Pages

Showing posts with label उत्तमराव पाटील. Show all posts
Showing posts with label उत्तमराव पाटील. Show all posts

Saturday, 10 March 2012

उत्तमराव पाटील यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा

आज लोणी येथे अंत्यसंस्कार

राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेकांचे आधारस्तंभ, सहकार क्षेत्रातील मुरब्बी नेते, लोणी या छोट्याश्या गावातील सरपंच ते लोकसभेचे सलग पाच वेळा खासदार असा प्रदीर्घ राजकीय प्रवास केलेले उत्तमराव पाटील उपाख्य 'दादा' यांचे नागपूर येथील आदित्य हॉस्पिटलमध्ये काल सायंकाळी ६.३0 वाजता निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी येथे धडकताच जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली.
उत्तमरावदादा यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या आर्णी रोड स्थित 'देवकृपा' या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती. नागपूर येथून रात्री त्यांचे पार्थिव यवतमाळात आणण्यात आले. रविवार ११ मार्च रोजी सकाळी १0 वाजेपर्यंत दादांचे पार्थिव त्यांच्या येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता त्यांच्या मूळ गावी लोणी येथे (ता. आर्णी) अंत्यसंस्कार केले जातील. दादांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकीय व सहकार क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
२ मार्चला येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात रक्तदाब कमी झाल्याने अचानक ते मंचावर कोसळले. त्यांना येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना ६ मार्चला नागपूर येथील डॉ.राजन मारोकार यांच्या आदित्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे आज सायंकाळी ६.३0 वाजता त्यांचे निधन झाले. सन १९६९ मध्ये लोणी (ता.आर्णी) येथील सरपंच पदापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. दिग्रस पंचायत समितीचे सदस्य, यवतमाळ जिल्हा परिषदेचे सदस्य त्यानंतर १९७२ ते ७८ या कालावधीत ते विधानसभेचे आमदार होते. त्यानंतर १९८0 ते २00३ अशी सलग २३ वर्षे ते काँग्रेस पक्षाचे पाच टर्म खासदार राहिले. १४ नोव्हेंबर २0११ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.


दादांच्या निधनावर मान्यवरांच्या प्रतिक्रिया


जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण
असलेला नेता हरवला - मुख्यमंत्री 
जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता हरविला, अशा शब्दात माजी खासदार उत्तमराव पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

विदर्भातील बहुजन समाजाला घेवून चालणारा नेता उत्तमराव पाटील यांच्या रूपाने आपल्यातून निघून गेला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
- सदाशिवराव ठाकरे
माजी खासदार

जिल्ह्याला व राष्ट्रवादी पक्षाला उत्तमरावदादांची आवश्यकता होती. माझा हितचिंतक काळाने हिरावला आहे. काँग्रेसमध्ये असूनसुध्दा दादांसोबत स्नेहाचे संबंध होते. कौटुंबिक दृष्ट्याही अतिशय जवळ होते. परिवारातीलच व्यक्ती हिरावली आहे. या घटनेने कधीही भरून न निघणारी पोकळी वैयक्तिक जीवनात निर्माण झाली आहे.
- मनोहरराव नाईक
अन्न व औषध प्रशासन मंत्री

राजकीय कृपाछत्र हिरावले. उत्तमरावदादा हे अतिशय सरळ व सर्वसामान्य माणसाला घेवून चालणारे लोकनेते होते. विदर्भातील आघाडीच्या मोजक्या नेत्यांपैकी ते एक होते. काळाने आपल्यातील एक प्रामाणिक नेतृत्व हिरावले आहे.
- आमदार वसंतराव पुरके
विधानसभा उपाध्यक्ष

दादांनी व्यक्तिगतरीत्या केलेल्या मदतीमुळेच अनेक पदांपर्यत पोहोचू शकलो. सामाजिक व राजकीय क्षेत्रात दादांचे फार मोठे कार्य आहे. दादांनी जिल्ह्यात माझ्यासारख्या अनेकांना घडविले. निधनाची वार्ता कळताच मला व माझ्या कुटुंबीयांना दु:ख झाले आहे. दादांच्या निधनाने जिल्ह्यात एक पोकळी निर्माण झाली असून कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.
- आमदार माणिकराव ठाकरे
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

