Pages

Friday 2 August 2013

घाटंजीत नगराध्यक्षपदाची ‘संगितखुर्ची’

दिड वर्षात तिन नगराध्यक्ष : पदाच्या आघाडीत ‘कर्तव्य’ माघारले
अवघ्या दिड वर्षाच्या कालावधीत तब्बल तिन नगराध्यक्ष पाहण्याचा दुर्मिळ पण तितकाच दुर्दैवी योग घाटंजीवासीयांच्या नशिबी आला आहे. येत्या ५ ऑगस्टला नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर तिस-यांदा ‘नवा गडी’ विराजमान होणार आहे. कोणतीही तांत्रिक अडचण नसतांना दिड वर्षात तिन वेळा सर्वसहमतीने नगराध्यक्ष बदलाची बहुदा जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असावी. त्यामुळे ही पालिकेच्या नगराध्यक्षपदाची खुर्ची आहे की ‘संगितखुर्ची’च्या खेळातली? असा प्रश्न घाटंजीवासियांना पडला आहे.
उल्लेखनिय म्हणजे हे बदल प्रासंगिक नव्हे तर पुर्वनियोजीत आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी करतेवेळीच ही ‘वाटणी’ ठरविली होती. ज्यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसने नगर पालिकेत सर्वाधीक जागा मिळविल्या ते जगदिश पंजाबी हे पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले. एका वर्षात त्यांनी ठरल्या प्रमाणे राजीनामा दिला. त्यानंतर कॉंग्रेसचेच परंतु ना.मोघे यांचे खंदे समर्थक किशोर दावडा यांनी नगराध्यक्षपदाची खुर्ची पटकावली. मात्र सहाच महिन्यामध्ये त्यांना ‘खो’ मिळाल्याने खुर्चीवरून उठावे लागले. आता एका वर्षासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राम खांडरे हे खुर्चीचा ताबा घेतील. त्यानंतरचे अडीच वर्ष नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलांकरीता राखीव आल्याने व त्या प्रवर्गातील एकमेव उमेदवार रा.कॉं.कडे असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. अन्यथा घाटंजी नगर परिषदेने यावेळी पाच वर्षांच्या काळात सर्वाधीक नगराध्यक्ष बदलाचा नवा विक्रम प्रस्थापीत केला असता. पदाच्या या ओढाताणीत विकास तर सोडाच परंतु मुलभूत समस्यांकडे लक्ष द्यायलाही कोणाला वेळ नाही. पावसात शहराच्या विवीध भागामध्ये साचणारे तलाव व त्यामुळे जीव मुठीत घेऊन जगणारे घाटंजीकर, अवघ्या दोन तिन वर्षांपुर्वी बांधलेल्या रस्त्यांवर पावलोपावली पडलेले खड्डे, नाल्या नसल्याने पॉश वस्त्यांमध्येही वाहणारी गटारे यासह विवीध समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. न.प.च्या सर्वच शाळांची दुरावस्था झाली आहे. न.प.कार्यालयातही ठिकठिकाणी पाणी गळते. मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये यावर्षी मुरूम देखिल टाकण्यात आला नाही. एवढेच नव्हे तर कोणत्याही आवश्यक कागदपत्रांवर मुख्याधिका-यांची स्वाक्षरी मिळवणे हे मोठे दिव्य असल्याचा अनुभव घाटंजीकरांना येत आहे. अशातच नगराध्यक्षपदाची ही संगितखुर्ची मात्र शहरवासियांचे मनोरंजन करीत आहे.

