Pages

Tuesday 7 April 2015

ग्रा.पं.निवडणुक प्रक्रीयेतील वादातून घाटंजीत तणाव








देवानंद पवार समर्थकांनी सतिश मलकापुरे यांच्या घरात केलेली तोडफोड
दोन गटात हाणामारी : राजकीय वैमनस्यातून घटनेला हिंसक वळण
येथिल तहसिल कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीची नामनिर्देशन प्रक्रीया सुरू असतांना जातवैधता प्रमाणपत्र स्विकारण्याच्या वेळेबाबत निर्माण झालेल्या वादाला ता.६ ला रात्री उशिरा हिंसक वळण मिळाले. जि.प.सदस्य देवानंद पवार यांना मारहाण झाल्यावर दोन गटात हाणामारी होऊन काही ठिकाणी जमावाकडून दगडफेकही झाली. माजी नगरसेवक सतिश मलकापुरे यांच्या घरात घुसून जमावाने प्रचंड तोडफोड केली. या संपुर्ण घटनाक्रमात दोन्ही गटाच्या तक्रारींवरून घाटंजी पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या वादामुळे शहरात तणावपुर्ण शांतता आहे.
घाटंजी तहसिल कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीची नामनिर्देशन प्रक्रीया सुरू होती. दरम्यान जात वैधता प्रमाणपत्र स्विकारण्याची वेळ गेल्याचे सांगुन संबंधीत लिपिकाने काही लोकांचे प्रमाणपत्र स्विकारले नाही. तर देवानंद पवार समर्थकांचे प्रमाणपत्र स्विकारल्या जात आहे असा आरोप करून माजी नगरसेवक सतिश मलकापुरे यांचा संबंधीत लिपिकाशी वाद झाला. हि घटना कळताच त्या लिपिकाचा मुलगा कार्यालयात आला. परिस्थिती पाहुन त्याची प्रकृती बिघडली. त्याला पवार व त्यांच्या सहका-यांनी खासगी दवाखान्यात नेले. तेवढ्यात तिथे सतिश मलकापुरे, भरत दलाल व अन्य काहीनी येऊन देवानंद पवार यांना मारहाण करायला सुरूवात केली. हि घटना रात्री ९ वाजताच्या सुमारास नेहरू नगर परिसरात घडली. 
घटनेची माहिती मिळताच देवानंद पवार यांचे शेकडो समर्थक घटनास्थळी गोळा झाले. पोलीस स्टेशनसमोर तुरळक दगडफेकही झाली. त्यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास हा जमाव सतिश मलकापुरे यांच्या घराकडे वळला. घराचा दरवाजा तोडून घरातील वस्तुंची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. यावेळी मलकापुरे यांच्या घरी कुणीही नव्हते. शिवाय परिसरातील काही नागरिकांनाही जमावातील काहीनी मारहाण केल्याची माहिती आहे. 
घरात तोडफोड करत असतांना मलकापुरे यांच्या समर्थकांनीही या जमावावर दगडफेक केली. त्यामुळे तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही गटातील समर्थकांमध्येही हाणामारी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सतिश मलकापुरे यांच्या तक्रारीवरून देवानंद पवार, अशोक पवार, अमोल मुत्यलवार, अरविंद चौधरी व इतर आठ जणांविरूद्ध भा.दं.वि. कलम १४३, १४९, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
तर मारहाण केल्याबद्दल देवानंद पवार यांच्या फिर्यादीवरून सतिश मलकापुरे, वैभव मलकापुरे, भरत दलाल यांचेविरूद्ध भांदवि ३९४, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. शिवाय भरत दालाल यांच्या फिर्यादीवरून देवानंद पवार यांचे विरोधात भांदवि ३९४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सतिश मलकापुरे यांचे घर फोडून तोडफोड केल्या प्रकरणी मलकापुरे यांच्या तक्रारीवरून देवानंद पवार, साहेबराव पवार, अशोक पवार, अनिल एंबडवार, संदिप जाधव यांचेसह एकुण २३ जणांविरूद्ध भांदवि  १४३, १४७, १४८, ५०४, ५०६, ३९५ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. राजकीय दबावातून गुन्हे दाखल केल्या गेल्याचा पवार गटाचा आरोप आहे. तर ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रीयेत पवार यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप मलकापुरे गटाने केला आहे.
तणावपुर्ण परिस्थितीमुळे यवतमाळ येथुन पोलीसांची अतिरिक्त कुमक बोलविण्यात आली असुन उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन घाटंजीत तळ ठोकुन आहेत. या घटनेच्या पाश्र्वभुमिवर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुक तणावपुर्ण वातावरणात होण्याची चिन्हे दिसत असुन निवडणुका घेण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.

