ऐनवेळी झालेल्या नाट्यमय घडामोडी नंतर घाटंजी बाजार समिती सभापती पदाची माळ अखेर आमडीचे सरपंच अभिषेक ठाकरे यांच्या गळ्यात पडली. तर उपसभापतीपदी प्रकाश डंभारे यांची निवड झाली. सभापती-उपसभापती पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत दोन्ही गटांना सारखीच मते पडल्याने ईश्वर चिठ्ठीने निवड करण्यात आली. बाजार समिती निवडणुकीत मोघे-लोणकर व अण्णासाहेब-निलेश पारवेकर या दोन मुख्य गटात निवडणुक झाली. त्यात मोघे-लोणकर गटाचे बहुमत आले. मात्र आज ना.मोघेंचे समर्थक देवानंद पवार यांनी वेगळी चुल मांडल्याने या गटात फुट पडली. सहकार क्षेत्रातील निवडणुकीत सत्तास्थापनेचा दांडगा अनुभव असलेल्या सुरेश लोणकरांनी पारवेकर गटाला हाताशी घेऊन बाजार समितीवर आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. त्यामुळे देवानंद पवार तोंडघशी पडले आहेत. नवनियुक्त सभापती अभिषेक ठाकरे हे लोणकरांचे समर्थक आहेत तर उपसभापती प्रकाश डंभारे हे पारवेकरांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. आज झालेल्या निवडणुकीत लोणकर पारवेकर गटाकडून सभापतीपदासाठी अभिषेक ठाकरे तर उपसभापती पदासाठी प्रकाश डंभारे यांनी नामांकन दाखल केले होते. तर मोघे-पवार गटाकडून रमेश आंबेपवार व सचिन ठाकरे यांचे नामांकन होते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणल्या गेल्याने दोन्ही गटांच्या समर्थकांचा जीव टांगणीला लागला होता. निवडणुकीनंतर विजयी मिरवणुक काढण्यात आली. त्यामध्ये जि.प.सदस्य सुरेश लोणकर, राष्ट्रवादीचे सहकोषाध्यक्ष सतिष भोयर, माजी सभापती सचिन पारवेकर यांचेसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
Monday, 12 September 2011
Sunday, 11 September 2011
घाटंजीत एकाच रात्री सात घरफोड्या
नागरीकांमध्ये चोरट्यांची धास्ती
पोलीसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ
सातत्याने गुन्हेगारांच्या पाठीशी उभ्या राहणा-या घाटंजी पोलीसांच्या ‘चांगुलपणाचा' फायदा चोरट्यानीही करून घेतला. एकाच रात्री प्रतिष्ठीत रहिवासी परिसरामध्ये सात घरे फोडुन चोरट्यांनी सुमारे १ लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. येथिल बाबासाहेब देशमुख कॉलनी ( नृसिंह वार्ड) भागात राहणारे मोहम्मद नासिर यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील ५२ हजार २०० रूपयांचे सोन्याचे दागीने, ५ हजार रूपयांचे चांदीचे दागीने व ५ हजार रोख असा सुमारे ६२ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यांच्या घरी दोन विद्यार्थींनी भाड्याने राहतात. चोरट्यांनी त्यांच्या खोलीचे दार बाहेरून लावुन घेतले होते. नासिर हे नेर येथे गेले असल्याने शिवसेनेचे सैय्यद फिरोज यांनी या घटनेबाबत पोलीसांना कळविले. शहरातील घाटी परिसरात रमेश ठाकरे व राजु डंभारे यांच्या घराचे कुलूपही चोरट्यांनी तोडले. त्यापैकी डंभारे यांचे घरातील कपाटातुन १ हजार रूपये रोख लंपास केले. ठाकरे यांचे घरात चोरट्यांना काहीही हाती लागले नाही. प्राध्यापक कॉलनी मध्ये जी. एन. विरदंडे यांचे घरातुन सुद्धा चोरट्यांना काही मिळाले नाही. तर त्या बाजुलाच राहणारे एस.एन. धनवे यांचे घरातुन ३ हजार रूपयांचे चांदिचे दागीने चोरीस गेले. जेसिस कॉलनीतील रहिवासी चंद्रशेखर ठाकरे व त्यांचे घरी भाड्याने राहणारे श्री. उम्रतकर यांचेही घरात चोरटे घुसले. ठाकरे यांचेकडे काहिच सापडले नाही तर उम्रतकर यांचेकडुन दागीने व रोख असा एकुण २५ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला. सणासुदीच्या निमित्ताने बाहेरगावी गेल्याचे निमित्य साधुन चोरट्यांनी डाव साधला. चोरट्यांनी आजुबाजुला राहणा-यांचे दरवाजे बाहेरून लावुन घेतले होते हे विषेश.
