Pages

Thursday 7 February 2013

घाटंजीतील पाच युवकांचा अपघातात करूण अंत

अंत्यसंस्काराला अवघी घाटंजी लोटली
पंधरवाड्यातील दुस-या दुर्दैवी घटनेने तालुका शोकमग्न





आमदार निलेश पारवेकर यांच्या अकाली निधनाच्या दु:खातून घाटंजी तालुका सावरलाही नसताना पाच जिवलग मित्रांच्या अपघाती मृत्यूची बातमी पहाटेच धडकली अन संपुर्ण शहरात स्मशान शांतता पसरली. सारेच काही सुन्न झाले. राहुल अशोक फ़ुसे (२२), अमोल प्रल्हाद गोडे (२३), सुमित सुरेश कांबळे (२४), अजय गणपत कुमरे (२७), आकाश उर्फ़ गोल्डी विजय गिरी (२२) या पाच मित्रांचा देवळी (जि.वर्धा) तालुक्यातील शिरपुर गावाजवळ झालेल्या भिषण अपघातात करूण अंत झाला. सुमारे १५ दिवसांपुर्वी राहुल फ़ुसे याने घेतलेल्या इंडीगो कार क्रं.एम.एच.२९-२१७३ या गाडीने हे सर्व मित्र काल सायंकाळी नागपुर येथे गेले होते. त्यानंतर परत येतांना रात्री २.३० वाजताच्या सुमारास ट्रक क्रं.एम.एच.२६ एच.६१७२ या सोयाबिन नेणा-या ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. या अपघातात या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थीव शहरात आणण्यात आले. वसंत नगर, राममंदीर वार्ड, मानोली रोड या परिसरात राहणा-या या पाचही युवकांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. हजारो नागरिक अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले होते. येथिल स्मशानभुमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यातील अमोल प्रल्हाद गोडे हा वसंतनगर भागात राहतो. त्याला एक भाऊ व दोन बहिणी आहेत. तो येथिल पेट्रोलपंपावर काम करतो. सुमित सुरेश कांबळे हा देखिल वसंतनगर भागात राहतो. त्याला एक भाऊ व बहिण आहे. अजय कुमरे हा मानोली रोड भागात राहतो. हा सुद्धा पेट्रोल पंपावर काम करतो. राहुल फ़ुसे हा राममंदिर वार्डात राहत होता. तो हि कार भाड्याने देत होता. 
आकाश गिरी हा राम मंदिर वार्डातील रहिवासी आहे. त्याचे वडील गवंडी काम करतात. हे पाचही अत्यंत जिवलग मित्र होते. मोक्षधामात एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले. भयाण शांततेत मृतकांच्या नातलगांचा आक्रोश काळीज चिरून टाकत होता. घाटंजी तालुक्याच्या ईतिहासात प्रथमच स्मशानभुमीने एवढी गर्दी अनुभवली. संपुर्ण बाजारपेठ यावेळी बंद करण्यात आली होती. सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर यांचेसह अनेक राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने घाटंजीकर नागरीक यावेळी उपस्थित होते. अनेकांनी घराच्या गच्चीवरून, रस्त्याच्या कडेवरून हा दु:खद प्रसंग अनुभवला. 
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment