Pages

Sunday 29 April 2012

आता तिथे पाण्यासाठी सुद्धा ‘तंटा’ होत नाही......!

बक्षिसाच्या रकमेतून पाणी पुरवठा
सायतखर्डा गावाचा स्तुत्य उपक्रम

सार्वजनिक पाणवठ्यावर पाण्यासाठी होणारे भांडणतंटे ग्रामिण भागात नित्याचेच. प्रसंगी किरकोळ वादाचे रूपांतर गंभिर भांडणातही झाल्याची उदाहरणे नेहमीच निदर्शनास येतात. उन्हाळ्यात तर पाण्यासाठी महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. फार क्वचित गावांमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजना यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे ग्रामिण भागात सध्या पाणी समस्या ऐरणीवर आहे. शासन प्रशासनाच्या उपाययोजना बहुतांशी कागदोपत्रीच असल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. मात्र सायतखर्डा गावाने शासनातर्फे  मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून ही समस्या सोडविली आहे. सायतखर्डा गावाला यावर्षी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत ३ लाख रूपयांचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. ही बक्षिसाची रक्कम व्यर्थ गोष्टींवर खर्च करण्या ऐवजी त्या माध्यमातून गावाची तहान भागविली जावी अशी कल्पना तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष गजानन लेनगुरे यांनी मांडली. याबाबत ग्रामस्थांशी चर्चा केल्यावर सर्वांनाच ही कल्पना आवडली. सायतखर्डा गावाची लोकसंख्या जास्त आहे. येथे असलेली पाणी पुरवठा योजना अपुर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे गावात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत होती. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तंटामुक्त ग्राम समिती, पाणी पुरवठा समिती व शाळा व्यवस्थापन समितीने एकत्रीत येऊन बैठक घेतली. तंटामुक्तीच्या बक्षिसातून पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याचे ठरविले. गावात असलेल्या जलकुंभात सुमारे ६ किलोमीटर अंतरावरून पाणी येत होते. त्यामुळे २४ तासातही हा जलकुंभ भरत नव्हता. त्यामुळे जलकुंभात येणारे पाणी ग्रामपंचायतीच्या विहिरीत सोडण्यात आले. त्या विहिरीवर सबमर्सिबल मोटर पंप बसवून विहिरीतून पाणी पाईपलाईनद्वारे जलकुंभात नेण्याची व्यवस्था करण्यात आली. आता हा जलकुंभ दिवसातून दोन वेळा भरत आहे. या जलकुंभाची क्षमता ५० हजार लिटरची आहे. या सामुहीक प्रयत्नामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. पाण्यासाठी वेगळ्या शासकीय निधीची वाट न पाहता तंटामुक्तीच्या बक्षिसाच्या रकमेतून एक लाख रूपये खर्च करून पाणी समस्या सोडविण्याचा प्रयत्न करून सायतखर्डा गावाने एक अनुकरणीय उदाहरण निर्माण केले आहे. तंटामुक्त गाव समितीचे युवा अध्यक्ष गजानन लेनगुरे यांनी या बाबत पुढाकार घेतला ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. गावात पाण्यासाठी अथवा ईतर कोणत्याही कारणासाठी किरकोळ तंटेही होऊ नयेत म्हणूनच प्रथम प्राधान्याने पाण्याची समस्या मार्गी लावल्याचे लेनगुरे यांनी देशोन्नतीशी बोलतांना सांगीतले.
साभार :- देशोन्नती 

अनंत बावने यांच्या ‘विरंगुळा’ चारोळी संग्रहाचे प्रकाशन


येथिल कवी अनंत बावने यांच्या विरंगुळा या चारोळी संग्रहाचे प्रकाशन नुकतेच नागपुर येथे आयोजीत राज्यस्तरीय शब्द साहित्य संमेलनात करण्यात आले. महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन व श्री गुरूदेव युवा संगठण गुरूकुंज यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरूदेव सेवाश्रम नागपुर येथे आयोजीत या संमेलनाचे निमंत्रक प्रा. ज्ञानेश वाकुडकर, कवी संमेलनाचे अध्यक्ष लोकनाथ यशवंत, कवी रमेश ठाकरे यांच्या हस्ते अनंत बावने यांच्या ११४ चारोळ्या असलेल्या ‘विरंगुळा’ या चारोळी संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. या शब्द साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी भुषविले. उद्घाटन जेष्ठ साहित्यीक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते झाले तर स्वागताध्यक्ष विष्णु मनोहर हे होते. घाटंजी येथिल कवी अनंत बावने यांचे यापुर्वी ३ काव्यसंग्रह प्रकाशीत झाले असुन रंग जिवनाचे हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
साभार :- देशोन्नती 

Monday 23 April 2012

घाटंजी येथे डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त विवीध कार्यक्रम


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात सकाळी सायकल रॅली तर संध्याकाळी मेणबत्ती मार्च काढण्यात आला. 
सायकल रॅलीला डॉ. आंबेडकर वॉर्ड येथून सुरुवात झाली. रॅली मार्गात संत गाडगेबाबानगर (खापरी) येथे सुनील कांबळे यांच्या हस्ते, नेहरूनगर येथे रा.वि. नगराळे यांच्या हस्ते, बसस्थानकातील फोटोला माल्यार्पण करण्यात आले. जयभीम चौकात संतोष शेंद्रे यांच्या हस्ते, घरकूल वसाहत घाटी येथे विमल मानकर यांच्या हस्ते तर डॉ. आंबेडकर वॉर्डात जयंती समारोह समितीचे अध्यक्ष संतोष शेंद्रे यांचे हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
जयभीम चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन संजय टिपले यांच्या हस्ते झाले. वसंतनगर येथील आंबेडकरी युवा मंचच्या कार्यक्रमाची सुरुवात नितीन पाटील यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून केले.
सायंकाळी मेणबत्ती शांती मार्च काढण्यात आला. याशिवाय घाटंजी आयडॉल, वेशभुषा स्पर्धा यासह वैविध्यपुर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यशस्वीतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष शेंद्रे, कार्याध्यक्ष सतीश रामटेके, कोषाध्यक्ष रा.वि. नगराळे, सचिव संतोष जीवणे, उपाध्यक्ष प्रकाश लढे, सहसचिव सुरेश हुमे, सुनील नगराळे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, भीमशक्ती युवा मंच आणि विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेतला. तसेच शहराच्या विविध भागात आणि ग्रामीण भागामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम घेवून अभिवादन करण्यात आले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्य आयोजीत विवीध कार्यक्रमांची ठळक छायाचित्रे















छायाचित्र सौजन्य :- महेंद्र देवतळे, ९५४५३४२२४२

Friday 20 April 2012

महागाईमुळे वधु पित्याचे 'अंदाजपत्रक' कोलमडले



ऐन लग्नसराईत वाढलेल्या महागाईमुळे वधूपित्यांना घाम फुटला असून त्यांचे लग्नाचे अंदाजपत्रक कोलमडून पडल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात लग्न पहावे करून, घर पहावे बांधून असे म्हंटले जाते. लग्न करण्यासाठी वधूपित्यांना अनेक बाबींची जुळवाजुळव करताना नाकीनऊ येत आहेत.
अगदी स्वत:चे घर बांधताना मिस्त्री शोधण्यापासून तर सामानाची जमवाजमव करण्यापर्यंत घरमालकास अनेक कामे पार पाडावी लागतात. घरमालकास आपले काम लांबणीवर टाकता येते. परंतु वधुपित्यास अशी सोय उपलब्ध नसते. विहित कालावधीत मुलीच्या डोक्यावर अक्षता पडून आपण केंव्हा जबाबदारीतून मुक्त होतो. हीच धाकधूक त्यांना लागलेली असते. डिसेंबर महिन्यापासून वर संशोधनाच्या तयारीत लागलेल्या वधुपित्यास महागाई आकाशाला भिडली असल्याने हे सुख घाम फोडणारे ठरत आहे. लग्नाचा प्रसंग जीवनात एकदाच येतो. ही जाणीव ठेवून चांगल्या प्रकारे कार्य पार पाडण्यासाठी त्याचा आटापिटा सुरू असतो. सर्वांचे समाधान करण्यासाठी जेंव्हा पैशाची जुळवाजुळव करणे सुरू होते. त्यावेळी घरी तयार केलेले अंदाजपत्रक बाजारात पाऊल ठेवताच विस्कळीत होत असल्याचे दिसून येते.
 मे, जून महिन्यात लग्नसराईची धामधूम असते. याच काळात बाजारात सोने, कापड, जीवनावश्यक वस्तूंच्या भावात मोठी वाढ झालेली आहे. या महागाईने गोरगरीब वधुपित्याचे चेहरे काळवंडल्याचे दिसून येत आहेत. यावेळी महागाईने कळस गाठल्याने प्रत्येकच वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. मात्र वधुपित्याला महागाई असली तरी लग्नासाठी खरेदी केल्याशिवाय पर्याय नाही. याच कालावधीत शहरातील मंगल कार्यालये, वांजत्री, फोटोग्राफर, डेकोरेशनवाले, वाहनधारक व्यस्त आहेत. गोरगरीब व मध्यमवर्गीय वधुपित्यांना मुलीच्या लग्नासाठी लागणारे साहित्य जमा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. वरपक्षाकडून लादलेल्या गोष्टींची पुर्तता करण्यासाठी त्याला चप्पल झिजवावी लागत आहे. नवरदेव मुलाचा साधासुधा सुट व कपडा घेणे म्हंटले तर १० हजार रूपये लागतात. नव-या मुलाच्या आवडीनुसार तो महाग होत जातो. मुलाच्या प्रत्येक नातेवाईकांचा मानपान झाला पाहिजे अशी अपेक्षा असल्यामुळे त्याचा भुर्दंड वधुपित्यावर बसतो.
१००० लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी ३० ते ४० हजार मोजावे लागत आहेत. लग्नामध्ये सोन्याची खरेदी सुद्धा महत्वाची असते. वधुपिता हलाकीचे जीवन जगत असला तरी लाडक्या लेकीच्या विवाहासाठी आवश्यक तेवढ्या सोन्याची खरेदी त्याला करावीच लागते. आज १० ग्रॅम सोन्याला २९ हजार रूपये मोजावे लागत आहेत. चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. याशिवाय घरातील सदस्यांसाठी कपडे, मंगल कार्यालय, भेटवस्तू, मंडप, भांडी घराची रंगरांगोटी यासारख्या अनेक बाबींचा ताळमेळ बसवताना वधूपित्यांच्या नाकीनऊ येत आहेत.


भुरटे समाजसेवक व अर्थहिन आंदोलने


हल्ली समाजाची ‘सेवा' करणा-यांची संख्या खुप वाढली आहे. शासकीय कार्यालयाच्या परिसरात व वर्तमानपत्रातील बातम्यांमध्ये हे समाजसेवक नेहमीच चमकत असतात. ‘सामाजिक कार्यकर्ता' हे गोंडस बिरूद लावुन मिरवणारे महाभाग दगड उचलला तरी नजरेस पडतील. समाजाच्या सेवेचा वसा घेऊन कुणी पुढे येत असेल तर त्याला जनाधारही मिळतो. परंतु समाजसेवेच्या बेगडाखाली व्यक्तीगत स्वार्थ साधणा-या ‘भुरट्यांचे' काय? आजुबाजुचे चार दोन लोक गोळा केले, शंभर रूपयांचे बॅनर लावले, वर्तमानपत्राला बातमी द्यायला फोटो काढला की झाले आंदोलन. अशा आंदोलनाच्या माध्यमातुन शासकीय अधिका-यांना वेठीस धरून पैसा उकळणा-या आंदोलकांचे पिक सध्या जोमाने वाढत आहे. तहसिल कार्यालय परिसरात असे समाजसेवक पडलेलेच असतात. निराधार लाभार्थी, दारिद्र्य रेषेचे कार्डधारक व विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्याचे आमिष दाखवुन ते गरिबांची लुबाडणूक करतात. अधिकारी व कर्मचा-यांना धाक दाखवुन त्यांच्या कडुन अनेकदा बेकायदेशीर कामेही करवून घेतल्या जातात. कधी अधिकारी अथवा कर्मचा-याने काम करण्यास नकार दिला तर थेट ‘मोर्चा' काढल्या जातो. माहितीच्या अधिकाराचा खरा वापर या भुरट्यानीच केला आहे. योजनांच्या ‘निधी' ची माहिती मागवायची व नंतर खिशात ‘निधी' आला की, प्रकरण तिथेच दाबायचे असे प्रकार सर्रास होताना दिसतात. प्रसिद्धी पत्रक काढुन आंदोलनाचे देण्यात येणारे ईशारे, प्रत्यक्षात होणारे आंदोलन व त्या आंदोलनाची फलनिष्पत्ती तपासुन पाहिल्यास या कथित आंदोलकांचा खरा चेहरा समाजासमोर येईल.
घाटंजी तालुक्यात तर एकेकाळी रोजमजुरी करणा-यानीही  समाजसेवेचे सोंग घेतले आहे. तुम्हाला योजनांचा लाभ मिळवुन देतो असा कांगावा करून आंदोलनात गर्दी जमवायची व आपला हेतु साध्य करून घ्यायचा असा हा समाजसेवेचा उद्योग सध्या परिसरात भरभराटीला आला आहे. अशाच एका पोटभरू समाजसेवकाने अनेक गरिबांना जमिनीचे पट्टे मिळवुन देतो अशी बतावणी करून लाभार्थ्यांकडून प्रत्येकी पाच हजार रूपये गोळा केले व स्वत:चा गल्ला भरला. निवडणुक जवळ आली की या सामाजिक कार्यकर्त्यांच्या ‘उठाठेवी' या ना त्या माध्यमातुन वाढतात. जनतेच्या समस्यांची आपल्यालाच चाड आहे असा बनाव निर्माण केल्या जातो. कोणत्याही आंदोलनाचा हेतू स्वच्छ दिसला तर जनता त्यांच्या पाठीशी उभी राहतेच (अण्णा हजारेंच्या मौन सत्याग्रहानेही सरकार हादरून जाते). मग या समाजसेवकांच्या आंदोलनाला जनता व प्रशासन कवडीचेही महत्व का देत नाही याचे आत्मचिंतन या सामाजिक कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे.
सद्यस्थितीत पैशाला पासरी भावाने मिळणा-या संघटना व त्याचे पदाधिकारी ज्याच्या त्याच्या तक्रारी करतांना आढळतात. भ्रष्टाचारावर त्यांचे विशेष लक्ष असते. वनविभाग, तहसिल कार्यालय, पोलिस स्टेशन व कृषी विभाग हे कार्यालय तर या भुरट्यांसाठी चरण्याचे कुरण बनले आहे. आधी तक्रारी करायच्या व ‘डिमांड' पुर्ण झाल्यावर ‘समाधान' झाल्याचे लिहुन द्यायचे असा बिनभांडवली व्यवसाय सध्या चांगलाच फोफावतोय. त्यामुळे वरिष्ठांनी आता तक्रारीच्या खरेखोटेपणा सोबतच तक्रारकर्त्याचीही उलट तपासणी घेण्याची गरज आहे. जनतेनेही अशी आंदोलने केवळ मनोरंजनासाठी 'एन्जॉय' करावीत.

Thursday 19 April 2012

भ्रष्टाचाराच्या गळतीमुळे पाणी पुरवठा योजना ‘कोरड्या’


जलस्वराज्य प्रकल्प, भारत निर्माण यासह विवीध पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा खर्च झाला असुनही पाणी टंचाई कायमच आहे. योजना आपल्या गावात येण्यासाठी गावपुढारी प्रयत्न करतात. त्यानंतर आपल्या नातलगांची वर्णी योजना राबविणा-या समितीमध्ये लागावी यासाठी राजकीय गॉडफादर मार्फत सेटींग लावल्या जाते. एकदा शासकीय रक्कम योजनेच्या खात्यात जमा झाली की, ती आपलीच मालमत्ता आहे असे समजुन समितीचे पदाधिकारी त्याचा वापर करतात हे वेळोवेळी उघड झाले आहे. त्यामुळे घाटंजी तालुक्यात पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून आजवर कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च झाला असला तरी बहुतांश योजना अर्धवट आहेत. कागदोपत्री तांत्रिक अडचणी दाखवुन योजना जाणीवपुर्वक अपुर्ण ठेवल्या जात आहेत. त्यानंतर त्याच पाणी पुरवठा योजनेवर वाढीव निधीची मागणी करून हे भ्रष्टाचारी आपली कधीही न शमनारी ‘तहान’ भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पाणी पुरवठा योजनेत गैरप्रकार करणा-यांवर तडकाफडकी फौजदारी कार्यवाही करण्यात यावी असे शासनाचे सक्त निर्देश असले तरी शासकीय निधीवर आपले पोट भरणा-या राजकारण्यांचा दबाव व पैशापुढे लाचार होऊन पुढा-यांच्या ईशा-यावर चालणारे अधिकारी यांच्यामुळे अशा प्रकरणात केवळ चालढकल करून कार्यवाहीसाठी टाळाटाळ केल्या जाते.
तालुक्यातील वासरी, भांबोरा व कुर्ली येथिल भारत निर्माण योजनेत झालेले गैरप्रकार स्थानिक कार्यकत्र्यांनी केलेल्या तक्रारीमुळे चर्चेत आले आहेत. काही वर्षांपुर्वी जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत निवड झालेली २० गावे व भारत निर्माण योजनेंतर्गत २३ गावांना विपुल प्रमाणात निधी वितरीत झाला असुनही बहुतांश गावांमध्ये या योजना पुर्णत्वास गेल्या नाहीत. खर्च झाला असतांना योजनेची उद्देश्यपुर्ती का झाली नाही हा अतिशय गंभिर प्रश्न आहे. 
मात्र प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधी याकडे कधीच लक्ष देतांना दिसत नाहीत. वासरी येथिल वादग्रस्त ठरलेल्या भारत निर्माण योजनेत १२ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणात मनसेचे प्रशांत धांदे यांनी तक्रार केली होती. गैरप्रकार झाल्याचा अहवाल देऊनही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यास यंत्रणेने तब्बल ४ महिण्यांचा कालावधी घेतला. या प्रकरणात तत्कालीन सरपंच दत्ता जाधव व योजनेच्या सचिव स्व.सखुबाई कचाडे यांचेवर गुन्हे दाखल झाले असले तरी ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी आलेल्या त्या बारा लाख रूपयांचे काय झाले हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. 
भांबोरा येथेही भारत निर्माण योजनेची हिच स्थिती आहे.  कौटुंबिक लोकांनी एकत्र येऊन योजनेच्या खर्चात मोठा घोळ केल्याचा आरोप होत असुन जि.प.सदस्य उषा राठोड, समितीच्या अध्यक्ष रेणुका चव्हाण व समितीचे सचिव रामसिंग राठोड यांनी कागदोपत्री खर्च दाखवुन योजना अर्धवट ठेवल्याची तक्रार माजी पं.स.सदस्य सहदेव राठोड यांनी केली होती. मात्र अद्याप या प्रकरणाची योग्य प्रकारे चौकशी झालेली नाही. कुर्ली येथिल भारत निर्माण योजनेत घोळ झाल्याची तक्रार सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी संबंधीतांकडे केली आहे. सुमारे १० लाख २६ हजार रूपये निधी खर्च झाल्याचे पाणी पुरवठा समितीचे तत्कालीन अध्यक्ष विलास बडगुलवार यांनी दाखविले आहे. मात्र प्रत्यक्षात तो खर्च झालाच नसल्याचा आरोप होत आहे. उल्लेखनिय म्हणजे बडगुलवार यांनी नागरिकांच्या मागणीवरून ग्रामसभेतही या योजनेत झालेल्या खर्चाचा हिशेब सादर केला नाही. या प्रकरणीही प्रशासनाने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तालुक्यातील सुमारे ६६ गावांमध्ये पाणी टंचाई आहे. प्रशासनाने कथितपणे त्यासाठी उपाययोजनाही केल्या आहेत. मात्र विवीध योजनांच्या  माध्यमातुन कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडविण्या ऐवजी दरवर्षी पाणी टंचाईचा केवळ उहापोहच केल्या जात असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने अधिग्रहीत केल्याचे दाखविलेल्या विहिरींची संख्या व प्रत्यक्षात अधिग्रहीत विहिरींचा होत असलेला वापर सुद्धा संशयाच्या भोव-यात आहे. एकंदरीतच जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व अधिका-यांनी पाणी टंचाईचा आढावा घेतांना भ्रष्टाचाराने पोखरलेल्या पाणी पुरवठा योजनांचाही विचार केला व त्यावर तत्परतेने कार्यवाही केली तर भविष्यात कदाचित पाणी टंचाईचा आढावा घेण्याचीही गरज भासणार नाही हे निश्चित.

Tuesday 17 April 2012

अनेक वर्षांपासुन ‘ती’ टाकी पाण्याच्या प्रतिक्षेत

खर्च झाला मात्र पाणी नाही
भारत निर्माण मध्ये लाखोंचा घोळ
भ्रष्टाचाराची चौकशी थंडबस्त्यात

तब्बल २० ते २५ लाख रूपये खर्च होऊनही भांबोरा येथिल पाणी पुरवठा योजनेच्या टाकीत अनेक वर्षांपासुन पाण्याचा थेंबही पोहचला नाही. 
ही योजना राबविण्याची जबाबदारी खांद्यावर असलेल्या पदाधिका-यांनी आर्थिक गैरव्यवहार करून आपले हात ओले करून घेतले. मात्र यामुळे तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या भांबोरा येथिल ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण हिंडावे लागत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गावात असलेल्या जुन्या विहिरीवर जिवन प्राधिकरणामार्फत सुमारे १७ लाख रूपये खर्च करून पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली. यामध्ये विहिरीची दुरूस्ती, टाकी, पाईपलाईन ईत्यादी खर्चाची तरतूद होती. मात्र या योजनेत त्यावेळी आर्थिक गैरव्यवहार झाल्याने योजना पुर्णत्वास गेली नाही. त्यानंतर भारत निर्माण योजनेंतर्गत अपुर्ण राहिलेल्या या योजनेसाठी सुमारे १४ लाख रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला. मात्र तत्कालीन सरपंच व विद्यमान जि.प.सदस्य उषा राठोड, योजनेचे सचिव असलेले त्यांचे पती रामसिंग राठोड व या दोघांच्या नातेवाईक असलेल्या योजनेच्या अध्यक्ष रेणुका चव्हाण यांनी कागदोपत्री खर्च दाखवून योजना अर्धवट ठेवली. त्यामुळे लाखो रूपयांचा खर्च, १० ते १५ वर्षांचा कालावधी होऊनही भांबो-यातील गावक-यांना या योजनेतील पाण्याचा थेंबही नशिबी आला नाही. या गैरप्रकाराच्या अनेक तक्रारी झाल्या, आंदोलनेही झाली, चौकशीचे आदेशही आले मात्र आजवर ना कोणाची गांभिर्याने चौकशी झाली ना कोणावर कार्यवाही. जाणीवपुर्वक या योजनेला यशस्वी न होऊ देणा-या पदाधिका-यांच्या काही नातेवाईकांनी गावात खासगी पाणी पुरवठा योजना सुरू करून एक नवाच व्यवसाय सुरू केला. खासगी नळ योजनेंतर्गत नळ कनेक्शन घेण्यासाठी पाच हजार रूपये अनामत व १५० रूपये महिन्याप्रमाणे दर आकारल्या जात आहे. पाणी पुरवठा होत नसतांनाही ग्रामस्थांना ग्रा.पं.चा पाणीकर मात्र भरावाच लागत आहे. भारत निर्माण योजनेतून मंजुर झालेल्या रकमेचा पहिला हप्ता ४,५६,९२९ रू, जमा झालेली लोकवर्गणी ६०,००० रू, आरंभीची शिल्लक १०,००० रू., बँकेचे व्याज ६७११ रू. असा एकुण ५,३३,६४० रू निधी योजनेच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता. त्यापैकी ५,२०,६०४ रू १७ ऑक्टोबर २००८ पर्यंत खर्च झाले आहेत. मात्र करण्यात आलेला खर्च संशयास्पद असुन कागदोपत्री दाखविण्यात आलेल्या वस्तू प्रत्यक्षात वापरण्यात आल्याचे दिसत नाही. मंजुरी नसतांना बंधा-याचा खर्च दाखविणे, लोकवर्गणीची रक्कम परत केल्याची नोंद व ग्रामसभेच्या ठरावासह अनेक बिलांमध्ये प्रचंड खोडतोड करून हिशोबाची जुळवाजूळव केल्या गेली आहे. उपविभागीय अभियंता पाणी पुरवठा विभाग, पांढरकवडा यांनी माजी पं.स.सदस्य सहदेव राठोड यांच्या तक्रारीवरून केलेल्या चौकशीत या गोष्टींकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसुन येत आहे. उपविभागीय अभियंत्यांनी थातुरमातुर चौकशी केल्याने राठोड यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार विभागीय भारत निर्माण कक्ष व उपायुक्त (विकास) अमरावती यांनी १२ ऑक्टोबर २०११ ला मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग, जि.प.यवतमाळ यांना चौकशीचे आदेश दिले होते. मात्र अद्यापही चौकशी थंडबस्त्यातच आहे. या योजनेच्या निधीतून दाखविण्यात आलेला खर्च व प्रत्यक्षात झालेले काम याचा ताळमेळ जुळत नाही. या योजनेच्या निधीमध्ये आपले हात ओले करून घेतलेल्या तत्कालीन सरपंच व विद्यमान जि.प.सदस्य यांनी जि.प.निवडणुकी दरम्यान भ्रष्टाचाराचे ‘प्रतिक’ बनलेल्या याच पाण्याच्या टाकीवर आपल्या प्रचाराचा फलक लावला होता हे विशेष. टाकीवर प्रचार फलक लागल्याने पाणी येईल या वेड्या आशेने ग्रामस्थांनी आपली मते दिली. अत्यंत काठावर त्या निवडूनही आल्या. मात्र ‘ती’ टाकी अद्यापही पाण्यासाठी वाटच पाहात आहे.
साभार :- देशोन्नती 


