Pages

Tuesday, 3 July 2012

संगिता भुरे यांचे विशारद पुर्ण परिक्षेत सुयश


अखिल भारतील संगित गांधर्व मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गायन वादन परिक्षेत नगरसेविका संगिता अरविंद भुरे यांनी उल्लेखनिय  यश संपादन केले. येथिल कलाश्री संगित वर्गाच्या विद्यार्थीनी असलेल्या सौ.भुरे यांनी संगित क्षेत्रात अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणा-या ‘संगित विशारद’ या गायन परिक्षेत ७० टक्के गुण मिळवुन विशारद पुर्ण ही परिक्षा प्रथमश्रेणीत उत्तीर्ण केली. 
शिवाय कलाश्री संगित क्लासेसचे सुमारे ४२ विद्यार्थी सुद्धा या परिक्षेत उत्तीर्ण झाले असुन त्यापैकी ३० विद्यार्थी प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. या सर्वांना कलाश्रीचे संगित शिक्षक दिलीप हेमके यांचे मार्गदर्शन मिळाले.
साभार :- देशोन्नती 

नाणेटंचाईमुळे व्यावसायीक व ग्राहकांना मनस्ताप

स्टेट बँकेने नाणे उपलब्ध करून देण्याची मागणी

दैनंदिन व्यवहारात महत्वपूर्ण असलेल्या नाण्यांची टंचाई घाटंजी तालुक्यात सर्वच ठिकाणी निर्माण झाली आहे. परिणामी टंचाईचे कारण पुढे करून ग्राहकांची लूट होत आहे. व्यापारी वर्गाकडून सक्तीने सुट्या पैशांसाठी अनावश्यक वस्तू ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहेत.गेल्या चार ते पाच वर्षांपुर्वी बाजारपेठ व बँक व्यवहारात नाण्यांचा सुकाळ पहावयास मिळत होता. यानंतर देशभरात एक रुपयांत बोला अशी सुविधा क्वॉईन बॉक्सवर आल्याने या व्यवहारात वेगाने वाढ झाली. परिणामी नाण्यांची टंचाई भासू लागली. पण आता मोबाईलच्या एक पैसा एक सेकंद अशा विविध सवलती योजनांमुळे क्वॉईन बॉक्स व्यवसाय अडचणीत येऊन बंद झाल्याने बॉक्समध्ये पडणारी नाणी व्यवहारातून हद्दपार झाली आहेत. त्यामुळे व्यवहारामध्ये अनेकदा नाण्यांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह व्यापारी, हॉटेल चालकांची पंचाईत झाली आहे. सध्या बाजारपेठेत १,२,५ रुपयांच्या नाण्यांची टंचाई असून अनेक ठिकाणी सक्तीने अनावश्यक वस्तू दिल्या जात आहेत. त्यामुळे सर्वांनाच ते अडचणीचे ठरत आहे. प्रवास करतांना तिकिट काढल्यानंतर सुटे पैसे उतरतांना मागून घ्या, असे वाहकाकडून सांगण्यात येते. अनेकदा प्रवासी कामाच्या गडबडीत तसेच उतरुन जातात, तर काहीजण एक-दोन रुपये मागण्यात कुठे वेळ घालवायचा म्हणून पैसे न घेताच जातात. याचा फायदा वाहकांना होतो. एकेकाळी सक्तीने नाणी दिली जायची. असे असतांना आता असणारी भरमसाठ नाणी गेली कुठे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
स्टेट बँकेकडून नाणे उपलब्ध करून देण्याची सुविधा आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासुन स्टेट बँकेतही नाणे उपलब्ध होत नसल्याने व्यापारीवर्गात नाराजी आहे. नाणे टंचाईमुळे सुट्या पैशासाठी व्यावसायीकांचे ग्राहकांशी होणारे वाद आता नेहमीचे झाले आहेत. मात्र यामुळे व्यवसायावर तसेच ग्राहकांच्या खिशावरही परिणाम होत आहे. स्टेट बँकेने व्यापा-यांना नाणे उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू करावी अशी आग्रही मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
साभार :- देशोन्नती 