युवा नगराध्यक्षाकडून ‘रामराज्या’ची अपेक्षा !
 येत्या ५ ऑगस्टला नगराध्यक्षपदी आरूढ होणार असलेले राम खांडरे हे पालिकेच्या विस्कळीत कारभाराला रूळावर आणतील अशी अपेक्षा घाटंजीकर बाळगून आहेत. एक प्रगतीशील व्यावसायीक, उमदा कार्यकर्ता व सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा माणुस अशी ओळख असलेले हे व्यक्तीमत्व अन नावामध्ये असलेला ‘राम’ यामुळे त्यांच्याकडून सुराज्याची अपेक्षा केली जात आहे.
अमोल राऊत
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

गिलानी महाविद्यालयाला एक लाखांचा पहिला पुरस्कार


येथिल शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयाला जागर जाणिवांचा अभियानांतर्गत जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. महाराष्ट्र शासनाच्या  उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फ़े  सन २०१२-१३ करिता देण्यात आलेल्या या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रूपये रोख, गौरवचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए.शहजाद यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्याला खा.सुप्रिया सुळे, ना.जयंत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.राजेश टोपे, उच्च शिक्षण संचालक श्री गायकवाड साहेब यांचेसह मान्यवरांची उपस्थिती होती. महाविद्यालय व शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण 
घेणा-या विद्यार्थ्यांमध्ये  स्त्री पुरूष समानतेची बिजे रूजविणे आणी विद्यार्थीनींमध्ये आत्मविश्वास तथा आत्मनिर्भयता विकसीत होण्याच्या दुष्टीने गिलानी महाविद्यालयाने पुढाकार घेऊन शैक्षणिक वर्ष २०१२-१३ मध्ये विवीधांगी उपक्रम राबविले. याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फ़े महाविद्यालयाला जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषीक देऊन गौरविण्यात आले. या उल्लेखनिय यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एस.ए.गिलानी, उपाध्यक्ष ए.एस.गिलानी, सचिव ए.ए.लोणकर यांनी कौतूक केले आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.सी.पी.वानखडे, प्रा. डॉ.एन.एन.तिरमनवार, प्रा.डॉ.सी.आर.कासार, प्रा.पत्की, प्रा.डॉ.प्रदिप राऊत, प्रा.डॉ.निनाद धारकर, प्रा.युवराज माहुरे यांचेसह प्राध्यापक वर्ग व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

पाऊस पडताच घाटंजीत वाहते गटारगंगा !

नगर परिषद व पंचायत समितीतही पाणीच पाणी
अनेक भागातील नागरिकांचा जीव धोक्यात





नगर परिषद व तहसिल कार्यालयाच्या तुघलकी कारभारामुळे पाऊस पडताच शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचुन सर्वत्र तलावाचे स्वरूप येते. पांढुर्णा रोड, आंबेडकर वार्ड, आनंद नगर, घाटी यासह अनेक भागातील नागरिकांना पाऊस येताच घर सोडून उंच ठिकाणी जावे लागते. बेशरमाच्या झाडांनी लुप्त झालेले नाले, पाणी वाहुन जाण्यासाठी नसलेली व्यवस्था, कच-याने तुंबलेल्या नाल्या यामुळे पाऊस येताच सर्वत्र पाणी साचते. शहरातील रहिवाशी भागच नव्हे तर पाण्याच्या निच-याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असलेल्या नगर परिषद कार्यालय परिसरालाही तलावाचे स्वरूप येते. अशीच परिस्थिती पंचायत समिती कार्यालयाचीही आहे. 
पांढुर्णा रोडवरील सरस्वती नगरातील घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाल्याची तक्रार त्यांनी तहसिल व न.प.ला दिली होती. या ले आऊट मध्ये नाल्या नाहीत. या भागातून जो नाला वाहतो त्याचे पाणी थेट ले आऊट मधील घरांमध्ये घुसते. येथिल रहिवाशांनी अनेकदा प्रशासनाकडे याबाबत तक्रारी केल्या. तहसिलदार, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, पं.स.सभापती या सर्वांनी येऊन पाहणी केली. मात्र अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. दि.३ जुलै रोजी ले आऊटधारक दिपक बळीराम बेलोरकर यांनी तहसिलदारांसमक्ष नाल्याची २४ तासात व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्यांनी कोणतेही काम केलेले नाही. संदिप नार्लावार यांच्याबाबतही नागरिकांची अशीच तक्रार आहे. पांढुर्णा रोड, वसंत नगर व शहरातील ईतर भागात असलेले मोठे नाले बेशरम व गाजगवताने बुजलेले आहेत. वर्षानुवर्षे त्याची सफाई झालेली नाही. त्यामुळे या सफाईचा निधी कोणाच्या घशात गेला असा प्रश्न मनसेचे शहराध्यक्ष गजानन भालेकर यांनी उपस्थित केला. सरस्वतीनगरासह शहरातील समस्या तातडीने न सोडविल्यास आंदोलन करण्याच्या ईशारा मनसेचे विनायक परचाके, गजानन ठाकरे, सागर मोहुर्ले, अनिल जाधव, आनंद पंधरे, राजु गावंडे, संदिप झाडे, राहुल धुर्वे, राजु ठाकरे, नितेश डोनारकर, संदिप राऊत, शिवराज्य चे जिल्हाध्यक्ष पवन परडखे, प्रशांत ठाकरे यांचेसह या परिसरातील रहिवासी प्रविण ठाकरे, वैâलास बगमारे, संदिप आत्राम, आकाश  बांगरे, विलास बगमारे, आसीफ शेख यांनी दिला आहे.