सामाजिक जाण असणारी व्यक्ती गेली. दादांच्या काम करण्याच्या शैलीमुळे विरोधकांनाही ते आपलेसे वाटायचे. दादा आपल्यातून निघून गेले यावर विश्‍वास बसत नाही. ही घटनाच माझ्यासाठी धक्कादायक आहे. जिल्ह्याचे पितृतुल्य नेतृत्व गमावले आहे. पाटील कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.
- भावनाताई गवळी
खासदार

दादांच्या निधनाने राजकीय पोकळी तयार झाली आहे. श्रेष्ठ मार्गदर्शक निघून गेले. विरोधकांनाही सन्मानपूर्वक वागणूक देणारा द्रष्टा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
- हरिभाऊ राठोड
माजी खासदार

उत्कृष्ट संघटक जिल्ह्याने गमावला आहे. उत्तमराव पाटील हे माझ्या मुलासारखे होते. त्यांचे वडील देवराव पाटील व त्यानंतर उत्तमराव पाटील यांची काँग्रेसवर निष्ठा होती. कालपरवाच ते राष्ट्रवादीत दाखल झाले आणि काळाने त्यांना आपल्यातून हिरावले आहे. माझ्या कुटुंबातलाच माणूस गेल्याने अतिव दु:ख झाले आहे.
- जांबुवंतराव धोटे
माजी खासदार

माझी राजकीय कारकीर्द घडविण्यात उत्तमरावदादांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे निधन ही सर्वांसाठीच दु:खद घटना आहे. काँग्रेस कमिटीचा जिल्हाध्यक्ष या नात्याने सर्वांच्यावतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली.
- आ.वामनराव कासावार
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी

दूरदृष्टी ठेवणारा, राजकारणात राहून स्पष्ट भूमिका असलेला खुल्या दिलाचा नेता उत्तमरावदादा होते. त्यामुळेच विरोधी पक्षातही माणणारा वर्ग जिल्ह्यात आहे. स्वाभिमानी व राजकारणात राहुनही कटकारस्थान, हुजरेगिरी यापासून दादा कोसो दूर होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील स्वाभिमानी नेता हरविला आहे. माझे त्यांच्याशी पारिवारिक संबंध असल्याने ही घटना माझ्यासाठी कौटुंबिक आघात आहे. दारव्हा व दिग्रस येथील शिवजयंतीच्या मिरवणुकीत निधनाची दु:खद वार्ता कळाली. कार्यकर्त्यांनी लगेच दादांना श्रध्दांजली अर्पण करून मिरवणूक आटोपती घेतली. यातच त्यांचे थोरपण दिसून येते.
- आमदार संजय राठोड
जिल्हा प्रमुख, शिवसेना

शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी दादा सदैव भांडत होते. कृषी क्षेत्रात दादांचे भरीव योगदान आहे. जिल्ह्याच्या राजकारणातील ते अजात शत्रू होते. विदर्भासह जिल्ह्यातील ज्येष्ठ नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. या घटनेने प्रचंड असे नुकसान झाले आहे.
- आमदार निलेश पारवेकर

दादांचे निधन ही आम्हा सर्वांसाठीच अतिशय दु:खद घटना आहे. या पलिकडे कुठलेही शब्द मला सूचत नाही.
- आमदार संदीप बाजोरिया

लोकनेता काळाने हिरावून घेतला आहे. सर्वसामान्यांना समान वागणूक देणारा नेता आपल्यातून निघून गेला आहे. विकासाची दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व उत्तमरावदादा होते. संयमाचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून दादांवर सर्वांचेच प्रेम होते. त्यांच्या निधनाने आज मोठी हानी झाली आहे.
- योगेश गढिया
नगराध्यक्ष, यवतमाळ

उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. दादांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने पक्षाला चांगली उभारी मिळणार होती. मात्र दु:खद घटनेने कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.
- प्रकाश पाटील देवसरकर
माजी आमदार





