Pages

Showing posts with label गॅस सिलेंडर. Show all posts
Showing posts with label गॅस सिलेंडर. Show all posts

Wednesday, 19 September 2012

गॅस सिलेंडर ‘ऑनलाईन’ वरून ‘लांबलाईन’वर




दोन तिन वर्षांपुर्वी गॅस सिलेंडर वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन बुकींग करण्याची सुविधा अंमलात आली. मोबाईलद्वारे फोन करून बुकींग करणे सक्तीचे केल्या गेले. त्यानंतर घरपोच गॅस पोहचविण्यात येत होता. आता मात्र या सेवेचा पार बोजवारा उडाला असुन ही सेवा ऑनलाईन वरून लांबलाईन झाल्याची प्रतिक्रीया घाटंजी शहरात व्यक्त होत आहे. गेल्या काही महिन्यांपासुन घाटंजी शहरात गॅस सिलेंडरचे घरपोच वितरण अनियमीतपणे होत आहे. काही ठरावीक भागातच गॅस घरपोच जातो. या आठवड्यात तर ऑनलाईन बुकींगच बंद झाली असे लखमाई ईण्डेन या गॅस वितरकाकडून सांगण्यात आले. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिन्याभरापुर्वी ऑनलाईन बुकींग केलेल्या ग्राहकांनाही सिलेंडर मिळेनासे झाले. त्यामूळे अनेकांनी थेट गॅस वितरकाच्या गोडाऊनपुढेच सिलेंडरसह ठाण मांडणे सुरू केले. आता तर अनेकदा गॅस सिलेंडरची ही रांग तब्बल १ ते २ किलोमीटर पर्यंत पसरलेली असते. पहाटे ६ वाजतापासुनच ग्राहक येथे आपला नंबर लावुन बसतात. सुमारे ६ ते ७ तास वाट पाहिल्यावर त्यांना सिलेंडर मिळते. कधी तर ग्राहकांची संख्या जास्त असल्यावर पुरेसे सिलेंडर उपलब्ध नसल्याने तासंतास वाट पाहुनही आल्या पावली परत जावे लागते. तिन चार दिवसांपुर्वी तर लखमाई ईण्डेनच्या अंजी रोडवरील गोदामावर सुमारे ८०० ते ९०० ग्राहकांची रांग सकाळपासुन लागलेली होती. मात्र गॅसच्या गाडीमध्ये केवळ ३०० सिलेंडरच आले. त्यामुळे ईतर ग्राहकांना परत जावे लागले. एकीकडे ग्राहकाना सिलेंडर मिळणे दुरापास्त झाले असतांना काळ्या बाजारात मात्र गॅस सिलेंडरचा मागणी तेवढा पुरवठा सुरू आहे. ज्या ग्राहकांनी वर्षातून केवळ चार ते पाच सिलेंडरची उचल केली आहे. त्यांच्या नावे त्यापेक्षा कितीतरी अधिक सिलेंडरची नोंद आहे. महसुल प्रशासन, पुरवठा निरिक्षक व तहसिलदार गेल्या अनेक महिन्यांपासुन सुरू असलेल्या या प्रकाराकडे जाणीवपुर्वक डोळेझाक करीत आहे. घाटंजी महसुल प्रशासनाने कधी घरगुती सिलेंडरच्या व्यावसायीक वापरावर कार्यवाही केल्याचे ऐकीवात नाही. अधिका-यांच्या या चुप्पीचे नेमके काय कारण आहे हे सर्वानांच माहित आहे. 
लखमाई ईण्डेनच्या मनमानीपणामुळे ऑनलाईन गॅस बुकींग नाममात्रच ठरली असुन ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत आहे. 
अमोल राऊत

साभार :- देशोन्नती 



Thursday, 10 May 2012

घाटंजीत गॅस सिलेंडर लिकेजमुळे घराला भिषण आग

घरातील साहित्य भस्मसात
३ लाख ५० हजारांचे नुकसान








स्थानिक आनंदनगर भागात वसंत वडतकर यांचे घरी गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत घरातील संपुर्ण साहित्य जळाले. आज सकाळी ११ वाजेदरम्यान ही घटना घडली. यामध्ये सुमारे ३ लाख ५० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. 
श्री गजानन महाराज मंदिराच्या मागे असलेल्या आनंदनगरात वसंत नारायण वडतकर यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर राम बापुराव करपते हे भाड्याने राहतात. सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते देवघरात दिवा लावण्यास गेले. सिलेंडर लिक असल्यामुळे गॅस घरात पसरलेला होता. ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही. माचीस पेटवताच अचानक मोठा भडका झाला. राम करपते यांनी आग लागलेला सिलींडर घराबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यादरम्यान घरातील साहित्याने पेट घेतला. टि.व्ही, सोफा, फ्रीज, कुलर, पलंग यासह दरवाजे, खिडक्या जळुन खाक झाले. आजुबाजूच्या नागरीकांनी धावपळ करून आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र तोवर घरातील बहुतेक सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. घटनेच्या वेळी घरात राम करपते यांची पत्नी प्रतिभा, २ वर्षांचा चिमुकला दिपेश हे होते. मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. आगीच्या तिव्रतेने खिडक्यांची तावदाने फुटली. नागरीकांनी वेळीच आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला. सिलींडरचा स्फोट झाला असता तर मोठ्या प्रमाणावर हानी झाली असती. महसुल विभागाचे एस.वाय गुघाणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. करपते दाम्पत्याचे तिन वर्षांपुर्वीच लग्न झाले असुन दोन वर्षांपासुन ते वडतकर यांचे घरी भाड्याने राहात आहेत. गॅस कंपन्यांकडून देण्यात येत असलेले अनेक रेग्युलेटर तकलादु असल्याने काही दिवसांनी त्यातून कमी अधिक प्रमाणात गॅस लिक होत असल्याच्या तक्रारी आहेत.
साभार :- देशोन्नती