Pages

Friday 24 February 2012

शिवरायांच्या कर्तृत्वाला जगात तोड नाही - ना.मोघे

शिवजयंती उत्सवात नवनिर्वाचीतांचा सत्कार


















शिवरायांचे कार्य त्यांचे कर्तृत्व आणी त्यांनी दिलेली शिकवण याला जगात तोड नसुन त्यांच्या चारित्र्याचे अध्ययन करून ते आत्मसात करण्याची गरज आहे असे प्रतिपादन सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनी केले. येथिल शिवतिर्थावर आयोजीत शिवजयंती उत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्याकाळी गुलामगीरीत जखडलेल्या समाजाला त्यातुन मुक्त केले. सर्व धर्मांचा सन्मान त्यांनी राखला. त्यांचे प्रत्येक कार्य अनुकरणीय असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष जगदिश पंजाबी, उपाध्यक्ष अकबर तंव्वर, बांधकाम सभापती परेश कारीया, शिक्षण सभापती राम खांडरे, महिला व बालकल्याण सभापती शोभा ठाकरे सतिश भोयर यांचेसह नगरसेवकांची उपस्थिती होती. यावेळी नगर परिषदेच्या नवनिर्वाचीत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच हालाखीच्या परिस्थिती असतांना राष्ट्रीय स्तरावर क्रिडा क्षेत्रात नाव कमाविणा-या ससाणी येथिल राजु मेश्राम याचाही सत्कार यावेळी करण्यात आला. राजु हा सायकलपटू आहे. मात्र त्याचेजवळ सराव करण्यासाठी सायकल नाही. त्यामुळे ना. शिवाजीराव मोघे यांनी यावेळी राजूला आठ दिवसांच्या आत रेसिंगची सायकल देण्याचे आश्वासन दिले. याशिवाय राजे छत्रपती सामाजीक सभागृहाच्या वॉलकंपाऊंड करीता निधी अथवा नगर परिषदेच्या माध्यमातुन लवकरच पावले उचलण्यात येतिल असे आश्वासन ना.मोघे यांनी दिले. नगर परिषदेच्या पदाधिका-यांनीही याबाबीला दुजोरा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतिश भोयर, संचालन दिपक महाकुलकर व आभार प्रदर्शन प्रफुल्ल अक्कलवार यांनी केले.
साभार :- देशोन्नती  

