Pages

Sunday 30 June 2013

पिवळ्या हळदीने आणली लक्ष्मी घरात

घाटंजी तालुक्यातील रमेश आंबेपवार यांनी घेतले दिड एकरात ४६ क्विंटल हळदीचे उत्पन्न



केवळ शासकीय योजनांच्या भरवशावर न राहता शेतक-याने घाम गाळुन शेती कसली तर धरणीमाय सोनेच पिकवते. शेतीवर असा निढळ विश्वास असलेल्या घाटंजी तालुक्यातील राजापेठ येथिल उपक्रमशील शेतकरी रमेश गंगण्णा आंबेपवार यांनी अवघ्या दिड एकर शेतीमध्ये तब्बल ४६ क्विंटल हळदीचे उत्पादन घेतले आहे. 
कापुस, सोयाबीन अशा पारंपारीक पिकांव्यतिरिक्त अन्य कोणते पिक घेण्याची रिस्क अनेक शेतकरी घेत नाहीत. पण तरी देखिल अवघी २ हेक्टर ६० आर शेती असलेल्या रमेश आंबेपवार या शेतक-याने धाडस केले. दिड एकर शेतीत हळद, एका एकरात कापुस व ४ एकरात सोयाबीन पिकाचे उत्पादन घेऊन त्यांनी पारंपारिक शेतीसोबतच नाविन्यपुर्ण पिकही घेतले. ४६ क्विंटल हळदीसह १७ क्विंटल कापुस व १० क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न त्यांना झाले आहे. कृषी विभागामार्फत आयोजीत करण्यात आलेल्या पिक पाहणी कार्यक्रमात परभणी व हिंगोली येथे शेतक-यांनी हळदीच्या पिकांमधुन साधलेली प्रगती पाहुन प्रेरणा मिळाली व त्यानंतर हा प्रयत्न केला. अनेकांनी सुरूवातीला शंका कुशंका व्यक्त केल्या मात्र स्वत:च्या मेहनतीवर विश्वास असल्याने केवळ दिड एकरात एवढे उत्पन्न घेतल्याचे आंबेपवार ठामपणे सांगतात. 
त्यांच्या शेतात विहिरीच्या पाण्याने ओलीताची व्यवस्था आहे. शेती कमी असली तरी स्वत:च्या मालकीचा ट्रॅक्टर, मळणीयंत्र व पेरणीयंत्र अशी आधुनिक शेतीसाधने त्यांच्याकडे आहेत. शिवाय शेतीला जोडधंदा म्हणुन दुधाचा व्यवसायही ते करतात. त्यांच्याकडे ६ म्हशी आहेत. त्या दिवसाला सुमारे २५ लिटर दुध देतात. राजापेठ या छोट्याशा गावात नाबार्डच्या माध्यमातून शेतकरी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. काही शेतक-यांचा एका गट मिळुन सुमारे ५० एकरात गट शेती करण्यात येते. या मंडळाच्या माध्यमातून गावातील शेतक-यांसाठी नाविण्यपुर्ण उपक्रम, चर्चासत्र अशा कार्यक्रमांच्या आयोजनात आंबेपवार यांचा मोलाचा वाटा असतो. ते घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालकही आहेत. 
पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय पवार व कृषी विस्तार अधिकारी राहुल डाखोरे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याचे ते आवर्जुन सांगतात. शेतक-यांनी केवळ शासकीय योजनांच्या मागे लागुन वेळ न गमावता परिश्रमाने शेती कसल्यास कुण्याही शेतक-यावर आत्महत्येची वेळ येणार नाही. मात्र त्यासाठी शेतीला आधुनिकतेची जोड देणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत रमेश आंबेपवार यांनी ‘सकाळ’ शी बोलतांना व्यक्त केले.
‘शेतीनिष्ठ शेतकरी’ पुरस्काराने होणार गौरव
अत्यंत अल्प शेतीत हळदीचे चांगले उत्पादन घेणा-या रमेश आंबेपवार यांचा कृषी दिनानिमित्य शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये होणा-या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांच्या शेतीप्रती असलेल्या एकनिष्ठतेचा सन्मान केल्या जाणार आहे.
रमेश आंबेपवार :- मोबाईल नं. ९४२०११८५५४
अमोल राऊत, घाटंजी
साभार : सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

Wednesday 26 June 2013

कोळसा घोटाळा तब्बल ५० लाख कोटींचा : खा.हंसराज अहिर

वाळूचा लिलाव होतो मग कोळसा फुकटात का?