पारवा पोलीसांना अवैध दारू विक्रेत्यांचा पुळका

दारू विक्रीची तक्रार करणा-यांना ठाण्यात दमदाटी

तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला अवैध दारू विक्रेत्यांशी एवढी सहानुभूती निर्माण झाली आहे की, गावात होत असलेल्या अवैध दारू विक्रीची तक्रार करणा-यांना चक्क पोलीस ठाण्यात बोलावुन दमदाटी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. या प्रकाराने चिडलेल्या ग्रामस्थांनी शेकडो महिलांसह सावळी सदोबा पोलीस चौकीवर धडक दिली. याबाबत विस्तृत वृत्त असे की, पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या उमरी कापेश्वर येथिल ग्रामस्थांनी गावातील दोन अवैध दारू विक्रेत्यांविषयी ग्रामसभेत तक्रार केली. पोलीसांनाही याबाबत कळविण्यात आले. मात्र अवैध व्यावसायीकांना पाठिशी घालणा-या पारवा पोलीसांनी तक्रारकर्त्यांनाच गोत्यात आणण्याची खेळी केली. ज्या अवैध दारू विक्रेत्यांची ग्रामस्थांनी तक्रार केली होती त्यांच्याकडून पोलीसांनी त्या ग्रामस्थांविरोधात खोटी तक्रार घेतली. तसेच चार ते पाच ग्रामस्थांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावुन, ‘तुमच्या विरोधात तक्रार आली आहे, तुम्ही दारू विक्रेत्यांना विरोध केल्यास ते सुद्धा तुमच्या विरोधात जाऊ शकतात. त्यामुळे यापुढे तक्रार करू नका’ असा धमकीवजा सल्ला पारवा पोलीसांनी दिल्याची माहिती काही ग्रामस्थांनी दिली. योग्य बाबीची तक्रार केल्यावर पोलीस दारू विक्रेत्यांची बाजु घेऊन ग्रामस्थांना धमकावत असल्याचे लक्षात येताच उमरी कापेश्वर येथिल शेकडो गावक-यांनी थेट सावळी सदोबा पोलीस चौकी गाठुन या प्रकाराचा निषेध नोंदविला. यावेळी तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते अशी माहिती आहे. पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंजाब वंजारे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध व्यवसायांना संरक्षण देण्याचे धोरण अवलंबिल्याने अवैध व्यावसायीकांचे धारिष्ट्य वाढले आहे. उल्लेखनिय म्हणजे काही दिवसांपुर्वीच विशेष शाखेने पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआमपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला होता. परंतु ग्रामिण भागात अद्यापही मोठ्या प्रमाणावर अवैध दारू, मटका, जुगार, अवैध वाहतुक व  तत्सम व्यवसाय पोलीसांच्या डोळ्यादेखत बिनदिक्कतपणे सुरू आहे. वरिष्ठांचेही या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती 

Saturday, 30 June 2012

फेसबुकवर वावरतांना ‘ज्ञान’ व ‘भान’ ठेवण्याची गरज


कोणत्याही गोष्टीचे पुर्ण ज्ञान असल्याशिवाय तिचा वापर करतांना झालेली चुक कशी घोडचुक ठरू शकते याचा प्रत्यय दारव्ह्यातील घटनेतून दिसुन येतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे नक्कीच श्रेयस्कर आहे. मात्र ते करतांना त्यातील प्रत्येक बाबीचे किमान प्राथमिक ज्ञान व विवेक असणे अत्यंत गरजेचे आहे. सामाजीक संपर्काचे एक प्रभावी माध्यम ठरलेले ‘फेसबुक’ आता मोठ्या शहरापासुन थेट ग्रामिण भागापर्यंतही पोहचले आहे. एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी व आपले आचार विचार इतरांशी ‘शेअर’ करण्यासाठी फेसबुक व तत्सम सामाजीक संकेतस्थळांची उपयुक्तता निश्चितच जास्त आहे. त्यामुळेच प्रस्थापीत माध्यमांनाही त्याची गरज भासत आहे. मात्र ज्या गोष्टीचा सकारात्मक दृष्टीने चांगला वापर होऊ शकतो तितकाच त्याचा वाईट गोष्टींसाठीही वापर होतो असा अनुभव आहे. सामाजीक संकेतस्थळांवर टाकण्यात आलेल्या आक्षेपार्ह मजकुरामुळे तणाव निर्माण होण्याची दारव्ह्याची घटना पहिलीच नव्हे. किंबहुना अशा वादग्रस्ततेमुळेच ही सामाजीक संकेतस्थळे सर्वांच्या परिचयाची झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सुरूवातीला ऑर्कुट व आता फेसबुक अशा वादाचे कारण ठरत आहे. विकृत मानसिकता व माहितीचा अभाव हेच अशा तणावाचे कारण आहे. 
कुठल्यातरी एका विकृत डोक्यातून नको ती गोष्ट बाहेर येते. त्याचे प्रदर्शन तो चक्क सामाजीक संकेतस्थळावरच करतो. अन त्या गोष्टीला एखादी समविचारी प्रवृत्ती अनावधानाने अथवा खोडसाळपणाने ‘लाईक’ करते. त्यामुळे भडकलेल्या व प्रसंगी भडकविण्यात आलेल्या भावनांमुळे तणाव निर्माण होतो. खरं तर फेसबुकवरील फोटो, पोस्ट, लिंक हे लाईक करणे किंवा त्यावर प्रतिक्रीया देणे ही अत्यंत क्षुल्लक बाब आहे. सेकंदाला कोट्यवधी वेळा होणा-या या क्रियेपैकी एका क्रियेसाठी संपुर्ण शहरात तणाव निर्माण व्हावा हे कितपत योग्य आहे याचा विचारही व्हायला हवा. याचा अर्थ असा मुळीच नाही की दारव्ह्यातील त्या दोन विक्षिप्तांनी केलेली कृती समर्थनिय आहे. कोणाच्याही भावनांना तडा जाईल अशी कृती कधीच योग्य ठरू शकत नाही. मात्र सद्यस्थितीत फेसबुक सारख्या माध्यमांचा होत असलेला चुकीचा वापर लक्षात घेता त्याबाबत समाजाने संयमाने वागण्याची गरज आहे. फेसबुकवर आपण स्वत: जरी आक्षेपार्ह मजकुर टाकला नाही तरी इतर कोणी टाकलेल्या मजकुराला लाईक, टॅग, शेअर करणे म्हणजे एकप्रकारे आपण सुद्धा त्याच विचाराचे आहोत हे आपसुकच दर्शविते. त्यामुळेच संकेतस्थळांवर वावरतांना आपण काय करतोय याचे भान असणे गरजेचे आहे. अशा मजकुराला ‘लाईक’ अथवा तत्सम कृती करणारा व्यक्ती तांत्रिकदृष्ट्या दोषी ठरेलच असे नाही. परंतू भडकलेल्या भावना कोणाचीच गय करीत नाहीत हे आपल्या समाजाचे वास्तव आहे.
त्याचप्रमाणे सगळेजण वापरतात म्हणुन आपणही वापरायचे अशा मानसिकतेतून सामाजीक संकेतस्थळांचा वापर करणा-या तरूणाईला सुद्धा आता जागरूक राहण्याची गरज आहे. अनेक तरूणी या संकेतस्थळांवर आपली छायाचित्रे टाकतात. त्यापैकी बहुतांश तरूणी ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ स्विकारतांना समोरचा व्यक्ती आपल्या परिचयाचा आहे अथवा नाही याचाही विचार करीत नाही. याचा परिणाम अनेकदा विचित्रच होतो. काही विक्षिप्तांकडून त्याचा गैरवापर होतो अन त्याचा शेवट मनस्तापात. त्यामुळेच कोणत्याही गोष्टीचा वापर करतांना त्याचे पुरेपूर ज्ञान व संयमी मानसिकता असणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा क्षुल्लक गोष्टीतून मोठा भडका होणे अटळ आहे. 
अमोल राऊत
साभार :- देशोन्नती 


Thursday, 28 June 2012

ग्रा.पं.पोटनिवडणुकीत सुरेश लोणकरांना धक्का


नुकत्याच झालेल्या शिरोली ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर समर्थीत उमेदवाराचा पराभव झाला. तर आमदार निलेश पारवेकर यांचे समर्थक असलेले शिरोलीचे सरपंच अरविंद महल्ले यांच्या गटाचे उमेदवार अमोल मोतीराम पेंदोर हे १८ मतांनी निवडून आले. त्यांनी सुरेश लोणकर यांच्या गटाच्या संतोष वसंत सोयाम यांचा पराभव केला. पेंदोर यांना १५३ तर सोयाम यांना १३५ मते मिळाली. शिरोलीचे उपसरपंच रमेश धुर्वे हे पंचायत समिती सदस्यपदी निवडून आल्याने त्यांनी ग्रा.पं.सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणुक झाली. नुकतीच सुरेश लोणकर यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. मात्र त्यांच्या स्वत:च्या गावातच ग्रा.पं.पोटनिवडणुकीत त्यांच्या उमेदवाराला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.
साभार :- देशोन्नती