Wednesday 22 February 2012

घाटंजीचे ग्रामदैवत संत मारोती महाराजांच्या यात्रेला सुरुवात




विदर्भात सर्वदुर प्रसिद्ध असलेल्या घाटंजीतील संत मारोती महाराज व तुकाराम महाराज यांच्या भव्य यात्रेला सुरुवात झाली आहे. दि.५ मार्च पर्यंत विवीध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. महाशिवरात्रीपासुन यात्रेला सुरूवात होते. 
ब्रम्हलीन परमहंस श्री. मारोती महाराज व श्री. तुकाराम महाराज हे घाटंजी शहराचे ग्रामदैवत आहे. दरवर्षी त्यांच्या नावाने घाटंजीत माघ वद्य प्रतिपदा ते वद्य अमावस्या पर्यंत भव्य यात्रा भरते. मारोती महाराजांच्या घाटंजीतील अवतरणाचा इतिहास फार जुना आहे. दि. २५ फेब्रुवारी १९४९ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी मारोती महाराज घाटंजीत प्रकट झाले. महाराजांचा जन्म तामसा नदिच्या तिरावर असलेल्या पिंपळगावात सन १८९२ साली सप्टेंबर महिन्यात झाला. पिता बळीरामजी चिवरकर व आई रेणुकाबाई यांचे ते खुप लाडके होते. महाराजांना शाळेत जाणे मुळीच आवडत नसे. ते शाळेला दांडी मारून नदिच्या वाळूत बसुन रहात असत. 
शाळेची घंटी होताच ते घरी जात. मात्र तरी देखील दरवर्षी ते परिक्षेत पास व्हायचे. त्यांचे वडील कोंडवाड्यात कारकुन होते. महाराजांचे ७ व्या वर्गापर्यंत शिक्षण झाल्यावर ते दापोरी खुर्द येथे शिक्षक पदी रूजू झाले. त्यानंतर त्यांच्या घरी लग्नाची बोलणी सुरू झाली. मात्र त्यांनी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. या काळातच त्यांनी सिद्धांत बोध ग्रंथ वाचला. त्यानंतर त्यांचे मन:परिवर्तन झाले. आईवडीलांचा मृत्यु झाल्यानंतर १९२७ मध्ये सावत्र आई यमुनाबाई यांच्याजवळ मंगरूळपीर तालुक्यातील इंझोरी येथे राहण्यास गेले. तेथे असलेल्या शिंपीनाथ बाबांच्या समोर असलेल्या निंबाच्या झाडावरच ते रात्रंदिवस राहु लागले. या काळात त्यांनी अन्नग्रहण केले नाही. कधी कधी ते धामणगाव देव येथे मुंगसाजी महाराजांच्या भेटीसाठी जात असत. एकदा मुंगसाजी महाराजांनी त्यांना भिंतीच्या खांडावर बसण्यास सांगीतले. सुमारे १३ दिवसपर्यंत बाबा तेथेच बसुन होते. या काळात मुंगसाजी महाराज त्यांना चटणीचे गोळे खायला देत असत. या परिक्षेत मारोती महाराज खरे उतरल्याने मुंगसाजी महाराज त्यांच्यावर प्रसन्न झाले. या दरम्यान दारव्हा पुसद भागात भ्रमण करतांना अनेकांना बाबांच्या दैवी शक्तींचा साक्षात्कार झाल्याने त्यांच्या शिष्यांमध्ये वाढ होऊ लागली. दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले लोक बाबांना शरण येत असत. एकदा मरणासन्न अवस्थेत असलेल्या बालकाला त्यांचेकडे आणले असता त्यांनी त्याचे तोंडात एक गोटा कोंबला. त्यामुळे ते बालक मरण पावले. त्या बालकाचे आई वडील संतप्त झाले. त्यांनी पोलीसात तक्रार दिली. पोलीस आल्यावर बाबांनी पोलीसांना शिव्या दिल्या व म्हणाले कोण म्हणतो ते बालक मृत आहे? असे बोलुन त्यांनी तोंडातील गोटा काढला. अन चमत्कार असा की ते मुल रडायला लागले. विषेश म्हणजे ते मुल सर्व व्याधींपासुन मुक्त झाले होते. तेव्हापासुन त्या मुलाचे आईवडील व इतर अनेक लोक बाबांचे निस्सिम भक्त झाले. १९४६ मध्ये मुंगसाजी महाराज मुंबईला गेल्यावर मारोती महाराज घाटंजी नगरीत आले. यवतमाळ जिल्ह्यात फिरत असतांना अनेक लोक त्यांची सेवा करू लागले. घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सचिव डी.पी. पेटकर व गणपतराव भोसले यांची बाबांवर श्रद्धा होती. माघ वद्य १३ रोजी २५ फेब्रुवारी १९४९ रोज शुक्रवार ला महाशिवरात्रीच्या दिवशी श्रवण नक्षत्रावर दुपारी बाराच्या सुमारास बाबा घाटंजीत आले. बाबांचे भक्त पेटकर व भोसले यांनी बाबांना रामचंद्र भोंग यांच्या घरी थांबवीले. आजही भोंग यांच्या निवासस्थानी बाबांचे ठाणे असुन बाबा बसायचे त्या बंगळीवर पादुका ठेऊन आहेत.
घाटंजीत घालविलेल्या काळात बाबांच्या शक्तीमुळे अनेक लोक त्यांचे भक्त होऊ लागले. घरोघरी त्यांची पुजा होत होती. बाबा घाटंजीत आले तेव्हा त्यांचेकडे पाहुन हा कुणी संत आहे का यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता. मात्र लोकांना आलेल्या अनुभूतीवरून त्यांच्या दैवी शक्तीची प्रचीती आल्याने ते घाटंजीकरांचे दैवत बनले. बाबांच्या चमत्कारांची किर्ती सर्वदुर पसरायला लागली. मसुद संस्थानचे राजेसाहेब बाबांच्या दर्शनाकरीता आले. शिवाय बडोदा संस्थानच्या राणी सुद्धा घाटंजीत आल्या. त्यावेळी त्यांनी पायदळ संपुर्ण गावातुन पेâरफटका मारला. त्यानंतर बाबांचे दर्शन घ्यायला दुरदुरचे लोक यायला लागले. दि, ११ ऑक्टोबर १९५३ रोजी कामठवाडा येथे चंपत पाटील यांच्या घरी बाबांच्या परमभक्त लोढीनबाई यांच्या मांडीवर डोके ठेऊन मारोती महाराजांचे निर्वाण झाले. त्यावेळी घाटंजी येथुन पेटकर, भोसले, पुरणसिंग बैस, रामचंद्र भोंग यांच्यासह शेकडो लोक दिंड्या घेऊन कामठवाडा येथे गेले. तिथुन बाबांचे पार्थिव घाटंजी येथे आणण्यात आले. येथे समाधी देऊन त्या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले. तेव्हापासुन दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवसापासुन घाटंजीत संत श्री मारोती महाराजांची भव्य यात्रा भरविण्यात येते. लाखो भाविक या दरम्यान महाराजांच्या दर्शनासाठी येतात. घाटंजीचे ग्रामदैवत म्हणुन संत श्री मारोती महाराजांचा लौकीक आहे. तसेच संत तुकाराम महाराजांचेही याच ठिकाणी मंदिर आहे.
यावर्षी यात्रेनिमित्य आयोजीत सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन न.प.अध्यक्ष जगदिश पंजाबी, न.प.उपाध्यक्ष अकबर तंव्वर, बांधकाम सभापती परेश कारीया, शिक्षण सभापती राम खांडरे, आरोग्य सभापती शोभा ठाकरे, महिला व बालकल्याण सभापती संगिता भुरे, नगरसेवक संदिप बिबेकार, मुख्याधिकारी गिरिष बन्नोरे यांचेसह सर्व नगरसेवक व कर्मचा-यांनी केले आहे.
साभार :- देशोन्नती 

