Pages

Sunday 30 June 2013

पिवळ्या हळदीने आणली लक्ष्मी घरात

घाटंजी तालुक्यातील रमेश आंबेपवार यांनी घेतले दिड एकरात ४६ क्विंटल हळदीचे उत्पन्न



केवळ शासकीय योजनांच्या भरवशावर न राहता शेतक-याने घाम गाळुन शेती कसली तर धरणीमाय सोनेच पिकवते. शेतीवर असा निढळ विश्वास असलेल्या घाटंजी तालुक्यातील राजापेठ येथिल उपक्रमशील शेतकरी रमेश गंगण्णा आंबेपवार यांनी अवघ्या दिड एकर शेतीमध्ये तब्बल ४६ क्विंटल हळदीचे उत्पादन घेतले आहे. 
कापुस, सोयाबीन अशा पारंपारीक पिकांव्यतिरिक्त अन्य कोणते पिक घेण्याची रिस्क अनेक शेतकरी घेत नाहीत. पण तरी देखिल अवघी २ हेक्टर ६० आर शेती असलेल्या रमेश आंबेपवार या शेतक-याने धाडस केले. दिड एकर शेतीत हळद, एका एकरात कापुस व ४ एकरात सोयाबीन पिकाचे उत्पादन घेऊन त्यांनी पारंपारिक शेतीसोबतच नाविन्यपुर्ण पिकही घेतले. ४६ क्विंटल हळदीसह १७ क्विंटल कापुस व १० क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न त्यांना झाले आहे. कृषी विभागामार्फत आयोजीत करण्यात आलेल्या पिक पाहणी कार्यक्रमात परभणी व हिंगोली येथे शेतक-यांनी हळदीच्या पिकांमधुन साधलेली प्रगती पाहुन प्रेरणा मिळाली व त्यानंतर हा प्रयत्न केला. अनेकांनी सुरूवातीला शंका कुशंका व्यक्त केल्या मात्र स्वत:च्या मेहनतीवर विश्वास असल्याने केवळ दिड एकरात एवढे उत्पन्न घेतल्याचे आंबेपवार ठामपणे सांगतात. 
त्यांच्या शेतात विहिरीच्या पाण्याने ओलीताची व्यवस्था आहे. शेती कमी असली तरी स्वत:च्या मालकीचा ट्रॅक्टर, मळणीयंत्र व पेरणीयंत्र अशी आधुनिक शेतीसाधने त्यांच्याकडे आहेत. शिवाय शेतीला जोडधंदा म्हणुन दुधाचा व्यवसायही ते करतात. त्यांच्याकडे ६ म्हशी आहेत. त्या दिवसाला सुमारे २५ लिटर दुध देतात. राजापेठ या छोट्याशा गावात नाबार्डच्या माध्यमातून शेतकरी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. काही शेतक-यांचा एका गट मिळुन सुमारे ५० एकरात गट शेती करण्यात येते. या मंडळाच्या माध्यमातून गावातील शेतक-यांसाठी नाविण्यपुर्ण उपक्रम, चर्चासत्र अशा कार्यक्रमांच्या आयोजनात आंबेपवार यांचा मोलाचा वाटा असतो. ते घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालकही आहेत. 
पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय पवार व कृषी विस्तार अधिकारी राहुल डाखोरे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याचे ते आवर्जुन सांगतात. शेतक-यांनी केवळ शासकीय योजनांच्या मागे लागुन वेळ न गमावता परिश्रमाने शेती कसल्यास कुण्याही शेतक-यावर आत्महत्येची वेळ येणार नाही. मात्र त्यासाठी शेतीला आधुनिकतेची जोड देणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत रमेश आंबेपवार यांनी ‘सकाळ’ शी बोलतांना व्यक्त केले.
‘शेतीनिष्ठ शेतकरी’ पुरस्काराने होणार गौरव
अत्यंत अल्प शेतीत हळदीचे चांगले उत्पादन घेणा-या रमेश आंबेपवार यांचा कृषी दिनानिमित्य शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये होणा-या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांच्या शेतीप्रती असलेल्या एकनिष्ठतेचा सन्मान केल्या जाणार आहे.
रमेश आंबेपवार :- मोबाईल नं. ९४२०११८५५४
अमोल राऊत, घाटंजी
साभार : सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

No comments:

Post a Comment