Pages

Tuesday 29 January 2013

आमदार निलेश पारवेकर यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

पारवा येथे उसळला प्रचंड जनसागर
साश्रुनयनांनी लाडक्या नेत्याला निरोप
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांची गर्दी



यवतमाळ विधानसभा मतदार संघाचे आमदार नीलेश देशमुख पारवेकर यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घाटंजी तालुक्यातील पारवा येथे हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत वीर शैव लिंगायत समाजाच्या परंपरेनुसार दफन विधी करण्यात आला. शासकीय इतमामात हवेत तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. 
त्यांचे पार्थिव स्मृतिरथातून पारवा येथील त्यांच्या वाड्यावर आणण्यात आले. सर्वच क्षेत्रातील दिग्गजांसह सर्वसामान्य नागरिकांनी पारवा येथे धाव घेतली होती. संपूर्णगाव मूकशोक व्यक्त करीत होते. गावात सर्वत्र शांतता पसरली होती. आमदार पारवेकर यांचे पार्थिव प्रथम त्यांच्या वाड्यात ठेवण्यात आले. त्यानंतर पार्थिव वाड्याबाहेर नागरिकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पारवा येथे आगमन झाले. त्यांनी आमदार नीलेश पारवेकरांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.
त्यानंतर सर्वांनी मौन पाळून सामूहिक श्रध्दांजली अर्पण केली. पारवेकर घराण्याच्या कौटुंबिक स्मशानभूमीत दफनविधी पार पडला. अंत्यसंस्काराला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, महिला व बालविकास मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, राज्यमंत्री रणजित कांबळे, राजेंद्र मुळक, खा.विलास मुत्तेमवार, खा.भावना गवळी, खा.सुभाष वानखडे, खा.हंसराज अहीर, अ.भा. युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार राजीव सातव, आ.गिरीश बापट, आ.विजय वडेट्टीवार, आ.रावसाहेब शेखावत, आ.वामनराव कासावार, आ.विजय खडसे, आ.संजय राठोड, आ.संदीप बाजोरिया, आ.रवी राणा, आ.प्रणिती शिंदे, आ.यशोमती ठाकूर, आ.वीरेंद्र जगताप, आ.अनिल बोंडे, आ.वसंत खोटरे, आ.प्रकाश डहाके, डॉ. एन. पी. हिराणी, उपस्थित होते. 
नीलेश पारवेकरांची अंत्ययात्रा यवतमाळ शहरातून पारवा येथे जाण्यासाठी निघाली तेव्हा 'आमदार नीलेश पारवेकर अमर रहे' च्या घोषणांनी आसमंत गहिवरून गेले. शहरातील रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. तर यवतमाळ शहरातील बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली होती. 
राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य नागरिक अंत्यदर्शन घेत होते. त्यांच्या निवासस्थानासमोर अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. वडिलांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना निधी व मैत्रयी यानी हंबरडा फोडला तेव्हा वातावरण गहिवरले होते. आमदार नीलेश पारवेकर यांची अंत्ययात्रा पारवा येथील त्यांच्या वाड्यातून निघाली त्यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. पारवा येथे रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. सर्व रस्ते चाहत्यांच्या गर्दीने गजबजले होते.


आमदार निलेश पारवेकर यांच्या अंत्यसंस्काराची निवडक छायाचित्रे

































  छाया :- महेंद्र देवतळे, अमोल राऊत



No comments:

Post a Comment