रेती, मुरूम, दगड यासारख्या गौण खनिजाचा शासन लिलाव करते. मग बहुमुल्य कोळसा आजवर फुकटात का वाटण्यात आला? कोल ब्लॉक वाटणीत शासनाला झालेल्या नुकसानाचा कॅग ने जाहिर केलेला आकडा अत्यंत कमी असुन प्रत्यक्षात तब्बल ५० लाख कोटींच्याही वर तोटा झालेला आहे. असा दावा खासदार हंसराज अहिर यांनी केला. 
येथिल जलाराम मंदिर सभागृहात आयोजीत व्याख्यानात ते बोलत होते. महाबलाय व्यायाम प्रसारक मंडळातर्फे ‘कोळसा खान वाटप घोटाळा’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले, देशातील या संपत्तीचा विनीयोग नागरिकांसाठी होणे अपेक्षीत असतांना खासगी कंपन्यांना कोल ब्लॉकची खैरात का वाटण्यात आली? 
देशात नऊ राज्यांमध्ये कोळशाचे उत्पादन होते. १९७३ साली स्थापन झालेली कोल इंडीया ही सरकारी कंपनी कोळसा उत्पादन करणारी एकमेव वंâपनी होती. मात्र माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांच्या काळात खासगी उद्योजकांना कोळसा ब्लॉक देण्याचा निर्णय झाला. तेव्हापासुन या कंपनीला उतरती कळा लागली. कोट्यवधींची किंमत असलेले कोल ब्लॉक आजवर शासनाने फुकटात वाटले. लोकसभेत या विषयावर सर्वप्रथम प्रश्न उपस्थित करून हा विषय पुढे आणला व तेव्हा सरकारला जाग आली. देशाच्या महालेखापरिक्षकांकडे याची तक्रार केल्यावर या घोळाची चौकशी सुरू झाली. त्यांनी या घोटाळ्यावर ताशेरे ओढताच त्यांचेवरही शिंतोडे उडविण्यात आले. आता सि.बी.आय.या प्रकरणाची चौकशी करीत आहे. या घोटाळ्यात ज्यांचे हात काळे झाले आहेत ते बाहेर येत आहेत. मात्र ज्या पंतप्रधान कार्यालयाने या सर्वांची पाठराखण केली त्यांचेवर कार्यवाही कधी होणार? पंतप्रधान मनमोहनसिंग व्यक्तीगतरित्या दोषी नसतीलही मात्र एवढ्या गंभिर प्रकाराकडे डोळेझाक केल्याने त्यांना निर्दोषही ठरविता येणार नाही असे खा.अहिर म्हणाले. वाटप करण्यात आलेले कोल ब्लॉक रद्द करण्याचा अधिकार शासनाला आहे. मात्र उद्योजकांशी लागेबांधे असल्याने तसा निर्णय टाळल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्या अभ्यासपुर्ण व्याख्यानात खा.अहिर यांनी कोळसा खान घोटाळ्याचे अनेक पैलु श्रोत्यांपुढे मांडले. 
दरम्यान महाबलाय व्या.प्र.मंडळ, स्व.रमणीकभाई सुचक बहुउद्देशीय संस्था व गुजराती समाजातर्फे खा.हंसराज अहिर यांचा जाहिर सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, स्व.रमणीकभाई सुचक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजु सुचक, महाबलाय व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शैलेश ठाकुर, उपाध्यक्ष सैय्यद फिरोज, समर्थ विद्यालयाचे संचालक मधुसूदन चोपडे, शिवसेना तालुका प्रमुख भरत दलाल, भाजप तालुकाध्यक्ष दत्ता कोंडेकर यांचेसह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन विष्णु नामपेल्लीवार व सुरेश जाधव यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.  
साभार- सकाळ
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

घाटंजी बाजार समितीवर बरखास्तीची टांगती तलवार?

जिल्हा उपनिबंधकांकडून कारणे दाखवा नोटीस
विवीध गैरप्रकार सुरू असल्याचा ठपका

येथिल कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत गैरप्रकार सुरू असल्याचा कारणावरून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ यांनी समितीच्या सर्व २१ संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.  
मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांच्या तक्रारीनंतर सहाय्यक निबंधकाच्या चौकशी अहवालावरून ही नोटीस बजावण्यात आली आहे. या संदर्भात २० जुलै २०१३ रोजी बाजार समितीला आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम ४५(१) अन्वये ही नोटीस बजावण्यात आली आहे. 
सेस व सुपरव्हीजन च्या थकीत रकमा, राणा जिनिंग अ‍ॅन्ड फॅक्टरी प्रा.लि. मध्ये प्रदिप राऊत या शेतक-याच्या कापुस सौदे पट्टी मध्ये खोडतोड, तिरूपती कॉटन जिनिंग साठी वसंत जिनिंगमध्ये खरेदी करणारे व्यापारी पिंटू अग्रवाल यांनी २०१२-१३ या हंगामात खरेदी केलेल्या संपुर्ण कापसापैकी ९० टक्के कापसाच्या लिलावाच्या दरात जिनात कपात करत असल्याचे सहाय्यक निबंधकांच्या निदर्शनास आल्याने अशा व्यापा-यांचे परवाने बाजार समितीने रद्द करावयास पाहिजे होते. मात्र बाजार समितीने कार्यवाही केली नाही. अशा विवीध कारणांवरून बाजार समिती नियमानुसार काम करीत नसल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. 
२०११-१२ च्या हंगामातील एकुण बाजार व देखरेख फि पैकी सुमारे २२ लाख रू फि वसुल झाली नाही. मागील बाजार फि थकीत असतांनाही अशा व्यापा-यांचे परवाने नुतणीकरण करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. समाधानकारक खुलासा सादर करण्यात न आल्यास बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्यात येईल असे नोटीसमध्ये नमुद करण्यात आले आहे.

