Pages

Tuesday 29 January 2013

गिलानी महाविद्यालयाच्या रा.से.यो.शिबिरातून ‘बेटी बचाओ’ चा संदेश














शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर दत्तकग्राम मुरली येथे संपन्न झाले. या शिबिरांतर्गत अनेक सामाजीक उपक्रमांसोबतच बेटी बचाओ अभियान प्रामुख्याने राबविण्यात आले. रा.से.यो.स्वयंसेवकांनी गावातून रॅली काढुन मुलगी वाचवा देश वाचवा हा संदेश दिला. या सात दिवशीय विशेष शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सद्रुद्दीन गिलानी यांचे हस्ते झाले. यावेळी मुरलीच्या सरपंच दिपमाला निकम, सुरेश चौधरी, प्रा.प्रकाश निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरा दरम्यान बौद्धीक, उद्बोधनपर, सामाजीक व मनोरंजनात्मक उपक्रम राबविण्यात आले होते. बौद्धीक सत्रात कृषी अधिकारी आर.डी.पिंपरखेडे, प्रा.डॉ.पी.आर.राऊत, प्रा.आर.सी.वानखडे, प्रा.आर.व्ही.राठोड, अड.एम.आर.शुक्ला, महेश पवार यांनी कृषी विषयक, अंधश्रद्धा आणी भ्रष्टाचार निर्मुलन, व्यक्तीमत्व विकास, पर्यावरण जनजागृती, रक्तदान - सर्वश्रेष्ठ दान या विषयावर मार्गदर्शक व्याख्याने आयोजीत करण्यात आली होती. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गितगायन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन विद्यार्थ्यांच्या वतीने घेण्यात आले. स्त्री भ्रुणहत्या थांबविण्यासाठी पथनाट्य, स्त्री पुरूष समानता या विषयावर सर्वेक्षण तसेच व्यसनमुक्ती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन मार्गदर्शन केले.
या शिबिराला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे रा.से.यो.समन्वयक डॉ.श्रिकांत पाटील, जिल्हा समन्वयक डॉ.अजय लाड, क्षेत्रीय समन्वयक प्रा.आर.व्ही.राठोड, शि.प्र.मं.चे सचिव अड. अनिरूद्ध लोणकर, उपाध्यक्ष संजय गढीया या मान्यवरांनी सदिच्छा भेटी दिल्या. या शिबिरात स्व.प्रा.व्हि.जी.हटवारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आले होते. या शिबिरात रा.से.यो.स्वयंसेवक तसेच गावातील अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. समारोपीय कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए.शहेजाद, श्रीमती पुष्पा हटवारे, केतन हटवारे, सी.बी.ढोणे, राजु साठे, राजु निकम, श्री.टोंगे यांची उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वीतेकरीता प्रा.ए.के.पत्की, प्रा.आर.जी.डंभारे, प्रा.यु.ए.ठाकरे, प्रा.सी.पी.वानखडे, प्रा.आर.एम.पवार, प्रा.वाय.एस.माहुरे, प्रा.जी.सी.भगत, प्रा.सी.आर.कासार, डॉ.निनाद धारकर, डॉ.एम.एच.ढाले, प्रा.एस.पी.डोमळे, प्रा.टी.एम.कोटक, प्रा.जे.पि.मोरे, प्रा.के.आर.किर्दक, प्रा.एन.एन.तिरमनवार, कार्यक्रम अधिकारी प्रा.व्ही.एस.जगताप, छात्रसंघ सचिव तथा विद्यापीठ प्रतिनिधी गौरव गावंडे, कर्मचारी सुभाष कनाके, मंदार भुसारी यांचेसह सर्व रा.से.यो.स्वयंसेवक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती 