आमच्या जीवाची जबाबदारी प्रशासनावरच
आम्ही वारंवार तक्रारी करूनही न.प.व तहसिल प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याने जीवीतहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील अशी प्रतिक्रीया या भागातील नागरिकांनी दै.सकाळ जवळ व्यक्त केली.

रस्त्यांवर डबक्यांचे साम्राज्य
घाटंजीच्या मुख्य रस्त्याला डबक्यांनी व्यापले आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पाणी साचुन असल्याने अनेक वाहनधारक यामध्ये पडून जखमी होतात. मात्र नगर परिषदेला ते बुजविण्यासाठी मुहूर्त मिळालेला नाही. याबाबत कोणी न.प.मध्ये तक्रार घेऊन गेले तर त्यांना सांभाळून वाहने चालविण्याचा सल्ला देण्यात येतो.
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

हि शाळा आहे की मुत्रीघर ?

न.प.च्या दुर्लक्षाने उर्दू शाळेची दुरावस्था

जीर्ण ईमारतीमुळे २१२ विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात














शाळा म्हणजे विद्येचे भांडार...तिथे ज्ञानाचा दरवळ यावा, विद्यार्जनासाठी प्रसन्न वातावरण असावे हि सर्वांचीच माफक अपेक्षा असते. मात्र घाटंजीतील नगर परिषद प्राथमिक व माध्यमिक उर्दू शाळेचे चित्र जरा वेगळे आहे. येथिल विद्यार्थ्यांना विद्यार्जनासाठी प्रसन्न वातावरण तर सोडाच पण गटार व मुत्रीघराच्या घाणेरड्या वासाने शाळेमध्ये बसणे दुरापास्त झाले आहे. 
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या शाळेमध्ये वर्ग १ ते ७ मध्ये ४९ मुले व ९३ मुली  तर वर्ग ८ ते १० मध्ये ३२ मुले व ३८ मुली असे एकुण २१२ विद्यार्थी शिक्षण घेतात. प्राथमिक शाळेची ईमारत अत्यंत जीर्ण झाली असुन भिंतीना भेगा पडल्या आहेत त्यातून पाणी झिरपते. विंचु, साप असे धोकादायक जीव जंतू सुद्धा वर्गात येत असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन बसावे लागते. छतावरील कवेलु फ़ुटल्याने
 वर्गात पाणी गळते. एका वर्गखोलीचा स्लॅब खाली झुकला आहे. तो कधीही कोसळु शकतो. परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीवर टिनाचे शेड टाकुन त्याला स्वयंपाकगृह केले आहे. ६ बाय ८ च्या या जागेतच पोषण आहार शिजवुन विद्यार्थ्यांना उघड्यावरच जेवायला दिले जाते. प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छतागृह असावे असा नियम आहे. मात्र उर्दू शाळेमध्ये स्वच्छतागृहच नाही. शाळेलगत असलेल्या न.प.कन्या शाळेचे दोन मुत्रीघर आहे. त्यापैकी वापर करण्या योग्य नसल्याने एक कुलूपबंद तर दुस-या मुत्रीघराचा वापर परिसरातील व्यापारी व नागरिक करतात. न.प.उर्दू शाळा, कन्या शाळा व अंगणवाडी एकाच परिसरात आहेत. मात्र संरक्षक भिंत नसल्याने मुत्रीघर व परिसरामध्ये नागरिक नेहमीच घाण करून ठेवतात. वर्गखोल्यांच्या भिंती, स्वयंपाकगृहाचाही वापर मुत्रीघरासारखाच केल्या जातो. त्यामुळे या परिसरात अत्यंत उग्र दर्प दरवळत राहतो. शिवाय शिक्षीका, विद्यार्थीनींची यामुळे प्रचंड कुचंबना होते. विद्यार्थींनीना तर अत्यंत संकोचलेल्या अवस्थेत परिसरात वावरावे लागते. त्यामुळे अनेक विद्यार्थीनी वर्गाबाहेरच पडत नाहीत.
माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांची खोलीही जीर्ण झाली आहे. पाणी झिरपत असल्याने भिंती काळवंडल्या आहे. शाळेचे दस्तावेज सुरक्षीत राहतील का याचीही हमी नाही. एकदा तर चोरट्यांनी जीर्ण झालेली खिडकी तोडून कार्यालयातील कपाटे फोडून कागदपत्रे अस्ताव्यस्त केली होती. अशा धोकादायक परिस्थितीमध्ये १३१ अल्पसंख्यांक विद्यार्थींनी व ८१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या पालकांनी आज दुपारी शाळा व्यवस्थापन समितीसह न.प.कार्यालय गाठले. मात्र नगराध्यक्ष व मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने कार्यालयात तक्रार देऊन त्यांना परतावे लागले. नविन जागेवर उर्दू शाळेची ईमारत बांधण्यासाठी न.प.ने २०१२ मध्ये ठराव घेतला आहे. जागा उपलब्ध आहे. नविन ईमारतीसाठी निधीही आला आहे. मात्र तरी देखिल नगर परिषद नविन ईमारत बांधण्यासाठी टाळाटाळ करीत आहे असा आरोप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शे.सलिम कुरेशी यांनी केला. प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही न केल्यास तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

शि.प्र.म. विद्यालयाच्या ८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती




राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने ईयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय दुर्बल घटक (एन.एम.एम.एस.) परिक्षेत येथिल शि.प्र.मं.विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. 
समिक्षा संजय कांबळे, शौरी विकास डंभारे, शिवाणी गणेश वल्लपवार, शरयु प्रविण चौधरी, सुबोध राजेश मुनेश्वर,  अनिकेत सुभाष निकम, अजिंक्य दत्ताजी पांढरमिसे, प्रतिक श्रिराम कनाके या आठ विद्याथ्र्यांना ईयत्ता बारावी पर्यंत दरमहा पाचशे रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या विद्याथ्र्यांना संस्थेचे अध्यक्ष एस.ए.गिलानी, उपाध्यक्ष ए.एस.गिलानी, सचिव अ‍ॅड. अनिरूद्ध लोणकर, मुख्याध्यापक बाबा भोंग, उपमुख्याध्यापक पुरूषोत्तम बोभाटे, पर्यवेक्षीका कुसूम महाकाळकर, देविदास टोंगे, जी.आर.सिंहे, एस.जी.राठोड, दिपक सपकाळ, महेश वाघाडे, डी.के.मस्के, मनोज बुरांडे, संदीप नखाते, अनुप मानकर, फिरोज पठाण, प्रशांत उगले, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके यांचे मार्गदर्शन लाभले.
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

