Pages

Tuesday 31 January 2012

कॉंग्रेस राष्ट्रवादीला घराणेशाहीचीच परंपरा-भाजप

रमेश यमसनवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ








कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना घराणेशाहीची परंपरा असुन सर्वसामान्यांचा त्या पक्षात विचार केला जात नाही असे एकमुखी वक्तव्य भाजपाच्या नेत्यांनी पारवा येथे केले. पारवा गटातील भाजपाचे उमेदवार रमेश यमसनवार यांचेसह पारवा गणाच्या अरूणा महल्ले व कुर्ली गणाचे गजानन गाऊत्रे या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ येथिल गणपती मंदिरात फोडण्यात आला. 
यावेळी माजी खासदार राजाभाऊ ठाकरे, माजी आमदार मदन येरावार, जिल्हाध्यक्ष विजय कोटेचा, उद्धव येरमे, मुकुंद कदम, अशोक यमसनवार, वासुदेव महल्ले, दत्ता कोंडेकर, देवानंद काळे, संजय सवळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. हजारो कार्यकर्त्यांसह प्रचाराला सुरूवात करण्यात आली. जनसामान्यांमध्ये वावरणारे रमेश यमसनवार यांना उमेदवारी दिल्याने कॉंग्रेस रा.काँ.ला त्याची मळमळ सुटली असुन हा मालकशाही विरोधातील संघर्ष असल्याची प्रतिक्रीया भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केली. शेतक-यांशी निगडीत व्यवसाय असल्याने शेतकरीवर्गात यमसनवार यांचेविषयी आदर आहे. आजवर शेतक-यांच्या अडीअडचणीला धावून जाण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमूळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मागील निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवाराच्या विजयात यमसनवार यांची महत्वाची भुमिका होती. यावेळी त्यांच्या स्वतंत्र उमेदवारीमुळे कॉंग्रेस व रा.कॉ. ला चांगलेच परिश्रम घ्यावे लागणार आहे.