रा.यु.कॉ.तालुकाध्यक्षपदी संजय आडे



राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या घाटंजी तालुका अध्यक्षपदी येथिल युवा कार्यकर्ते संजय आडे यांची निवड झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार संदिप बाजोरीया, रा.कॉ. जिल्हाध्यक्ष  सुरेश लोणकर, नाना गाडबैले, रा.यु.कॉ.जिल्हाध्यक्ष आशिष मानकर, सुरेश चिंचोळकर, रा.कॉ.महिला जिल्हाध्यक्ष क्रांती धोटे (राऊत) यांचेसह मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांची नियुक्ती करण्यात आली. यापुर्वी त्यांनी ऑल इंडीया बंजारा सेवा संघाचे तालुकाध्यक्षपद भुषविले आहे. त्यांच्या नियुक्तीचे तालुक्यातील कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.
साभार :- देशोन्नती 

पांदण रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करणा-यांवर कार्यवाही करा


कुर्ली ग्रामवासियांची मागणी

कुर्ली ते सायफळ पांदण रस्त्याच्या काम बंद करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणा-यांवर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांचे नेतृत्वात कुर्ली ग्रामवासियांनी घाटंजी तहसिलदारांना दिले. तसेच हे काम तिन दिवसांच्या आत सुरू करण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली. कुर्ली ते सायफळ पांदण रस्ता तत्कालीन पालकमंत्री वसंतराव पुरके यांच्या निर्देशावरून २००३ साली मंजुर झाला होता. या रस्त्याचे काम जि.प.च्या बांधकाम विभागामार्फत सुरू होते. मात्र अ.रब अ.सईद व ईतर काही लोकांनी रस्त्याच्या कामात अडथळे निर्माण करून काम बंद पाडले. उल्लेखनिय म्हणजे गट क्र.११ मधुन तलाठी नकाशा, नझुल नकाशा नुसार कुर्ली ते सायफळ रस्ता असल्याचे स्पष्ट आहे. मात्र सदर व्यक्ती रस्त्याचे काम बंद पाडून शेतकरी व कंत्राटदारांना धमक्या देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे. तिन दिवसांच्या आत रस्त्याचे काम सुरू न केल्यास आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असा ईशारा देण्यात आला आहे.
साभार :- देशोन्नती 