नोटीस राजकीय दबावातून - सभापती अभिषेक ठाकरे
केवळ राजकीय दबावातून ही नोटीस देण्यात आली आहे. बाजार समितीवर ठेवण्यात आलेल्या सर्व आरोपांचा पुराव्यानिशी खुलासा सादर करण्यात येईल. अशी प्रतिक्रीया बाजार समिती सभापती अभिषेक ठाकरे यांनी दिली. कृ.ऊ.बा.स.चा कारभार पारदर्शक आहे. बाजारात स्पर्धा टिकुन शेतक-यांना योग्य भाव मिळावा यासाठी अनेकदा व्यापा-यांविषयी मवाळ भुमिका ठेवावी लागते. थकीत सेसच्या मुद्द्यावरून समिती बरखास्त होऊ शकत असेल तर राज्यातील एकही बाजार समिती अस्तित्वात राहणार नाही. घाटंजी बाजार समितीमध्ये यावर्षी तब्बल ४ लाख १० हजार क्विंटल कापसाची विक्रमी आवक झाली आहे. आम्ही गैरप्रकार केले असते तर दुस-या तालुक्यातून घाटंजीमध्ये कापुस आला नसता. आमचे काम प्रामाणिक असल्याने संचालक मंडळावर कार्यवाही होणार नाही असा दावा ठाकरे यांनी सकाळ शी बोलतांना केला.
साभार- सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

चोरटे ‘सापळा’ रचतात, मग पोलीस का नाही?

‘त्या’ महिलांना पकडण्यासाठी पोलीसही हतबल

‘त्यांची’ भिरभिरणारी नजर शोधत असते दागिण्यांनी लदबदलेले ‘सावज’. एकदा का ते नजरेस पडले की त्याचा पाठलाग सुरू होतो. पाच सहाच्या संख्येत असलेल्या ‘त्या’ अगदी गर्दीच्या ठिकाणी ते सावज गाठतात. त्याच्या अवतीभवती गराडा घालतात. एकदा का ‘पाश’ आवळला की मग थेट मानेवर ‘झडप’ घालुन दागिने लंपास करतात. गराडा अशा पद्धतीने घालण्यात येतो की समोरच्या व्यक्तीला ती बाब लक्षात आली तरी हालचाल करता येऊ नये. लगेच त्या टोळीतील अन्य साथिदार दागिने घेऊन निघुनही जातात. म्हणजे कोणी आरोप केलाच तर ‘आमची झडती घ्या’ असे म्हणायला त्या मोकळ्या. ही परिस्थिती आहे जवळजवळ प्रत्येक बसस्थानक व वर्दळीच्या परिसरातील. घाटंजीच्या बसस्थानकावरही असे प्रकार आता ऐकीवास येत आहेत. सापळा रचुन दागिने लंपास करणा-या महिलांची टोळी सध्या शहरात सक्रीय आहे. लग्नाचा हंगाम असल्याने दागिने घालुन जाणा-या महिलांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. मात्र अनेक घटना पोलीस स्टेशन पर्यंत जातच नाहीत. अन कुणी तक्रार द्यायला गेलेच तर पोलीस, ‘वस्तु मिळणार नाही अन तुम्हालाच त्रास होईल’ असे गोंडस कारण सांगुन अशा तक्रारी धुडकावुन लावतात. 
चोरट्या महिलांनी पद्धतशीरपणे सापळा रचुन मौल्यवान दागिने लंपास केल्याच्या घटना नेहमीच घडतात. मात्र सहज लक्षात येणा-या अशा टोळ्यांना पकडण्यासाठी पोलीसांनी कधी सापळा रचल्याचे अगदी दुर्मिळच. ज्या प्रमाणे पोलीस ईतर गुन्ह्यांमधील आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचतात त्याच प्रकारे अशा टोळ्यांना जेरबंद करण्यासाठी पोलीसांकडून प्रयत्न का होत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुचाकीवरून चेन स्नॅचिंग करणा-या युवकांपेक्षाही या महिलांच्या कारवाया जास्त आहेत. मात्र त्याचा उहापोह होत नाही. 
अनेकदा प्रवाशी अशा महिलांना पकडतात. मात्र केवळ तक्रार नसल्याच्या कारणावरून अशा टोळ्यांना सोडून दिल्याचे प्रकारही यापुर्वी घडले आहेत. बसस्थानकावर पोलीस कर्मचा-याची नेमणुक असते. मात्र घाटंजीच्या बसस्थानकावर कधीही पोलीस कर्मचारी आढळत नाही. नेहमीच घडणा-या अशा चोरीच्या घटना व त्याचा क्वचीतच लागणारा तपास यामुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
साभार- सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          