Saturday 28 January 2012

घाटंजी तालुक्यात निवडणुकीला चढलाय रंग

‘शिवणी’चा तिढा सुटता सुटेना
उमेदवार लागले प्रचाराला

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीला आता रंग चढण्यास सुरूवात झाली असुन बहुतांश उमेदवारांनी प्रचारही सुरू केला आहे. घाटंजी तालुक्यात जिल्हा परिषदेचे तिन गट व पंचायत समितीचे ६ गण अशा एकुण ९ जागांकरीता निवडणुक होणार आहे.
पक्षाची उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चित झाले असले तरी कोणत्याही पक्षाने अद्याप आपले अधिकृत उमेदवार जाहिर केले नाहीत. शिवणी गटात कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अजुनही काथ्याकुट चालु आहे. सुरेश लोणकर, सतिश भोयर व जितेंद्र ठाकरे यांच्यात उमेदवारी मिळविण्यासाठी ओढाताण सुरू आहे. लोणकरांनी मोठे शक्तीप्रदर्शन करून नामांकन दाखल केले. तर सतिश भोयर व जितेंद्र ठाकरे हे सुद्धा उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचे सांगत प्रचार करीत आहेत. या विचित्र परिस्थितीमुळे पक्षश्रेष्ठी हतबल, कार्यकर्ते संभ्रमात व मतदार कोड्यात पडल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाणा-या  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची धामधुम जिल्हाभरात सर्वत्र सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अनेक इच्छूकांना जि.प. व  पं.स.च्या सत्तेचे डोहाळे लागले आहेत. अस्ताव्यस्त पसरलेला मतदारसंघ, प्रचंड मतदार संख्या या पार्श्वभूमीवर निवडणुकीत यश मिळवण्यासाठी अनेकांनी विविध राजकिय पक्षांची तिकीटे मिळवण्याची खटपट सुरु केली आहे. विविध पक्षाकडे उमेदवारी मिळवण्यासाठी भाऊगर्दी झाली असून अनेकांनी तिकीटे मिळवण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे. परंतू ऐनवेळी तिकीट कोणाला मिळणार? तिकीटाच्या शर्यतीतून पत्ता कोणाचा कापला जाणार? याबाबत साशंकता निर्माण झाली असल्याने ३० तारखेपर्यंत ईच्छुक उमेदवारांच्या डोक्यावर टांगती तलवारच राहणार आहे. 
गट व गणात एकाच पक्षातील तुल्यबळ उमेदवारांमध्ये उमेदवारीसाठी संघर्ष सुरू आहे. यातून बंडखोरीची समस्या निर्माण झाली. या बंडखोरीला लगाम लावण्यासाठी  नेतेमंडळींनी व्युहरचना आखली आहे. परंतू यास जुमानता काही बंडखोर निवडणुक लढून जिंकता नाही आले तरी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पाडण्याची भूमिका वठविण्याची शक्यता आहे. उमेदवारीचा घोळ तात्काळ मिटत नसल्याने विरोधी पक्षाआधी पक्षांतंर्गत स्पर्धकाबरोबर शह- कटशहाचे राजकारण करत स्पर्धा करीत तिकीट मिळवण्याची लढाई खेळण्याची वेळ आली आहे. या पक्षांअंतर्गत लढाईतही धनशक्तींचीच सरशी होत असल्याने सर्वसामान्य कार्यकर्ते संतप्त होत आहेत. बहूतेक ठिकाणी उमेदवाराचे निष्कलंक चारित्र्य, राजकीय कौशल्य, या गुणाऐवजी निवडणुकीत धनशक्तीचा जोर दाखवू शकणा-या उमेदवारांनाच राजकीय पक्षांकडून प्राधान्य दिले जात असल्याची खंत सर्वसाधारण कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. 
सगळीकडे सध्या राजकारण्यांची धामधुम सुरू आहे. खेड्यातील रस्त्यांवर धुळ उडवित बेफामपणे जाणा-या वाहनांचा ताफा, मागील निवडणुकीनंतर गावात अवतरलेले नेते, स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारी भाषणे यामुळे ग्रामिण भागातील वातावरण निवडणुकमय झाले आहे. तर दुसरीकडे मतदार संघातील जनता नागरी समस्यांच्या विळख्याने होरपळून निघत आहे. अनेक ठिकाणी मुलभूत सुविधांचीही वाणवा आहे. रस्ते, पाणीपुरवठा,वीजसेवा, शिक्षण, आरोग्य, आदीसह विविध नागरी समस्यामुळे मतदार त्रस्त आहेत. निवडणुका आल्या की गावपुढा-यांकडून विकासाच्या गप्पा मारल्या जातात. नंतर मात्र त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते अशी संतप्त प्रतिक्रीयाही मतदारातून व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती

Thursday 26 January 2012

राज्यात उघडणार नवीन पर्यटनस्थळांचे दालन

पर्यटनस्थळांची निवड करण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना 
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन खात्याने नुकत्याच घेतलेल्या एका निर्णयात ‘क’ आणी ‘ब’ दर्जाच्या पर्यटनस्थळांची निवड करण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यात पर्यटनाच्या विकासाला चालना मिळणार असुन आजवर डावलल्या गेलेल्या पर्यटनस्थळांना शासकीय ‘दर्जा’ मिळणार आहे
नवीन पर्यटनस्थळांची निवड करतांना अडथळा ठरत असलेल्या जुन्या निकषांना लवचिक करीत सरकारने आता ‘क’ आणि ‘ब’ दर्जाचे स्थळे निवडण्याचे अधिकारी जिल्हाधिका-यांच्या  अध्यक्षतेखालील समितीला प्रदान केले आहेत. या निर्णयाचा फायदा राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला होणार असून, जिल्ह्याच्या भौगोलिक विविधतेला पर्यटनस्थळा चा ‘मुकुट’ चढणार आहे. पारंपारीक वारसा लाभलेली पुरातन मंदिरे, निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या विलोभनिय पर्यटनस्थळांची दखल घेणे या निर्णयाने सोपे जाणार आहे. या नवीन निर्णयानुसार आता प्रत्येक जिल्ह्यात एक समिती कार्यरत राहणार असुन जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतील. या समितीला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळे जाहीर करण्याचे तर ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळे घोषित करण्याबाबतचे प्रस्ताव सरकारला सादर करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यापुर्वी पर्यटनस्थळ निवडायचे असेल तर त्यासाठी अनेक जाचक निकष व अटी पुर्ण कराव्या लागत असत. 
सरकारने याबाबतच्या प्रस्तावनेत म्हटले आहे, की महाराष्ट्र राज्य हे निसर्गसंपन्न आणि वैविध्यपूर्ण आहे. राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पर्यटनस्थळांचे निकष लागू होऊ शकतील. पण पर्यटनस्थळे म्हणून विकसित होणा-या ठिकाणी तीर्थक्षेत्रांप्रमाणे भाविकांची संख्या, विशिष्ट कालावधीत होणार यात्रा आदी परिस्थिती दिसून येणार नाही. राज्यातील समुद्रकिनारे, विविध किल्ले, विदर्भातील अभयारण्ये, थंड हवेची ठिकाणे अशी प्रादेशिक विविधता व निरनिराळी भौगोलिक परिस्थिती आहे. त्यामुळे पर्यटनस्थळ घोषित करतांना जलक्रीडा, किल्ले पर्यटन, साहसी पर्यटन, ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन अशा पर्यटनक्षम विविध प्रकारांतील स्थळांना एकाच प्रकारचे निवडीचे निकष लागू करणे योग्य होणार नाही. त्यामुळे निवडीच्या निकषांत लवचिकता ठेवणे आवश्यक आहे. नवनवीन स्वरूपांची पर्यटनस्थळे निवडतांना प्रत्येक वेळी निकष बदलण्याची देखील आवश्यकता भासेल, असे स्पष्ट दिसून येईल. 
त्यामुळेच या बाबी विचारात घेऊन सरकारने जिल्हास्तरीय समितीला ‘ब’ आणि ‘क’ दर्जाच्या पर्यटनस्थळांच्या निवडीबाबत  अधिकार दिले आहेत. पर्यटनस्थळे विकासाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील पर्यटन क्षमतेचे निकष ठरवून ‘क’ वर्ग स्थळांची निश्चिती करून विकासाचा आराखडा व अंदाजपत्रक बनविण्यास मान्यता देणे अंतिम निवडीसाठी जिल्हा नियोजन समितीला शिफारस करणे हा महत्त्वपूर्ण अधिकार या समितीला मिळाला आहे. ‘ब’ वर्ग स्थळांची सरकारला शिफारस करण्याचे काम सुद्धा ही समिती करू शकणार आहे. 
साभार :- देशोन्नती

भयमुक्त निवडणुकांसाठी जनजागृती अभियान

वाढत्या तक्रारींमुळे आयोगाचे पाऊल
राष्ट्रीय मतदार दिनापासून सुरूवात
निवडणुकीत उमेदवारांकडून देण्यात येणा-या प्रलोभनांना बळी न पडता नि:पक्ष मतदान व्हावे यासाठी निवडणुक आयोग जनजागृती अभियान राबविणार आहे. २५ जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनापासुन एक आठवडाभर स्थानिक सामाजीक संघटनांच्या मदतीने मतदार जागृती अभियान राबविण्यात यावे असे आदेश निवडणुक आयोगाने दिले आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पैसे व दारूचा वापर होऊ नये, तसेच मतदारांमध्ये मतदानाच्या महत्वाची जाणीव निर्माण व्हावी हा या अभियानाचा उद्देश आहे. त्यासाठी राज्य निवडणुक आयोगाने मतदारांच्या जागृतीसाठी सीडी तयार केली आहे. ती स्थानिक केबल टि.व्ही.वर प्रसारीत करण्यात येणार आहे. शिवाय मतदारांना आवाहन करणारे फलक सुद्धा लावण्यात येतील. आगामी निवडणुकांमध्ये विवीध प्रलोभनांचा वापर करून सर्रासपणे मतदारांवर दबाव आणण्याचे प्रयत्न उमेदवार व राजकीय पक्षांकडून होत असल्याच्या अनेक तक्रारी आयोगाकडे झाल्या आहेत. त्यामुळे निवडणुका भयमुक्त व स्वच्छ वातावरणात पार पाडण्याच्या दुष्टीने एक सकारात्मक संदेश जनतेत पोहचावा यासाठी आयोगाने हे पाऊल उचलल्याचे या आदेशात म्हटले आहे.
साभार :- देशोन्नती

किन्ही शाळेत विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत होणार ध्वजारोहण ?