या घटनेमुळे घाटंजी पोलीसांची अकार्यक्षमता पुन्हा एकदा उघड झाली आहे. एकाच रात्री सात ठिकाणी घरफोड्या झाल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. विषेश म्हणजे घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात येत आहे. चोरीला गेलेल्या प्रत्येक वस्तुचे बिल द्या तरच तक्रार घेतल्या जाईल असा अजब पवित्रा घाटंजी पोलीसांनी घेतल्याने अनेकांनी तक्रार देण्याचेही टाळले. वृत्त लिहीस्तोवर स्टेशन डायरीवर एकही तक्रार नसल्याचे अमंलदार रफिक शेख (पापामियॉ) यांनी सागीतले. शिवाय या घटनेच्या सर्व तक्रारी ठाणेदारांकडे असल्याने त्याची नोंद झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली.
Wednesday, 7 September 2011
घाटंजीच्या पोलीसांना लागला गुन्हेगारी प्रवृत्तींशी ‘लळा’
सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रिद वाक्य असले तरी घाटंजी पोलीस दलाने मात्र आपल्या वागणुकीने खलरक्षणाय सदनिग्रहणाय असा अर्थच बदलुन टाकला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तींवर पोलीसांचा वचक असणे गरजेचे आहे. खरं तर ते पोलीसांचे प्राथमीक कर्तव्य आहे. मात्र गेल्या काही महिण्यांपासुन घाटंजी व पारवा पोलीस स्टेशन हद्दीत अनुभवास आलेल्या प्रकरणांनी पोलीसांनी सर्वसामान्य नागरीकांपेक्षा गुन्हेगारांनाच झुकते माप दिल्याचे पुढे आले आहे. घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाबुराव खंदारे तसेच सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनूले यांनी तर कित्येक प्रकरणांमध्ये अधिकाराचा गैरवापर करून आरोपींना संरक्षण देण्याचेच काम केले आहे. कोणतीही तक्रार आली तर सर्वप्रथम ती एफ.आय.आर. केली जावी असा नियम आहे. मात्र असे क्वचितच झाल्याचे आढळते. सुमारे ९० टक्के तक्रारकर्त्यांना धमकावुन आल्यापावली परत पाठविल्या जाते असा अनुभव आहे. कायद्याची जाण असणा-यांनी आग्रह केलाच तर या ना त्या माध्यमातुन त्यांचेवर दबाव आणल्या जातो. किंवा त्यांचे विरोधात तक्रार करण्यास प्रवृत्त केल्या जाते. हा सर्व खटाटोप केल्यावर पोलीस अधिका-यांचा खिसा चांगलाच गरम झालेला असतो.