Saturday 18 February 2012

घाटंजीत आज होणार एका अविरत संघर्षाचा सन्मान




वय वर्ष ७४, शिक्षण जेमतेम तिसरा वर्ग. परिस्थिती दोन वेळच्या जेवणाची सोय होईल अशी. या परिस्थितीतील व्यक्ती मोलमजुरी करून पोट भरणे एवढाच विचार करू शकते. मात्र चंद्रपुर जिल्ह्यातील दादाजी खोब्रागडे यांनी सर्वसामान्यांमध्ये राहुन असामान्य विषयाला हात घातला. तांदळाच्या नवनविन वाणांचे संशोधन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ची व त्यानुषंगाने देशाची एक वेगळी ओळख निर्माण करणा-या दादाजी नावाच्या साक्षात संघर्षाचा सन्मान घाटंजी येथे शिवजयंती उत्सवात आज होणार असुन त्यांना यावर्षीच्या वीर राजे संभाजी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यात नांदेड या छोट्याशा गावी हालाखीच्या परिस्थितीत जिवन जगत असतांना दादाजी खोब्रागडे यांनी अवघ्या दिड एकर शेतीमध्ये तांदळाची तब्बल नऊ वाणे विकसीत करून पुस्तकी ज्ञानाला सणसणीत चपराक दिली आहे. दादाजींच्या कर्तृत्वामुळे संशोधन हे केवळ ए.सी.च्या थंडगार हवेतच नाही तर ऊन, वारा, पाऊस सहन करून निसर्गाच्या सानिध्यात सुद्धा होऊ शकते हे त्यांनी सिद्ध केले.
आपल्या दिड एकर शेतीला नैसर्गीक प्रयोगशाळेचे रूप देऊन गेल्या चाळीस वर्षांपासुन दादाजी संशोधन करीत आहे. मात्र हे करीत असतांना त्यांना करावा लागलेला संघर्ष अकल्पनीय आहे.
१९८३ मध्ये दादाजीनी तांदळाचे एक नविन वाण विकसीत केले. या वाणाची पेरणी करून बघा असे त्यांनी गावातील शेतक-यांना सांगीतले. मात्र तेव्हा कोणीही त्याला महत्व दिले नाही. याला अपवाद ठरले ते याच गावातील भिमराव शिंदे हे शेतकरी. त्यांनी चार एकरात या वाणाची पेरणी केली. पहिल्याच वर्षी शिंदे यांना तब्बल ९० क्विंटल तांदूळाचे पिक झाले. तेव्हा त्यांची किर्ती सर्वत्र पसरू लागली. त्या काळात एच.एम.टी. कंपनीची घड्याळे प्रसिद्ध असल्याने दादाजींनी त्या वाणाला एच.एम.टी. हे नाव दिले. पंजाबराव कृषी विद्यापीठातील तज्ञांनी हे वाण तपासण्यासाठी घेतले. मात्र तिथे दादाजींचा घात झाला. विद्यापीठाने या वाणाच्या संशोधनाचे श्रेय दादाजींना देण्या ऐवजी  हे वाण पीकेव्ही एचएमटी या नावाने बाजारात आणले. तेव्हापासुन दादाजींचा विद्यापीठाशी संघर्ष सुरू आहे. चाळीस वर्षाच्या संघर्षाची दखल देशातील कोणत्याही कृषी विद्यापीठाने किंवा शासनाने घेतली नाही. मात्र फोर्ब्स या प्रतिष्ठीत मासिकाने त्यांच्या कार्याची दखल घेताच सर्वांना त्यांचे महत्व वाटू लागले. त्यानंतर दादाजींना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.  त्यांनी तांदळाची विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चिन्नुर, नांदेड दिपक, काटे एचएमटी व डीआरके सुगंधी अशी नऊ वाणे विकसीत केली असुन त्यांच्या एचएमटी सोना या वाणाला देशात प्रचंड मागणी आहे. विदर्भात गेल्या काही वर्षांपासुन शेतकरी आत्महत्यांची चर्चा होत असतांना प्रतिकुल परिस्थितीशी दोन हात करीत वेगळ्या वाटेने वाटचाल करणा-या या विदर्भपुत्राने आत्मविश्वासाचा संदेश समाजात पेरला आहे.
घाटंजीत आज रात्री ७ वाजता दादाजी खोब्रागडेंच्या या संघर्षाला मानाचा मुजरा करण्यासाठी शिवतिर्थ, जेसिस कॉलनी येथे वीर राजे संभाजी पुरस्काराने त्याना गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे उपाध्यक्ष वसंतराव पुरके, उपजिल्हाधिकारी श्यामकांत मस्के, लोकनेते सुरेश लोणकर, अण्णासाहेब पारवेकर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