तब्बल दोन आठवड्यांपासुन तालुक्यातील किन्ही (वन) जि.प. शाळेवर विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकला असल्याने उद्या प्रजासत्ताक दिनाला विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीतच ध्वजारोहण होणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दोन शिक्षकांची पदे मंजुर असतांना केवळ एकाच शिक्षकावर कारभार सुरू असल्याने संतप्त पालकांनी १२ जानेवारी पासुन पाल्यांना शाळेत पाठविणे बंद केले आहे. या जि.प.शाळेत १ ते ४ पर्यंत वर्ग असुन ५० पटसंख्या आहे. येरंडगाव केंद्रांतर्गत येत असलेल्या या शाळेवर तब्बल सात महिन्यांपासुन एकच शिक्षक आहे. पारवा येथिल शाळेवर अतिरिक्त असलेल्या सचिन मांडवगडे या शिक्षकाची किन्ही (वन) शाळेवर १९ डिसेंबरला समुपदेशनाद्वारे बदली करण्यात आली. मात्र पारवा शाळेचे मुख्याध्यापक ठाकरे यांनी शिक्षकास कार्यमुक्त केले नाही. ग्रामस्थांनी याबाबत पंचायत समितीकडे तक्रार केल्यावर गटशिक्षणाधिका-यांनी शिक्षकाला कार्यमुक्त करण्याचा आदेश मुख्याध्यापकास दिला. मात्र या आदेशालाही मुख्याध्यापकांनी केराची टोपली दाखविली. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासुन विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार आहे. केवळ किशोर भोयर हे एकमेव शिक्षक विद्यार्थ्यांअभावी शाळेत केवळ येऊन बसतात. प्रस्तुत प्रतिनिधीने किन्ही (वन) शाळेला प्रत्यक्ष भेट दिली असता पालक व विद्यार्थ्यांनी आपल्या संतप्त भावना यावेळी व्यक्त केल्या. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुखदेव आत्राम, उपसरपंच राजु कुंभारे, पालक प्रकाश रामटेके व विद्यार्थी प्रतिक उमरे, बाळू जिवने (वर्ग ४ था), सचिन कुंभारे (वर्ग ३ रा) हे म्हणाले की, जोपर्यंत या शाळेवर पुर्णवेळ कायमस्वरूपी शिक्षक देण्यात येणार नाही तोवर बहिष्कार राहणार आहे.
याबाबत गटशिक्षणाधिकारी जुमनाके यांची प्रतिक्रीया घेतली असता आदेशाचे पालन न करणारे मुख्याध्यापक ठाकरे व शिक्षक मांडवगडे यांचेवर कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. या निमित्ताने पंचायत समिती शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. सुमारे पंधरा दिवसांपासुन विद्यार्थी शाळेत येत नसल्याने उद्या प्रजासत्ताकदिनी तरी पालक विद्यार्थ्यांना शाळेत ध्वजारोहणासाठी पाठवणार का ? असा प्रश्न विचारल्या जात आहे.
साभार :- देशोन्नती

किन्ही (वन) येथिल शाळेची बातमी दि.२७ जानेवारीला
 ई.टिव्ही. वाहिनीच्या १२.३० वाजताच्या
 बातमीपत्रात दाखविण्यात आली. 
या बातमीची झलक आपल्यासाठी.