अंशकालीन निदेशकांचे सामाजीक न्यायमंत्र्यांना साकडे

राज्यातील १८६४५ निदेशक बेरोजगार : पुनर्नियुक्तीची मागणी
राज्यातील न.प., मनपा, तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत अंशकालीन निदेशकांना पुनर्नियुक्ती देण्यात यावी या मागणीसाठी स्थानिक अंशकालीन निदेशकांनी सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांची भेट घेतली. 
या वर्षी राज्यातील सुमारे १८ हजार ६४५ अंशकालीन निदेशकांना पुनर्नियुक्ती देण्यात न आल्याने त्यांचेवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली आहे. बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याच्या अधिनियमान्वये वेंâद्र सरकारने ईयत्ता ५ ते ७ वी मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी क्रिडा, कार्यानुभव व कला या तिन अंशकालीन निदेशकांची नियुक्ती केली. त्यानुसार २०१२ या वर्षात निदेशकांनी काम सुद्धा केले. 
मात्र १८ फ़ेब्रुवारी २०१३ ला केंद्र शासनाच्या मान्यता मंडळाच्या बैठकीत सर्व शिक्षा अभियानांतर्गत चालणा-या २३ उपक्रमांमधुन १६ उपक्रमांसाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद सर्व शिक्षा कार्यक्रमांतर्गत करण्यात आली नाही असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या १९ मार्च २०१३ च्या परिपत्रकामध्ये नमुद करण्यात आले आहे. मात्र १३ मे २०१३ ला केंद्रशासनाने काढलेल्या शुद्धीपत्रकात कला, क्रिडा व कार्यानुभव निदेशकांच्या पदांसाठी २०१३-१४ वर्षाकरीता अनुदानाची तरतूद केली आहे. 
शासनाने शैक्षणीक सत्र २०१३-१४ मध्ये सर्व शिक्षा अभियानाला ७११.५० कोटी अनुदानास मंजुरी सुद्धा दिली आहे. मात्र तरी देखिल राज्यातील १८ हजार ६४५ निदेशकांना शासनाने पुनर्नियुक्ती दिलेली नाही अशी तक्रार आहे. सामाजीक न्यायमंत्र्यांनी याबाबत पाठपुरावा करून बेरोजगारांना संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्थानिक निदेशकांनी यावेळी केली असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जितेंद्र जुनगरे यांनी कळविले आहे.
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

घाटंजी पालिकेच्या अडेलतट्टू धोरणामुळे अनुकंपा उमेदवाराची फरफट

जिल्हाधिका-यांचा आदेशही मुख्याधिका-यांसाठी ‘कवडीमोल’
अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी शासन निर्णयानुसार पात्र असतांनाही केवळ घाटंजी पालिका मुख्याधिका-यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे विक्की माधव शेंद्रे हा उमेदवार नोकरीपासुन वंचित आहे.
सदर उमेदवाराने आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार दि.१४ जुन २०१३ ला जिल्हाधिकारी कार्यालयाने घाटंजी नगर परिषदेला पत्र पाठवुन शासकीय निकषानुसार अनुकंपा तत्वावरील पद भरण्यासंदर्भात कार्यवाही करावी असे सुचित केले होते. तसेच या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात यावा असेही या पत्रात नमुद करण्यात आले होते. मात्र जिल्ह्याधिका-यांनी आदेश देऊनही घाटंजी नगर परिषद प्रशासनाने याबाबत अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही.
त्यामुळे घाटंजी पालिका आता जिल्हाधिका-यांच्या आदेशालाही महत्व देत नसल्याचेच सिद्ध झाले आहे. सुधारीत आकृतीबंधानुसार नगर परिषदेने पदभरती करतांना प्रथम पदोन्नतीची पदे, त्यानंतर अनुकंपा त्वावरील पदे, लाडकमिटीची पदे व शेवटी जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली सरळ सेवा भरती द्वारे पदे भरण्याचे निकष ठरवुन देण्यात आले आहेत. उल्लेखनिय म्हणजे नगर परिषदांनी आपल्या आस्थापनेवर कोणतेही पद कंत्राटी, हंगामी, मानधन तत्वावर अथवा प्रतिनियुक्ती द्वारे भरण्यात येऊ नये असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवुन नगर परिषदेचे पदाधिकारी व प्रशासन कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्याच्या प्रयत्नात होते. 
नगर परिषदेच्या ग्रंथालयातील पदे रिक्त आहेत. अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्यास पात्र असलेला उमेदवार विक्की माधव शेंद्रे याने ग्रंथालय शास्त्रातही पदवी संपादन केली आहे. तसेच तो कला शाखेत पदव्युत्तर पदवीधारक आहे. सदर उमेदवाराचे वडील माधव शेंद्रे यांचा २५ जुन २००६ मध्ये कार्यालयीन कामकाजा दरम्यान मृत्यू झाला. ते लिपिक पदावर कार्यरत होते. त्यामुळे समकक्ष पदावर कार्य करण्यास सदर उमेदवार पात्र आहे. शिवाय अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये तो एकमेव उमेदवार आहे. तरी देखिल न.प.प्रशासनाकडून त्याला नियुक्ती देण्यास जाणिवपुर्वक दिरंगाई केल्या जात असल्याची तक्रार त्याने जिल्हाधिका-यांकडे केली होती. मात्र मुख्याधिकारी विपीन बन्नोरे हे जिल्हाधिका-यांच्या आदेशालाही जुमानत नसल्याने कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. वडीलांच्या निधनामुळे कुटूंबाची संपुर्ण जबाबदारी सदर उमेदवारावर आहे. अर्धांगवायुने ग्रस्त आई व तिन बहिणींसह कुटूंबाची उपजिवीका तो कशीबशी सांभाळत आहे. मात्र याचे कोणतेही सोयरसुतक नगर परिषदेला नाही. जिल्हाधिका-यांचा आदेश झुगारणा-या मुख्याधिका-यांवर वरिष्ठांचा अंकुश नाही हे यातुन सिद्ध होत आहे. या प्रकरणी योग्य न्याय न मिळाल्यास प्रसंगी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सदर उमेदवाराने ‘सकाळ’ शी बोलतांना सांगितले.
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडीयाच्या शहर शाखेचे गठण

दि.बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इडीया च्या घाटंजी शहर शाखेचे नुकतेच गठण करण्यात आले. शहराध्यक्षपदी गजानन भावराव मनवर, सरचिटणीसपदी आशिष विठ्ठलराव कांबळे व कोषाध्यक्षपदी विरेंद्र पिलावन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
उर्वरीत कार्यकारीणीमध्ये संरक्षण विभाग उपाध्यक्ष स्वप्निल खोब्रागडे, प्रचार व पर्यटन विभाग उपाध्यक्ष स्वप्निल कांबळे, संस्कार विभाग उपाध्यक्ष सचिन खोब्ब्रागडे, कार्यालय सचिव मयुर भवरे, हिशेब तपासणीस सचिन भगत, संरक्षण विभाग सचिव अमोल मानकर, प्रचार व पर्यटन विभाग सचिव प्रतिक खरतडे, संस्कार विभाग सचिव प्रविण बागेश्वर, संघटक संरक्षण विभाग चंदू खरतडे, रवि कांबळे, वैभव निखाडे, शुभम मनवर यांचा समावेश आहे. बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इडीयाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष रवि भगत यांचे प्रमुख उपस्थितीत या कार्यकारीणीचे गठण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका सरचिटणीस नरेंद्र भगत व आभार प्रदर्शन तालुका संस्कार विभाग उपाध्यक्ष संतोष जिवने यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष सुनिल नगराळे व अविनाश खरतडे यांची प्रमुख उपस्थिती होती.