Pages

Sunday 14 September 2014

घाटंजी पंचायत समितीत अभद्र युती

ना.मोघे गटाला जबर धक्का
सभापती कॉंग्रेसचे शैलेश इंगोले, उपसभापती भाजपाचे रमेश धुर्वे







कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेल्या दुफळीमुळे ना.शिवाजीराव मोघेंच्या विरोधी गटाने थेट भाजपाशी हात मिळवणी करीत सभापतीपद मिळविले. तर उपसभापतीपद आयतेच भाजपाच्या पदरात टाकले. ऐन विधानसभेच्या तोंडावर घाटंजी पंचायत समितीमध्ये झालेल्या या अभद्र युतीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 
आज झालेल्या निवडणुकीत सभापतीपदी कॉंग्रेसचे शैलेश इंगोले विजयी झाले. त्यांनी कॉंग्रेसच्याच सुवर्णा निकोडे यांचा ४ विरूद्ध २ मतांनी पराभव केला. तर उपसभापतीपदी भाजपाचे रमेश धुर्वे यांनी बाजी मारली. त्यांनी कॉंग्रेसच्या रूपेश कल्यमवार यांचा ४ विरूद्ध २ मतांनी पराभव केला. 
गेल्या २-३ दिवसांमध्ये घाटंजी तालुक्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला होता. बंडखोरीची शक्यता लक्षात घेऊन कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी वर्तमानपत्रातून व्हिप बजावला होता. मात्र ना.मोघेंच्या विरोधी गटाने यावर कुरघोडी करत जिल्हाध्यक्षांचा व्हिप तर धुडकावलाच शिवाय गटनेते म्हणुन शैलेश र्इंगोले यांनी देखिल व्हिप काढला. अखेर आज निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेसचा एक गट व भाजपाचे सदस्य एकत्र आल्याने चित्र स्पष्ट झाले. एकीकडे राज्याच्या राजकारणात कॉंग्रेस भाजपामध्ये सुरू असलेला सत्तासंघर्ष व दुसरीकडे घाटंजी मध्ये कॉंग्रेस व भाजपाचे एकत्र आलेले झेंडे पाहुन सर्वसामान्य मतदार मात्र बुचकळ्यात पडला आहे. 
राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे व जि.प.सदस्य देवानंद पवार यांच्यात निर्माण झालेल्या दुफळीमुळे घाटंजी तालुका कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यांच्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष अवघा जिल्हा अनुभवत असतांना एकेकाळी ना.मोघेंचे मानसपुत्र अशी ओळख असलेल्या देवानंद पवारांनी विधानसभेच्या तोंडावर या निवडणुकीच्या निकालामुळे जबर धक्का दिला आहे. मात्र विधानसभेतही हि अभद्र युती कायम राहणार का? आज कॉंग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन असलेले नेते कार्यकर्ते कुणाच्या बाजुने उभे राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

कॉंग्रेस जिंकली...कॉंग्रेस हरली !
अवघे बोटावर मोजण्याईतके सदस्य असलेल्या घाटंजी पंचायत समिती निवडणुकीत कॉंग्रेसच कॉंग्रेसच्या विरोधात असल्याने विजय व पराभवाचा एकत्रीत अनुभव घेण्याचा दुर्मिळ योग पक्षाला मिळाला. तर कॉंग्रेस व भाजपाचे नवनियुक्त पदाधिकारी विजयी मुद्रेत बाहेर पडत असतांना माळी महासंघ व काही संतप्त कार्यकत्र्यांकडून मुर्दाबादचे नारे लागल्याने आनंदावर थोडे विरजणही पडले. शेकडो कार्यकत्र्यानी गद्दारांना हाकला, देवानंद पवार मुर्दाबाद, शैलेश इंगोले मुर्दाबाद असे नारे लावले. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपुर्ण झाले होते. भाजपाने कॉंग्रेसला निवडणुक कक्षात दिलेली साथ रस्त्यावरही दिसुन आली. भाजप व कॉंग्रेस कार्यकत्र्यांची आपापल्या झेंड्यांसह निघालेली विजयी मिरवणुक अभुतपुर्व ठरली. या निवडणुकीत भाजपाने सत्तेसाठी चक्क कॉंग्रेसचा हात धरल्याने पद मिळवुनही नैतिक पराभव करून घेतला आहे. भाजप सदस्य तटस्थ राहिले असते तर एक चांगला संदेश मतदारांमध्ये गेला असता. तालुक्यात पहिल्यांदाच पंचायत समिती व जिल्हा परिषदेत भाजपाचे सदस्य निवडुन आले. मात्र एक जबाबदार विरोधक म्हणुन भाजपाचे सदस्य कधीच दिसले नाही.

No comments:

Post a Comment