अपघातात तरूण ठार; एक जखमी


ट्रॅक्टरच्या जबर धडकेत दुचाकीस्वार तरूण जागीच ठार झाला तर दुसरा गंभिर जखमी झाल्याने त्याला यवतमाळच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. विजय शामराव भलावी (२२) रा. विद्याभुवन वार्ड घाटी, घाटंजी  असे मृताचे नाव आहे. तर मुन्ना अशोक ठाकरे हा जखमी आहे.  काल (दि.२४) ला रात्री ९ वाजेदरम्यान हा अपघात झाला. घाटंजी वरून पारव्याकडे जाणा-या ट्रॅक्टर क्र. एम.एच.२९ सी.४२५२ ने विरूद्ध बाजुने येणा-या दुचाकी क्र.एम.एच.३१ ए.एन.५९०७ ला जबर धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की दुचाकी सुमारे २० फुटावर  फेकल्या गेली. तर ट्रॅक्टर विजय याच्या अंगावरून गेल्याने विजय भलावी हा जागीच ठार झाला. अपघात झाल्यावर ट्रॅक्टरचालक फरार झाला. 
विजय भलावी हा तरूण पोलीस भरतीची लेखी परिक्षा पास झाला होता. दोन दिवसांनी मौखिक परिक्षेसाठी तो गडचिरोली येथे जाणार होता असे समजते.
साभार :- देशोन्नती

घाटंजीत अखेरच्या दिवशी ३५ नामांकने दाखल

नामांकन अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी ३५ उमेदवारांनी नामांकन दाखल केले.
यामध्ये पार्डी (न) गटात ज्योती निकडे, पार्डी (न) गणात रूपाली राठोड, अल्का आसुटकर, छाया राठोड, शिरोली गणात कैलास कोरवते, रमेश धुर्वे, गोपाल गेडाम, नामदेव मडकाम, भाऊराव आत्राम, अनिल गेडाम, शिवणी गटात देवानंद पवार, अयनुद्दीन सोलंकी, विजय कोंडलवार, मोहन जाधव, राजु राठोड, शिवणी गणात विजय कोंडलवार, खेमचंद पवार, गिरीधर राठोड, संजय जाधव, मारोती पवार, गजानन भोयर, शालु दलाल, नरेंद्र चव्हाण, राजेश्वर वातिले, श्रीहरी निबुधे, मानोली गणात सुमित्रा घोडाम, रूख्मा कनाके, पारवा गटात अशोक यमसनवार, विजय ठाकरे, योगेश देशमुख, सचिन देशमुख, शेख आसिफ शेख चांद, सुहास देशमुख, पारवा गणात सुनिता शेंडे, सारीका कडू, मनिषा दवणे, कलावती मोहुर्ले, सुवर्णा निकोडे, कुर्ली गणात युसूफ खॉ पठाण, संदिप जैस्वाल, सोमजी मंगाम, नितिन नार्लावार, माधव नार्लावार, राजेश उपुवार यांचा समावेश आहे.
साभार :- देशोन्नती

कपडे धुतांना सापडलेले १८ हजार परत केले

मोलकरीणचा प्रामाणीकपणा
पैशाच्या मागे धावणा-या आजच्या काळात कोणाच्याही नियतीचा भरवसा सांगता येत नाही. धनदांडग्यांनाही पैशाचा मोह आवरत नाही. कुणाची मौल्यवान वस्तू अथवा पैसे हरविले तर ते परत मिळतील याची शाश्वतीच नसते. मात्र घाटंजी येथे एका मोलकरणीने धुण्याच्या कपड्यात सापडलेले तब्बल १८ हजार रूपये परत करून प्रामाणीकपणा आजही जिवंत असल्याचा प्रत्यय आणुन दिला.
येथिल घाटी भागात राहणारी मंगला वसंता कलाने ही महिला घरोघरी धुणी भांडी करून आपल्या कुटूंबाचे पालन पोषण करते. २१ जानेवारीला वसंतनगर भागात राहणारे मोखडकर यांच्या घरी नेहमीप्रमाणे कामासाठी आली. त्या दिवशी मोखडकर कुटूंबीय गावाला गेले होते. त्यांनी धुण्याचे कपडे व भांडी बाहेर काढुन ठेवली होती. कपडे वाळवितांना मंगलाला एका  पँटच्या खिशात काहीतरी असल्याचे जाणवले. तिने खिसा पाहिला असता पाचशे रूपयांच्या नोटांचे बंडल आढळले. पैसे पाहुन ती थोडी घाबरली. काय करावे हे तिला सुचत नव्हते. मोखडकर कुटूंबीय तिन चार दिवस गावावरून परत येणार नव्हते. त्यामुळे तिने शेजारी राहणा-या उमाताई भारशंकर यांचे घर गाठले. त्यांना हा प्रकार सांगीतला. तिथे पैसे मोजले असता ५०० रूपयांच्या ३६ नोटा आढळल्या. भारशंकर यांनी मोखडकर कुटूंबीयांना याबाबत भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. आज मोखडकर कुटूंबीय घरी परतल्यावर त्यांना हे पैसे परत करण्यात आले. विशेष म्हणजे खिशात पैसे होते याची आठवण सुद्धा मोखडकर यांना नव्हती. मंगला मध्ये असलेल्या प्रामाणीकपणाने सर्वांनाच सुखद धक्का बसला. काबाडकष्ट करून पोटाची खळगी भरणा-या मोलकरणीने प्रामाणीकपणे मोठी रक्कम परत करून एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
साभार :- देशोन्नती

