Pages

Friday, 4 November 2011

घाटंजी नगर परिषदेत अस्तित्व टिकविण्यासाठी शिवसेनेची ‘केविलवानी’ धडपड

अखेर बहुप्रतिक्षीत नगर परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले. येत्या ८ डिसेंबरला नागरीक आपले शहर कोणाच्या हातात द्यायचे याचा निर्णय घेणार आहे. सर्वच राजकीय पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले असुन आपापल्या स्तरावर प्रयत्न करीत आहेत. गेली अडीच वर्षे सत्ता उपभोगलेल्या शिवसेनेने न.प.निवडणुकीत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी अत्यंत केविलवानी धडपड सुरू केल्याचे निदर्शनास येत आहे. घाटंजी शहरासाठी व येथिल नागरीकांसाठी गेली दोन अडीच वर्षे जे केले नाही ते अवघ्या एका महिन्यात करण्याचा खटाटोप नगर परिषदेतील शिवसेनेचे पदाधिकारी करीत आहेत. आचार संहिता लागण्याच्या महिनाभर आधी शहरातील विवीध भागात रस्ते व नाल्यांची कामे एवढ्या वेगाने सुरू करण्यात आली की, मतदान करायला नागरीक त्या रस्त्यावरूनच जाईल की काय अशी परिस्थिती आहे. या धडपडीत बांधण्यात येत असलेल्या रस्त्याचा दर्जा काय असेल याचा विचार न केलेलाच बरा. निवडणुक तोंडावर आल्यामुळे गेल्या काही दिवसात शिवसेनेने वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्याची वर्तमानपत्रातुन प्रसिद्धी करण्याचा सपाटाच लावला आहे. जनतेच्या मनात खदखदत असलेल्या या संतापाला प्रसिद्धीची पुंâकर घालण्याचा खटाटोप सध्या सुरू आहे. या नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडे उमेदवारांचीही कमतरता आहे. मागील महिन्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेची उमेदवारी घेण्यास ईच्छुक असलेल्यांना बोलाविण्यात आले होते. मात्र त्याला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे आमदार संजय राठोड यांनीही नाराजी व्यक्त केली होती. ही निवडणुक शिवसेना भाजपासोबत लढणार की स्वतंत्र लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात घाटंजीकरांनी आजवरचे सर्वात निष्क्रीय पदाधिकारी पाहिले. जनतेचे प्रश्न, शहरातील विवीध समस्या व विकास याचेशी काहीही देणेघेणे न ठेवता एकमेकांचे पाय ओढुन आपल्या पदरात मिळेल ते पाडुन घेण्यातच या पदाधिका-यांनी पाच वर्षे घालवली. आता जनतेच्या समोर जाण्याची वेळ आल्याने या ‘आणीबाणीच्या’ विकासकामांचा बेगड लावुन जनतेची दिशाभुल करण्याच्या या प्रयत्नाला मतदार कितपत भिक घालतात हे लवकरच स्पष्ट होईल.
साभार :- देशोन्नती

Wednesday, 2 November 2011

यवतमाळ जिल्ह्यात कापसावर आधारीत उद्योगांची उभारणी व्हावी

खासदार हंसराज अहिर यांचे प्रतिपादन
कापुस उत्पादनात अग्रगण्य असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात कापसावर आधारीत उद्योगांची उभारणी व्हावी याकरीता कॉटनसेझ होणे अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन खासदार हंसराज अहिर यांनी केले.
घाटंजी येथे भा.ज.प. कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी आहे. मात्र त्यांना त्या तुलनेत मोबदला मिळत नाही. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. घाटंजी नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत शिवसेना व मित्रपक्षांशी समन्वय राहीला तर एकत्र निवडणुक लढवु अन्यथा स्वतंत्र निवडणुक लढण्यास भाजप सक्षम आहे असा दावा त्यांनी केला.
घाटंजी नगर परिषद जुनी असुनही त्या तुलनेत प्रगतीच्या दृष्टीने बरीच मागे असल्याचे ते म्हणाले. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीही पक्ष सज्ज असल्याचे त्यांनी सांगीतले. घाटंजी शहराच्या सौंदर्यीकरणासाठी उद्यानांची निर्मिती करण्यावर भर देणे गरजेचे असुन त्यासाठी आपण दहा लाख रूपयांचा निधी दिला व आणखी दहा लाख रूपये देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पत्रकार परिषदेला भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्ता कोंडेकर, शहराध्यक्ष राजु सुचक, मधुसूदन चोपडे, सतिष मलकापुरे, मुकुंद कदम, वासुदेव महल्ले, अरविंद बोरकर यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पारधी बेड्यावर साहित्य वाटप

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या घाटंजी शाखेच्या वतीने पारवा येथिल पारधी बेड्यावर दिवाळी निमित्य फराळ, कपडे व तत्सम साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारवा ग्रा.पं.चे उपसरपंच संजय आरेवार होते. तर रा.स्व.संघाचे जिल्हा व्यवस्था प्रमुख संजय गाडे, राजु प्रतापवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. गेल्या पाच वर्षांपासुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागातर्फे पारधी बेड्यावर दिवाळी सण साजरा केल्या जातो.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मण कानकाटे, मनोज परसोडकर, सतिश रामगडे, संतोष मैंद, गणेश खापर्डे, राहुल व्यास, सौरभ कोमावार, राजु जलतारे, अमोल देशपांडे, आनंद सोनटक्के, राहुल भुरगाटे, लोकनाथ जाधव, भालचंद्र नांदेकर, राजेश कामटवार, सत्यम गटलेवार यांनी परिश्रम घेतले.

अरूणावती च्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची समस्या निवारण सभा

अरूणावती प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतक-यांसाठी समस्या निवारण सभेचे आयोजन दि.४ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता वसंत आदिवासी विद्यालय पार्डी(नस्करी) येथे करण्यात आले आहे. अरूणावती प्रकल्पाचे पाणी अजुनही शेवटच्या गावापर्यंत पोहचले नाही. या प्रकल्पांतर्गत कनॉलबाधीत शेतक-यांना अद्याप प्रकल्पात गेलेल्या शेतजमिनीचा मोबदला मिळालेला नाही. यामुळे सदर विभागाचे अधिकारी व लाभ क्षेत्रातील समस्याग्रस्त शेतकरी यांच्यामध्ये थेट संवाद व्हावा यासाठी या समस्या निवारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक प्रफुल्लचंद्र झपके, जिल्हाधिकारी श्रावण हर्डीकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता सु.दा.साळुंखे, अरूणावती प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता पी.व्ही. गायकवाड, युवा नेते योगेश पारवेकर, सद्रुद्दीन रयानी, आर्णी बाजार समितीचे माजी सभापती शंकर राठोड, निम्न पैनगंगा प्रकल्प समस्या निवारण समितीचे सचिव रफिक पटेल, जयवंत चिल्लावार यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थीती राहणार आहे.
या कार्यक्रमाला शेतक-यानी उपस्थित राहुन आपल्या व्यथा मांडाव्या असे आवाहन पार्डी नस्करी ग्रा.पं.सरपंच गजेंद्र निकडे, उपसरपंच विठ्ठल धुर्वे, भांबोरा ग्रा.पं.सरपंच अशोक मेश्राम, उपरपंच निलेश कोठारी, धन्नु चव्हाण, बलदेव खडसे, शिवदास डेहणकर, किसन पवार, नामदेव जाधव, खुशाल राठोड, दामोधर शिंदे, रामराव साखरकर, विजय मरगडे, दामोधर थोटे, राजाराम पवार यांनी केले आहे.

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी जान्हवी श्रीरामे हिची निवड

भारत सरकारच्या जलसंवर्धन मंत्रालयातर्फे आयोजीत ‘जलसंवर्धन चित्रकला स्पर्धा  २०११’ करीता जिल्ह्यातुन घाटंजीच्या जान्हवी श्रीरामे हिची निवड करण्यात आली आहे. ती येथिल शि.प्र.मं. कन्या शाळेत पाचव्या वर्गाची विद्यार्थीनी आहे. दि.१४ नोव्हेंबरला बालकदिनी नागपुर येथे तुली इंपेरियल हॉटेल मध्ये ही स्पर्धा होणार आहे. तिच्या या यशाबद्दल शि.प्र.मं.कन्या शाळेच्या मुख्याध्यापीका संध्या कासलीकर, वर्ग शिक्षीका गेडाम, कला शिक्षक श्री. ठाकरे यांनी तिचे कौतुक केले असुन पुढील यशाकरीता तिला शुभेच्छा दिल्या आहेत.