Pages

Wednesday 26 June 2013

कोळसा घोटाळा तब्बल ५० लाख कोटींचा : खा.हंसराज अहिर

वाळूचा लिलाव होतो मग कोळसा फुकटात का?

रेती, मुरूम, दगड यासारख्या गौण खनिजाचा शासन लिलाव करते. मग बहुमुल्य कोळसा आजवर फुकटात का वाटण्यात आला? कोल ब्लॉक वाटणीत शासनाला झालेल्या नुकसानाचा कॅग ने जाहिर केलेला आकडा अत्यंत कमी असुन प्रत्यक्षात तब्बल ५० लाख कोटींच्याही वर तोटा झालेला आहे. असा दावा खासदार हंसराज अहिर यांनी केला. 
येथिल जलाराम मंदिर सभागृहात आयोजीत व्याख्यानात ते बोलत होते. महाबलाय व्यायाम प्रसारक मंडळातर्फे ‘कोळसा खान वाटप घोटाळा’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले, देशातील या संपत्तीचा विनीयोग नागरिकांसाठी होणे अपेक्षीत असतांना खासगी कंपन्यांना कोल ब्लॉकची खैरात का वाटण्यात आली? 
देशात नऊ राज्यांमध्ये कोळशाचे उत्पादन होते. १९७३ साली स्थापन झालेली कोल इंडीया ही सरकारी कंपनी कोळसा उत्पादन करणारी एकमेव वंâपनी होती. मात्र माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांच्या काळात खासगी उद्योजकांना कोळसा ब्लॉक देण्याचा निर्णय झाला. तेव्हापासुन या कंपनीला उतरती कळा लागली. कोट्यवधींची किंमत असलेले कोल ब्लॉक आजवर शासनाने फुकटात वाटले. लोकसभेत या विषयावर सर्वप्रथम प्रश्न उपस्थित करून हा विषय पुढे आणला व तेव्हा सरकारला जाग आली. देशाच्या महालेखापरिक्षकांकडे याची तक्रार केल्यावर या घोळाची चौकशी सुरू झाली. त्यांनी या घोटाळ्यावर ताशेरे ओढताच त्यांचेवरही शिंतोडे उडविण्यात आले. आता सि.बी.आय.या प्रकरणाची चौकशी करीत आहे. या घोटाळ्यात ज्यांचे हात काळे झाले आहेत ते बाहेर येत आहेत. मात्र ज्या पंतप्रधान कार्यालयाने या सर्वांची पाठराखण केली त्यांचेवर कार्यवाही कधी होणार? पंतप्रधान मनमोहनसिंग व्यक्तीगतरित्या दोषी नसतीलही मात्र एवढ्या गंभिर प्रकाराकडे डोळेझाक केल्याने त्यांना निर्दोषही ठरविता येणार नाही असे खा.अहिर म्हणाले. वाटप करण्यात आलेले कोल ब्लॉक रद्द करण्याचा अधिकार शासनाला आहे. मात्र उद्योजकांशी लागेबांधे असल्याने तसा निर्णय टाळल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्या अभ्यासपुर्ण व्याख्यानात खा.अहिर यांनी कोळसा खान घोटाळ्याचे अनेक पैलु श्रोत्यांपुढे मांडले. 
दरम्यान महाबलाय व्या.प्र.मंडळ, स्व.रमणीकभाई सुचक बहुउद्देशीय संस्था व गुजराती समाजातर्फे खा.हंसराज अहिर यांचा जाहिर सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, स्व.रमणीकभाई सुचक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजु सुचक, महाबलाय व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शैलेश ठाकुर, उपाध्यक्ष सैय्यद फिरोज, समर्थ विद्यालयाचे संचालक मधुसूदन चोपडे, शिवसेना तालुका प्रमुख भरत दलाल, भाजप तालुकाध्यक्ष दत्ता कोंडेकर यांचेसह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन विष्णु नामपेल्लीवार व सुरेश जाधव यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.  
साभार- सकाळ
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

No comments:

Post a Comment