Wednesday 25 January 2012

संतप्त मजुरांचा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला घेराव

आश्वासन देऊन बोनस न दिल्याचा संताप
तेंदुपत्ता बोनस वाटपात प्रचंड घोळ


तेंदुपत्ता बोनस वाटपाच्या यादीत ख-या मजुरांऐवजी वनविभागातील कर्मचा-यांच्या नातलगांच्या नावाने धनादेश काढण्यात आल्याच्या निषेधार्थ मजुरांनी आज वनपरिक्षेत्र कार्यालयाला घेराव घातला. 
काही दिवसांपुर्वी बोनस वाटपात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात प्राऊटिस्टचे मधुकर निस्ताने यांच्या नेतृत्वात अभिनव भिक मांगो आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी बोनस पासुन वंचीत राहिलेल्या मजुरांना १५ दिवसांच्या आत बोनस दिल्या जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. तसेच या प्रकरणात गैरप्रकार करणा-यांची चौकशी करण्यात येईल असेही तेव्हा सांगण्यात आले होते. मात्र महिना उलटूनही वनविभागाने याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. यामुळे संतप्त झालेल्या मजुरांनी आज दुपारी संपुर्ण कार्यालयाला घेराव घातला. यावेळी तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने पोलीसांना पाचारण करण्यात आले. ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर, स.पो.नि.अरूण गुरूनूले, पी.एस.आय. राऊत, पी.एस.आय.कोंडे यांचेसह पोलीस ताफा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात पोहचला.  बोनस घेतल्याशिवाय येथुन हलणार नाही असा आक्रमक पवित्रा मजुरांनी घेतल्याने पोलीसांचाही नाईलाज झाला होता. वनपरिक्षेत्र अधिकारी के.झेड.राठोड यांची या प्रकरणी प्रतिक्रीया घेतली असता ते कोणत्याही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. यादीत घोळ झाल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र त्यावर नेमकी काय कार्यवाही झाली? या गैरप्रकाराला कोण जबाबदार आहेत? या प्रकरणात वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात आला आहे का? याबाबत त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.
साभार :- देशोन्नती

माथनी येथिल विद्यार्थ्यांचा पं.स.मध्ये ठिय्या

तालुक्यातील माथनी येथिल जिल्हा परिषद शाळेत शिक्षक देण्यात यावा या मागणीसाठी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी पंचायत समीती मध्ये ठिय्या दिला. माथनी शाळेत दोन शिक्षकांची पदे मंजुर असतांना केवळ एकाच शिक्षकाच्या भरवशावर शाळा सुरू आहे. ग्रामस्थांनी याबाबत वेळोवेळी शिक्षण विभागाला कळवुनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. काल ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकुन प्रशासनाचा निषेधही नोंदवला होता. मात्र तरी देखिल पंचायत समितीने याची दखल न घेतल्याने आज विद्याथ्र्यांसह पं.स.मध्येच शाळा भरवून निषेध व्यक्त केला.
साभार :- देशोन्नती

