Pages

Sunday 26 August 2012

विशाल बाणेवार यांना आचार्य पदवी


अमरावती येथिल विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयात कार्यरत असलेले घाटंजीतील प्रा.विशाल वामनराव बाणेवार यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने रसायनशास्त्र विषयात आचार्य पदवी देऊन सन्मानीत केले आहे.
विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.ए.आर.राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंथेसीस कॅरेक्ट्राझीशन अ‍ॅन्ड फिजो केमीकल प्रॉपर्टीज ऑफ सम हेक्ट्रॉ सीकल कंपाऊंड्स अ‍ॅन्ड देअर कॉम्प्लेक्शन बिहेविअर या विषयातील प्रबंध विद्यापीठाला सादर केला होता.
यापुर्वी त्यांनी नेट सेट परिक्षा सुद्धा उत्तीर्ण केल्या आहेत. ते आपल्या यशाचे श्रेय आईवडील व मार्गदर्शक प्राध्यापकांना देतात.


भाजयुमो तर्फे भारतमाता व शहीद स्मारकाचे पुजन
भारतीय जनता युवा मोर्चा तालुका घाटंजी च्या वतीने स्वातंत्र्यदिनी अंजी (नृ.) येथे शहिद गुलाबराव रणदिवे यांच्या स्मारकाचे व भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी भाजयुमो जिल्हा सचिव स्वप्नील मंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी तालुकाध्यक्ष राजु शुक्ला, तालुका उपाध्यक्ष प्रणव वाघ, तालुका सरचिटणीस गणेश चव्हाण, गजानन पारधी, स्वप्नील भोयर, गोलु रणदिवे, राहुल अंजीकर, पवन वाघ, अमर पडगीलवार, विनय वाघ, गणेश वाघ, आकाश इंगोले, विनोद मंगळे, अमोल तिजारे, विवेक कदम, पांडुरंग डंभारे, विलास जमदापुरे, राहुल जांभुळे, धनंजय रणदिवे, आर्या शुक्ला, संजय मंगळे उपस्थित होते.
साभार :- देशोन्नती  

Monday 20 August 2012

घाटंजीत पोळा सण उत्साहात साजरा


















शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली
चढविल्या झुली, ऐनेदार
राजा परधान्या, रतन दिवाण
वजीर पठाण, तुस्त मस्त
वाजंत्री वाजती, लेझिम खेळती
मिरवीत नेती, बैलाला गे
दुल दुलतात, कुणाची वशींडे
काही बांड खोंडे, अवखळ
कुणाच्या शिंगाना, बांधियले गोंडे
पिवळे तांबडे, शोभिवंत
वाजती गळ्यात, घुंगरांच्या माळा
सण बैल पोळा, ऐसा चाले
जरी मिरवीती, परि धन्या हाती
वेसणी असती, घट्ट पट्टा
झुलीच्या खालती, काय नसतील
आसूडांचे वळ, उठलेले
आणि फुटतील, उद्याही कडाड
ऐसेच आसूड, पाठीवर
सण एक दिन, बाकी वर्षभर
ओझे मर मर, ओढायाचे.