Sunday 15 April 2012

स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठ्याच्या आश्वासनाची पुर्तता-अभिषेक ठाकरे



आमडी येथिल ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासुन मुबलक पाण्यापासुन वंचित होते. उन्हाळ्यात पाण्यासाठी महिलावर्गाची प्रचंड वणवण होत होती. गावक-यांना स्वच्छ व मुबलक पाणी पुरविण्याचे धेय्य पुढे ठेवुन वाटचाल केल्याने आज हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या आश्वासनाची पुर्तता झाल्याचा आनंद होत असल्याचे मत घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा आमडी ग्रा.पं.सरपंच अभिषेक ठाकरे यांनी व्यक्त केले.
आमडी ग्रामपंचायतींतर्गत राष्ट्रीय पेयजल योजनेतून मंजुर झालेल्या सुमारे ५० लाखांच्या पाणी पुरवठा योजनेच्या भुमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. आमडी येथे नुकताच या पाणी पुरवठा योजनेचा भुमिपूजन कार्यक्रम सरपंच अभिषेक ठाकरे यांचे हस्ते संपन्न झाला. अध्यक्षस्थानी सुरेश राठोड (नाईक) होते. यावेळी ग्रा.पं.सदस्य थावरसिंग चव्हाण, विठुजी वाढ़गुरे, किशोर वानखेडे, मंदा गिनगुले, नर्मदा लढे, पुष्पा कनाके, आमडी येथिल जेष्ठ नागरीक शंकर ठाकरे, बाबाराव महल्ले, विठ्ठल गावंडे, नामदेव पांगुळ, उत्तम चव्हाण, उमाकांत ठाकरे, सिताराम ठाकरे, डोमाजी जाधव, हिरालाल जयस्वाल, रमेश डंभारे, अंबादास निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
या योजनेतून आमडी येथे उद्भव विहिर, नलिका वितरण व्यवस्था व पाण्याची उंच टाकी ही कामे करण्यात येणार आहे. सरपंच अभिषेक ठाकरे यांच्या विषेश प्रयत्नातून आमडी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पेयजल योजनेतून सन २०१२-१३ या वर्षासाठी ४९,२२,३२२ रू निधी मंजुर झाला आहे. त्यापैकी ४,९२,२३२ रू रक्कम लोकवर्गणीतून भरण्यात आली आहे. पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता यावले, सह अभियंता गभणे यांनी या कामाचा आराखडा तयार केला आहे. 
ही योजना पुर्णत्वास येताच आमडी येथिल गावक-यांना पाण्याची चणचण भासणार नाही याबद्दल अनेकांनी यावेळी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजु जाधव, अरूण नाईक, मारोती कुकडे, तानबा कुकडे, किसन गिनगुले, निलेश ठाकरे, देवराव वाढगुरे, हरसिंग राठोड, मोहन चव्हाण, पुरूषोत्तम नाईक यांनी अथक परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती 



Friday 13 April 2012

मोहदा येथे व-हाडाच्या वाहनाला अपघात: १ ठार; १२ जखमी


घाटंजी तालुक्यालगत असलेल्या मोहदा ता. पांढरकवडा येथे लग्न वरातीच्या वाहनाला आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर १२ व-हाडी जखमी झाले. मोहदा येथुन लग्न आटोपुन निघालेले मॅक्स पिक अप हे वाहन मोहद्यापासुन दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आसोली गावाजवळ उलटले. त्यामुळे या वाहनात बसुन असलेले शिवलाल रायसिंग राठोड (४०) रा. कारेगाव यावली यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या सुमारे १२ व-हाड्यांना यवतमाळ येथे भरती करण्यात आले असुन त्यापैकी गंभिर जखमी असलेल्या चौघांना सेवाग्राम येथे उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे. जखमींमध्ये पवन ठाकुर पवार (२७), विक्रम मधुकर पवार (१५), रूपेश राजु जाधव (१०), गुलाब जांभुळकर (२४), वाल्मीक ढोबळे (१६), जयश्री राजु जाधव (१२), दुर्गा राजु जाधव (३५), नरेश चांदेकर (३५) संदिप पवार (३२), राजु वासुदेव जाधव (२७), संतोष नेवारे (३५) यांचा समावेश आहे. कारेगाव तांडा येथिल गजानन रामदास राठोड याचे मोहदा येथिल दामु जाधव यांच्या मुलीशी लग्न होते. लग्न आटोपून परता जातेवेळी हा अपघात घडला. 


दोन लाखांची अफरातफर करणा-या आरोपींना  मध्यप्रदेशातून अटक

येथिल बिर्ला जिनिंग मध्ये कापसाच्या वजनकाट्यात खोडतोड करून जिनिंग मालकाला तब्बल १ लाख ८६ हजार रूपयांनी गंडा घालणा-या दोन आरोपींना मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातून अटक करण्यात आली. काल (दि.१२) च्या मध्यरात्री घाटंजी पोलीसांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपी हितेष उर्फ रितेष राजु राठोड (२२) रा.शेगाव जि.खरगोन मध्यप्रदेश व रविराज मधुसूदन पवार (२२) रा.बंजर ता.भिकनगाव जि.खरगोन मध्यप्रदेश या आरोपींना रात्रीच घाटंजी येथे आणण्यात आले. सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरूनूले यांचे नेतृत्वात पोलीस कर्मचारी उमेश चंदन व सारंग बालपांडे यांनी ही कार्यवाही केली. फिर्यादी गोपाल रूडमल मित्तल यांच्या तक्रारीवरून घाटंजी पोलीसांनी आरोपींविरूद्ध कलम ४०६, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
साभार :- देशोन्नती 



‘कागदी’ मजुरांच्या सोयीसवलतीही कागदावरच !

रोहयोच्या कामात सर्व नियम धाब्यावर

ग्रामिण भागातील कुटूंबांना रोजगार मिळुन त्यांच्या आर्थिक निर्वाहाची सोय व्हावी यासाठी राबविण्यात येत असलेली महत्वाकांक्षी रोजगार हमी योजना कागदोपत्रीच यशस्वी ठरत असल्याचे चित्र आहे. ही योजना राबवितांना पालन करावयाच्या अटी व नियम पडताळुन पाहिले तर एकाही नियमाची पुर्तता होत असतांना दिसत नाही.
जिथे काम सुरू आहे त्या भागातील पाच किलोमिटर परिसरातील मजुरच कामावर असावेत हा नियम आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्याबाहेरील मजुर नोंदणीकृत मजुरांच्या जागी काम करतात. स्थानिक मजुरांमध्ये कामाची क्षमता नसल्याचे कारण देत ठेकेदार बाहेरील मजुर आणण्यालाच प्राधान्य देतात. नियोजन आराखडा तयार करतांना ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात काम करावयाचे आहे ती ग्रामपंचायत व ग्रामसभा यांचा सहभाग असणे गरजेचे असते. ग्रामपंचायतीने सुचविलेली व योजनेत असणारी कामे आराखड्यात समाविष्ट करण्यात यावी असाही नियम आहे. 
काम करणा-या मजुरांना विवीध सोयी सवलती द्यावात, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी अनेक उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, दुपारच्या सुट्टीत विश्रांतीसाठी सावली, निवा-याची सोय, प्रथमोपचाराची व्यवस्था, महिला मजुरांसोबत येणा-या सहा वर्षाखालील बालकांना सांभाळण्यासाठी बाईची नेमणुक तसेच पाळणा व निवा-याची सुविधा, खडी फोडणा-या मजूरांसाठी चष्मा, कामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास वारसास सानुग्रह अनुदान, स्त्री मजुरांना प्रसुती रजा, मजुरांनी कामावर वापरलेली स्वत:ची हत्यारे, अवजारे यांचे भाडे, हत्यारांना धार लावण्याचा मोबदलाही देण्यात यावा असा निकष आहे. मात्र यापैकी एकाही अटीचे काटेकोरपणे पालन होत असल्याचे दिसत नाही. त्यामुळे कागदोपत्री असलेल्या बोगस मजुरांसाठी दाखविण्यात येत असलेल्या सोयी सवलती सुद्धा कागदोपत्रीच असल्याने या योजनेचा मुळ उद्देशच डागाळला आहे.
साभार :- देशोन्नती 


रोहयोच्या कामातील ४० टक्के रक्कम अधिका-यांच्या खिशात

प्रत्येक कामाचा ‘दर’ ठरलेला
कार्यालयातूनच कामाची पाहणी

ग्रामिण भागातील विकासकामे, निसर्ग संवर्धनाची कामे करण्यासाठी रोहयोंतर्गत आलेल्या निधीतील सुमारे ४० टक्के रक्कम ‘कमीशन’च्या स्वरूपात अधिका-यांच्या खिशात जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजनेंतर्गत घाटंजी तालुक्यात सुरू असलेल्या कोट्यवधी रूपयांच्या कामांचे घसघशीत कमीशन अधिका-यांना मिळत असल्याने रोहयोचे प्रत्येक काम कंत्राटदारांमार्फतच  करण्याचा सपाटा अधिका-यांनी लावला आहे. प्रत्येक स्तरावर अधिकारी व कर्मचा-यांच्या स्वाक्षरीचे ‘दर’ ठरलेले असल्याने कंत्राटदारही कामाच्या दर्जाबाबत निश्चिंत राहतात. ठरलेले कमीशन मिळाले की, अधिकारी कोणत्याही गोष्टींची पडताळणी न करता हिरवी झेंडी दाखवितात. प्रसंगी नियमांना फाटा देऊन कंत्राटदारांच्या फायद्यासाठी गरज नसलेल्या ठिकाणी कामांना मान्यता दिल्या जात असल्याची माहिती आहे. प्रत्येक कामाच्या एकुण रकमेतील सुमारे ४० टक्के रक्कम अधिकारी व कर्मचा-यांमध्ये विभागल्या जात असल्याने कामे निकृष्ट होणार नाहीतर काय? असे एका वंâत्राटदाराने खासगीत सांगीतले. 
कामाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी तहसिल कार्यालयात अधिका-याला ३ हजार रूपये मिळतात. तर घाटंजी तहसिल कार्यालयातील एक महिला लिपीक फाईल पुढे रेटण्यासाठी ५०० रूपये ‘परिश्रम शुल्क’ घेते. तांत्रीक मान्यतेसाठी वनपरिक्षेत्र अधिका-याला २ हजार तर त्या संबंधीत लिपीकाला ५०० रूपये मिळतात. जलसिंचनाची कामे जसे, पाझर तलाव, वनतलाव, वन्यजीव पाणी पुरवठा तलाव, मातीचे बांध, दगडी बांध, वनराई बंधारे, मातीचे धरण, भुमिगत बंधारे यासह विवीध कामांना या प्रकाराचे कोणतेही तांत्रिक ज्ञान नसतांना वनविभागाचे अधिकारी तांत्रिक मान्यता कशी काय देऊ शकतात हा मुख्य प्रश्न आहे. काम पुर्ण झाल्यावर मागणी पाठवितांना कामाच्या रकमेतील १५ टक्के रक्कम वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी २० टक्के, क्षेत्र सहाय्यक ३ टक्के, वनरक्षक २ टक्के व ५ टक्के रक्कम तहसिलदाराच्या वाटणीला येते अशी माहिती आहे. 
महसुल प्रशासनाच्या अधिका-यांनी रोहयोच्या कामांवर प्रत्यक्ष भेट देऊन कामाचा दर्जा, मजुरांची उपस्थिती यासह विवीध बाबींची पाहणी करणे अपेक्षीत असतांना अधिकारी मात्र कार्यालयातुनच कामाच्या स्थळी भेट दिल्याचे प्रमाणपत्र देऊन टाकतात. त्यामुळे एकंदरीतच सर्वानुमते शासनाच्या निधीची सोयीस्करपणे विल्हेवाट लावण्याचा प्रकार खुले आमपणे सुरू असल्याने रोजगार हमी योजनेच्या मुळ उद्देशाला हरताळच फासल्या गेला आहे.
साभार :- देशोन्नती


Tuesday 10 April 2012

लाकडाच्या काळाबाजारातील व्यापारी उतरले रोहयोच्या कामात

पारवा वनपरिक्षेत्रात प्रचंड गैरप्रकार
बंधारे खोदताना झाडांची कत्तल

महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणा-या कामांमध्ये लाकडाचा काळाबाजार करणा-या व्यापा-यांचा शिरकाव झाला आहे. रोहयोची कामे संबंधीत विभागाने मजुर लावून करावी असा नियम आहे. मात्र अधिकारी या नियमाला धाब्यावर बसवुन कंत्राटदारांना ही कामे देत असल्याचा धक्कादायक प्रकार घाटंजी तालुक्यासह ईतरही भागात बिनबोभाटपणे सुरू आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणारी अनेक कामे प्रामुख्याने निसर्ग संवर्धन व पर्यावरणाशी संबंधीत आहेत. मात्र ही कामे करतांना झाडांची बेसुमार कत्तल केल्या जात आहे. बंधारे, वनतळे यासह विवीध कामांमध्ये येणा-या आजुबाजूच्या वनराईला तोडण्यात येत असल्याने या कामातून नेमके कोणते निसर्ग संवर्धन साधल्या जात आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. पारवा वनपरिक्षेत्रात हा प्रकार सर्रास सुरू आहे. रोहयोच्या कामातील मलिद्यासह आजुबाजूची मौल्यवान झाडे तोडण्याचा अलिखीत परवानाच मिळत असल्याने लाकडाच्या काळाबाजारातील तगडे व्यापारी आता रोहयोच्या कामातही उतरले आहेत. जिल्ह्यातील लाकडाच्या ठेकेदारीत चर्चेत असलेले लच्छु पाटील, अमीन शेख, राम बाबु, मुन्ना सेठ यांचा या कामांमध्ये सध्या चांगलाच बोलबाला आहे. प्रादेशिक पक्षांच्या स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन हे व्यापारी धडाक्यात ही कामे करीत आहेत. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा केळापूर तालुक्याचा एक पदाधिकारी या कामांमध्ये आघाडीवर आहे. स्थानिक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते अधिका-यांशी संगनमत करून रोहयोची कामे बळकावीत असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे. नियमानुसार एका गावामध्ये रोहयोंतर्गत जास्तीत जास्त ६० लाखांची कामे करता येतात. मात्र राजकीय दबावतंत्र तसेच मिळणा-या कमीशनसाठी अधिकारी काही गावांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त निधीच्या कामाना मंजुरात देत आहेत. रोहयोची बरीच कामे जंगलात करण्यात येत असल्याने सागवानासारखी मौल्यवान झाडे कंत्राटदारांच्या घशात जात आहे.
साभार :- देशोन्नती 

बेजबाबदार एस.टी. चालक वाहकाची तक्रार


एस.टी.मध्ये प्रवाशांना बसू न देता रिकामी बस यवतमाळकडे नेणा-या चालक वाहकाला प्रवाशांनी जाब विचारला असता त्यांनी गैरवर्तणुक केली अशी तक्रार सामाजीक कार्यकर्ते मधुकर निस्ताने यांनी संबंधीतांकडे केली आहे. घाटंजी बसस्थानकावर दि.२१ मार्चला दुपारी १.३० वाजता यवतमाळ करीता जाणारी सर्वसाधारण बस उभी होती. त्यामध्ये अनेक प्रवासी बसलेले होते. तेवढ्यात त्या बाजुलाच जलद बसही लागली होती. ही बस अगोदर जाणार म्हणुन बहुतांश प्रवाशी साधारण बस मधुन उतरून जलद बसमध्ये जाण्यास निघाले. मात्र अचानकच ती बस सुरू झाली. त्यामध्ये एकही प्रवाशी नव्हता. दुस-या बसमधील प्रवाशी येत असल्याचे दिसुनही चालक व वाहकाने बस थांबविली नाही. महिला व जेष्ठ नागरीक बसमागे धावत होते. एवढ्यात काही लोक बस समोरून आल्याने चालकाला बस थांबवावी लागली. पाहुण्यांना यवतमाळ बस मध्ये रवाना करण्यासाठी आलेल्या निस्ताने यांनी सदर चालक वाहकाला प्रवाशांना बस मध्ये घेण्याची विनंती केली. मात्र ती धुडकावुन चालक दांडगे व वाहक आत्राम यांनी तक्रारकर्त्यालाच शिवीगाळ करणे सुरू केले. तसेच बस मध्ये चढणा-यांना खाली ढकलण्याचाही प्रयत्न केला. यावेळी तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते. चालक वाहकाच्या असभ्य वर्तणुकीची तक्रार विभाग नियंत्रकाकडे करण्यात आली असुन त्यांचेवर कडक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. बसस्थानकावर असे प्रकार नेहमीचे झाले असुन एस.टी.चे काही चालक वाहक अनेकदा बसस्थानक प्रमुखालाही जुमानत नसल्याचे दिसते. एस.टी. महामंडळ सौजन्यपुर्ण सेवेचा गाजावाजा करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र प्रवाशांना कर्मचा-यांच्या वागणुकीमुळे अनेकदा अपमानीत व्हावे लागते. बेजबाबदार कर्मचा-यांवर कार्यवाहीच होत नसल्याने अशा प्रकारांमध्ये वाढ झाली असल्याचे निदर्शनास येत आहे.
साभार :- देशोन्नती 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्य घाटंजीत विवीध कार्यक्रम


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२१ व्या जयंती निमित्य घाटंजीत विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १४ एप्रीलला सकाळी सायकल रॅली काढण्यात येईल. संत गाडगेबाबा नगर, नेहरू नगर, बसस्थानक, जयभिम चौक, घाटी अशा विवीध भागात पंचशील ध्वजाला अभिवादन करण्यात येईल. सायंकाळी ७ वाजता कँडल मार्चसह डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येईल. दि.१५ एप्रीलला दुपारी १२ वाजता धम्मज्ञान स्पर्धा, २ वाजता वेशभुषा स्पर्धा, ३ वाजता वक्तृत्व स्पर्धा, ४ वाजता समुह व एकलनृत्य स्पर्धा घेण्यात येईल. सायंकाळी ६ वाजता घाटंजी आयडॉल स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. दि. १६ एप्रील रोजी दुपारी ४.३० वाजता बक्षीस वितरण व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६.३० वाजता भिमशाहीर राजेंद्र कांबळे व संच यांचा आंबेडकरी क्रांतीचा हुंकार हा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.
साभार :- देशोन्नती 