घाटंजीत आजपासुन शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन

सामाजीक व सांस्कृतीक कार्यक्रमांची अनोखी मेजवानी

येथिल राजे छत्रपती सामाजीक संस्था व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवतिर्थ जेसिस कॉलनी येथे दि.१८ व १९ फेब्रुवारी ला शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
दि. १८ ला दुपारी ३ वाजता तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. दोन गटात होणा-या या स्पर्धेसाठी प्रत्येक गटातील विजेत्यांसाठी प्रथम बक्षिस १ हजार व १०१ रुपयांची १० बक्षिसे हर्षद दावडा यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
सायंकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळा होणार असुन या कार्यक्रमात नगर परिषदेच्या नवनिर्वाचीत सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे राहतील. यावेळी नगराध्यक्ष जगदिश पंजाबी, कुणबी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतिष भोयर, न.प.उपाध्यक्ष अकबर तंव्वर, बांधकाम सभापती परेश कारीया, राम खांडरे, संगिता भुरे, शोभा ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहील. त्यानंतर खुली समुहनृत्य स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षिस २ हजार स्व.मारोतराव अक्कलवार यांचे स्मृतीप्रित्यर्थ सुधाकर अक्कलवार यांचेकडून , द्वितीय १ हजार अरविंद मानकर यांचेकडून देण्यात येईल. दि.१९ ला सकाळी ८ वाजता मॅराथॉन स्पर्धा होणार आहे. खुल्या गटासाठी प्रथम बक्षिस १ हजार रूपये अनुप देव यांचेकडून, द्वितीय ५०१ रू मनोज ढगले यांचेकडून, तर ब गटासाठी प्रथम बक्षिस ७०१ रू.निमकर बंधु यांचेकडून, द्वितीय ५०१ रू.विशाल यल्लरवार यांचेकडून देण्यात येईल.
सकाळी ११ वाजता विदर्भस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘प्रसार माध्यमांची वाढती व्यावसायीकता लोकशाहीस मारक’ या विषयावर होणा-या या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षिस ३ हजार रूपये स्व.डॉ.ज्ञानेश्वर राऊत स्मृतीप्रित्यर्थ अमोल राऊत यांचेकडून, द्वितीय २ हजार रूपये भरत खाटीक यांचेकडून, तृतिय १ हजार रूपये पंकज तन्ना यांचेकडून देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी गिरीराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय मारावार राहतील. जितेंद्र ठाकरे, संजय पिसाळकर, रावसाहेब जुमनाके, हेमंत कांबळे, डॉ.मधुकर मडावी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील. सायंकाळी ५ वाजता फ्लॉवर डेकोरेशन स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम बक्षिस ७०१ रू. अनिता वर्हाडे यांचेकडून, द्वितीय ५०१  प्रमोद टापरे यांचेकडून  देण्यात येणार आहे.  सायंकाळी ६ वाजता शिवपुजन होईल. त्यानंतर ईतिहास संशोधक डॉ. साहेबराव खंदारे यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला डॉ. अरविंद भुरे, बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, तहसिलदार संतोष शिंदे, सि.यु. मेहेत्रे, के.झेड. राठोड यांची उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी ७ वाजता वीर राजे संभाजी पुरस्कार वितरण होईल. यावर्षी या पुरस्काराने चंद्रपुर येथिल एच.एम.टी. तांदळाच्या वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांना सन्मानीत करण्यात येणार आहे. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे उपाध्यक्ष वसंतराव पुरके राहतील. विशेष अतिथी म्हणुन उपजिल्हाधिकारी श्यामकांत मस्के, पणन महासंघाचे संचालक सुरेश लोणकर, अण्णासाहेब पारवेकर यांची उपस्थिती राहील. या सर्व कार्यक्रमांना नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Friday 17 February 2012