छायाचित्र :- मिलिंद लोहकरे, रवि कहाळे, घाटंजी

Sunday 19 August 2012

उच्च शिक्षणातील मलिदा लाटण्याचे षडयंत्र थांबवा

प्रा.डॉ.प्रदीप राऊत यांची राज्यपालांकडे मागणी

जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या पाच विज्ञान महाविद्यालयांना अनुदान मंजुर करा, आठ विज्ञान महाविद्यालयांची मान्यता रद्द करा, महाविद्यालयांना चुकीचे संलग्नीकरण देणा-या समितीच्या सदस्यांवर फौजदारी कार्यवाही करा व खोटी माहिती पुरवून शासनाला फसविणा-या व्यवस्थापनांवर गुन्हे नोंदवा अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली आहे. घाटंजी येथिल प्रा.डॉ.प्रदीप राऊत यांनी याविषयीची तक्रार राज्यपालांसह राज्याचे उच्च शिक्षण मंत्री, उच्च शिक्षण विभागाचे मुख्य सचिव, उच्च शिक्षण संचालक पुणे व अमरावती विद्यापीठाचे कुलगूरू यांचेकडे केली आहे. या मागण्यांसह गत तिन वर्षांपासुन रखडून पडलेला अनुदान मंजुरीचा प्रश्न त्वरीत निकाली काढावा तसेच महाविद्यालयांना स्पर्धेत उतरवून मलिदा लाटण्याचे षडयंत्र हाणून पाडावे आदी महत्वपुर्ण मागण्याही तक्रारीमध्ये करण्यात आल्या आहेत. 
शासनाने दि.४ पेâब्रुवारी २००८ रोजी ज्या तालुक्यात एकही विज्ञान  महाविद्यालय नाही तेथे प्रत्येकी एका विज्ञान महाविद्यालयास १०० टक्के अनुदान देण्यात यावे असा निर्णय घेतला होता. हा निर्णय जाहीर होताच २००९-१० मध्ये एकाच दिवशी महागाव, झरी जामनी, राळेगाव, कळंब व आर्णी या पाच तालुक्यांमध्ये पाच महाविद्यालयांची गरज असतांना तब्बल १३ महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी शासनाकडून देण्यात आली. आर्णी व कळंब शहरात प्रत्येकी चार महाविद्यालये उघडून नवा उच्चांकच गाठण्यात आला. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, विधानसभा उपाध्यक्ष वसंतराव पुरके, माजी मंत्री संजय देशमुख, आमदार वामन कासावार, माजी खासदार हरीभाऊ राठोड यांच्यासह रामजी आडे व किशोर भगत या कॉंग्रेस नेत्यांची ही महाविद्यालये असल्यामुळे आपापली राजकीय शक्ती पणाला लावुन १०० टक्के अनुदानाचा दावा त्यांनी केला आहे. 
उल्लेखनीय म्हणजे आर्णीच्या मोघे महाविद्यालयाने तर इमारत नसतांनाही ती असल्याचा दावा विद्यापीठाकडे केला आहे. वास्तविकत: हे महाविद्यालय गेल्या तिन वर्षांपासुन दत्तरामपुर या गावात एका आश्रमशाळेत सुरू आहे. याबाबत विद्यापीठाकडून माहितीच्या अधिकारान्वये प्राप्त माहितीनुसार सदर महाविद्यालय भाड्याच्या इमारतीत असल्याचे दाखविण्यात आले आहे. शासन अनुदानीत आश्रमशाळेची जागा कोणत्या कायद्यान्वये भाडेतत्वावर देण्यात येते ? याची शहानिशा न करताच प्रा.सुभाष गवई, डॉ.प्रविण रघुवंशी, प्रा.ए.एम.मनवर, प्राचार्य व्ही.के.कडू, प्रा.डॉ.एस.एम.ढोरे, प्रा.डॉ.व्ही.के.जाधव, प्रा.डॉ.देवतारे, डॉ.प्रशांत गावंडे, प्रा.ए.के.हुरडे, प्रा.एन.ए.रशिदी या विद्यापीठ सदस्यांनी भाड्याच्या जागेचे दरवर्षी २ गुण देऊन व्यवस्थापनावर कृपा केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. शासनाने चालु शैक्षणीक सत्रातच याची दखल घेतली नाही तर मोठी समस्या निर्माण होईल. तसेच याबाबत पालक व विद्याथ्र्यांसह आंदोलन छेडण्यात येईल असा ईशाराही त्यांनी दिला आहे.
साभार :- देशोन्नती  

