Pages

Tuesday, 29 May 2012

भावापाठोपाठ आईनेही दिली तिला किडनी दान

घाटंजीतील कटकमवार परिवार जोपासतोय जिव्हाळ्याची अनोखी परंपरा

रक्ताच्या नात्यातील जिव्हाळा कधीही न तुटणारा आहे. या नात्यात कितीही मतभेद असले तरी प्रसंगी आपल्या माणसाप्रती ओढ वाटतेच. आजच्या युगात रक्ताची नातीही परक्यापेक्षा वाईट वागत असल्याची अनेक उदाहरणे असली तरी आपल्या जीवाभावाच्या माणसासाठी आपल्या शरीराचा एक भाग दान करणारे सुद्धा या समाजातच आहेत. जग कितीही स्वार्थी झाले तरीही हक्काच्या नात्याची नाळ अजुनही जुळलेलीच आहे. खापरी (घाटंजी) येथिल कटकमवार परिवाराने आपल्या कृतीतून समाजापुढे एक अनुकरणीय आदर्श ठेवला आहे. येथिल व्यावसायीक अभय कटकमवार यांच्या मातोश्री हिराबाई ब्रम्हानंद कटकमवार यांनी त्यांची मुलगी अश्विनी अनिल बेलगमवार रा. आर्णी हिला किडनी दान केली. अश्विनी ही गेल्या ११ वर्षांपासुन किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे. १० वर्षापुर्वी तिचे बंधु अभय कटकमवार यांनी तिला एक किडनी दान केली होती. पुन्हा किडनी खराब झाल्यामुळे आईने आपल्याच शरीराचा भाग असलेल्या लेकीसाठी किडनी दान दिली. हिराबाई ५८ वर्षांच्या आहेत. या वयातही अवघड शस्त्रक्रीयेला सामोरे जाऊन त्यांनी मातृत्वात असलेल्या अजोड जिव्हाळ्याचा परिचय दिला. 
काही महिन्यांपुर्वी हैदराबाद येथिल महाविर हॉस्पीटल मध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.
नुकत्याच कृषी भवन घाटंजी येथे झालेल्या एका कौटुंबीक कार्यक्रमात सहयोग नागरी सहकारी पतसंस्था व अभय कटकमवार मित्र परिवाराच्या वतीने हिराबाई कटकमवार यांचा 
सन्मान करण्यात आला. या भावनिक सोहळ्यात सहयोग पतसंस्थेचे विनोद गवळी, रविंद्र उमाटे, उत्तम कोवे, मोहन ढवळे, विशाल साबापुरे, तसेच अनिता सुधीर बोरगावकर, सखाराम निलावार, माला अवधुत बिजमवार, शितल अभय कटकमवार, विनोद गुज्जलवार, संस्कृती कटकमवार यांच्यासह मित्रपरिवाराची उपस्थिती होती.
साभार :- देशोन्नती 

