Pages

Tuesday, 10 April 2012

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्य घाटंजीत विवीध कार्यक्रम


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२१ व्या जयंती निमित्य घाटंजीत विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १४ एप्रीलला सकाळी सायकल रॅली काढण्यात येईल. संत गाडगेबाबा नगर, नेहरू नगर, बसस्थानक, जयभिम चौक, घाटी अशा विवीध भागात पंचशील ध्वजाला अभिवादन करण्यात येईल. सायंकाळी ७ वाजता कँडल मार्चसह डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येईल. दि.१५ एप्रीलला दुपारी १२ वाजता धम्मज्ञान स्पर्धा, २ वाजता वेशभुषा स्पर्धा, ३ वाजता वक्तृत्व स्पर्धा, ४ वाजता समुह व एकलनृत्य स्पर्धा घेण्यात येईल. सायंकाळी ६ वाजता घाटंजी आयडॉल स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. दि. १६ एप्रील रोजी दुपारी ४.३० वाजता बक्षीस वितरण व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६.३० वाजता भिमशाहीर राजेंद्र कांबळे व संच यांचा आंबेडकरी क्रांतीचा हुंकार हा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.
साभार :- देशोन्नती 

शिवणी जि.प.शाळेत शिक्षण महोत्सव


तालुक्यातील शिवणी जि.प.शाळेत नुकतेच शिक्षण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच कुडसिंग राठोड यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी दमडू राठोड होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद आडे, सुभाष कनाके, गोपीचंद पवार, मोहन चव्हाण, सुभाष राठोड, रेखा आडे, संजु पवार, यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्याथ्र्यांनी तयार केलेले शैक्षणीक साहित्य, कलाकृती, शिक्षकांनी तयार केलेल्या प्रतिकृती याची मान्यवरांनी पाहणी करून त्याबाबत माहिती घेतली. या निमित्याने सांस्कृतीक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट साहित्य तयार केल्याबद्दल पुजा वामन राठोड हिला प्रथम, रोहिणी कुमरे द्वितीय, तुषार वाढई तृतिय तर रेखा राठोड या विद्यार्थीनीला प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापीका अनिता व-हाडे यांनी केले. संचालन आर.ए.राठोड तर आभार प्रदर्शन हितेश राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदिप राऊत, प्रगती फुटाणे, अरूणा चिंतावार, संगिता गेडाम, अनिता टेकाम यांनी परिश्रम घेतले. 
साभार :- देशोन्नती 



घाटंजीत रोहयोच्या कामांमध्ये जेसीबीचा धुमाकूळ



गेल्या काही महिन्यांपासुन घाटंजी तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये जेसीबीचा खुले आम वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. वनविभाग त्यामध्ये आघाडीवर आहे.  तालुक्यातील अनेक भागांमध्ये सध्या वनविभागातर्फे बंधा-यांचे काम सुरू असुन त्यासाठी जेसीबीचाच प्रामुख्याने वापर होत आहे. रोजगार हमी, ‘अर्धे तुम्ही अर्धे आम्ही’ या एकाच वाक्याने शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेत नेमका काय प्रकार सुरू आहे हे लक्षात येते. घाटंजी व पारवा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत बंधारे, वन्यजीवांसाठी पाणी साठवण तलाव, यासह विवीध कामे सध्या सुरू आहेत. ही सर्व कामे रोजगार हमी योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या मजुरांच्या माध्यमातून करण्यात यावीत असा नियम आहे. मात्र महसुल व वनविभागाच्या अधिका-यांनी या नियमाला सपशेल हरताळ फासुन बिनदिक्कतपणे जेसीबी व तत्सम यंत्रांचा वापर करून ही कामे करण्याचा सपाटा लावला आहे.
बहुतांश ठिकाणी रात्रीच्या वेळी ही कामे केल्या जात आहेत. संबंधीत कामांवर एकही मजुर उपस्थित नसतांना मस्टरवर मात्र मजुरांची उपस्थिती असल्याचे दाखविण्यात येत असल्याची माहिती आहे. या योजनेंतर्गत होणारी अनेक कामे अनावश्यक ठिकाणी करण्यात येत असल्याच्याही तक्रारी आहेत. ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होऊ शकत नाही तिथे बंधारे बांधण्याची किमया वनविभाग करीत आहे.
साभार :- देशोन्नती 

