Pages

Saturday 25 May 2013

अघोरी अंधश्रद्धेनेच घेतला चिमुकल्या सपनाचा बळी

देवीला प्रसन्न करण्यासाठी चालविला गळ्यावर सुरा 
प्रसाद म्हणुन प्राशन केले सपनाचे रक्त
मामा, आजोबा, आत्याच निघाले आरोपी 




घाटंजी तालुक्यातील चोरंबा येथील सपना पळसकर नरबळीप्रकरणाचा अखेर पर्दापाश झाला असून गावात शांतता राहावी यासाठी सपनाचा मामा, आजोबा, आत्या आणि गावातील काही शेजार्‍यांनीच तिचा नरबळी देण्यात आल्याचे अखेर पोलिस तपासात उघड झाले आहे. दहा लोकांनी अत्यंत क्रूरपणे तिचा नरबळी देत तिचे रक्त प्रसाद म्हणून वाटल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सपना पळसकर ही नवरात्र सुरू असताना २३ ऑक्टोंबर २0१२ रोजी अचानक बेपत्ता झाली होती. ती हरविल्याची तक्रार २४ ऑक्टोंबरला घाटंजी पोलिस ठाण्यात तिच्या आईवडिलांनी दिली. तेव्हापासून पोलिस याप्रकरणाचा तपास करीत होते. परंतु सात महिन्यात तपासात फारशी प्रगती न झाल्याने या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. तर लोकांकडून माहिती मिळावी म्हणून ५0 हजाराचे बक्षिसही राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. शिवाजीराव मोघे यांनी जाहीर केले होते. अखेर सपनाची कवटी, हाडे आणि फ्रॉक चोंरबा येथील जंगलात गुराख्याला २२ मे २0१३ रोजी आढळून आले. तिच्या शरीराचे अवशेष तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. या प्रकरणी पोलिसांनी सपनाचे आजोबा पुनाजी आत्राम, मामा देविदास आत्रात आणि या प्रकरणाची मास्टरमाईंड यशोदा मेर्शाम हिला अटक केली असून तपासकामी आठ लोकांना ताब्यात घेतले आहे. मनोज उर्फ लाल्या वसंता मेर्शाम यांने पोलिसांना याबाबत सविस्तर माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावातीलच दुर्गा शिरभाते या महिलेच्या अंगात देवी येते. देवीने 'सपनाचे रक्त द्या, त्याशिवाय गावात शांतता नांदणार नाही', असे दुर्गाला सांगितले. दुर्गाने याबाबत आपल्या आईस म्हणजे यशोदा मेर्शाम हिला सांगितले. यशोदा मेर्शाम हिने गावातील काही लोकांना याबाबत माहिती दिली. शिवाय नरबळी देण्याची योजना आखली. 
त्यासाठी यशोदा मेर्शाम हिने वेगवेगळय़ा तीन बैठका घेऊन त्यात नरबळी देण्याची योजना आखली. त्यानुसार २३ ऑक्टोंबरला यादव टेकाम याने सपनाला बिस्किट आणण्यासाठी दहा रुपये दिले. ती दुकानात जात असताना ईलेक्ट्रिशिएन असलेल्या मोतीराम मेर्शाम यांनी लाईट बंद केले आणि अंधाराचा फायदा घेत यादव टेकाम याने सपनाचे तोंड दाबून तिला यशोदा मेर्शाम हिच्या घरी नेले. त्यानंतर एक तासाने देवीची पूजा करून सपनाचा नरबळी देण्यात आला. सपनाची मान अक्षरश: धारदार चाकूने कापून रक्त एका भांड्यात जमा करण्यात आले. नरबळी दिल्यानंतर तिचे रक्त गावातील देवीला वाहण्यात आले आणि प्रसाद म्हणूनही वाटण्यात आले. त्यानंतर तिचा मृतदेह यशोदा मेर्शाम हिच्या स्नानगृहात पुरण्यात आला. त्यानंतर काही महिन्यांनी तो मृतदेह तेथून काढून गावाबाहेर ४00 मीटर अंतरावर पुरण्यात आला. 
पोलिसांनी गेल्या आठ दिवसात गावातच डेरा टाकल्याने पुन्हा तो मृतदेह बाहेर काढून चोरंबा येथील जंगलात पुरण्यात आला. तिच्या शरीराची कवटी, हाडे आणि फ्रॉक सापडल्याची माहिती गुराख्याने पोलिसांना दिली. याप्रकरणी मोतीराम मेर्शाम, शेडकी बुडा मेर्शाम, यादव टेकाम, पुनाजी आत्राम, दुर्गा शिरभाते यांना तपासकामी ताब्यात घेतले असून यशोदा मेर्शाम व मनोज आत्राम व देविदास आत्राम यांना अटक करण्यात आली आहे.



Click On The Image To View In Full Size



No comments:

Post a Comment