Saturday 18 August 2012

घाटंजीत मटका अड्ड्यावर विशेष पथकाचा छापा



पोलीस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरावर बिनधास्तपणे सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक एस.पी.पवार यांच्या पथकाने काल (दि.१६) ला  दुपारी ३.२० वाजता छापा मारला. महाराष्ट्र बँकेसमोर असलेल्या मोकळ्या जागेत खुले आमपणे हा मटका अड्डा सुरू होता. या धाडीत राजेंद्र रामदयाळ अग्रहरी, सुरेश रामभाऊ हटवार, मोहन बापुराव शिवणकर, प्रशांत लक्ष्मण धोटे रा.घाटंजी या आरोपींना पोलीसांनी अटक केली. त्यांचे जवळून वरळी मटक्याचे साहित्य व ७ हजार ७५० रू.रोख जप्त करण्यात आली. 
हा छापा दुपाराच्या सुमारास टाकण्यात आला. यावेळी अशा अड्ड्यावर हजारो रूपये जमा असतात. मात्र पोलीसांच्या या छाप्यात केवळ साडेसात हजारच रूपये कसे जप्त झाले याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
घाटंजी येथे वर्दळीच्या परिसरात व पोलीस स्टेशनच्या आजुबाजूला खुले आमपणे मटका अड्डे सुरू असतात. घाटंजी पोलीस मात्र त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असतात. या धाडीमुळे घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
साभार :- देशोन्नती  


Wednesday 15 August 2012

सोसायटीचे नाव बदलण्यावरून आमसभेत गोंधळ


स्थानिक घाटी घाटंजी विवीध कार्यकारी सहकारी संस्थेच्या आमसभेत आज संस्थेचे नाव बदलण्याच्या मुद्द्यावरून चांगलाच गदारोळ झाला. त्यामुळे अवघ्या पंधरा मिनिटांच्या कालावधीतच सभा तहकुब करावी लागली. काही सदस्यांनी दप्तर हिसकावण्याचा प्रयत्न केल्याने अखेर पोलीसांना पाचारण करण्यात आले.
घाटी घाटंजी सहकारी सोसायटीची आमसभा येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजीत करण्यात आली होती. या संस्थेचे नाव बदलुन सहकार महर्षी बाळासाहेब देशमुख पारवेकर विविध कार्यकारी सहकारी संस्था म.घाटंजी असे करण्यासंबंधीचा आमसभेतील विषय पत्रिकेवरील ठराव क्रमांक सात सचिव शेंडे यांनी वाचुन दाखविला. यावरून आमसभेत गोंधळाला सुरूवात झाली. नाव बदलण्याला विरोध दर्शविण्यात आला. नाव बदलण्याची गरजच काय आहे? जे आहे तेच नाव कायम ठेवण्यात यावे अशी मागणी अनेक सदस्यांनी केली. सभेत गोंधळ व तणाव वढत असल्याचे निदर्शनास येताच अध्यक्ष पुंडलीक वघरे यांनी आमसभा तहकुब केली. 
या गोंधळामध्येच आमसभेत उपस्थित असलेले आमदार निलेश पारवेकर, जि.प.सदस्य योगेश पारवेकर सभागृहातून बाहेर पडले. या दरम्यान सदस्यांनी दप्तर हिसकावण्याचा प्रयत्न केल्याने संस्थेचे सचिव व कर्मचारी गर्दीच्या गराड्यात सापडले. वातावरण संतप्त होत असल्याने तातडीने पोलीसांना पाचारण करण्यात आले. ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांनी आपल्या ताफ्यासह सभास्थळी येऊन वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. सदर संस्थेची स्थापना गोविंदराव चंपत ठाकरे यांनी १९६० साली केली. या संस्थेचा विस्तार तब्बल ३२ गावात असुन ६ हजार ७५० सभासद आहेत.
साभार :- देशोन्नती  

माजी जि.प.सदस्य काटपेल्लीवार विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल



शेतजमीन सौदे प्रकरणात ७ लाख रूपये घेऊन फसवणुक केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून पारवा पोलीसांनी माजी जि.प.सदस्य जयप्रकाश काटपेल्लीवार यांचेविरूद्ध कलम ४१७, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कुर्लीचे सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी या प्रकरणात न्यायालयात फौजदारी दंड प्रक्रीया संहिता कलम १५६ (३) अन्वये घाटंजी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी तेजवंत सिंग संधु यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने गुन्हा दाखल करून ३० दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जयप्रकाश काटपेल्लीवार यांचे कुर्ली येथिल शेत गट क्रं ४/१ जमिन आहे. यापैकी ४ हेक्टर ८० आर जमिन त्यामधील विहीर व विद्युत मोटरपंपासह विक्रीचा करार सौदेपत्र फिर्यादी अयनुद्दीन सोलंकी यांचेसोबत दि. १९ मे २००९ रोजी झाला होता. ईसारा दाखल ७ लाख रूपये विक्रीचा करारनामा नोंदवुन घेतला. मात्र त्यानंतर ठरलेल्या तारखेवर काटपेल्लीवार हे दुय्यम निबंधक कार्यालयात जमिन खरेदी करून देण्यासाठी आले नाही. त्यामुळे त्यांनी सौदेपत्राच्या अटी नियमांचे पालन न करून फसवणुक केली आहे. त्यामुळे फिर्यादी अयनुद्दीन सोलंकी यांनी १३ जुलै रोजी पारवा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र राजकीय दबावातून पारवा पोलीसांनी या प्रकरणात चौकशी केली नव्हती. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.
साभार :- देशोन्नती  


कृषी साहित्य विक्रेत्यांकडून पुरग्रस्तांना मदत


तालुक्यातील कृषी साहित्य विक्रेता संघाच्या वतीने पुरग्रस्त गावांमधील शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. कोपरी (कापसी) व कवठा या पुरग्रस्त गावांमध्ये हे साहित्य वाटप करण्यात आले. पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. तसेच भास्कर अंजीकर, संजय पालतेवार, अभय कटकमवार, भावेश गंढेचा, राजेश र्इंगोले, प्रमोद हांडे, ललित सुचक, स्वप्नील भांडारवार, प्रशांत नित, प्रकाश काकडे, नरेंद्र माडूरवार, किशोर सोनटक्के, सखाराम बिबेकार, चिकराम, उईके हे यावेळी उपस्थित होते.
साभार :- देशोन्नती  

कोठारी परिवारातर्फे पुरग्रस्तांना मदतीचा हात


तालुक्यात पुराच्या पाण्यामुळे आपले सर्वस्व गमावलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे येत आहेत. भांबोरा येथिल कोठारी परिवारानेही सामाजीक दायीत्व जपत गरजूंना ब्लँकेट व चादरींचे वाटप केले. भांबोरा ग्रा.पं.चे उपसरपंच निलेश कोठारी यांनी पुरग्रस्तांशी आस्थेने विचारपुस करून त्यांना भेडसावत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी आपल्या पातळीवर योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अनेक पुरग्रस्तांनी आपल्या व्यथा त्यांच्यापुढ़े व्यक्त केल्या. दोन वेळचे जेवण व कपड्यांची व्यवस्था दानशुरांच्या मदतीमुळे होत आहे. मात्र कायमस्वरूपी निवासाचा प्रश्न या पुरग्रस्तांपुढे असुन भविष्यात राहायचे कुठे अन शेती खरडून गेल्याने आता पोटाचा प्रश्न कसा सोडवायचा असे एक ना अनेक प्रश्न पुरग्रस्तांनी त्यांच्यापुढे मांडले. या समस्या तातडीने निकाली काढण्यासाठी प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, मंत्री यांनी प्रथम प्राधान्याने प्रयत्न करावे असे आवाहन निलेश कोठारी यांनी केले. कोळी, कापसी कोपरी, चिंचोली, कवठा, चांदापुर या गावांमध्ये कोठारी परिवारातर्फे अंथरूण साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी नितिन कोठारी, जितेंद्र कोठारी, रामधन नाईक, श्रावण राठोड, दत्ता पवार, रवि दत्ताणी, मनोज राठोड, अनिल चव्हाण, अविनाश भगत, दिलिप जाधव हे उपस्थित होते.
साभार :- देशोन्नती  

Sunday 12 August 2012

पुरग्रस्तांचे जीवन उभारणारा कार्यक्रम राबवणार

मुख्यमंत्र्यांनी दिला आश्वासक शब्द



















 




अतिवृष्टीने आलेल्या पुरामध्ये ज्यांचे सर्वस्व वाहुन गेले त्यांचे जीवन नव्याने उभारणारा कार्यक्रम राबविणार या आश्वासक शब्दांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.पृथ्वीराज चव्हाण यांनी घाटंजी तालुक्यातील पुरग्रस्तांचे सांत्वन केले. पुरग्रस्त भागाच्या पाहणी दौ-यामध्ये कोळी (बु.) येथे पुरग्रस्तांना संबोधीत करतांना ते बोलत होते. पुररेषेखाली येणा-या धोकादायक गावांचे सुरक्षीतस्थळी पुनर्वसन करण्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल, पुनर्वसनाबाबतचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत असे त्यांनी सांगीतले.
यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री ना.नितिन राऊत, सामाजीक न्यायमंत्री ना.शिवाजीराव मोघे, अन्न व औषध प्रशासनमंत्री ना.मनोहर नाईक, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके,  आमदार निलेश पारवेकर, विजय खडसे, वामनराव कासावार, संजय राठोड, संजय देशमुख यांचेसह मान्यवरांची उपस्थिती होती.
पुरग्रस्तांशी हितगूज करतांना ते पुढे म्हणाले की, कधी नव्हे एवढा महापुर या भागात आला. ढगफुटीमुळे एकाच दिवशी तब्बल २९० मि.ली.पावसाची विक्रमी नोंद झाली. प्रशासकीय यंत्रणा झालेल्या नुकसानाचे पंचनामे करीत आहे. मात्र कुटूंबांचे झालेले नुकसान केवळ पंचनाम्याने कधीच भरून निघणार नाही. पुरात जीवन किती उध्वस्त होते याची जाणीव असल्याचे ते यावेळी म्हणाले. अतिवृष्टीच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. त्यामुळे पुराचा धोका असलेल्या गावांचे गावापासुन जवळ असलेल्या सुरक्षीतस्थळी पुनर्वसन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जिथे जमिन मिळणार नाही तिथे अधिग्रहण करून पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जातील. घाटंजी तालुक्याचा परिसर रम्य आहे. येथिल शेतकरी कष्टाळू आहे. योग्य सोयीसुविधा मिळाल्या तर आत्महत्याग्रस्त परिसरातील शेतकरी सुखी होऊ शकतील. या भागातील शेतक=यांनी ठिबक सिंचनाचा वापर केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल त्यासाठी शासन अनुदान सुद्धा देईल असे त्यांनी सांगीतले. राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने पुरग्रस्तांच्या दु:खात सहभागी असुन त्यांना शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
दुपारी १२ वाजुन ५० मिनीटांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा कोळी (बु) येथे पोहचला. आमदार निलेश पारवेकर हे स्वत: मुख्यमंत्री बसुन असलेली पजेरो गाडी चालवित होते. याच गाडीमध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणीकराव ठाकरे, पालकमंत्री ना.नितीन राऊत हे देखिल होते.  कोळी (बु) चे उपसरपंच चंद्रप्रकाश खरतडे यांनी मुख्यमंत्र्यांना गावात झालेल्या भिषण नुकसानाची माहीती दिली. रामपुर प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय पुराम व त्यांच्या चमुकडून मुख्यमंत्र्यांनी या भागातील आरोग्य विषयक बाबींबद्दल विचारणा केली.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी विवीध संघटना व नागरिकांची निवेदने स्विकारून त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.  कवठा (खु.), चांदापुर (आश्रम), किन्ही, विरूळ, कोळी (खु.), कापसी (कोपरी) या पुराने सर्वाधीक बाधीत झालेल्या गावातील अनेक ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांपुढे आपली संवेदना व्यक्त करण्यासाठी कोळी (बु) येथे जमले होते.


पुरग्रस्तांना मायेचा आधार द्यावा - ना.मोघे

घाटंजी तालुक्यात प्रथमच पुरामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी भरीव मदत करून पुरग्रस्तांना मायेचा आधार द्यावा अशी मागणी सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनी केली. पुरग्रस्तांसाठी सध्या घराची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे लाभार्थ्याची उत्पन्न मर्यादा न पाहता सर्व पुरग्रस्तांना सरसकट घरे देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

हारतुरे स्वागत स्विकारले नाही

आपल्या गावात राज्याचे मुख्यमंत्री येणार या आशेने सुखावलेल्या पुरग्रस्त कोळी गावातील ग्रामस्थांनी आपल्या वेदना विसरून मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची तयारी केली होती. ग्रामिण भागातील परंपरेनुसार कार्यक्रमस्थळी पाय धुवायला पाणी ठेवले होते. तसेच स्वागतासाठी पुष्पहार आणण्यात आले होते. मात्र कोणत्याही प्रकारच्या स्वागतास मुख्यमंत्र्यांनी नम्र नकार दिला. केवळ कपाळी अक्षत लावुन घेतल्यावर त्यांनी लगेच गावाची पाहणी करण्यासाठी प्रस्थान केले.

फलकातूनही दिसली पुराची भिषणता

पावसाच्या पाण्याने सर्वस्व वाहुन गेलेल्या ग्रामस्थांनी आपल्या गावाची ओळख दाखविण्यासाठी आणेलेले फलक सुद्धा पावसाची भिषणता दाखवित होते. कुणी वापरण्यासाठी असलेल्या एकमेव उपरण्यावर गावाचे नाव लिहीले होते तर कुणी फाटक्या धोतराच्या कापडावर. गावाचे नाव लिहीलेले कापड सुद्धा पावसात भिजल्याने नावे धुसर झाली होती. या भिजलेल्या कापडांमधुन गावात पावसाने घातलेल्या थैमानाचे चित्र स्पष्ट दिसत होते.
अमोल राऊत
साभार :- देशोन्नती  

छायाचित्र सौजन्य :-
संदिप डिजीटल फोटो स्टुडीओ, शिरोली 
(प्रो.प्रा.संदिप वानखडे), Mob.No.9421770650
निलेश जुनगरे, शिरोली




Saturday 11 August 2012

पुरग्रस्तांच्या जखमांवर केवळ ’ फुंकर’ पुरेशी नाही

१ हजार कुटूंबे बेवारस
६ हजार हेक्टर शेती उध्वस्त















जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस आला ते सर्वस्व घेऊन जाण्यासाठीच. घरदार, शेती सगळं काही पावसात वाहुन गेलं. जिथे हक्काचं डौलदार घर होतं तिथे पावसानंतर उरला केवळ मलबा. अंकुरायला आलेली शेतपिके पुराच्या पाण्याने पार खरडून नेली. पावसाच्या तडाख्याने शारिरीक, मानसिक व आर्थिकदृष्ट्या घायाळ झालेल्या पुरग्रस्तांच्या जखमांवर फुंकर घालायला अनेकजण आले. सामाजीक संस्था, दानशुर लोक, राजकीय नेते, कार्यकर्ते या सर्वांनी येऊन आपापल्या परिस्थितीनुसार मदत केली, जखमांवर फुंकर घातली. मात्र निसर्गाच्या फटक्याने भळभळणा-या या जखमा केवळ पुंâकर घातल्याने ब-या होणार नाहीत. त्यासाठी भरीव मदतीचे ’बँडेज’च गरजेचे आहे. हा उपाय केवळ मुख्यमंत्रीच करू शकतात. २८ जुलैला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा नियोजीत दौरा खराब हवामानामुळे रद्द झाल्याने पुरग्रस्तांचे तर अवसानच गळाले होते. आता उद्या मुख्यमंत्री येणार या आशेने त्यांना एक आधार मिळाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जखमांवर फुंकर घालावी ही अपेक्षा अगदीच तोकडी आहे. पुराच्या पाण्याने तालुक्यातील सुमारे १ हजार कुटूंबे उघड्यावर पडली आहेत. स्वत:चे असे काहीच त्यांच्या जवळ उरले नाही. नदीकाठची शेती तर पुर्णपणे खरडून गेली आहे. आज हाती आलेल्या आकडेवारीनुसार सुमारे ९६४ हेक्टर शेतीचे ५० टक्केच्या आत व ४८१७ हेक्टर शेतीचे ५० टक्केच्या वर नुकसान झाले आहे. तर सुमारे ८४७ हेक्टर शेती पुर्णपणे खरडून गेली आहे. हे नुकसान कोटवधींच्या घरात आहे. शासकीय आकड्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान तालुक्यात झाले आहे. प्रशासनाच्या वतीने ५० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान वाटप झाले आहे. ठराविक गावांमध्ये आरोग्य कॅम्प व्यतिरिक्त कोणतीही ठोस मदत प्रशासनाकडून झालेली नाही. हजारो पुरग्रस्त कुटूंबांनी आपापल्या परिने विवीध ठिकाणी आश्रय घेतला आहे. त्यांच्या तात्पुरत्या निवा-याची व्यवस्था सुद्धा अद्याप झालेली नाही.
काही गावांमध्ये नागरीक स्वत: खर्च करून पुरग्रस्त गावांमध्ये पिण्याचे पाणी टँकरने पुरवित आहेत. मात्र तिथे भारनियमन आडवे येत आहे. पुरग्रस्त गावांनाही भारनियमनातून तात्पुरते वगळण्यात आलेले नाही. गावात साचलेल्या चिखलावर केवळ मुरूमाचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. ते पसरविण्यात आले नाही. ज्या काही थोड्या थोडक्या उपाययोजना झाल्यात त्या केवळ मुख्यमंत्री येण्याच्या वार्तेमुळेच झाल्या आहेत.
मंत्री, आमदार असलेल्या तालुक्यातील नेत्यांनी पुरग्रस्तांच्या जखमेवर केवळ सहानुभूतीची फुंकर घालण्यापलीकडे काही केल्याचे दिसत नाही. अशा अवस्थेत आता सर्व पुरग्रस्तांच्या आशाळभूत नजरा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेच लागलेल्या आहेत.

सर्वस्व गमावलेल्या सरपंचाचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
अतिवुष्टीमुळे पुराच्या पाण्यात सर्वस्व गमावलेल्या कवठा (खुर्द) येथिल सरपंच उदेभान रायबाजी घरडे (५५) यांचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. जुलै महिन्यात झालेल्या पावसामध्ये घरडे यांचे घर पुर्णपणे वाहुन गेले आहे. तसेच शेतपिकांचेही नुकसान झाले आहे. आता आयुष्य कसे जगावे याच विवंचनेत असलेल्या घरडे यांना हा ताण सहन झाला नाही व हदयविकाराच्या झटक्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शिक्षकांचा मदतनिधी गेला कुठे?
घाटंजी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षकांनी आपल्या नक्षलग्रस्त भत्त्याची एका महिन्याची रक्कम पुरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वास्तविकत: एका जि.प.सदस्याच्या तोंडी आदेशावरून शिक्षण विभागाने सर्व शिक्षकांना नक्षलग्रस्त भत्त्याची रक्कम बंधनकारक केले होते. गटशिक्षणाधिका-यांनी तसा आदेशही  केंद्र प्रमुख व मुख्याधापकांना लेखी स्वरूपात कळविला होता. त्यानुसार सुमारे ५ लाखांच्या वर निधी गोळा होणार होता. मानवतेच्या दृष्टीने कोणीही यासाठी विरोध केला नाही. मात्र त्यानंतर या निधीचे काय झाले? त्याचा विनियोग कुठे करण्यात आला याबाबत माहिती द्यायला कुणीच तयार नाही. उल्लेखनिय म्हणजे नक्षलग्रस्त भत्त्याची रक्कम जुलै महिन्याच्या वेतनातून कपात करण्यात येणार होती. मात्र अद्याप जुलै महिन्याचे वेतनच निघाले नाही. तर मग ही लाखो रूपयांची रक्कम कुठून अ‍ॅडजस्ट करण्यात आली हे गुलदस्त्यातच आहे. ही रक्कम पुरग्रस्तांसाठीच वापरण्यात आली असेल तर मग त्याचा कुठे वापर झाला हे सांगायला कुणीच का तयार नाही असा प्रश्न आता शिक्षकांमध्येच चर्चील्या जात आहे.
साभार :- देशोन्नती