Pages

Monday, 13 February 2012

बाबासाहेब देशमुख विद्यालयात क्रीडा महोत्सव


साखरा(खुर्द) येथील बाबासाहेब देशमुख विद्यालयात स्नेहसंमेलन, विविध स्पर्धा आणि क्रीडा महोत्सव नुकताच पार पडला. स्नेहसंमेलनाची सुरुवात महाराष्ट्र छात्रसेना दिनापासून झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती दिनी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक महेश बोदुलवार तर उद्घाटक राजू दिकुंडवार होते.
एमसीसी प्रशिक्षक संजय चौलमवार यांनी अनुशासन, शौर्य व राष्ट्रप्रेम हे गुण विकसित होण्यासाठी एससीसी महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश बोदुलवार यांनी विविध स्पर्धेचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.
गीतगायन, प्रश्नमंजूषा, बचाव स्पर्धा, स्लो सायकलिंग, गोळाफेक, थाळीफेक, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, सॅक रेस, एक मिनीट स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले कलाकौशल्य दाखविले. प्रजासत्ताक दिनी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात लावणी नृत्य, बंजारा नृत्य, पर्यावरण बचाव नाटिका तसेच शिक्षणाचे महत्त्व सांगणारी नाटिका राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून सादर करण्यात आली. 
इसाफ पठाण, मनीषा मोहुर्ले, दुर्गा राठोड, शुभम तामगाडगे, भावना राऊत, कुणाल कुळसंगे, ज्योत्स्ना चव्हाण, करिश्मा जाधव यांना बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमांसाठी यादव घोडे, कृष्णा नार्लावार, अक्षय डंभारे, सैयद मुतालिक, खुशाल डंभारे आदींनी पुढाकार घेतला. या महोत्सवासाठी बाबासाहेब देशमुख विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.
साभार - लोकमत

Saturday, 11 February 2012

एच.एम.टी.तांदुळाच्या जनकाला यंदाचा ‘वीर राजे संभाजी पुरस्कार’

एच.एम.टी.तांदुळाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांना यावर्षीचा वीर राजे संभाजी पुरस्कार घोषीत करण्यात आला आहे. दरवर्षी शिवजयंती उत्सवात राजे छत्रपती सामाजीक संस्था व संभाजी ब्रिगेड तर्फे साहित्य, कला, क्रिडा, शेती तथा सामाजीक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणा-या विभुतीला हा पुरस्कार देण्यात येतो. 
चंद्रपुर जिल्ह्यातील नांदेड गावी शेती करणारे दादाजी रामजी खोब्रागडे यांनी त्यांच्याकडे असलेल्या दिड एकर शेतीमध्ये विवीध प्रयोग केले आहेत. तांदुळाच्या एच.एम.टी. वाणासह ईतर आठ वाणांचा त्यांनी शोध लावला आहे. त्यांनी संशोधन केलेल्या एच.एम.टी.सोना या वाणाला संपुर्ण देशात प्रचंड मागणी असुन सद्यस्थितीत चार राज्यांमध्ये त्याची लागवड केल्या जात आहे. अल्पशी शेती, तिस-या वर्गापर्यंत शिक्षण व हालाखीची आर्थिक परिस्थिती असतानांही त्यांनी शेतीच्या क्षेत्रात संशोधन करून एक आदर्श निर्माण केला. त्यांची ही कामगिरी विदर्भासाठी गौरवास्पद असुन शेतकरी आत्महत्यांचा प्रदेश असे दुर्दैवी बिरूद लागले असतांना त्यांच्या कामाने नवी ओळख निर्माण करून दिली आहे. शेतक-यांसह सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरलेल्या दादाजींचा सन्मान शिवजयंती उत्सवात १९ फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे उपाध्यक्ष वसंतराव पुरके राहणार असुन पणन महासंघाचे संचालक अण्णासाहेब पारवेकर, लोकनेते सुरेश लोणकर, उपजिल्हाधिकारी श्यामकांत मस्के यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजे छत्रपती सामाजीक संस्था व संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.