ले-आऊट धारकांनी पाडले न.प.चे सार्वजनिक शौचालय


ले-आऊट मध्ये अडसर ठरत असलेले घाटंजी नगर परिषदेचे सार्वजनिक शौचालयच ले-आऊट धारकांनी पाडण्यास सुरूवात केल्याने न.प.प्रशासनाचा वचक नसल्याचे दिसुन येत आहे. काही नागरिकांनी ही बाब नगर परिषदेच्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांनी ले-आऊट धारक राजीव राधामोहन बजाज, प्रदिप पुरूषोत्तम लोयलका, वर्षा राजेश ठाकुर यांना थातुर मातूर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 
येथिल शेत सव्र्हे क्रं.५५/२ मध्ये या भागातील रहिवाशांसाठी अनेक वर्षांपुर्वी नगर परिषदेने सार्वजनिक शौचालय बांधलेले आहे. परिसरातील सर्वसामान्य नागरिक त्याचा उपयोगही करतात. या शौचालयाच्या मागील बाजुस असलेल्या शेतात ले-आऊट झाले आहे. या सार्वजनिक शौचालयामुळे प्लॉटचे भाव अपेक्षेप्रमाणे मिळणार नाहीत या उद्देशाने सदर ले-आऊटधारकांनी कोणताही विचार न करता शौचालयाचे बांधकाम पाडायला सुरूवात केली. सुमारे १० वर्षांपुर्वी तत्कालीन न.प.पदाधिका-यानी ले-आऊटधारकासोबत हे शौचालय पाडून दुस-या जागेवर दहा शौचालये बांधुन देण्याचा करार केला होता असे ले-आऊटधारकाचे म्हणणे आहे. 
मात्र दहा वर्षांपुर्वी केलेल्या तथाकथित कराराची अंमलबजावणी आजवर का केली नाही? तसेच न.प.ची मालमत्ता असलेल्या बांधकामाला पाडण्याचा अधिकार खासगी व्यक्तीला आहे का? असे प्रश्न उपस्थित केल्या जात आहेत.
मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे यांनी सदर ले-आऊटधारकांवर फौजदारी अथवा दंडात्मक कार्यवाही न करता थातुर मातूर कारणे दाखवा नोटीस बजावून औपचारीकता पुर्ण केली असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एवंâदरीतच नियमबाह्य होत असलेल्या कामांवर नगर परिषद प्रशासनाचे लक्ष नसुन सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीतच नियमांवर बोट ठेवुन काम केल्या जात असल्याची ओरड होत आहे.
साभार :- देशोन्नती 

घाटंजीत ‘तरूणाईच्या वेगळ्या वाटा’ शिबिराचे आयोजन  

‘चलो युवा कुछ कर दिखाये’ या चळवळीच्या वतीने येथिल रसिकाश्रय संस्थेच्या फार्म हाऊसवर दि.१ ते ३ जुन पर्यंत तरूणाईच्या वेगळ्या वाटा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हालाखीच्या परिस्थितीत युवकांनी न डगमगता कसे उभे रहावे? करीयर सोबतच समाजहिताच्या दृष्टीने कसे कार्य करावे याचे मार्गदर्शन या शिबिरात करण्यात येणार आहे.
या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी वसुंधरा पाणलोट विकास प्रकल्पाचे उपायुक्त इंद्रजीत देशमुख, पुणे, डॉ.राम पुनियानी, मुंबई, नरेश माहेश्वरी, आमगाव जि.गोंदीया, बंटी भांगडीया, चिमुर, जि.चंद्रपुर, नंदु माधव, गेवराई जि.बिड, दत्ता बाळसराफ, मुंबई, अ‍ॅड. असिम सरोदे, पुणे, चंद्रकांत वानखडे, नागपुर, विकास लवांडे, पुणे, आनंद पवार, पुणे, डॉ अविनाश सावजी, जिल्हाधिकारी डॉ.श्रावण हर्डीकर, दगडू लोमटे, अनिकेत लोहिया, संतोष गर्जे, डॉ.प्रियदर्शन तुरे, रवि बापटले, अ‍ॅड पल्लवी रेणके, छोटु काका वरणगावकर, डॉ.अशोक बेलखोडे, प्रकाश ढोबळे, प्रा.वर्षा निकम, अ‍ॅड सिमा तेलंगे, प्रविण देशमुख, आमदार संजय राठोड, मधुकर धस, किशोर मोघे, राम नायगावकर, अविनाश मारशटवार, डॉ.मधुकर गुमळे, प्रा.दिलीप अलोणे, हरिश ईथापे, प्रा.हेमंत कांबळे. बाळासाहेब सरोदे, संजय संगेकर, पुंडलीक वाघ, रमाकांत मस्के, विजय कडू हे विवीध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरात विवीध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिवाय युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणुन संगित रजनी, लावणी महोत्सव तसेच तरूणाईच्या वेगळ्या वाटा या विषयावर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात भाग घेण्यासाठी २०० रूपये नोंदणी शुल्क आकारण्यात येणार असुन या शिबीरात सहभागी होण्यास ईच्छुक असलेल्यांनी महेश पवार, देवेंद्र गणवीर यांचेशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.     
साभार :- देशोन्नती 

Tuesday, 22 May 2012

उलट्या फिरणा-या ‘काट्यांमुळे’ घाटंजीत घड्याळीची ‘वेळ’ खराब


काही महिन्यांपुर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घाटंजी तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दयनीय पराभव झाला होता. जिल्हा परिषद तर सोडाच पण पंचायत समितीची एक जागाही रा.कॉ.ला पदरात पाडता आली नाही. तालुक्यातील दोन दिग्गज नेते एकत्र असतांना राष्ट्रवादीचा असा पराभव कदाचित विरोधकांनाही अपेक्षीत नव्हता. विजय व पराभव एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. मात्र पराभवानंतर त्याच्या कारणांचा शोध घेऊन त्यादृष्टीने उपाययोजना करण्याचा प्रघात राजकीय पक्षांमध्ये असतो. मात्र घाटंजी तालुक्यात तसे झालेले दिसत नाही. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरूद्ध आपली उमेदवारी दाखल करणारे व पक्षासोबत असल्याचे दाखवुन छुप्या पद्धतीने विरोधकाला सहकार्य करणारे तथाकथित पक्षनिष्ठ अजुनही राष्ट्रवादी मध्ये आहेत. त्यांच्यावर पक्षविरोधी कुरापती केल्यामुळे शिस्तभंगाची कार्यवाही झाल्याचे ऐकीवात नाही. तालुक्यात झालेल्या मानहानीजनक पराभवाची जबाबदारी स्विकारून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश डंभारे यांनी राजीनामा देण्याची औपचारीकता पुर्ण केली होती. मात्र नुकत्याच झालेल्या तालुकाध्यक्षांच्या निवडीत त्यांच्यावरच ती जबाबदारी पुन्हा एकदा सोपविण्यात आली. तालुक्यातील एक मोठा गट कॉंग्रेसमधुन राष्ट्रवादी मध्ये आला असला तरी तालुकाध्यक्ष पदासाठी पक्षाला माणसांची उणिव भासत असल्याचे प्रकर्षाने दिसत आहे. पक्षबांधणीसाठी सक्षम नेतृत्वाकडे जबाबदारी असणे गरजेचे असते. स्वतंत्र निर्णयक्षमता असल्याशिवाय कोणीही त्या पदाला न्याय देऊ शकत नाही. प्रकाश डंभारे हे माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांच्या अत्यंत जवळचे आहेत. ‘मालक’ म्हणतील तीच पुर्व दिशा असा त्यांचा ठाम विश्वास आहे. एकंदरीतच ते स्वतंत्र निर्णय घेण्यास सक्षम नाहीत. वाड्यावरून येणारा आदेशच शिरोधार्य मानुन ते काम करतील. त्यामुळे त्यांचा स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांवर वचक राहणे शक्यच नाही. राष्ट्रवादीतील नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी देण्या ऐवजी जे आहेत त्यांच्या पलीकडे न जाण्याच्या कार्यपद्धतीमुळे सध्या तालुक्यात राष्ट्रवादीवर खराब वेळ आली आहे.
नगर परिषद निवडणुकीत माजी खासदार पुत्राने दोन प्रभागात सेनेशी सलगी करून रा.कॉ. उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला होता. न.प.उपाध्यक्ष पद भोगलेल्या नगरसेवकानेही उमेदवारी मिळाली नाही म्हणुन पक्षविरोधी प्रचार केला. परिणामस्वरूप स्पष्ट बहुमत मिळेल अशी स्थिती असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला अवघ्या पाच जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम केले असते तर नगर परिषदेवर आज राष्ट्रवादीची एकहाती सत्ता राहीली असती. त्यावेळी सुद्धा पक्षासोबत दगा करणा-यांना अभय मिळाले.
पक्षात नव्याने आलेल्या सुरेश लोणकरांना पक्षाने शिवणी जि.प.गटात उमेदवारी दिली होती. त्यामुळे या जागेसाठी पुर्वीपासुन ईच्छुक असलेले राष्ट्रवादीचे दोन उमेदवार स्वाभाविकपणे दुखावल्या गेले. दोघांनीही उमेदवारी दाखल केली. त्यापैकी एकाने आपले बंड कायम ठेवले तर दुस-याने कथितपणे पक्षादेश शिरोधार्य मानुन माघार घेत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना तन मन धनाने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रचार कार्याच्या शुभारंभ प्रसंगी आपल्या ग्रामदैवतासमोर दिलेला शब्द मात्र त्यांनी पाळला नाही. पक्षाच्या उमेदवाराला सहकार्य करणे तर सोडाच पण त्यांचा पाडाव करण्यासाठी तन, मन, धनाने ते निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे संपुर्ण तालुक्याने अनुभवले. एवढ़ेच नव्हे तर निवडणुकीच्या एक दिवस आधी त्यांच्याच शिक्षण संस्थेच्या ईमारतीत विरोधी पक्षाच्या उमेदवारासोबत गुप्त बैठकी घेऊन पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी रणनीतीही आखली. या सर्व कुरापतींमुळे राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांचा दारूण पराभव झाला. जे झाले ते झाले. मात्र या सर्व अनुभवातून पक्षाने कोणताही धडा घेतल्याचे दिसत नाही. राष्ट्रवादीच्या घड्याळाला चालविण्याची जबाबदारी असलेले हे काटे असेच उलटे फिरत राहिले तर भविष्यामध्ये या पक्षाला तालुक्यात स्थान राहील की नाही अशी शंका निर्माण झाली आहे.

अमोल राऊत
साभार :- देशोन्नती 

नाभिक समाजाच्या समस्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडणार

घाटंजी येथे महामेळाव्यात ना.मोघेंचे प्रतिपादन

काळाच्या ओघात नाभिक समाज प्रगतीपासुन वंचित राहिला आहे. मुख्य प्रवाहात येण्यासाठी समाजाला लढा देण्याची गरज आहे. सर्व मागण्या व समस्या सहज सुटणार नाहीच. त्यासाठी योग्य पाठपुरावा करावा लागेल. नाभिक समाजाच्या मागाण्यांसंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करणार असे आश्वासन राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना. शिवाजीराव मोघे यांनी दिले. येथिल संत मारोती महाराज सांस्कृतीक भवनात आयोजीत नाभिक समाजाच्या महामेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे प्रांताध्यक्ष कल्याण तळे होते. प्रमुख अतिथी म्हणुन महामंडळाचे उपाध्यक्ष दामोधर बिडवे, कार्याध्यक्ष पुंडलीक केळझरकर, जि.प.सदस्य देवानंद पवार, योगेश देशमुख, पं.स.सभापती शैलेश इंगोले, उपसभापती सुवर्णा निकोडे, नगराध्यक्ष जगदिश पंजाबी, नगरसेवक किशोर दावडा, नाभिक महामंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय धारकर, राजेश नागतुरे, जिल्हाध्यक्ष संजय मादेशवार, सचिव संतोष मोतेवार, जिल्हा संघटक शशीकांत नक्षणे, श्री.पिस्तुलकर, दिलीप मादेशवार, अरूण ठणेकर यांचेसह घाटंजी पंचायत समितीचे सदस्य, न.प. सदस्य यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 
नाभिक महामंडळाच्या पदाधिका-यांनी समाजाच्या विवीध समस्या व मागण्या मंत्री महोदयांसमोर मांडल्या. त्यावर यथोचीत उपाययोजना करण्याचे तसेच नाभिक महामंडळाच्या पदाधिका-यांची मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन ना. मोघे यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. पिस्तुलकर यांनी केले. तर संचालन व आभारप्रदर्शन प्रदिप गड्डमवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाभिक महामंडळाचे जिल्हा संपर्क प्रमुख गजानन भालेकर, तालुकाध्यक्ष बाबाराव लिंगणवार, शहराध्यक्ष अमोल मोतेलवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या महामेळाव्याला मोठ्या प्रमाणात समाजबांधवांची उपस्थिती होती.
साभार :- देशोन्नती