उज्वल निमजे राष्ट्रीय फॅशन डिझायनिंग स्पर्धेत अव्वल

येथिल उज्वल देविदास निमजे याने राष्ट्रीय फॅशन डिझायनिंग स्पर्धेत अव्वल कामगिरी केली. फॅशन जगतातील ‘व्होग’ या प्रतिष्ठित नियतकालिकाने ही स्पर्धा आयोजीत केली होती. तो नागपुर येथिल इंटरनशनल इन्स्टीट्युट ऑफ फॅशन डिझाईन या संस्थेमध्ये बि.एस्सी. करीत आहे. ‘निसर्ग’ या संकल्पनेवर आधारीत असलेल्या या स्पर्धेत उज्वलने ‘लपवलेले प्राणी’ या विषयावर आपले डिझाईन सादर केले होते. त्याला १५ हजार रूपये रोख व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यापुढे दिल्ली येथे होणा-या ‘व्होग फॅशन नाईट’ या समारंभात त्याला आपले डिझाईन प्रदर्शीत करण्याची संधी मिळणार आहे. या समारंभामध्ये आंतरराष्ट्रीय फॅशन जगतातील दिग्गज सहभागी होणार आहेत. उज्वल हा येथिल एकात्मीक बाल विकास सेवा योजन कार्यालयात पर्यवेक्षीका असलेल्या कमल देविदास निमजे यांचा मुलगा आहे. घाटंजीतील युवकाने फॅशन जगतामध्ये मारलेल्या या भरारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
साभार- सकाळ


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा
                           
                          

घाटंजीतील चिमुकल्या क्रिकेटपटूंनी पटकावले राष्ट्रीय विजेतेपद

चेन्नईला पराभुत करून ‘योटी नॅशनल कप’ विदर्भाकडे
१४ वर्षाखालील संघाची चमकदार कामगिरी

राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणा-या घाटंजीतील चिमुकल्यांनी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. वल्लभगढ (हरियाणा) येथे झालेल्या ‘योटी इंडीयन नॅशनल कप’ क्रिकेट सामन्यांच्या १४ वर्षाखालील गटाचे विजेतेपद विदर्भ संघाने पटकावले. या संघामध्ये बहुतांश खेळाडू घाटंजी तालुक्यातील आहेत हे विशेष. 
येथिल राष्ट्रीय खेळाडू व क्रिडा प्रशिक्षक राजन भुरे यांच्या मार्गदर्शनात सराव करणा-या या खेळाडूंनी यापुर्वीही अनेक स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. करमविर स्टेडीयम, वल्लभगठ, फरिदाबाद (हरियाणा) येथे झालेल्या उपांत्य सामन्यात यजमान हरियाणा संघाचा पराभव करून विदर्भ संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात चेन्नई (तामिळनाडू) संघाचा दणदणीत पराभव करून विजेतेपद पटकावले. 
विजेत्या संघामध्ये वेदांत बोंडे, प्रथमेश गुघाणे, संकेत देशमुख, गजानन सोनुले, गौरव भोयर, हेमंत राठोड, हर्षल देठे, कौस्तुभ आगे, प्रियांशु वाघमारे, चेश राठोड सर्व रा.घाटंजी व सुबोजीत राय, मित सिंग रा.गोंदीया या खेळाडूंचा समावेश होता. राजन भुरे हे या संघाचे प्रशिक्षक होते. संपुर्ण मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणारा वेदांत बोंडे याने मालिकावीर तर चेश राठोड याने सामनाविर होण्याचा बहुमान पटकावला. पारितोषीक वितरण समारंभाला योटी ग्रुपचे अध्यक्ष प्रताप चौधरी, बि.सि.सि.आय.कोच मोहन दास, कोलकता यांचेसह मान्यवरांची उपस्थिती होती. या यशाबद्दल या चिमुकल्या क्रिकेटपटूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा