‘ओठी तुझ्या असु दे’ : हौशी युवकांनी साकारलाय
‘गारवा स्टाईल’ गझल अल्बम
हळुवार पार्श्वसंगीत... अर्थपुर्ण शब्दांनी मनाचा ठाव घेणारे निवेदन... अन जणु काही अंत:करणातील भावनाच शब्दरूपाने कानावर पडत असल्याचा भास... तरूणाईला भुरळ पाडणा-या गारवा व सांज गारवा या सारख्या मराठी गित व गझलांच्या अल्बम्स मध्ये हा प्रकार अत्यंत लोकप्रिय झाला. या अल्बम्समधील गिते अनेकांचा काळजात घर करून गेली. असे दर्जेदार अल्बम्स केवळ पुण्या मुंबईकडे व केवळ व्यावसायीक स्तरावरच होऊ शकतात असा आपला समज आहे. मात्र घाटंजी तालुक्यातील काही हौशी युवकांनी हा समज सपशेल खोटा ठरवत ‘ओठी तुझ्या असु दे...’ हा एक अप्रतिम मराठी गझल अल्बम साकारला आहे. या अल्बमचा उद्देश व्यावसायीक नसला तरी त्याचा दर्जा मात्र व्यावसायीक स्तराचा आहे.
व्यवसायाने शिक्षक तसेच निवेदक, वादविवादपटू व कवि असलेले रूपेश कावलकर, नुकतेच अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केलेला युवा गझलकार पुष्कर राऊत, कुक्कुटपालनाचा व्यवसाय करून स्वरांची साधना करणारा युवा गायक संतोष मानकर व ट्रॅक्टर चालवुन तबल्यावरही थाप देणारे आकपुरी येथिल रवि एकुनकर या चार युवकांनी आदिवासीबहुल घाटंजी तालुक्याच्या मातीत मराठी गझलेचे ‘बिजारोपण’ केले आहे. मराठी गझलेची व्याप्ती वाढावी, आदिवासी भागातूनही नवे गझलकार पुढे यावे हा उद्देश डोळ्यापुढे ठेऊन तसेच ग्रामिण भागातूनही एक दर्जेदार कलाकृती निर्माण होऊ शकते याच धेय्याने या युवकांनी हा अल्बम साकारला आहे. या अल्बममध्ये रूपेश कावलकर व पुष्कर राऊत यांच्या एकुण सात गझल असुन प्रत्येक गझलेच्या पुर्वी रूपेश कावलकर यांच्या आवाजात त्यांच्याच कवितांचे निवेदन आहे. तर सर्व गझलांना संगित व स्वर संतोष मानकर यांनी दिला आहे. संगित संयोजन यवतमाळ येथिल संजय व संतोष र्इंगोले यांनी तर ध्वनीमुद्रण सुबोध वाळके यांनी केले आहे.
मराठीत गझल हा काव्यप्रकार हाताळणे वाटते तितके सोपे नाही. मात्र या अल्बममधील प्रत्येक गझल शास्त्रशुद्ध आहे. उल्लेखनिय म्हणजे या गझलकारांनी हा अल्बम व्यावसायीक उद्देशाने पुढे आणला नसुन केवळ उत्पादन खर्च निघेल एवढीच अत्यल्प किंमत ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. नुकतेच घाटंजी येथे एका कार्यक्रमात या अल्बममधील काही गझल ध्वनिक्षेपकावरून ऐकविण्यात आल्या तेव्हा अनेक घाटंजीकरांनी या अल्बमचे कौतुक केले. हळव्या गझल अन मनाला स्पर्श करणारे निवेदन ओठी तुझ्या असु दे या मराठी गझल अल्बम मध्ये प्रेम, व्याकुळता, विरह, आनंद यासह विवीधांगी भावनांना स्पर्श करणा-या शब्दांची गुंफण आहे. या हळव्या शब्दांना रूपेश कावलकर यांच्या रेशमी आवाजाने चांगलाच रंग चढविला आहे.
‘‘काट्यां शिवाय गुलाबाचही प्रेम कधीच फुलत नाही,
अन त्यांना प्रेम काय कळणार ज्यांना काटा सलत नाही.’’
अल्बममधील पहिल्या गझलेच्या सुरूवातीला असलेल्या कवितेमधील या ओळींमध्ये प्रेमाचा असा मार्मिक अर्थ सांगितला आहे.
तर
‘‘भिजल्या तुझ्या रूपाला, तु सावरून घे ना !
पाण्यात आग मोठी, लागेल पावसाने !! ’’
गझलेतील हा शेर प्रेयसीचे सौंदर्यवर्णन करून जातो.
‘‘ओठी तुझ्या असु दे, बदनाम नाव माझे !
होता कधी सुगीचा हंगाम नाव माझे !! ’’
या गझलेतील शब्दांना संतोष मानकर यांनी अप्रतिम स्वरसाज दिला आहे.
‘‘शेवटी, लांडगा जरी साधू असला
तरी त्याचा भरवसा ठेऊ नये.
अन कसायाच्या हाती कधी
काळीज आपलं देऊ नये ! ’’
या कवितेचे शब्द खुप काही शिकवुन जातात. पुष्कर राऊतने लिहिलेली,
‘‘वेदनांचे गीत माझी आसवे गाणार आहे,
साथ मोलाची तुझे ते नयनही देणार आहे.
एकदा ये सांजवेळी राधीका होऊन माझी
मी पहाटे गोकुळाला सोडुनी जाणार आहे !!’’
हि गझल प्रेमातील व्याकुळता सांगते.
आणी
‘‘जन्माला येणारा प्रत्येक माणुस,
जगात कायमचा रहात नाही.
तरिही माणसं माणसाकडे
माणसासारखी पाहत नाही. ’’
हे रूपेश कावलकरचे शब्द समाजातील वास्तविकता पुढे आणतात
साभार : सकाळ
By : अमोल राऊत
या अल्बम विषयी अधिक माहितीसाठी खालील Page Like करा
No comments:
Post a Comment