Pages

Showing posts with label हिंदु. Show all posts
Showing posts with label हिंदु. Show all posts

Monday, 22 April 2013

रामभक्तांच्या लाटेने मोडले गर्दीचे उच्चांक

घाटंजीत रामनवमी शोभायात्रेचा अभुतपुर्व जल्लोष

सर्वत्र रामनामाचा गजर, ढोलताशांचा निनादात ठेका धरून नाचणारी तरूणाई व रत्यावरून ओसंडून वाहणारा अलोट जनसागर अशा भक्ती जल्लोष व उत्साहाच्या वातावरणाने यंदाची रामनवमी शोभायात्रा अविस्मरणीय झाली. उल्लेखनिय म्हणजे रामनवमीच्या गर्दीने गतवर्षीचा विक्रमही मोडीत काढला. गिलानी महाविद्यालयापासुन ते शिवाजी चौकापर्यंत संपुर्ण परिसर आबालवृध्द व महिलांच्या गर्दीने व्यापला होता. ‘पाय ठेवायलाही जागा नव्हती’ या वाक्याला शोभायात्रेच्या निमित्ताने खरा अर्थ मिळाला. येथिल जलाराम मंदिरापासुन सायंकाळी ७ वाजेदरम्यान शोभायात्रेची सुरूवात झाली. अष्टधातुचा रत्नजडीत रामरथ शोभायात्रेत अग्रस्थानी होता. भारतमाता, रामभक्त हनुमान, प्रभु श्रिराम यासह विवीध देखावे साकारण्यात आले होते. नेत्रदिपक रोषणाईने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. महाराणा प्रताप चौक, सिनेमा टॉकीज चौक, जुना बसस्थानक चौक, पोलीस स्टेशन चौक असे मार्गक्रमण करीत शोभायात्रा शिवाजी चौकात विसर्जीत करण्यात आली. अनेक भाविकांनी स्वयंस्फूर्तीने पाणी, मठ्ठा, सरबत, महाप्रसादाचे ठिकठिकाणी स्टॉल्स लावले होते. उल्लेखनिय म्हणजे सर्वधर्मीय नागरिकांनी शोभायात्रेत सक्रीय सहभाग घेतला. एवढ्या मोठ्या संख्येने जनसागर व त्या तुलनेत अत्यंत तोकडा पोलीस बंदोबस्त असुनही आजवर येथे कोणतीही अनुचीत घटना घडली नाही हे विषेश उल्लेखनिय. या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता शोभायात्रेचे संयोजक विक्रम जयस्वाल व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. 

रामनवमी शोभायात्रेची निवडक छायाचित्रे
छायाचित्र सौजन्य
अंकुश ठाकरे (मैनाई फोटो स्टुडीओ), मिलिंद लोहकरे (मयुर मोबाईल, घाटंजी)
































Thursday, 17 May 2012

कुर्ली येथे हिंदु स्मशानभुमी देण्यास प्रशासनाची टाळाटाळ

तालुक्यातील कुर्ली येथे ब-याच कालावधीपासुन हिंदु स्मशानभुमीची गरज असताना प्रशासनाकडून त्यासाठी टाळाटाळ होत आहे. ग्रामपंचायतीच्या ठरावासह या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र राजकीय दबावातून याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी केला आहे. यासंदर्भात पालकमंत्री ना.नितीन राऊत, सामाजीक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, विभागीय आयुक्त, अमरावती, जिल्हाधिकारी, यवतमाळ यांचेसह संबंधीतांकडे तक्रारीही करण्यात आल्या आहेत. मात्र एक वर्षाचा कालावधी होऊनही स्मशानभुमीबाबत प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही असा सोलंकी यांचा आरोप आहे. मौजा कुर्ली येथे हिंदु समाजाकरीता अनेक वर्षांपासुन स्मशानभुमी नसल्याने ग्रामपंचायतीने रितसर ठराव घेतला. मात्र, कुर्ली येथे पुर्वीपासुनच हिंदु स्मशानभुमी असल्याचे महसुल विभागाच्या फेरफार, हक्क नोंदणीनुसार निष्पन्न झाले आहे. कुर्ली येथे गट क्र. ४/१ मध्ये माजी जि.प.सदस्य जयप्रकाश आशारेड्डी काटपेल्लीवार यांच्या शेतजमीनीमध्ये ०.४० आर जागेवर हिंदुंची स्मशानभुमी असतांना तसेच तत्कालीन नायब तहसिलदार पंधरे यांना हिंदु स्मशानभुमीच्या प्रकरणात कोणताही आदेश देण्याचा अधिकार नसतांना त्यांनी ७/१२ उता-यावरील इतर अधिकारात नमुद असलेल्या ०.४० आर हिंदु स्मशानभुमीची जागा प्रकरणात प्रस्तुत ३/कली/क्रमांक/कावि/९५१/२००४, दि.१९/०६/२००४ रोजी आदेश काढुन गट क्र.४/१ जयप्रकाश आशारेड्डी काटपेल्लीवार यांच्या ७/१२ उता-यातील इतर अधिकार मधील नोंदी काढुन आदेश पारित केला आहे. जो नियमबाह्य आहे. स्मशानभुमीच्या प्रकरणात कोणताही आदेश रद्द अथवा पारित करण्याचा अधिकार केवळ जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिका-यांनाच आहे. त्यामुळे या प्रकरणात नायब तहसिलदार पंधरे यांच्यासह संबधीत तलाठीही दोषी असल्याने त्यांच्याविरूद्धही कार्यवाही करावी अशी सोलंकी यांची मागणी आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पंधरे यांनी काढलेला तो बेकायदेशीर आदेश तहसिल कार्यालयात उपलब्ध नसल्याचे जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार पारवा यांनी माहितीच्या अधिकारान्वये मागीतलेल्या माहितीमध्ये कळविले आहे. एकंदरीतच स्मशानभुमीच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट असुन प्रशासन मात्र त्याकडे डोळेझाक करीत आहे. कुर्ली येथे हिंदु स्मशानभुमीची अत्यंत आवश्यकता असतांना शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करून दोषींना पाठीशी घालत असल्याने आता याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सोलंकी यांनी सांगीतले.
साभार :- देशोन्नती