अशा अनेक प्रकरणात घाटंजी पोलीसांनी एकतर्फी कारवाई केल्याचे निदर्शनास आले आहे. वासरी येथिल भारत निर्माण योजनेतील आरोपी तब्बल दोन महिने फरार होते. त्यानंतर या घोटाळ्याची तक्रार करणा-यांवर तडकाफडकी गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या महिन्याभरात सहाय्यक पोलीस निरिक्षक गुरनूले यांनी काही जुगार अड्ड्यांवर मारलेले छापे संशयास्पदच होते. या छाप्यांदरम्यान केवळ काही जुगा-यांवरच गुन्हे दाखल करण्यात आले. अनेक प्रतिष्ठीत यातुन सराईतपणे निसटले. घाटंजी तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारू, कोंबडबाजार, मटका व जुगार मोठ्या प्रमाणावर चालतो. घाटंजी शहरात तर त्याचे दुकानच थाटले आहे. पारवा परिसरातुन मोठ्या प्रमाणावर गांज्याची तस्करी होते. या अवैध व्यावसायीकांचा घाटंजी पोलीस स्टेशनच्या अधिका-यांना एवढा लळा लागला आहे की, पोलीस अधिक्षकांचा आदेश असुनही तालुक्यात अशा व्यवसायांवर नियंत्रण आलेले नाही. उलट या आदेशामुळे हप्त्यामध्ये वाढ होऊन पोलीसांचे त्यांना सक्रिय सहकार्य लाभत आहे. केवळ थातुर मातुर कागदोपत्री कार्यवाही दाखवुन वरिष्ठांची बोळवण केल्या जात आहे. दोन दिवसांपुर्वी झालेल्या घटनेने तर पोलीसच असुरक्षीत असल्याचे निदर्शनास आले आहे. एवढेच नव्हे तर कायद्यातील खाचखळग्यांची प्रत्यक्ष माहिती असलेल्या पोलीसालाही न्यायासाठी झगडावे लागते अन तेही एका अवैध व्यावसायीकाविरोधात, हा खरच पोलीस दलाला आत्मचिंतन करायला लावणारा विषय आहे.
आपल्याच एका कनिष्ठ कर्मचा-याला पोलीस स्टेशनच्या आवारात मारहाण होते. मात्र अधिकारी त्या आरोपीवर कार्यवाही करण्या ऐवजी कायद्याची भाषा वापरून पाठीशी घालतात. यामुळे पोलीस कर्मचा-याचे मनोधैर्य तर खचेलच शिवाय गुन्हेगारांचा मस्तवालपणा नक्कीच वाढेल. पोलीसाला मारहाण करून मोकाट फिरणा-याविरोधात कुणी काही कसे बोलणार? गुन्हेगारांना संरक्षण देण्याच्या घाटंजी पोलीसांच्या ‘बाबुराव पटर्न' मुळे येणा-या काळात या भागात कायदा व सुव्यवस्थेचा गंभिर प्रश्न निर्माण होणार अशी स्पष्ट चिन्हे दिसुन येत आहेत.
अमोल राऊत
साभार :- दै. देशोन्नती
आरोपीला ‘सॉफ्टकॉर्नर' पोलीस कॉन्स्टेबलवर ‘दबाव’
घाटंजीच्या ठाणेदाराचा अजब कारभार
पोलीस कर्मचारी मारहाण प्रकरण
पोलीस स्टेशनच्या आवारात येऊन पोलीस कॉन्स्टेबल उमेश चंदन यांना बेदम मारहाण करणारा आरोपी प्रविण उर्फ भारी पांडुरंग खैरे (वय ४०) याचेवर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने घाटंजी पोलीसांचा अनियंत्रीत कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वाहतुक पोलीसाने खैरे याच्या पुतण्याची मोटरसायकल चलान केली. यामुळे चिडलेल्या खैरेने पोलीस कर्मचारी उमेश चंदन यांना पोलीस स्टेशनच्या आवारात अडवुन सुरूवातीला हुज्जत घातली व त्यानंतर अर्वाच्य शिविगाळ करून बेदम मारहाण केली. ईतर पोलीस कर्मचा-यांनी त्यांना सोडविल्याने हे प्रकरण थोडक्यात निभावले. उमेश चंदन यांनी प्रविण