Pages

Saturday 27 April 2013

मृत्यूशी दहा महिन्यांची झुंज संपली !

प्रा.डॉ.कमलेश मुणोत यांचे निधन

अपघातात गंभिर जखमी झाल्यामुळे गेल्या दहा महिन्यांपासुन अत्यवस्थ असलेले प्रा.डॉ.कमलेश मुणोत यांचे दि.२५ एप्रील ला रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी ते ५३ वर्षांचे होते. दि.१८ जुन २०१२ ला रात्री ८ वाजता नागपुर पांढरकवडा मार्गावर वडकी गावाजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातात प्रा.मुणोत व त्यांच्या पत्नी गंभिर जखमी तर मुलीला किरकोळ दुखापत झाली होती. तेव्हापासुन ते अत्यवस्थ होते. अखेर काल रात्री त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. एक शिस्तबद्ध प्राध्यापक असा त्यांचा लौकीक होता. ते येथिल शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. 
अनेक वर्ष त्यांनी पत्रकारीतेच्या क्षेत्रातही योगदान दिले. सांस्कृतिक कार्यक्रम, महाविद्यालयाचे विवीध उपक्रम, सहली यासह अनेक क्षेत्रात ते नेहमीच सक्रीय असायचे. त्यांच्या मागे पत्नी, ३ मुली व मोठा आप्त परिवार आहे. येथिल मोक्षधामात त्यांचेवर शोकाकुल वातावरणात त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मोठी मुलगी प्रिया हिने चितेला मुखाग्नी दिली. यावेळी शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व शहरातील नागरिकांची उपस्थिती होती. त्यांच्या दु:खद निधनामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Monday 22 April 2013

रामभक्तांच्या लाटेने मोडले गर्दीचे उच्चांक

घाटंजीत रामनवमी शोभायात्रेचा अभुतपुर्व जल्लोष

सर्वत्र रामनामाचा गजर, ढोलताशांचा निनादात ठेका धरून नाचणारी तरूणाई व रत्यावरून ओसंडून वाहणारा अलोट जनसागर अशा भक्ती जल्लोष व उत्साहाच्या वातावरणाने यंदाची रामनवमी शोभायात्रा अविस्मरणीय झाली. उल्लेखनिय म्हणजे रामनवमीच्या गर्दीने गतवर्षीचा विक्रमही मोडीत काढला. गिलानी महाविद्यालयापासुन ते शिवाजी चौकापर्यंत संपुर्ण परिसर आबालवृध्द व महिलांच्या गर्दीने व्यापला होता. ‘पाय ठेवायलाही जागा नव्हती’ या वाक्याला शोभायात्रेच्या निमित्ताने खरा अर्थ मिळाला. येथिल जलाराम मंदिरापासुन सायंकाळी ७ वाजेदरम्यान शोभायात्रेची सुरूवात झाली. अष्टधातुचा रत्नजडीत रामरथ शोभायात्रेत अग्रस्थानी होता. भारतमाता, रामभक्त हनुमान, प्रभु श्रिराम यासह विवीध देखावे साकारण्यात आले होते. नेत्रदिपक रोषणाईने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. महाराणा प्रताप चौक, सिनेमा टॉकीज चौक, जुना बसस्थानक चौक, पोलीस स्टेशन चौक असे मार्गक्रमण करीत शोभायात्रा शिवाजी चौकात विसर्जीत करण्यात आली. अनेक भाविकांनी स्वयंस्फूर्तीने पाणी, मठ्ठा, सरबत, महाप्रसादाचे ठिकठिकाणी स्टॉल्स लावले होते. उल्लेखनिय म्हणजे सर्वधर्मीय नागरिकांनी शोभायात्रेत सक्रीय सहभाग घेतला. एवढ्या मोठ्या संख्येने जनसागर व त्या तुलनेत अत्यंत तोकडा पोलीस बंदोबस्त असुनही आजवर येथे कोणतीही अनुचीत घटना घडली नाही हे विषेश उल्लेखनिय. या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता शोभायात्रेचे संयोजक विक्रम जयस्वाल व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. 

रामनवमी शोभायात्रेची निवडक छायाचित्रे
छायाचित्र सौजन्य
अंकुश ठाकरे (मैनाई फोटो स्टुडीओ), मिलिंद लोहकरे (मयुर मोबाईल, घाटंजी)
































Tuesday 16 April 2013

घाटंजीतील गायत्री दुर्गामाता मंदिरात चैत्र नवरात्रौत्सव

उद्या देवि जागरण भजन संध्या
येथिल जेसिस कॉलनी परिसरातील गायत्री दुर्गामाता मंदीरात चैत्र नवरात्रौत्सवानिमित्त विवीध कार्यक्रम सुरू असुन दि.१८ एप्रीलला अष्टमीच्या दिवशी होमहवनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. तसेच रात्री ७ वाजता प्रसिद्ध भजन सम्राट जितु पाखरे यांच्या देवी जागरण भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २१ एप्रीलला दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येईल. चैत्र नवरात्रानिमित्य संपुर्ण मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरात आयोजीत धार्मिक कार्यक्रमांमध्ये भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. महाप्रसाद व ईतर सर्व कार्यक्रमांचा समस्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन माँ गायत्री दुर्गामाता मंदिर भक्त मंडळ, जेसिस कॉलनी घाटंजीचे वतीने करण्यात आले आहे.

Saturday 13 April 2013

प्रथमच झालेल्या गारपीटीत घाटंजी शहर काश्मिरमय




गेल्या अर्धशतकाहूनही अधिक कालावधीमध्ये घाटंजी शहरात जी नैसर्गिक घटना झाली नव्हती ती आज घडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. आज चक्क १५ ते २० मिनिट आवळ्याच्या आकारापेक्षाही मोठ्या गारांचा वर्षाव झाल्याने परिसर पांढरा शुभ्र झाला होता. काही वेळासाठी शहराला जणुकाही काश्मिरचेच स्वरूप प्राप्त झाले होते. बराच वेळ सोसाट्याच्या वा-यासह टपो-या गारा पडायला सुरूवात झाली. तेव्हा सर्वत्र एकच धावपळ उडाली. सायंकाळी ४ वाजेपासुनच अवकाळी पावसाचे वातावरण होते. मात्र अचानकच गारा पडायला लागल्याने हे काय घडत आहे असाच प्रश्न सर्वांना पडला. कारण घाटंजी शहरात कधीच गारपीट होत नाही असा आजवरचा ईतिहास आहे. जुने लोक सांगतात की, आम्ही आतापर्यंत कधी शहरात गारपीट झाल्याचे पाहिले नाही. ब-याच काळापुर्वी एकदा शहरात झालेल्या गारपीटीने प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर एका संताने गार ‘बांधुन’ ठेवली होती असा समज शहरात आहे. त्यानंतर कधीही गारपीट झाली नाही असे सांगितल्या जाते. मात्र आज झालेल्या अभुतपुर्व घटनेने चर्चेला पेव फुटले आहे. उल्लेखनिय म्हणजे तालुक्याच्या ईतर भागात आज गारपीट झाल्याचे वृत्त नाही. या प्रचंड गारपीटीमुळे शहराच्या परिसरातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
साभार :- देशोन्नती