Tuesday, 3 April 2012

रत्नजडीत रामरथाने वेधले हजारो घाटंजीकरांचे लक्ष

रामनवमी शोभायात्रेला अभुतपुर्व प्रतिसाद

भक्ती, उत्साह आणी डोळ्यांचे पारणे फेडणा-या अलोट गर्दीच्या साक्षीने घाटंजीत रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्य मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या शोभायात्रेला संपुर्ण घाटंजी तालुक्यातुन हजारो भाविकांनी हजेरी लावली. आबालवृद्धांसह महिलावर्गाची यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सायंकाळी ६ वाजता येथिल जलाराम मंदिरापासुन मिरवणुकीला सुरूवात झाली. आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेला अष्टधातुचा रत्नजडीत रामरथ पाहण्यासाठी नागरीकांची प्रचंड गर्दी झाली होती. लक्ष वेधुन घेणा-या चकाकीसह कोरीव नक्षीकामाने सजविलेल्या रामरथाने मिरवणुकीची शोभा वाढविली. अनेक भक्त हा रथ ओढण्यासाठी स्वयंस्फूर्तीने  पुढे येत होते. परळी वैजनाथ येथिल प्रसिद्ध ढोल ताशाच्या तालात हजारो रामभक्तांनी ठेका धरला. रस्त्याच्या बाजुने केलेल्या विद्युत रोषणाईमुळे शहर उजळुन निघाले होते. सकाळपासुनच सर्वत्र लावण्यात आलेल्या लाऊडस्पिकर मधुन रामधुन वाजविण्यात येत होती. त्यामुळे वातावरण भक्तीमय झाले होते. प्रभु श्रिराम, राधाकृष्ण, शिवाजी महाराज, रामभक्त हनुमान, भगवान महादेव यांच्या प्रतिमांचे आकर्षक देखावे साकारण्यात आले होते. फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी करीत ही शोभायात्रा महाराणा प्रताप चौक, सिनेमा टॉकीज चौक, जुना बसस्थानक परिसर, पोलीस स्टेशन चौक, राम मंदिर या मार्गाने शिवाजी चौकात विसर्जीत करण्यात आली. शोभायात्रेच्या मार्गावर शरबत, मठ्ठा, महाप्रसाद व थंड पाण्याची व्यवस्था प्रिती कोल्ड्रींक्सचे भावेश सुचक, शुभमंगल बर्तन भंडार, रमेश सायरे, अशोक गावंडे, जलाराम मंदीर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शिवम हॉटेल, शिव सायकल स्टोअर्स, महिला मंडळ यांनी केली होती. सर्वप्रथम जलाराम मंदिरात रामजन्माचा सोहळा पार पडला. येथे विविध आध्यात्मीक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान घाटंजीचे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. शोभायात्रेचे संयोजक विक्रम जयस्वाल यांचेसह शेकडो कार्यकर्त्यांनी शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती 


रामनवमी शोभायात्रेतील क्षणांची छायाचित्रे खास आपल्यासाठी




































छायाचित्र :- अमोल राऊत, अमोल वारंजे, मिलींद लोहकरे, बादल झाडे, वैष्णवी फोटो स्टुडीओ, घाटंजी

Monday, 2 April 2012

छायाचित्रकार धम्मानंद कांबळे यांचे अपघाती निधन



येथिल युवा छायाचित्रकार धम्मानंद कांबळे वय (३२) यांचे आज रात्री ८ च्या सुमारास यवतमाळ येथिल खासगी रूग्णालयात दु:खद निधन झाले. आज सकाळी पांढरकवड्याजवळ दुचाकी वन्यप्राण्याला धडकल्याने झालेल्या अपघातात ते गंभिर जखमी झाले होते. त्यांच्या सोबत असलेले छायाचित्रकार संदिप धांदे हे सुद्धा अपघातात जखमी झाले असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे. घाटंजी येथे छायाचित्रणाच्या व्यवसायामुळे सर्वांना सुपरिचीत असलेल्या धम्मानंद कांबळे यांच्या अकाली जाण्याने शहरात शोककळा पसरली आहे.