भ्रष्टाचारामुळे तहान भागवणा-या योजनांवर फिरले पाणी



ग्रामीण भागाची तहान भागविण्यासाठी राबविण्यात आलेल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये भ्रष्टाचाराचे ‘लिकेज’ झाल्याने पाणी टंचाईची भिषणता घाटंजी तालुक्यात वाढली आहे. भारत निर्माण व जिवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेत पाणी पुरवठा समित्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे केवळ पदाधिका-यांचेच हात ओले झाले. ग्रामस्थांच्या नशिबी मात्र पाण्याचा थेंबही आला नाही. वासरी, कुर्ली, अंजी (नृ), भांबोरा यासह अनेक गावांमध्ये या योजनेच्या निधीत आर्थिक अफरातफर झाली आहे.
कुर्ली, अंजी (नृ.) येथिल पाणी पुरवठा समितीवर पंचायत समितीने अद्याप एफ.आय.आर. दाखल केला नाही. तसेच भांबोरा येथिल गैरव्यवहाराची चौकशीच थंडबस्त्यात आहे. उल्लेखनिय म्हणजे भांबोरा येथे भारत निर्माण योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीनंतर पाणी पुरवठा विभागाच्या उप अभियंत्यांनी चौकशी केली. लाखो रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट असतांना सदर चौकशीत केवळ १६ हजार ९०० रूपये एवढीच वसुली पात्र रक्कम दाखविण्यात आली. तब्बल २० ते २५ लाख रूपये खर्च होऊनही भांबोरा येथिल पाणी पुरवठा योजनेच्या टाकीत अनेक वर्षांपासुन पाण्याचा थेंबही पोहचला नाही. 
अंजी (नृ.) येथे पाणी पुरवठा करण्यासाठी भारत निर्माण योजनेंतर्गत २० लाख ६७ हजार रूपये निधी मंजुर करण्यात आला होता. मात्र पाणी पुरवठा समितीने या निधी मध्ये अफरातफर केली असा आरोप आहे. कामात झालेल्या अनियमिततेप्रकरणी एफ.आय.आर.दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिका-यांनी १८ नोव्हेंबरला दिले होते.  याप्रकरणीही पंचायत समितीने पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही. वासरी येथेही भारत निर्माण योजनेत गैरप्रकार झाला होता. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यानी याची तक्रार केल्यावर संबंधीतांवर गुन्हे दाखल झाले होते. तेव्हाही प्रशासनाने टाळाटाळ केली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. अफरातफरीची रक्कम मात्र अद्यापही वसुल करण्यात आली नाही. 
अशा एक ना अनेक प्रकरणांमध्ये झालेल्या गैरप्रकारांमुळे पाणी टंचाई अधिकच भिषण झाली आहे. तालुक्यातील अनेक नदी-नाले आटले असून विहिरींची पातळीदेखील खोल गेली आहे. ३०० फूट खोदूनही पाणी लागत नाही म्हणून अनेक ठिकाणी विंधन विहिरी खोदण्याच्या कार्याला खीळ बसली आहे. घाटंजी तालुक्यातील फ्लोराईडयुक्त पाण्याच्या समस्येने जिल्हा आरोग्य यंत्रणासुद्धा हादरून गेली आहे. फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे हाडे ठिसूळ होऊन आदिवासी भागात राहणाNया  जनतेच्या आरोग्याची भीषण समस्यादेखील निर्माण झाली आहे. अशा फ्लोराईडयुक्त जलस्रोत असलेल्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केल्या जातो. गावात जेव्हा पाण्याचा टँकर येतो, तेव्हा पाण्यासाठी गावकNयांची रेटारेटी होते. 
तालुक्यातील पारवा, कुर्ली, शिवणी, पार्डी (नस्करी), भांबोरा, सायफळ, गोविंदपूर, बिल्लायता, फनारवाडी (पोड), नामापूर (तांडा), घोटी, चिखलवर्धा यासह अनेक गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे
घाटंजी शहरातील अनेक भागांमध्ये सुद्धा उन्हाळ्यात पाण्याची प्रचंड टंचाई असते. नगर परिषदेची पाणी पुरवठा व्यवस्था अत्यंत कामचलाऊ असुन दोन वेळचे पाणी बिल देऊन न.प.दिवसातून एकदाच पाणी पुरवठा करते. घाटी परिसरात तर नागरिकांना पाण्यासाठी रात्र जागुन काढावी लागते. दरवर्षी उन्हाळ्याची चाहुल लागताच पाणी टंचाई आढावा बैठक होते. मात्र तेथे झालेल्या चर्चेतून अपेक्षीत असे फलित कधी होताना दिसत नाही.
साभार :- देशोन्नती 

घाटंजीत चार मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न

पालकांमध्ये दहशतीचे वातावरण

येथिल इंदिरा आवास परिसरातून १० ते १२ वर्ष वयोगटातील चार मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न त्या मुलींच्या प्रसंगावधानामुळे फसला. आरोपी संदिप रमेश चौधरी (२४) व रवि अंगद मोरे (२३) या दोघांनी वैष्णवी मेघराज रंदई (१२) हिच्यासह तिन मुलींना मारूती ओमनी व्हॅनमध्ये जबरदस्तीने बसविले. मुलींनी आरडा ओरड करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना जिवाने मारण्याची धमकी दिली. चोरांब्याजवळ आरोपींनी गाडी थांबविली. त्यावेळी या मुलींनी प्रसंगावधान ठेवून गाडीचा दरवाजा उघडला व बाहेर निघाल्या. तेवढ्यात रस्त्याने येत असलेल्या दुचाकीस्वाराला पाहुन त्या आरोपींनी पळ काढला. दुचाकीस्वारासोबत त्या मुलींनी घाटंजी गाठले व हा सर्व प्रकार आपल्या पालकांपुढे कथन केला. वैष्णवी हिचे वडील मेघराज सखाराम रंदई (४१) यांच्या तक्रारीवरून घाटंजी पोलीसांनी आरोपींविरूद्ध कलम ३६३, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकारामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचा तपास पी.एस.आय.राऊत करीत आहेत.
साभार :- देशोन्नती 