घाटंजी तालुक्यात कॉंग्रेसची सरशी, भाजपाचे खाते उघडले

कॉंग्रेसला जि.प.२ पं.स. मध्ये ४ जागा
राष्ट्रवादीची मते वाढली, विजय नाही








संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधुन घेणा-या घाटंजी तालुक्यातील निवडणुकीत कॉंग्रेसने सर्वाधीक जागा मिळवित आघाडी घेतली. तर प्रथमच भाजपाचे उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थेवर निवडून आल्याने तालुक्यात यावेळी भाजपाचे खाते उघडले. राष्ट्रवादीला बंडखोरी व काही ठिकाणी उमेदवार निवडीचा फटका बसल्याने एकही जागा मिळवता आली नाही. बहुचर्चित शिवणी जि.प.गटात देवानंद पवार व पारवा गटात योगेश पारवेकर या कॉंग्रेसच्या उमेदवारांनी मतांची आघाडी घेत विजय मिळविला. तर पार्डी नस्करी गटात झालेल्या काट्याच्या लढतीत भाजपाच्या उषा राठोड यांनी बाजी मारली.
पंचायत समिती मध्ये कॉंग्रेसला चार व भाजपाला २ जागांवर विजय मिळाला. त्यामुळे पंचायत समितीच्या सत्तेवर आता कॉंग्रेसने कब्जा मिळविला आहे. पंचायत समिती मध्ये शिवणी गणात शैलेष इंगोले (कॉंग्रेस), मानोली गणात सुमित्रा पेंदोर (कॉंग्रेस), पारवा गणात सुवर्णा निकोडे (कॉंग्रेस), कुर्ली गणात रूपेश कल्यमवार (कॉंग्रेस), पार्डी गणात रत्नमाला कोंडेकर (भाजप) व शिरोली गणात रमेश धुर्वे (भाजप) हे उमेदवार विजयी झाले आहेत.
पार्डी गटाच्या मतमोजणी दरम्यान अखेरच्या टप्प्यात मांजरी गावाची मतमोजणी करतांना मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने सुमारे चार तास प्रक्रीया रखडली होती. त्यानंतर यवतमाळ येथुन तज्ञांना पाचारण करण्यात आले. दुपारी चार वाजता यंत्र दुरूस्त झाल्यावर येथिल निकाल घोषीत करण्यात आला.
जिल्हा परिषद गटातील उमेदवारांना मिळालेली मते पारवा गट योगेश पारवेकर (कॉंग्रेस) ७०८० मते, सुहास पारवेकर (रा.कॉ.) ५६५५ मते, रमेश यमसनवार (भाजप) ३७७० मते, शे.आसिफ शे.चांद (सेना) २०२७ मते, अविनाश ठाकरे (अपक्ष) १०३१ मते, शिवणी गट देवानंद पवार (कॉंग्रेस) ७८०० मते, सुरेश लोणकर (रा,कॉ.) ५६५५ मते, मोहन जाधव (सेना) २२०७ मते, जितेंद्र ठाकरे (अपक्ष) १२५७ मते, विशाल कदम (भाजप) १११९ मते, प्रशांत धांदे (मनसे) ८१४ मते, पार्डी (नस्करी) गट उषा राठोड (भाजप) ६१८५ मते, 
मंदा डंभारे (रा.कॉ.) ६०८७ मते, ज्योती निकडे (कॉंग्रेस) ५७५५ मते, शांता आसुटकर (अपक्ष) ३१६ मते, पंचायत समिती मध्ये पार्डी (नस्करी) गणात रत्नमाला कोंडेकर (भाजप) ३२५३ मते, छाया राठोड (रा.कॉ.) ३०४२ मते, अर्चना राठोड (कॉंग्रेस) २७९६ मते, रूपाली राठोड (सेना) ३४९ मते, शिरोली गणात रमेश धुर्वे (भाजप) ३४६९ मते, कैलास कोरवते (रा.कॉ.) २९२९ मते, अनिल गेडाम (कॉंग्रेस) २३३५ मते, भाऊराव आत्राम (सेना) १५३ मते, शिवणी गण शैलेष इंगोले (कॉंग्रेस) २८९७ मते, संजय आडे (रा.कॉ.) २३४६ मते, राजेश्वर वातिले (सेना) १६८१ मते, गिरीधर राठोड (भाजप) ११४८ मते, रविंद्र चव्हाण (मनसे) ७२९, नरेंद्र चव्हाण (अपक्ष) ४९१ मते, मानोली गणात सुमित्रा पेंदोर (कॉंग्रेस) ४५३१ मते, सिंधु मेश्राम (रा.कॉ.) ३६०६ मते, रूख्मा कनाके (सेना) ६२१ मते, सुमित्रा घोडाम (भाजप), सुशिला मंगाम (मनसे) ३४५ मते, पारवा गणात सुवर्णा निकोडे (कॉंग्रेस) ३७८३ मते, पुष्पा खडसे (रा.कॉ.) ३५८५ मते, अरूणा महल्ले (भाजप) १८२४ मते, कलावती मोहुर्ले (सेना) ९५४ मते, कुर्ली गणात रूपेश कल्यमवार (कॉंग्रेस) ३६८० मते, नितिन नार्लावार (रा.कॉ.) २५३२ मते, गजानन गाऊत्रे (भाजप) २२२५ मते, सोमा मंगाम (सेना) ९४२ मते मिळाली आहेत. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन डॉ.अशोक खरात, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी संतोष शिंदे, नायब तहसिलदार एस.व्ही भरडे, वामन वैद्य होते. विजयी उमेदवारांची शहरातुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी ग्रामिण भागातुन मोठ्या प्रमाणावर नागरीक येथिल सांस्कृतिक भवन परिसरात आले होते.
मागील निवडणुकी पेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळालेल्या मतांचे प्रमाण वाढले असले तरी दिग्गज नेते रा.कॉ.मध्ये असतांना झालेला पराभव धक्कादायक असल्याचे मत व्यक्त होत आहे. पार्डी सर्कलमध्ये भाजपाला मिळालेल्या विजयाच्या पाठी ‘गॉडफादर’ कोण होते याची चर्चा सुरू आहे. जनतेने दिलेला कौल मान्य असुन सर्व मतदारांचे आभार जेष्ठ नेते सुरेश लोणकर यांनी यावेळी व्यक्त केले.

Thursday 16 February 2012

‘मोबाईल फसवेगिरी’ अजुनही सुरूच

आणखी एका ईसमाला १५ हजारांनी गंडविले
पोलीस यंत्रणेला तक्रारीची वाट

मोबाईलवर कॉल करून लॉटरी व तत्सम बक्षिसांचे आमिष दाखवुन हजारो रूपयांनी गंडा घालण्याचा प्रकार अजुनही सुरूच आहे. प्रशांत कुंभारे नामक ईसम या आमिषाला बळी पडल्याने तब्बल १५ हजार रूपयांनी फसविल्या गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
यापुर्वी देशोन्नती ने ‘मोबाईलवर कॉल करून गंडविणारे आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रीय’ या बातमी मधुन हा प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर काही मोबाईल  कंपन्यांनी अशा कॉल पासुन सावध राहण्याबाबत ग्राहकांना एस.एम.एस.द्वारे सुचनाही दिल्या होत्या. मात्र पोलीस यंत्रणेने ही बाब अद्यापही गंभिरतेने न घेतल्यामुळे फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. याबाबत विस्तृत माहिती अशी की, प्रशांत मुकींदा कुंभारे रा. हिरापूर जि.वर्धा यांना त्यांचा भ्रमणध्वनी क्रं.९७६७२९२७३१ यावर ९२३४४४८३१३०८ या क्रमांकावरून कॉल आला. तुम्हाला १० लाख रूपयांची लॉटरी लागली आहे. मात्र त्यासाठी बँक खाते क्रं.३०११७१०२८९४ यामध्ये १५ हजार २०० रूपये टाका असे सांगण्यात आले. त्यावेळी कुंभारे हे यवतमाळ तालुक्यातील त्यांची सासुरवाडी जवळा ईजारा येथे आले होते. त्यांनी कॉलवर विश्वास ठेवून अकोलाबाजार स्टेट बँकेत संबंधीत खात्यावर पैसे जमा केले. त्यानंतर ११ फेब्रुवारीला त्यांना ००९२३४१६९०८६७३ या क्रमांकावरून पुन्हा कॉल आला. आणखी २४ हजार रूपये खाते क्रं.१०८८७५९८११९ (खातेधारक - प्रदिपकुमार) किंवा ०७१००१५०१९५१ (खातेधारक - झिया उल हक सिद्धीकी) या खात्यामध्ये पैसे भरण्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र कुंभारे यांना शंका आल्याने त्यांनी पैसे भरले नाहीत. १३ फेब्रुवारीला त्यांना पुन्हा कॉल आला व किमान ६ हजार रूपये तरी खात्यात भरावे लागतील अन्यथा १० लाखांची रक्कम अनाथालयाला जाईल असे सांगण्यात आले. फोनवर बोलणा-या व्यक्तीने आपण कंपनीचे डी.एम.असल्याचे सांगीतले. आपण फसविल्या गेल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी रक्कम भरली नाही. 
कुंभारे यांनी ज्या खात्यात पैसे जमा केले ते खाते अमितसिंग चंद्राकेस सिंग विला रा. इंद्रानगर गोरखपुर या व्यक्तीचे असल्याचे बँकेत चौकशी केली असता निदर्शनास आले. वृत्त लिहिस्तोवर घटनेची तक्रार करण्यात आली नव्हती. त्याचप्रमाणे आज दुपारी १ वाजुन १२ मिनीटांनी नरेंद्र ढवळे रा.दहेगाव यांना ९१९१९९१७७१८३ या क्रमांकावरून कॉल आला. अडीच लाख रूपयांचे बक्षिस लागल्याचे त्यांना सांगीतल्या गेले. बक्षिसाची रक्कम १० मिनीटातच तुमच्या बँक खात्यात टाकण्यात येईल असेही संबंधीताने त्यांना सांगीतले. मात्र त्यासाठी कमलेश कुमार नामक व्यक्तीच्या खाते क्रं. ३१९५१७४३८०७ यावर २ हजार ६०० रूपये भरा अशी अट ठेवण्यात आली. ढवळे यांनी ‘देशोन्नती’ मध्ये याबाबतचे वृत्त वाचलेले असल्याने हे गौडबंगाल असल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यामुळे त्यांनी पैसे भरले नाहीत. शिवाय या प्रकाराची पोलीसात तक्रार करणार असल्याचेही त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले.
गेल्या काही महिन्यांपासुन अशा ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. मात्र पोलीस यंत्रणा याकडे कोणाचीही तक्रार नसल्याने सपशेल दुर्लक्ष करीत आहे. आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल येत असल्याने भारतालगत असलेल्या देशांमधुन असे रॅकेट चालविल्या जात असल्याच्या संशय व्यक्त होत असुन यंत्रणेने आपल्या स्तरावर या रॅकेटचा शोध घेण्याची मागणी जोर धरत आहे. 
साभार :- देशोन्नती 