दादाजी खोब्रागडे यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
http://dadajikhobragadefoundation.wordpress.com/

Friday, 10 February 2012

घाटंजीत गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचे भव्य आयोजन


संत गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाच्या निमित्ताने विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.११ ते १४  फेब्रुवारी पर्यंत आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल घाटंजी शहरात राहणार आहे. या कालावधीत दररोज दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करण्यात येणार आहे. उद्या सकाळी ६ वाजता कलश स्थापना, काकड आरती व श्रींच्या मुर्तीला अभिषेक करण्यात येईल. या तिन दिवसीय आध्यात्मिक उत्सवात मदन महाराज काठोळे यांचे रामायणावर प्रवचन, ह.भ.प. राजु महाराज विरदंडे यांचे किर्तन, ह.भ.प.विष्णु महाराज यांचे किर्तन, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज व संचाचा भक्ती संगिताचा कार्यक्रम यासह होम हवन, हरिपाठ व सामुदायीक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे. संत गजानन महाराजांच्या प्रगटदिनी १४  फेब्रुवारी ला दुपारी २ ते ४ 
पर्यंत महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. या दरम्यान दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत श्रींच्या पालखीची गावातून मिरवणुक काढण्यात येईल. श्री बलखंडी महाराज हरिपाठ मंडळ, वाई मेंढा यांचा काकडा व हरिपाठ, देवधरी मंडळाचा अखंड विणा, पार्डी (न), शिरोली, पांढुर्णा, जय बजरंग मंडळ (मांजर्डा), हरिपाठ मंडळ चिचघाट, तिवसाळा, श्री गजानन हरिपाठ मंडळ पहुर (न), पाटापांगरा, सायतखर्डा, हरिपाठ भजनी मंडळ शेंद्री यासह तालुक्यातील भजनी मंडळ या उत्सवात सहभागी होणार आहेत. 
या सर्व आयोजनाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री.गजानन महाराज संस्थान, घाटंजी यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

निवडणुक झाली...आता व्हायचे ते होईल....!

उमेदवारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
मतदार राजा पुन्हा कंगाल 
भल्या पहाटे उठुन रात्री उशिरापर्यंत धावपळ...गृहभेटी, प्रचार...  कार्यकर्त्यांची मर्जी -मतदारांचा मुड सांभाळणे... प्रत्येकालाच भाऊ-दादा ...करुन मानपान करणे...झाले एकदाचे.  हुश्श..! आता मतदान आटोपले... पुढे काय होईल ते होईल...
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत रिंगणात असलेले उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीची धावपळ आटोपताच सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. दहा ते १५ दिवस प्रचंड दगदग व धावपळीचे गेले. तिकीट मिळविण्यापासुन सुरू झालेली कसरत मतदारांकडून मतदान करुन घेण्यापर्यंत कायम होती. या काळात मर्जी सांभाळायची तरी कोणाकोणाची? दररोज नेत्यांच्या घराचे दरवाजे ठोठवायचे. दारात उभे राहून तिकीट मागायचे. पक्षाचे तिकीट पदरात घेण्याचे दिव्य पार पाडल्यावर लक्षात आले की अजुन तर मोठा पल्ला गाठायचा आहे. प्रत्यक्ष रिंगणात उतरल्यावर एका दरवाजाचे हजारो दरवाजे झाले. प्रत्येक कार्यकर्ता, मतदार यांच्या घरी फेऱ्या माराव्या लागल्या.  दारोदारी भटकावे लागले. हाडवै-यालाही ‘भाऊ लक्ष ठेवजो’ म्हणुन हात जोडावे लागले. दिवसाची सुरूवात भल्या पहाटे होत असली तरी झोपण्याची वेळ मात्र निश्चित ठरलेली राहात नव्हती. कधी एक वाजायचा. कधी तीन वाजायचे. कधी-कधी तर अंथरुणाला पाठ टेकते न टेकते तोच मोबाईल वाजायचा, ‘भाऊ तुमाले चाला लागते, दुस-या पार्टीवाले आपल्या एरीयात घुसले. आपले मतदार मॅनेज करने सुरू आहे’. अशी वार्ता कानी पडली की, एक एक दिवस झोपही नाही. स्वत:चा प्रचार करत असतांनाच विरोधी उमेदवारांच्या कुरापतींकडे लक्ष ठेवणे. या दरम्यान कुटूंब, जबाबदा-या, कामधंदा सगळं काही जागेवर. प्रचाराची धामधुम संपताच पोलचिटच्या निमित्ताने पुन्हा मतदारांचे घर गाठायचे. काही कमी पडले का विचारायचे. याच धावपळीत मतदानाचा दिवस आला. पुन्हा पहाटे उठून राहिलेल्यांच्या भेटी. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्याची व्यवस्था करणे यातच ५.३० ची वेळ संपून गेली. पुन्हा कार्यकर्त्यांच्या भेटी, कुठे काय झाले, मतदान कसे झाले, कुणाला झाले, त्यांनी मतदार आणण्यासाठी केलेली व्यवस्था, त्यांचे हिशोब, देणे-घेणे या सगळ्यात मतदानाच्या दिवशीही वेळेचे भान राहिले नाही. अखेर सर्व काही व्यवस्थित पार पडले अन् मोबाईल बंद करुन शांत झोप लागली ती दिवस केंव्हा वर आला हे कळलेच नाही. ही अवस्था निवडणूकीत जवळपास प्रत्येक उमेदवार व त्यांच्या सोबत राबणा-या कार्यकर्त्यांची होती. मतदान संपले आणि त्यांनी सुस्कारा सोडला. धावपळ थांबली. आता फक्त निकालाची प्रतिक्षा राहीली आहे. येत्या १७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी  होणार आहे. त्यात मतदारांनी काय कौल दिला याची धाकधुक असली तरी बहुतांश उमेदवारांनी आता जे व्हायचे ते होईल. उगीच टेंशन घेऊन फायदा काय? अशी मानसिकता करुन घेतली आहे. आता रिलॅक्स मुडमध्ये हे उमेदवार राहणार आहेत या कालावधीत पुन्हा कार्यकर्ते व मतदारांची कटकट नको म्हणून अनेकांनी आपले मोबाईलसुद्धा बंद करुन ठेवले आहेत. कांहींनी  हवापालट करण्यासाठी नियोजनही केले आहे. तर कोणी देवदर्शनालाही निघुन गेले आहे. ग्रामिण भागात नेत्यांच्या भरधाव गाड्यांनी उडणारा धुरळा आता दिसेनासा झाला आहे. निवडणुकीच्या झगमगाटात झाकल्या गेलेली ग्रामिण भागाची बिकट अवस्था, ग्रामस्थांना भेडसावणा-या समस्या पुन्हा नजरेस पडत आहेत. मात्र आता त्याचे कुणाला काय? अखेर गेल्या महिनाभरात सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला मतदार राजा मताचे दान देऊन कंगाल झाला आहे.
साभार :- देशोन्नती

शिवजयंती उत्सव २०१२



स्थळ:- शिवतीर्थ, जेसिस कॉलनी, घाटंजी
दि. १८ व १९ फेब्रुवारी २०१२

कार्यक्रम पत्रिका

दि.१८ फेब्रुवारी 
दुपारी ३ वाजता 
जलाराम कॉम्पुटर्स द्वारा प्रायोजीत
तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा 
विषय:- भारताचा स्वातंत्र्य लढा 
गट अ ( वर्ग ११ ते महाविद्यालय)
प्रथम बक्षिस १००१ रू.
प्रोत्साहनपर १०१ रूपयांची १० बक्षिसे
गट ब (वर्ग ७ ते १०) 
प्रथम बक्षिस १००१ रू.
प्रोत्साहनपर १०१ रूपयांची १० बक्षिसे

सायंकाळी ६ वाजता
उद्घाटन सोहळा, सत्कार समारंभ 
खुली समुहनृत्य स्पर्धा 
प्रथम बक्षिस २००१ रू.
(स्व.मारोतराव अक्कलवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुधाकर अक्कलवार यांचेकडून)
द्वितीय बक्षिस १००१ रू.
(कृष्णा कॉम्पुटर्स, प्रो.प्रा.अरविंद मानकर यांचेकडून)
प्रवेश फि. १०१ रू.