त्या लिपिकाला कारणे दाखवा नोटीस
या संपुर्ण वादाचा केंद्रबिंदू असलेल्या तहसिल कार्यालयातील लिपिक कैलासवार यांना काही जातवैधता प्रमाणपत्र न स्विकारल्याच्या कारणावरून प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सदर लिपिकाने वेळ गेल्याचे सांगून जातवैधता प्रमाणपत्र स्विकारले नव्हते. तर विशिष्ट लोकांचे प्रमाणपत्र स्विकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

पोलीसांची जरब संपली !
दोन गटात निर्माण झालेल्या तणावात घाटंजी पोलीसांनी नरमाईची भुमिका घेतल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. प्रकरण गंभिर होत असल्याचे निदर्शनास येऊनही पोलीसांनी तातडीने पावले उचलली नाही. जमावातील अनेकजण पोलीस स्टेशनच्या परिसरात काठ्या, रॉड, मिरचीपुड घेऊन असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हाणामारी, दगडफेक व तोडफोड होत असतांना पोलीस कुठेच प्रतिबंध करतांना दिसले नाही. पोलीसांची अतिरिक्त कुमक रात्री उशिरा आली. एकंदरीतच घाटंजी पोलीसांची तालुक्यात जरबच नसल्याचे बोलल्या जात आहे.

Monday 5 January 2015

घाटंजीच्या अंजलीने उंचावली यवतमाळ जिल्ह्याची मान !

भारतीय विज्ञान परिषदेत कौतुकाचा वर्षाव 
डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम, कैलाश सत्यार्थींसह 
मान्यवरांकडून प्रयोगाची दखल

अमोल राऊत
भारतातील सर्वात मोठा विज्ञान समारंभ...वैविध्यपुर्ण अविष्कारांच्या स्टॉल्सने गजबजलेला परिसर...पंचतारांकीत शाळांच्या विद्यार्थ्यांच्या अत्याधुनिक प्रयोगांची रेलचेल...दरम्यान देशाचे माजी राष्ट्रपती तथा ख्यातनाम वैज्ञानिक डॉ.अब्दुल कलाम कार्यक्रमाच्या उद्घाटनास येतात. देशातील सर्वोत्तम विजान अविष्कार असलेल्या या परिसरात त्यांची नजर पडते ती सायकलवरील स्वयंचलीत फवारणी यंत्रावर. ते तिथे जातात. प्रयोग साकारणा-या विद्यार्थीनीकडून प्रयोगाची माहिती घेतात. त्या प्रयोगाचा उद्देश व विद्यार्थीनीची पार्श्वभूमी जाणुन घेतल्यावर त्या विद्यार्थीनीच्या पाठीवर कौतुकाने हात फिरवतात. हा प्रसंग घडला मुंबई येथे सुरू असलेल्या भारतीय विज्ञान परिषदेच्या कार्यक्रमात. अन ती विद्यार्थीनी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्याची. शहरालगत असलेल्या खापरी या लहान खेड्यातील शेतकरी संजय गोडे यांची मुलगी अंजली. घाटंजीतील शि.प्र.मं.कन्या शाळेतील दहाव्या वर्गाची विद्यार्थीनी. राष्ट्रीय स्तरावर तिच्या प्रयोगाची मान्यवरांनी दखल घेतल्याने घाटंजी तालुकाच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्याचाही गौरव वाढला आहे.
मुंबई येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय स्तरावरील इंडीयन सायन्स कॉंग्रेस या विज्ञान प्रदर्शनात घाटंजी येथिल शि.प्र.मं. कन्या शाळेची विद्यार्थीनी अंजली संजय गोडे हिने सादर केलेल्या सायकलवरील स्वयंचलीत फवारणी यंत्र या प्रयोगाने अनेक मान्यवरांचे लक्ष वेधले. या प्रदर्शनीमध्ये अंजलीचा हा अभिनव व शेतक-यांसाठी उपयोगी असलेला हा प्रयोग चर्चेचा विषय ठरला आहे. 
देशाचे माजी राष्ट्रपती व ख्यातनाम वैज्ञानिक डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते चिल्ड्रन सायन्स कॉंग्रेसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी अंजलीच्या प्रयोगाची पाहणी केली. या प्रयोगाची संपुर्ण माहिती त्यांनी घेतली. शेतक-यांसाठी अत्यंत उपयोगी ठरू शकणा-या या प्रयोगासाठी अंजली गोडे व तिचे मार्गदर्शक शिक्षक अतुल ठाकरे यांचे डॉ.कलाम यांनी विशेष कौतुक केले. त्याच प्रमाणे नोबेल पारितोषीक विजेते कैलाश सत्यार्थी यांनीही या प्रयोगाची पाहणी करून अंजलीला शाबासकी दिली.
मुंबई येथे सुरू असलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान परिषदेचे ३ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मान्यवर यावेळी उपस्थित होते. या परिषदेमध्ये नोबेल पारितोषीक विजेते मान्यवर, प्रसिद्ध वैज्ञानिक, विवीध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला आहे. या विज्ञान मेळाव्यात देशभरातील प्रतिभावान विद्यार्थी सहभागी झाले असुन अंजली संजय गोडे हि महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करीत आहे. जिल्हा, राज्य, व राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये उल्लेखनिय कामगिरी केल्याने भारतीय विज्ञान परिषदेत तिला निमंत्रित करण्यात आले आहे. घाटंजी तालुक्यातील खापरी या छोट्याशा गावातील शेतकरी कन्येने राष्ट्रीय स्तरावर केलेली कामगिरी कौतुकाचा विषय ठरली आहे.