खैरे व त्याचा साथिदार अनिल खैरे यांचे विरोधात तक्रार केली. मात्र सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनूले यांनी ठाणेदार बाबुराव खंदारे यांचे आदेशावरून या आरोपी विरोधात गुन्हा दाखल न करता प्रकरण ‘चौकशीत' ठेवले. विषेश उल्लेखनिय म्हणजे गुरनूले यांनी सदर आरोपीस पोलीस कर्मचा-या विरोधात तक्रार करण्यास प्रोत्साहीत करून जातीवाचक शिविगाळ केल्याची तक्रार नोंदवुन घेतली असेही चर्चिल्या जात आहे. या घटनेची माहिती उपविभागीय अधिकारी गेडाम, जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनाही कळविण्यात आली. मात्र स्थानिक पोलीस अधिका-यांनी चंदन यांनाच तांत्रिक दुष्ट्या या प्रकरणात अडकवुन वरिष्ठांचीही दिशाभुल केल्याचे पोलीस वर्तुळात बोलल्या जात आहे. सदर आरोपी अवैध व्यवसायाशी संबंधीत असुन त्याचेवर अनेक गंभिर प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. चोरांबा परिसरात मोठ्या प्रमाणावर कोंबडबाजार चालतो. त्यातुन मोठ्या प्रमाणावर मलिदा मिळत असल्याने ठाणेदार खंदारे व स.पो.नि. गुरनूले यांनी सदर आरोपी विरोधात विषेश सहानुभूती दाखविल्याचे समजते. घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये चालणा-या या मनमानी कारभारावर उपविभागीय अधिकारी गेडाम यांचे नियंत्रण नसल्याचे सिद्ध होत आहे. पोलीस कर्मचा-याला मारहाण झाल्याच्या घटनेबाबत पोलीस स्टेशनच्या आवारात कमालीची गुप्तता पाळण्यात येत होती. बराच वेळ स्टेशन डायरी दडवुन ठेवण्यात आली होती. प्रस्तुत प्रतिनिधीने या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी संपर्वâ केला असता राजेंद्र वाढीवा या कर्मचा-याने माहिती देण्यास नकार दिला.
आज दुपारी वृत्तपत्र प्रतिनिधी या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले असता स्टेशन डायरी अमंलदार रफिक शेख (पापामियाँ) यांना ठाणेदारांनी तातडीने आपल्या निवासस्थानी बोलाविले. त्यानंतर शेख यांनी याबाबत माहिती देण्यास स्पष्ट नकार देऊन प्रकरणाचा तपास साहेबांकडे असल्याचे सांगितले. एकंदरीतच या सर्व घटनाक्रमावरून ठाणेदारांची भुमिका संशयास्पद असल्याचे दिसुन येत आहे.
या घटनेमुळे पोलीस कर्मचा-यांचे मनोधैर्य खचले असुन पोलीसच असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस स्टेशनच्या आवारात जर पोलीस कर्मचा-याला मारहाण होत असेल तर गुन्हेगारांवर यंत्रणेचा काय वचक असेल हे लक्षात येते. घाटंजी पोलीस स्टेशन गेल्या काही महिन्यांपासुन चर्चेत आले असुन येथिल अधिकारी आता वरिष्ठानांही जुमानत नसल्याचे चित्र आहे. ठाणेदार खंदारे व स.पो.नि. गुरनूले यांची आरोपींच्या बाजुनेच सहानुभूती जास्त असल्याचे अनेक प्रकरणांमध्ये दिसुन आले आहे. त्यांचा गुन्हेगारी प्रवृत्तींशी असलेला ‘लळा' असाच कायम राहिला तर या भागात कायदा व सुव्यवस्थेचा गंभिर प्रश्न निर्माण होण्याची स्पष्ट चिन्हे दिसुन येत आहे.
साभार :- दै. देशोन्नती
Subscribe to:
Posts (Atom)