दि.१९ फेब्रुवारी 
सकाळी ८ वाजता 
मॅराथॉन स्पर्धा
गट अ (खुला)
प्रथम बक्षिस १००१ रू.
 (विनायका एजंसी, प्रो.अनुप देव यांचेकडून)
द्वितीय बक्षिस ५०१ रू.
 (एकविरा डेली निड्स, प्रो.मनोज ढगले यांचेकडून)
गट ब (वय ६ ते १४ वर्ष)
प्रथम बक्षिस ७०१ रू.
 (निमकर बिछायत व कॅटरर्स, प्रो.योगेश व मंगेश निमकर यांचेकडून)
द्वितीय बक्षिस ५०१ रू. 
(पुर्ती किराणा स्टोअर्स, प्रो.प्रमोद टापरे यांचेकडून).

सकाळी ११ वाजता 
स्वातंत्र्यसेनानी स्व.कवडूजी पिसाळकर स्मृतीप्रित्यर्थ
विदर्भस्तरीय वादविवाद स्पर्धा 
विषय:- प्रसारमाध्यमांची वाढती व्यावसायीकता लोकशाहीस मारक .
प्रवेश फि.१०१ रू.
प्रथम बक्षिस ३००१ रू.
 (स्व.डॉ.ज्ञानेश्वर राऊत स्मृतीप्रित्यर्थ अमोल राऊत यांचेकडून)
द्वितीय बक्षिस २००१ रू.
 (भरत खाटीक यांचेकडून)
तृतिय बक्षिस १००१ रू.
 (महालक्ष्मी एजंसी, प्रो.पंकज तन्ना यांचेकडून)

सायंकाळी ५ वाजता
खुली फ्लॉवर डेकोरेशन स्पर्धा
नि:शुल्क
प्रथम बक्षिस ७०१ रू. 
(अनिता व-हाडे यांचेकडून)
द्वितीय बक्षिस ५०१ रू.
 (मोहित हेयर पार्लर, प्रो.विशाल यल्लरवार यांचेकडून)

सायंकाळी ६ वाजता
शिवपुजन व व्याख्यान
प्रमुख वक्ते:- डॉ.साहेबराव खंदारे (ईतिहास संशोधक तथा सुप्रसिद्ध वक्ते, परभणी)

सायंकाळी ७ वाजता 
वीर राजे संभाजी पुरस्कार वितरण समारंभ
पुरस्काराचे मानकरी :- दादाजी खोब्रागडे, (एच.एम.टी.तांदुळाचे संशोधक, चंद्रपुर)
कार्यक्रमाचे अध्यक्ष :- वसंतराव पुरके, (उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा)

सायंकाळी ८ वाजता
झी तडका व झी मराठी फेम 
अजितकुमार कोष्टी, पुणे यांचा 
धमाल विनोदी कार्यक्रम

कॉमेडी एक्स्प्रेस

सर्व स्पर्धकांसाठी संपर्क व नोंदणी
जलाराम कॉम्पुटर्स, घाटंजी
९४२१७७३८४२
९४२३५४५७९७
७५८८१८८३७०
९४२१७७०८८५
ओम साई मेडीकल, घाटंजी
९४२००४७२६७

सर्व शिवप्रेमींना आग्रहाचे निमंत्रण

आयोजक:- राजे छत्रपती सामाजीक संस्था घाटंजी, संभाजी ब्रिगेड, घाटंजी