Pages

Saturday 25 May 2013

अघोरी अंधश्रद्धेनेच घेतला चिमुकल्या सपनाचा बळी

देवीला प्रसन्न करण्यासाठी चालविला गळ्यावर सुरा 
प्रसाद म्हणुन प्राशन केले सपनाचे रक्त
मामा, आजोबा, आत्याच निघाले आरोपी 




घाटंजी तालुक्यातील चोरंबा येथील सपना पळसकर नरबळीप्रकरणाचा अखेर पर्दापाश झाला असून गावात शांतता राहावी यासाठी सपनाचा मामा, आजोबा, आत्या आणि गावातील काही शेजार्‍यांनीच तिचा नरबळी देण्यात आल्याचे अखेर पोलिस तपासात उघड झाले आहे. दहा लोकांनी अत्यंत क्रूरपणे तिचा नरबळी देत तिचे रक्त प्रसाद म्हणून वाटल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सपना पळसकर ही नवरात्र सुरू असताना २३ ऑक्टोंबर २0१२ रोजी अचानक बेपत्ता झाली होती. ती हरविल्याची तक्रार २४ ऑक्टोंबरला घाटंजी पोलिस ठाण्यात तिच्या आईवडिलांनी दिली. तेव्हापासून पोलिस याप्रकरणाचा तपास करीत होते. परंतु सात महिन्यात तपासात फारशी प्रगती न झाल्याने या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. तर लोकांकडून माहिती मिळावी म्हणून ५0 हजाराचे बक्षिसही राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. शिवाजीराव मोघे यांनी जाहीर केले होते. अखेर सपनाची कवटी, हाडे आणि फ्रॉक चोंरबा येथील जंगलात गुराख्याला २२ मे २0१३ रोजी आढळून आले. तिच्या शरीराचे अवशेष तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. या प्रकरणी पोलिसांनी सपनाचे आजोबा पुनाजी आत्राम, मामा देविदास आत्रात आणि या प्रकरणाची मास्टरमाईंड यशोदा मेर्शाम हिला अटक केली असून तपासकामी आठ लोकांना ताब्यात घेतले आहे. मनोज उर्फ लाल्या वसंता मेर्शाम यांने पोलिसांना याबाबत सविस्तर माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावातीलच दुर्गा शिरभाते या महिलेच्या अंगात देवी येते. देवीने 'सपनाचे रक्त द्या, त्याशिवाय गावात शांतता नांदणार नाही', असे दुर्गाला सांगितले. दुर्गाने याबाबत आपल्या आईस म्हणजे यशोदा मेर्शाम हिला सांगितले. यशोदा मेर्शाम हिने गावातील काही लोकांना याबाबत माहिती दिली. शिवाय नरबळी देण्याची योजना आखली. 
त्यासाठी यशोदा मेर्शाम हिने वेगवेगळय़ा तीन बैठका घेऊन त्यात नरबळी देण्याची योजना आखली. त्यानुसार २३ ऑक्टोंबरला यादव टेकाम याने सपनाला बिस्किट आणण्यासाठी दहा रुपये दिले. ती दुकानात जात असताना ईलेक्ट्रिशिएन असलेल्या मोतीराम मेर्शाम यांनी लाईट बंद केले आणि अंधाराचा फायदा घेत यादव टेकाम याने सपनाचे तोंड दाबून तिला यशोदा मेर्शाम हिच्या घरी नेले. त्यानंतर एक तासाने देवीची पूजा करून सपनाचा नरबळी देण्यात आला. सपनाची मान अक्षरश: धारदार चाकूने कापून रक्त एका भांड्यात जमा करण्यात आले. नरबळी दिल्यानंतर तिचे रक्त गावातील देवीला वाहण्यात आले आणि प्रसाद म्हणूनही वाटण्यात आले. त्यानंतर तिचा मृतदेह यशोदा मेर्शाम हिच्या स्नानगृहात पुरण्यात आला. त्यानंतर काही महिन्यांनी तो मृतदेह तेथून काढून गावाबाहेर ४00 मीटर अंतरावर पुरण्यात आला. 
पोलिसांनी गेल्या आठ दिवसात गावातच डेरा टाकल्याने पुन्हा तो मृतदेह बाहेर काढून चोरंबा येथील जंगलात पुरण्यात आला. तिच्या शरीराची कवटी, हाडे आणि फ्रॉक सापडल्याची माहिती गुराख्याने पोलिसांना दिली. याप्रकरणी मोतीराम मेर्शाम, शेडकी बुडा मेर्शाम, यादव टेकाम, पुनाजी आत्राम, दुर्गा शिरभाते यांना तपासकामी ताब्यात घेतले असून यशोदा मेर्शाम व मनोज आत्राम व देविदास आत्राम यांना अटक करण्यात आली आहे.



Click On The Image To View In Full Size



Wednesday 22 May 2013

बेपत्ता सपनाची कवटीच सापडली.....!