Tuesday 14 February 2012

गजानन महाराज प्रगटदिनी घाटंजीत लाखो भक्तांची मांदियाळी














टाळ मृदुंगाचा मंजूळ नाद...भजन व भक्तीसंगीताची मेजवानी..... आणी प्रत्येक मुखात गण गण गणात बोते चा गजर अशा भक्तीमय वातावरणात घाटंजी येथे संत श्री गजानन महाराज प्रगट दिनाचा सोहळा साजरा करण्यात आला. दिवसभरात तालुक्यातील गावागावातून आलेल्या भक्तांनी घाटंजी शहरातील रस्ते ओसंडून वाहात होते. या चार दिवसीय महोत्सवादरम्यान सुमारे एक ते दिड लाख भाविकांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली.
दि. ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान आयोजीत या समारोहादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अभिषेक, होमहवन, किर्तन व भजन संगीताच्या कार्यक्रमांनी घाटंजी शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. आज सकाळपासुनच येथिल गजानन मंदिरात तालुक्यातून आलेल्या भक्तांची रीघ लागली होती. सर्व भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. महाप्रसाद वितरणासाठी ग्रामिण भागातून मोठ्या संख्येने सेवा मंडळे, हरिपाठ मंडळ, दुर्गोत्सव व गणेशोत्सव मंडळे यासह शिरोली, सगदा, पारवा, मानोली, खापरी, मुरली, या गावांमधुन अनेक सर्वधर्मीय भक्त स्वयंस्फूर्तीने नि:शुल्क सेवा देतात. स्वयंपाकापासुन पत्रावळी उचलण्यापर्यंतची सर्व कामे ही मंडळी पार पाडतात. शिक्षक, शासकीय कर्मचारी, व्यावसायीक सुद्धा आपली प्रतिष्ठा श्रींच्या चरणी ठेवुन हाती लागेल ते काम करतांना दिसतात. शहरातील रस्त्यांवर काही दानशुरांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. दुपारच्या सुमारास टाळ मृदुंगाच्या गजरात श्रींची पालखी शहरातुन काढण्यात आली. वारकरी मंडळे, भजनी मंडळ, दिंड्या, अभंगाच्या नादात तल्लीन होऊन नाचणारे आबालवुद्ध यामुळे घाटंजी शहर भक्तीच्या वातावरणात न्हाऊन निघाले होते.
घाटंजी येथिल गजानन मंदिर हे सर्वदूर प्रसिद्ध असुन जिल्ह्यातील दुस-या क्रमांकाचे गजानन मंदिर अशी या देवस्थानाची ख्याती आहे. भक्तांची प्रचंड गर्दी लक्षात घेता पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीसांची संख्या जास्त असली तरी गर्दी नियंत्रण करण्या ऐवजी सर्व पोलीस एकाच ठिकाणी ठिय्या मांडून बसल्याने नाराजी व्यक्त होत होती.

(छायाचित्र :- अमोल राऊत, पांडूरंग निवल, वामनराव ढवळे)