शिवणी जि.प.शाळेत शिक्षण महोत्सव


तालुक्यातील शिवणी जि.प.शाळेत नुकतेच शिक्षण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच कुडसिंग राठोड यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी दमडू राठोड होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद आडे, सुभाष कनाके, गोपीचंद पवार, मोहन चव्हाण, सुभाष राठोड, रेखा आडे, संजु पवार, यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्याथ्र्यांनी तयार केलेले शैक्षणीक साहित्य, कलाकृती, शिक्षकांनी तयार केलेल्या प्रतिकृती याची मान्यवरांनी पाहणी करून त्याबाबत माहिती घेतली. या निमित्याने सांस्कृतीक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट साहित्य तयार केल्याबद्दल पुजा वामन राठोड हिला प्रथम, रोहिणी कुमरे द्वितीय, तुषार वाढई तृतिय तर रेखा राठोड या विद्यार्थीनीला प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापीका अनिता व-हाडे यांनी केले. संचालन आर.ए.राठोड तर आभार प्रदर्शन हितेश राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदिप राऊत, प्रगती फुटाणे, अरूणा चिंतावार, संगिता गेडाम, अनिता टेकाम यांनी परिश्रम घेतले. 
साभार :- देशोन्नती 



घाटंजीत रोहयोच्या कामांमध्ये जेसीबीचा धुमाकूळ



गेल्या काही महिन्यांपासुन घाटंजी तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये जेसीबीचा खुले आम वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. वनविभाग त्यामध्ये आघाडीवर आहे.  तालुक्यातील अनेक भागांमध्ये सध्या वनविभागातर्फे बंधा-यांचे काम सुरू असुन त्यासाठी जेसीबीचाच प्रामुख्याने वापर होत आहे. रोजगार हमी, ‘अर्धे तुम्ही अर्धे आम्ही’ या एकाच वाक्याने शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेत नेमका काय प्रकार सुरू आहे हे लक्षात येते. घाटंजी व पारवा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत बंधारे, वन्यजीवांसाठी पाणी साठवण तलाव, यासह विवीध कामे सध्या सुरू आहेत. ही सर्व कामे रोजगार हमी योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या मजुरांच्या माध्यमातून करण्यात यावीत असा नियम आहे. मात्र महसुल व वनविभागाच्या अधिका-यांनी या नियमाला सपशेल हरताळ फासुन बिनदिक्कतपणे जेसीबी व तत्सम यंत्रांचा वापर करून ही कामे करण्याचा सपाटा लावला आहे.
बहुतांश ठिकाणी रात्रीच्या वेळी ही कामे केल्या जात आहेत. संबंधीत कामांवर एकही मजुर उपस्थित नसतांना मस्टरवर मात्र मजुरांची उपस्थिती असल्याचे दाखविण्यात येत असल्याची माहिती आहे. या योजनेंतर्गत होणारी अनेक कामे अनावश्यक ठिकाणी करण्यात येत असल्याच्याही तक्रारी आहेत. ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होऊ शकत नाही तिथे बंधारे बांधण्याची किमया वनविभाग करीत आहे.
साभार :- देशोन्नती 

Tuesday 3 April 2012

रत्नजडीत रामरथाने वेधले हजारो घाटंजीकरांचे लक्ष

रामनवमी शोभायात्रेला अभुतपुर्व प्रतिसाद

भक्ती, उत्साह आणी डोळ्यांचे पारणे फेडणा-या अलोट गर्दीच्या साक्षीने घाटंजीत रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्य मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या शोभायात्रेला संपुर्ण घाटंजी तालुक्यातुन हजारो भाविकांनी हजेरी लावली. आबालवृद्धांसह महिलावर्गाची यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सायंकाळी ६ वाजता येथिल जलाराम मंदिरापासुन मिरवणुकीला सुरूवात झाली. आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेला अष्टधातुचा रत्नजडीत रामरथ पाहण्यासाठी नागरीकांची प्रचंड गर्दी झाली होती. लक्ष वेधुन घेणा-या चकाकीसह कोरीव नक्षीकामाने सजविलेल्या रामरथाने मिरवणुकीची शोभा वाढविली. अनेक भक्त हा रथ ओढण्यासाठी स्वयंस्फूर्तीने  पुढे येत होते. परळी वैजनाथ येथिल प्रसिद्ध ढोल ताशाच्या तालात हजारो रामभक्तांनी ठेका धरला. रस्त्याच्या बाजुने केलेल्या विद्युत रोषणाईमुळे शहर उजळुन निघाले होते. सकाळपासुनच सर्वत्र लावण्यात आलेल्या लाऊडस्पिकर मधुन रामधुन वाजविण्यात येत होती. त्यामुळे वातावरण भक्तीमय झाले होते. प्रभु श्रिराम, राधाकृष्ण, शिवाजी महाराज, रामभक्त हनुमान, भगवान महादेव यांच्या प्रतिमांचे आकर्षक देखावे साकारण्यात आले होते. फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी करीत ही शोभायात्रा महाराणा प्रताप चौक, सिनेमा टॉकीज चौक, जुना बसस्थानक परिसर, पोलीस स्टेशन चौक, राम मंदिर या मार्गाने शिवाजी चौकात विसर्जीत करण्यात आली. शोभायात्रेच्या मार्गावर शरबत, मठ्ठा, महाप्रसाद व थंड पाण्याची व्यवस्था प्रिती कोल्ड्रींक्सचे भावेश सुचक, शुभमंगल बर्तन भंडार, रमेश सायरे, अशोक गावंडे, जलाराम मंदीर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शिवम हॉटेल, शिव सायकल स्टोअर्स, महिला मंडळ यांनी केली होती. सर्वप्रथम जलाराम मंदिरात रामजन्माचा सोहळा पार पडला. येथे विविध आध्यात्मीक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान घाटंजीचे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. शोभायात्रेचे संयोजक विक्रम जयस्वाल यांचेसह शेकडो कार्यकर्त्यांनी शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती 


रामनवमी शोभायात्रेतील क्षणांची छायाचित्रे खास आपल्यासाठी




































छायाचित्र :- अमोल राऊत, अमोल वारंजे, मिलींद लोहकरे, बादल झाडे, वैष्णवी फोटो स्टुडीओ, घाटंजी