ज्या प्रकरणामुळे घाटंजी तालुका केवळ राज्यातच नव्हे तर देशपातळीवरही चर्चेत आला त्या बेपत्ता सपना पळसकर प्रकरणाचा दुर्दैवी शेवट पुढे आला आहे. दि.२० मे ला सायंकाळच्या सुमारास चोरांबा गावाच्या पश्चिम दिशेला सुमारे सातशे मिटर अंतरावर कवटी, हाडे, केस, गुलाबी रंगाचा ठिपक्याचा फ्रॉक व निळ्या रंगाची चड्डी संशयास्पद स्थितीत सापडली. देवा आत्राम नामक गुराखी संध्याकाळी त्या भागात गुरे चारून परत येत असतांना त्याला कवटी दिसली. 
त्याने लगेच पळसकर यांचे घर गाठुन याबाबत त्यांना सांगितले. सपना पळसकर हिच्या आईवडीलांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता गुलाबी रंगाचा फ्रॉक व निळ्या रंगाचे अंतर्वस्त्र हे सपनाचेच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अवघ्या काही वेळापुर्वीच चोरांबा येथुन चौकशी करून गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिका-यांना त्यांनी मोबाईलवर संपर्क केला. त्यांनी रात्री येऊन घटनास्थळाची पाहणी केली. आज (ता.२१) ला सकाळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र ते तेवढ्या परिसरातच घुटमळले. सपना गोपाल पळसकर ही चोरांबा येथिल सात वर्षीय चिमुकली २४ ऑक्टोबर २०१२ पासुन संशयास्पदपणे बेपत्ता झाली होती. त्यावेळी घाटंजी पोलीसांनी केवळ हरविल्याची नोंद घेऊन त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र १७ नोव्हेंबर २०१२ ला घाटंजीलगत असलेल्या मुरली गावाजवळ गुप्तधनाचा शोध घेणारी टोळी सापडली. त्यांच्या जवळ लहान मुल होते असे प्रत्यक्षदर्शीने वारंवार सांगितले. तेव्हा त्यांच्या जवळ असलेले लहान मुल म्हणजे चोरांब्याची सपनाच असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तशी तक्रार सुद्धा बेपत्ता सपनाची आई शारदा पळसकर यांनी पोलीस स्टेशनला दिली. या प्रकरणाच्या तपासात अद्यापपर्यंत पोलीसांचा तपास अत्यंत ढिसाळ असल्याने विवीध संघटनांनी आंदोलने केली. विधीमंडळातही तारांकीत प्रश्न उपस्थित करण्यात आले.
सपनाची कवटी व ईतर गोष्टी संशयास्पद स्थितीत आढळल्याने तिचा मृत्यू नेमका कसा झाला? गुप्तधन प्रकरणाशी त्याचा संबंध आहे का? तिचे मारेकरी कोण? विशेष पोलीस महासंचालकांच्या तंबीनंतर दोन दिवसातच शोध कसा लागला? सपना सुरक्षीत असल्याचे पोलीसांचे यापुर्वीचे दावे कशाच्या आधारावर होते? सपनाचा मृतदेह तिथेच कुजला की कवटी व कपडे तिथे कोणी आणुन टाकले? अशा अनेक प्रश्नांनी या प्रकरणातील गुढ अधिकच वाढले आहे.

Click On Image To View In Full Size

Do You Want Regular Updates Of 
Government & Private Jobs. 
GK, Career Tips & Many More?
Just Like Below Page To Stay In Touch !

Wednesday 15 May 2013

घाटंजीचे चिमुकले क्रिकेटपटू राष्ट्रीय स्तरावर

गोवा येथिल क्रिकेट सामन्यांमध्ये करणार राज्याचे प्रतिनिधीत्व

विवीध खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी गेल्या काही काळात सातत्याने चर्चेत असलेल्या घाटंजी तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. शहरातील तब्बल चार क्रिकेटपटूंची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. 
हे चार चिमुकले क्रिकेटपटू गोवा येथे २२ मे पासुन होणा-या १४ वर्षाखालील राष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे. प्रथमेश दिलिप गुघाणे, संकेत रमेश देशमुख, कौस्तुभ गणेश आगे व प्रियांशु संजय वाघमारे यांच्या नुकत्याच कोल्हापुर येथे झालेल्या राज्यस्तरीय सामन्यातील उत्कृष्ट प्रदर्शनाला लक्षात घेऊन महाराष्ट्र अमॅच्युअर क्रिकेट असोशिएशनने राष्ट्रीय सामन्यांसाठी त्यांची निवड केली आहे.
तोकड्या सोयी सुविधांच्या आधारावर सराव करून जिल्हा, राज्य व आता थेट राष्ट्रीय स्तरापर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा आहे. हे चारही क्रिकेटपटू अवघ्या ११ ते १३ वर्ष वयोगटातील आहेत. उत्कृष्ट फलंदाजी करणारे प्रथमेश गुघाणे व प्रियांशु  वाघमारे व ऑलराऊंडर असलेला कौस्तुभ आगे हे येथिल श्री.समर्थ विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. तर फिरकीपटू व फलंदाज असलेला संकेत देशमुख हा न.प.शाळा क्रं.५ चा विद्यार्थी आहे. कोल्हापुर येथे त्यांनी प्रशिक्षक राजन भुरे यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ जिल्हा संघाचे प्रतिनिधीत्व केले. उल्लेखनिय म्हणजे यापुर्वी घाटंजीतीलच चार युवा क्रिकेटपटुंची बांग्लादेशात होणा-या आशियायी सामन्यांसाठी निवड झाली होती. चिमुकल्या क्रिकेटपटूंच्या या उत्तुंग भरारीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Tuesday 14 May 2013

शिवसेना शहर उपप्रमुख राम गहणेवार यांचे अपघाती निधन


येथिल शिवसेनेचे शहर उपप्रमुख राम गहणेवार यांचे दि.१२ ला रात्री ९ च्या सुमारास अपघाती निधन झाले. सायंकाळी पांढरकवडा येथुन दुचाकीने घाटंजीकडे येत असतांना वासरी गावाजवळ विरूद्ध दिशेने येणा-या दुचाकीची परस्परांना जबर धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात गहणेवार यांच्या डोक्याला गंभिर दुखापत झाल्याने त्यांना यवतमाळ, सेवाग्राम व त्यानंतर नागपुरला उपचारासाठी नेण्यात आले. मात्र नागपुरकडे जातांना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते ३७ वर्षांचे होते. यावेळी दुचाकीवर त्यांचेसमवेत असलेले संतोष मादेशवार व विरूद्ध दिशेने येणा-या दुचाकीवरील दिनेश राठोर व राहुल उपावार दोघेही रा.वणी हे जखमी झाले. राम गहणेवार हे गेल्या अनेक वर्षांपासुन शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते होते. त्यांच्या मागे पत्नी, ३ महिन्यांची मुलगी, आई, ४ भाऊ, ४ बहिणी व मोठा आप्त परिवार आहे. काल (दि.१३) ला दुपारी त्यांचेवर येथिल मोक्षधामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

इंडीकाची झाडाला धडक : १ ठार
इंडीकाची झाडाला जबर धडक बसल्याने झालेल्या अपघातात वाहनचालक रमेश नारायण करमनकर (४२) रा.करंजी ता.केळापुर हे जागीच ठार झाले. काल (दि.१३) ला रात्री ६ वाजेदरम्यान नुक्ती गावाजवळ हा अपघात झाला. रमेश करमनकर हे एम.एच.०४ बि.ए.४४५२ या क्रमांकाच्या इंडीका कारने करंजीवरून घाटंजीकडे होते. 

राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळाला हात लावाल तर खबरदार !

घाटंजीतील गुरूदेवभक्तांचा ईशारा

गुरूकुंज मोझरी येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणात प्रस्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळाला हात लावल्यास त्याचे परिणाम शासन व प्रशासनाला भोगावे लागतील असा खणखणीत ईशारा घाटंजी तालुक्यातील गुरूदेव भक्तांनी दिला. तालुका प्रचारक अनंत कटकोजवार यांचे नेतृत्वात तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. अवघ्या विश्वाला एकात्मतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची महासमाधी लाखो गुरूदेवभक्तांसाठी प्रेरणास्थान आहे. 
अन्य पर्याय उपलब्ध असतांना महासमाधी परिसराचा भाग अधिग्रहीत करण्याचा शासन व प्रशासनाचा हट्टाग्रह अत्यंत दुर्दैवी असल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली. ज्या गोष्टींच्या प्रबोधनासाठी शासन आज कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे ते प्रबोधन राष्ट्रसंतानी अनेक वर्षांपुर्वीच सुरू केले होते. त्या प्रबोधनाचा वारसा संपुर्ण देशात पसरलेले गुरूदेव भक्त करीत आहेत. असे असतांना त्यांच्या भावनांना जाणिवपुर्वक दुखावण्याचा प्रयत्न शासनाला महागात पडेल. महासमाधी परिसराचा भाग अधिग्रहीत न करता उपलब्ध असलेल्या पर्यायाचा विचार करावा अन्यथा गुरूदेवभक्त तिव्र आंदोलन छेडतील असा ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी तालुका सेवाधिकारी सुभाष देवळे, गुरूदेव सेवा मंडळाचे तालुका सचिव अरूण मानकर, शिवदास सोयाम, राजु विरदंडे, जगताप दादा, काळे दादा, शंकर शेंडे, दादाराव वानखडे यांचेसह अनेक गुरूदेवप्रेमी उपस्थित होते.