साभार:- लोकमत

उत्तमरावदादा पाटील यांचा जीवनपट

जन्म : २५ डिसेंबर १९४४
शिक्षण : बी. एससी (कृषी) नागपूर विद्यापीठ
व्यवसाय : शेती
विद्यार्थि दशेतील कार्य 
कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष (१९६६)
नागपूर विद्यापीठात विद्यार्थी प्रतिनिधी (१९६७)
राजकीय कारकीर्द 
सरपंच, ग्रामपंचायत लोणी (सन १९६९)
सदस्य, पंचायत समिती दिग्रस (सन १९७0)
सदस्य, जिल्हा परिषद यवतमाळ (सन १९७९)
सदस्य, महाराष्ट्र विधानसभा (सन १९७२ ते १९७८)
सदस्य, उपविधान कार्य समिती (सन १९७४)
सदस्य, शासकीय आश्‍वासन समिती (सन १९७५)
सदस्य, पंचायत राज समिती (१९७६)
सलग पाच वेळा लोकसभा सदस्य 
अ) सातवी लोकसभा - सन १९८0 ते १९८४
ब) आठवी लोकसभा - सन १९८४ ते १९८९
क) नववी लोकसभा - सन १९८९ ते १९९१
ड) दहावी लोकसभा - सन १९९१ ते १९९६
इ) बारावी लोकसभा - सन १९९८ ते २00३
भूषविलेली पदे
सदस्य लोकसभा अंदाज समिती, दिल्ली
सदस्य, विदेश पर्यटन महामंडळ दिल्ली
सदस्य, बँकींग व विमा उद्दोग विभागीय विचार विर्मश समिती, दिल्ली
सचिव, अखिलभारतीय शेतकरी सांसदीय मंच, दिल्ली
संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबई
उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्य (२00८)
अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, यवतमाळ (२00२)
अध्यक्ष, आरोग्य विचार विर्मश समिती, शासकीय रुग्णालय यवतमाळ
सदस्य, दूरभाष सल्लागार मंडळ, अमरावती विभाग, अमरावती
अध्यक्ष, श्री शंकर शेतकरी सहकारी साखर कारखाना, मंगरुळ
अध्यक्ष, जि. मध्यवर्ती जनहित सहकारी घाऊक व किरकोळ ग्राहक भंडार
उपाध्यक्ष, यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेस कमेटी (१९७४ ते १९७७)
सहसचिव, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटी (१९७७ ते १९८0)
अन्य कार्ये 
* श्रीमती इंदिरा गांधी अटकेच्या निषेधार्थ पदयात्रा, सत्याग्रह व अटक
* २0 कलमी कार्यक्रमाच्या प्रचारासाठी १५0 किलोमीटरची पदयात्रा
सामाजिक व शैक्षणिक कार्ये 
राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ, लोणी द्वारा संचालित, पोस्ट बेसिक आश्रमशाळा, लोणी, पोस्ट बेसिक वसतीगृह, लोणी, स्व. देवराव पाटीलप्रतिष्ठाण, यवतमाळ द्वारा संचालित, आदिवासी आश्रमशाळा खटेश्‍वर, पोस्ट बेसिक आदिवासी आश्रमशाळा, खटेश्‍वर, आदिवासी आश्रमशाळा वसतीगृह, खटेश्‍वर, पोस्ट बेसिक आदिवासी आश्रमशाळा वसतीगृह, खटेश्‍वर स्व. देवराव पाटीलकन्या शाळा, आर्णी, सदाशिव अनंत भागवत, विद्यालय, म्हसोला (का), स्व. देवराव पाटील वसतीगृह, आर्णी
साभार:- लोकमत

माजी खासदार उत्तमराव पाटील यांचे दु:खद निधन


यवतमाळ लोकसभा मतदार संघाचे तब्बल पाच वेळा प्रतिनिधीत्व करणारे माजी खासदार उत्तमराव पाटील यांचे आज दुपारी नागपुर येथे दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी ते ६८ वर्षांचे होते. काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यक्रमादरम्यान त्यांना भोवळ आल्याने रूग्णालयात भरती करण्यात आले होते. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना नागपुरला हलविण्यात आले होते. त्यांच्या निधनाने संपुर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली असुन जिल्ह्यातील एक दिग्गज राजकीय नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र दु:खद वातावरण आहे.