Monday 23 January 2012

विद्यार्थिनींनी परत केला महागडा मोबाईल

प्रामाणिकपणाबद्दल शाळेत कौतुक
आजच्या काळात बहुतांश लोक फक्त आपल्यापुरताच विचार करतात. आपला फायदा दिसत असताना कुणाला एखाद्याच्या नुकसानाची पर्वा नसते. महागड्या मोबाईलचे तर आजच्या काळात चांगलेच फॅड निर्माण झाले आहे. त्यामुळे कोणालाही मोबाईल हवाहवासा वाटतो. त्यामुळे कधी मोबाईल हरविला तर तो आपला नव्हेच म्हणुन सोडून द्यावा लागतो. मात्र घाटंजी येथे दोन विद्यार्थिनींनी त्यांना सापडलेला मोबाईल संबंधीत व्यक्तीपर्यंत पोहचवुन प्रामाणिकपणाचे एक अनुकरणीय उदाहरण सामाजापुढे ठेवले आहे. विधी भगवान सरदार व काजल अशोक मंत्रीवार या येथिल नगर परिषद शाळा क्र.५ मध्ये सहाव्या वर्गात शिकणा-या विद्यार्थीनी पहाटे नेहमीप्रमाणे शाळेकडे येत असतांना त्यांना रस्त्यात एक महागडा मोबाईल पडलेला दिसला. मोबाईल खाली पडल्याने बंद झाला होता. त्यामुळे त्यांनी तो बॅगमध्ये ठेवला. घरी गेल्यावर त्यांनी मोबाईल सुरू करून त्यावर कुणाचा कॉल येईस्तोवर वाट पाहिली. कॉल येताच त्यांनी हा मोबाईल आम्हाला सापडला आहे. तो कुणाचा आहे सांगा अशी विचारणा केली. तसेच मोबाईल संबंधीत व्यक्तीला परत केला. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल नगर परिषद शाळेत त्यांचे कौतुक करण्यात आले. नगर परिषद शाळेचे शिक्षक कवेशकुमार कांबळे, रूपेश कावलकर, तुषार बोबडे, गजानन बंडीवार, चंद्रशेखर हळबेश्वर, हिरेश्वर यन्नरवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी इंग्रजी शब्द पाठांतर चाचणीत उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल अफशा महेवश सैय्यद, प्रितम हेमके, धवल कडू या विद्यार्थ्यांचेही कौतुक करण्यात आले. विधी सरदार या विद्यार्थीनीने यापुर्वी शाळेच्या एका कार्यक्रमात सर्वानाच चकीत केले होते. खासदार भावना गवळी या कार्यक्रमात आल्या असता तिने थेट त्यांच्याकडे जाऊन आमच्या शाळेत येण्यासाठी चांगला रस्ता नाही. त्यामुळे तुम्ही आमच्यासाठी रस्ता द्या अशी मागणी विधीने करून खुद्द खासदारांनाही अचंभित केले होते हे विशेष.
साभार :- देशोन्नती

Saturday 21 January 2012

सावंगी संगमच्या ग्रामसेवकाला अर्धनग्न करून मारहाण

तालुक्यातील सावंगी संगम येथिल ग्रामसेवकाला विषेश ग्रामसभेदरम्यान तिन लोकांनी कपडे काढायला लावून मारहाण केल्याची घटना घडल्याने त्याचा सर्वत्र निषेध होत आहे.
या घटनेतील आरोपी अशोक नालमवार, व्यंकटी अंगावार, आशन्ना जाधव यांच्या विरोधात कलम ३५३, ३४१, २९४, ५०६, ४२७, ३४ भा.दं.वि.अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जि.प.व पं.स.निवडणुकीसाठी ईच्छुक उमेदवारांकडे शौचालय आहे किंवा नाही या विषयासाठी विषेश ग्रामसभा बोलविण्यात आली होती. यादरम्यान आरोपींनी घरकुल व बि.पी.एल.यादी संदर्भात ठराव घेण्याची मागणी केली. मात्र विषेश ग्रामसभा असल्याने तसा ठराव घेता येणार नाही असे ग्रामसेवकाने सांगताच आरोपींनी सर्वांसमक्ष ग्रामसेवक हरिदास मडावी यांना कपडे काढण्यासाठी जबरदस्ती केली. त्यानंतर त्यांना धक्काबुक्की करून बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींनी गदारोळ घालुन तेथिल खुच्र्या व ईतर सामानाची तोडफोड केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. या घटनेमुळे कर्मचारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची फिर्याद गटविकास अधिकारी रामचंद्र गेडाम यांनी पारवा पोलीस स्टेशनला दाखल केली असुन पुढील तपास सुरू आहे.


