वये असा तपासणी अहवाल मागीतला असता अशी पाहणीच झाली नसल्याचे उघड झाले आहे. अशा तांत्रिक कामास मंजुरी प्रदान करण्यापुर्वी सर्वेक्षण करूनच अंदाजपत्रक तयार करावे हा साधा नियमही पूर्णत: धाब्यावर बसवलेला दिसतो. मात्र ३ अधिका-यांनी अशी पाहणी झाल्याचे खोटे प्रमाणपत्र शासनास सादर केले आहे. तसेच रपटे बांधण्याची कारणे दर्शवितांना दोन वेळा वेगळी व विसंगत ठरणारी कारणे देण्यात आल्याचेही पत्रकात म्हटले आहे. रपटे तर तोडले पण रोजगार हमी योजनेतूनच असे काम केले जावे असा नियम असतांना सदर काम जेसीपीने केल्या गेले याकडेही कानाडोळा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील व राज्यातील रस्ते विकासाकरिता ज्या रस्त्यांचा अनुक्रम ठरविला जातो त्यात हा रस्ता बसणाराच नाही. तरीही कुणाचीही मागणी नसतांना घाईघाईने या रस्त्यावरील रपट्यांच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळवुन घेण्यात आली. स्थानिक आमदार व लोकांच्या शिफारसीनुसार असे काम मंजूर करून घेण्यात आले असे म्हणणारे अधिकारी मात्र याचा स्पष्ट पुरावा म्हणून कोणताही अभिलेख देऊ शकले नाहीत. तसेच वाढत्या वाहतुक अडथळ्यांचे प्रमाण व ते अनुज्ञेय प्रमाणापेक्षा कमी जास्त असल्याचा योग्य खुलासाही अधिका-यांकडून करण्यात आला नाही. त्यामुळेच या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्याशिवाय उर्वरीत कामे करण्यात येऊ नये असेही पत्रकात म्हटले आहे.
साभार :- देशोन्नती