Monday 13 February 2012

तुकडोजी महाराज पुण्यस्मरणानिमित्य घाटंजीत विवीध कार्यक्रम

विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेत ५० हजारांची बक्षीसे

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४३ व्या पुण्यस्मरणानिमित्य येथिल गुरूदेव सेवा मंडळातर्फे विवीध सामाजीक व आध्यात्मीक कार्यक्रमांचे आयोजन दि.१७ ते १९ फेब्रुवारी पर्यंत स्थानिक जलाराम मंदीराच्या सभागृहात करण्यात आले आहे. 
दि. १७ फेब्रुवारीला आयोजीत मोफत रोग निदान व औषधोपचार शिबिराने कार्यक्रमाची सुरूवात होईल. या शिबिरात तज्ञ चिकीत्सक गरजू रूग्णांची तपासणी करून औषधोपचार करतील. सायंकाळी ६ ते ७ या वेळात सामुदायीक प्रार्थना व त्यानंतर रात्री ८ वाजता भक्ती सरगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुप्रसिद्ध गायक शंकरराव वैरागकर, नाशिक यांच्या गायनाचा कार्यक्रम होईल. आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त तबला वादक अजिंक्य जोशी हे त्यांना साथसंगत करतील. 
दि.१८ पेâब्रुवारीला सकाळी ५ वाजता सामुदायीक ध्यान होईल. सकाळी १० वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात येईल. दुपारी १ वाजता होणा-या कार्यकर्ता मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व गुरूदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
सायंकाळी ५ वाजता राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली व सामुदायीक प्रार्थना होईल. रात्री ७ वाजता विनय कुमार आणी संच अदिलाबाद यांच्या भावगित व भक्तीगितांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सारेगमप लिटील चॅम्प मधील स्पर्धक उज्वल गजभार यांच्या गायनाचा विशेष कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. 
रात्री १० वाजता विदर्भस्तरीय भव्य खंजेरी भजन स्पर्धा होणार असुन विदर्भ व तालुकास्तरासाठी सुमारे ५० हजार रूपयांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. विदर्भस्तरीय स्पर्धेसाठी अनुक्रमे ९ हजार, ७ हजार, ६ हजार, ५ हजार, ४ हजार, ३ हजार, २ हजार, १ हजार व ७०१ रूपयांची पारितोषीके ठेवण्यात आली आहेत. तर तालुकस्तरासाठी अनुक्रमे ३ हजार, २ हजार, १ हजार ५००, १ हजार, ७०१, ५०१ व ३०१ रूपयांची बक्षिसे राहतील. विदर्भस्तरीय स्पर्धेसाठी ३०१ रू व तालुकास्तरासाठी २०१ रू प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. 
१९ फेब्रुवारीला खंजेरी भजन स्पर्धेचे बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रम होईल. या सर्व कार्यक्रमांना नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गुरूदेव सेवा मंडळ घाटंजी यांचेवतीने करण्यात आले आहे. 
साभार :- देशोन्नती

विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेत सहभागी होण्यास ईच्छुकांनी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.
शिवदास सोयाम ९७६३४४०२९४
सुभाष देवळे ९४२१७७०७२९

गण गण गणात बोतेच्या गजरात उद्यापासुन घाटंजीत गजानन महाराज प्रगटदिनोत्सव






घाटंजी येथे श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त १४ फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. १४ रोजी कलश स्थापना, काकड आरती, अभिषेक, प्रवचन, पारायण, हरिपाठ, सामूहिक प्रार्थना, कीर्तन, भक्तीसंगीत, भजन, होमहवन, पालखी मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ घेण्याची विनंती श्री गजानन महाराज संस्थान सार्वजनिक ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे.
श्री संत गजानन महाराजांच्या भक्तांनी येथे श्रींचा प्रगटदिन व समाधी दिवसाचा कार्यक्रम घेणे सुरू केले. पुढे श्रींचे भव्य, सुरेख मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. सन १९८४ मध्ये सार्वजनिक ट्रस्ट तयार करून नोंदणी केली. मंदिर बांधकामासाठी जागेचा शोध घेण्यात आला. शेवटी पंचायत समिती जवळील १३ एकर शेत विकत घेण्यात आले. त्यातील पाच एकर जागा मंदिराकरिता आणि उर्वरित जागेत प्लॉट्स पाडून रक्कम उभी करण्यात आली. आलेल्या रकमेतून मंदिर उभारणी सुरू झाली. १९८७ मध्ये बांधकाम सुरू झाले.
सन १९९४ मध्ये जयपूरवरून आणलेली सव्वाचार फूट उंच व देखणी मूर्ती शास्त्रोक्त पद्धतीने मंदिरात स्थापन्यात आली. तसेच श्रीगणेश, राधाकृष्ण, विठ्ठल-रुक्मिणी, राणीसती आई मूर्तीची स्थापना करण्यात आली. मंदिरात दररोज आरती, पसायदान होत आहे. सोबत अनेक धार्मिक व सामाजिक कार्य सुरू आहे. प्रगटदिन व समाधीदिन दरवर्षी साजरा केला जातो.
मंदिरात होणार्‍या कार्यक्रमासाठी येणारे भाविक, दिंडीत सहभागी होणार्‍या वारकर्‍यांची थांबण्यासाठी होणारी अडचण लक्षात घेत भव्य भक्त निवास बांधण्यात आले आहे. दर गुरुवारी भाविकांकडून साहित्य स्वीकारून अन्नदान करण्यात येते. मंदिराच्या परिसरात फुल झाडे तसेच वड, पिंपळ, आवळा, आंबा, औदुंबर, बेल, पळस, तुळस, निम अशी अनेक मोठमोठी वृक्ष आहेत. कार्यक्रमासाठी मंदिर भवन उपलब्ध करून दिले जाते. याचा अनेक गरजूंना लाभ होत आहे.
साभार - लोकमत