कृषी क्षेत्रातच करीयर करणार
भविष्यात कृषी विज्ञान क्षेत्रातच शिक्षण घेऊन शेतक-यांसाठी उपयोगी ठरणारे संशोधन करण्याचा मानस अंजली गोडे हिने सकाळ शी बोलतांना व्यक्त केला. वडील शेतकरी असल्याने आधी पासुनच शेतीविषयी आवड आहे. या प्रयोगासाठी वडील संजय गोडे यांनी त्यांच्या अनुभवातून केलेले मार्गदर्शन खुप उपयोगी ठरले. राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान परिषदेत येऊन बरेच काही शिकायला मिळाले तसेच प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशिर्वाद मिळाला असे ती म्हणाली. शेतक-यांनी निसर्गाच्या लहरीपणामुळे खचुन न जाता आधुनिक तंत्रजानाच्या मदतीने शेती करण्याला प्राधान्य द्यावे. तसे झाल्यास शेतक-यांवर आत्महत्येची पाळी येणार नाही.
अंजली गोडे

खुप काही शिकायला मिळाले
अंजलीच्या या प्रयोगाला मार्गदर्शन करीत असतांना माझ्याही जानात भर पडली. जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात सहभागी होता आले. शिवाय या ठिकाणी अनेक नामवंत मान्यवरांचे मार्गदर्शन मिळाले. अंजलीमध्ये आता प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला आहे. या दरम्यान आलेल्या अनुभवांचा फायदा भविष्यात शाळेतील ईतर विद्यार्थीनींसाठी करता येईल
अतुल ठाकरे
मार्गदर्शक शिक्षक


शाळेसाठी गौरवाचा क्षण !
अंजलीने विजान क्षेत्रात घेतलेली भरारी शाळेसाठी गौरवास्पद आहे. या प्रयोगाची संकल्पना प्रथम दर्शनी जरी साधी वाटत असली तरी त्याची उपयोगीता खुप आहे. भविष्यात शेतक-यांसाठी हे संशोधन महत्वाचे राहील. अंजलीच्या या यशामुळे शाळेतील विद्यार्थीनींना प्रेरणा मिळेल.
सौ.के.पी.महाकाळकर
मुख्याध्यापीका, शि.प्र.म.कन्या शाळा

अंजलीच्या यशाचा अभिमान वाटतो

आमची वर्गमैत्रिण आज राष्ट्रीय स्तरावर गेली असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. अंजलीची जिद्द, परिश्रम व प्रयोगाचा उद्देश कौतुकास्पद आहे. आम्हालाही तिच्याकडून खुप काही शिकता येईल.
नेहा अवचित
वर्गमैत्रिण


स्वयंचलीत फवारणी यंत्र शेतक-यांसाठी वरदान
सायकलवर चालणारे हे स्वयंचलीत फवारणी यंत्र शेतक-यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. अवघ्या अडीच ते ३ हजार रूपयात हे यंत्र तयार होते. शिवाय र्इंधन विरहित असल्याने पैश्याच्या बचतीसोबतच पर्यावरणासाठीही हानीकारक नाही. सायकलच्या पॅडल द्वारे दाब निर्माण करून वेगवेगळ्या १० नोझल्स द्वारे फवारणी करता येऊ शकते. विषेश म्हणजे सायकलची गती कमी असली तरी फवारणी होऊ शकते. केवळ एक व्यक्तीच सायकल चालवुन फवारणी करू शकत असल्यामुळे मजुराची गरज नाही. तसेच फवारणी मागील बाजुस होत असल्यामुळे रासायनिक द्रव्य अंगावर पडण्याचा धोका कमी आहे. फवारणीसाठी शेतक-यांना ईलेक्ट्रीक फवारणी यंत्राचे भाडे, र्इंधन व मजुरी असा खर्च लागतो. मात्र या अत्यल्प खर्चातील स्वयंचलीत यंत्राने शेतक-यांना किफायतशीर दरात फवारणी करता येऊ शकते.

अंजलीच्या प्रयोगाची राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी घेतलेली दखल
( बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा )

The Indian Express
Teen invents pump on cycle for farmers, gets a pat from Abdul Kalam


Hindustan Times
Yavatmal schoolgirl's agricultural innovation appreciated by Dr Abdul Kalam


DNA ( Daily News & Analysis )
Yavatmal girl receives praise from former president Dr APJ Abdul Kalam for her project


The Asian Age
‘Create technology for welfare’

The Hindu
A scientist demonstrates her project to former President A.P.J. Abdul Kalam


महाराष्ट्र टाईम्स
पिकांवर फवारणीसाठी ‘सायकल पंप’
गरजू शेतकऱ्यांसाठी यवतमाळच्या अंजलीचा अविष्कार

लोकसत्ता
देशाला दर्जेदार नेतृत्त्वाची गरज

सकाळ
कल्पनांच्या पंखावर घ्या भरारी !