आमदार निलेश पारवेकर यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

पारवा येथे उसळला प्रचंड जनसागर
साश्रुनयनांनी लाडक्या नेत्याला निरोप
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांची गर्दी



यवतमाळ विधानसभा मतदार संघाचे आमदार नीलेश देशमुख पारवेकर यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घाटंजी तालुक्यातील पारवा येथे हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत वीर शैव लिंगायत समाजाच्या परंपरेनुसार दफन विधी करण्यात आला. शासकीय इतमामात हवेत तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. 
त्यांचे पार्थिव स्मृतिरथातून पारवा येथील त्यांच्या वाड्यावर आणण्यात आले. सर्वच क्षेत्रातील दिग्गजांसह सर्वसामान्य नागरिकांनी पारवा येथे धाव घेतली होती. संपूर्णगाव मूकशोक व्यक्त करीत होते. गावात सर्वत्र शांतता पसरली होती. आमदार पारवेकर यांचे पार्थिव प्रथम त्यांच्या वाड्यात ठेवण्यात आले. त्यानंतर पार्थिव वाड्याबाहेर नागरिकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पारवा येथे आगमन झाले. त्यांनी आमदार नीलेश पारवेकरांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.
त्यानंतर सर्वांनी मौन पाळून सामूहिक श्रध्दांजली अर्पण केली. पारवेकर घराण्याच्या कौटुंबिक स्मशानभूमीत दफनविधी पार पडला. अंत्यसंस्काराला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, महिला व बालविकास मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, राज्यमंत्री रणजित कांबळे, राजेंद्र मुळक, खा.विलास मुत्तेमवार, खा.भावना गवळी, खा.सुभाष वानखडे, खा.हंसराज अहीर, अ.भा. युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार राजीव सातव, आ.गिरीश बापट, आ.विजय वडेट्टीवार, आ.रावसाहेब शेखावत, आ.वामनराव कासावार, आ.विजय खडसे, आ.संजय राठोड, आ.संदीप बाजोरिया, आ.रवी राणा, आ.प्रणिती शिंदे, आ.यशोमती ठाकूर, आ.वीरेंद्र जगताप, आ.अनिल बोंडे, आ.वसंत खोटरे, आ.प्रकाश डहाके, डॉ. एन. पी. हिराणी, उपस्थित होते. 
नीलेश पारवेकरांची अंत्ययात्रा यवतमाळ शहरातून पारवा येथे जाण्यासाठी निघाली तेव्हा 'आमदार नीलेश पारवेकर अमर रहे' च्या घोषणांनी आसमंत गहिवरून गेले. शहरातील रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. तर यवतमाळ शहरातील बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली होती. 
राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य नागरिक अंत्यदर्शन घेत होते. त्यांच्या निवासस्थानासमोर अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. वडिलांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना निधी व मैत्रयी यानी हंबरडा फोडला तेव्हा वातावरण गहिवरले होते. आमदार नीलेश पारवेकर यांची अंत्ययात्रा पारवा येथील त्यांच्या वाड्यातून निघाली त्यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. पारवा येथे रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. सर्व रस्ते चाहत्यांच्या गर्दीने गजबजले होते.


आमदार निलेश पारवेकर यांच्या अंत्यसंस्काराची निवडक छायाचित्रे

































  छाया :- महेंद्र देवतळे, अमोल राऊत