लोकमत
पैशासाठी विज्ञान अभ्यास नको

दैनिक ट्रिब्युन
छोटा पंप करे कमाल

IBN Lokmat

Friday 2 January 2015

घाटंजीतील एकता महिला मंडळाचा मौक्तीक महोत्सव

आज उद्घाटन : महिला एकतेची प्रेरणादायी चाळीस वर्षे
शहरातील महिलांचे सामाजीक व सांस्कुतिक व्यासपीठ अशी ओळख असलेल्या एकता महिला मंडळाने चाळीस वर्षांचा पल्ला गाठला आहे. या निमित्ताने मौक्तीक महोत्सवाचे भव्य आयोजन मंडळातर्पेâ करण्यात आले आहे. दि.३ व ४ जानेवारी असा दोन दिवस हा महोत्सव होणार असुन विवीध कार्यक्रमांची रेलचेल या निमित्ताने राहणार आहे.
उद्या (ता.३) ला सकाळी ११ वाजता सोनु मंगलम येथे कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेखा मोघे राहतील. यावेळी रजनी वंâचलवार व जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य अध्यक्ष छाया महाले यांची प्रमुख उपस्थिती राहिल. मौक्तीक महोत्सवी स्मरणीकेचे प्रकाशन यावेळी करण्यात येईल. सायंकाळी ७ वाजेपासून विवीध सांस्कुतिक कार्यक्रम घेण्यात येतील. रविवार (ता.४) ला दुपारी १२ ते ३ दरम्यान मंडळाच्या सदस्यांसाठी विवीध खेळांचे आयोजन करण्यात येईल. दुपारी ४ वाजता अशी मी या विषयावर वक्तुत्व स्पर्धा घेण्यात येईल. सायंकाळी ५ वाजता महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष स्नेहलता श्रिवास्तव राहतील. मंडळाच्या जेष्ठ सदस्य वीणा रेगे व सुरेखा किडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 
१९७५ साली संयुक्त राष्ट्र संघातर्पेâ आंतरराष्ट्रीय महिला वर्ष साजरे करण्यात आले होते. हे औचित्य साधुन ३ मार्च १९७५ ला एकता महिला मंडळाची स्थापना करण्यात आली. स्नेहलता श्रिवास्तव यांना मंडळाच्या पहिल्या अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला. त्यांनी महिलांच्या या चळवळीला गतिमान केले. मंडळाच्या पहिल्या कार्यकारीणी मध्ये स्नेहलता श्रिवास्तव अध्यक्ष तर सरोजीनी पामपट्टीवार उपाध्यक्ष, सुवर्णा पंत सचिव, सरस्वती पाटील सहसचिव, वैशाली वाघ सहसचिव तर सदस्यांमध्ये सुरेखा किडे, शिला वानखडे, र्इंदू शिरभाते, सुलभा नार्लावार, सुनिता बेलोरकर यांचा समावेश होता. दरम्यान, मंडळातर्पेâ बालविकास वेंâद्र सुरू करण्यात आले. शिवाय ३ वर्ष महिला मंडळाने झुणका भाकर वेंâद्र चालविले. तसेच महिलापयोगी वस्तुंचे ग्राहक भांडार, भांड्यांची भीसी, निरमा एजन्सी असे अनेक उपक्रम राबविल्याने गरजू महिलांना त्याचा लाभ झाला. सन २००० पासून मंडळातर्पेâ एकता संस्कार कलश ची स्थापना करण्यात आली.  
सामाजीक कार्यातही या महिला मंडळाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. किल्लारी भुवंâपग्रस्तांसाठी मदत पेâरी, तालुक्यातील महापुरग्रस्तांसाठी मदत पेâरी, अपंग विद्याथ्र्यांना मदत, शिरोली येथिल धावपटू महिलांना स्पर्धेसाठी तिकीटाची सोय, दंतचिकीत्सा शिबीर, पंचकर्म शिबीर, विधी मार्गदर्शन, एक्युप्रेशर शिबीर, मोफत आरोग्य तपासणी, गरजू विद्याथ्र्यांना शालेय साहित्य, गणवेश व फि साठी मदत असे अनेक कार्यक्रम मंडळाने राबविले. याशिवाय महिलांसाठी विवीध कलांच्या प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेण्यात येतात.  मंडळातील जेष्ठ सदस्यांची पासष्ठी, वाढदिवस, विषेश कार्य करणा-या महिलांचा कौतुक सोहळा हे कार्यक्रम उत्साहात घेण्यात येतात.  दरवर्षी मंडळातर्पेâ शारदोत्सवाचे आयोजन केले जाते. यानिमित्य महिलांच्या विवीध कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम आयोजीत केल्या जातात. आनंदमेळावा, कोजागीरी तसेच सहलींचेही आयोजन केल्या जाते. 
एकता महिला मंडळाच्या सध्याच्या कार्यकारीणी मध्ये माया यमसनवार अध्यक्ष तर शोभा बेलोरकर व संगिता भुरे या उपाध्यक्ष, साधना ठाकरे सचिव, माया कटकमवार सहसचिव, माधुरी चौधरी कोषाध्यक्ष म्हणुन कार्यरत आहेत. कार्यकारीणी सदस्यांमध्ये अनिता येरावार, सविता लोकुलवार, विजया पामपट्टीवार, पुजा उत्तरवार, विभा केशट्टीवार, कविता र्इंगोले व अश्विनी भुरे यांचा समावेश आहे. सुरूवातीला अवघ्या २५ सदस्य असलेल्या या मंडळात सध्या सुमारे १०० महिला सदस्य आहेत.