घाटंजीत ३६ उमेदवारांचे नामांकन दाखल
नामांकन अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी घाटंजीत जि.प.गटात १४ तर पंचायत समितीसाठी २२ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. यामध्ये पार्डी नस्करी गटात ५, पार्डी(न) गणात २ तर शिरोली गणात १, शिवणी गटात ५ शिवणी गणात ६, मानोली गणात ३, पारवा गटात ४, पारवा गणात ६ व कुर्ली गणात ४ उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह उमेदवारी दाखल केली. उमेदवारी दाखल करणा-यांमध्ये पार्डी (न) जि.प.गटात वैशाली भोयर, शांता आसुटकर, उषा राठोड, ज्योती निकडे, शिवणी गटातून विशाल कदम, जितेंद्र ठाकरे, सतिश भोयर, प्रशांत धांदे, मोहन जाधव, पारवा गटात अविनाश ठाकरे, रमेश यमसनवार, योगेश पारवेकर, पांडूरंग निकोडे, पार्डी गणातून रत्नमाला कोंडेकर, अर्चना राठोड, शिरोली गणात अनिल गेडाम, शिवणी गणात गिरीधर राठोड, नरेंद्र चव्हाण, गजानन भोयर, संजय आडे, रविंद्र चव्हाण, शैलेष इंगोले, मानोली गणात सुशिला मंगाम, सुमित्रा पेन्दोर, रूख्मा कनाके, पारवा गणात अरूणा महल्ले, विद्या गावंडे, पुष्पा खडसे, माधुरी भोयर, शिल्पा ठाकरे, सुनिता शेंडे, सुवर्णा निकोडे, कुर्ली गणात गजानन गाऊत्रे, रमेश आंबेपवार, रूपेश कल्यमवार, रमेश वाटगुरे यानी नामांकन दाखल केले.


वादग्रस्त ठाणेदार अंबाडकर घाटंजीत रूजू
दिग्रस येथे वादग्रस्त ठरलेले ठाणेदार ओ.पी. अंबाडकर यांची घाटंजी पोलीस स्टेशनला बदली करण्यात आली आहे. आज त्यांनी घाटंजीच्या ठाणेदारपदाचा प्रभार घेतला. घाटंजीचे यापुर्वीचे वादग्रस्त ठाणेदार बाबुराव खंदारे निलंबीत झाल्यापासुन या पदाचा प्रभार सुरूवातीला सुधाकर अंभोरे व त्यानंतर स.पो.नि.अरूण गुरूनूले यांचेकडे होता. दिग्रस येथे अंबाडकर यांच्या विरोधात वकीलांच्या संघटनांनी आंदोलन केल्याने त्यांची बदली करण्यात आली.
साभार :- देशोन्नती

कोण गटस्थ, कोण तटस्थ आणी कोण कटस्थ हे गुलदस्त्यातच

शिवणीत रा.कॉ.चा "तिन तिघाडा"
पारवा गटात कॉंग्रेसची गोची
उमेदवारी मिळविण्यासाठी लागतोय कस

वातावरणात अंग गोठवणारा गारवा असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तिकीट वाटपावरून गरमागरमी सुरू आहे. राष्ट्रवादी मध्ये नव्यानेच आलेल्या नेते व कार्यकर्त्यांमुळे आजवर तालुक्यात राष्ट्रवादीची धुरा सांभाळणारे नेते दुखावल्या गेले आहेत. प्रबळ दावेदार वाढ़ल्याने शिवणीमध्ये रा.कॉ. व पारव्यात कॉंग्रेसला निर्णय घेणे कठीण जात आहे
बाजार समिती सभापती निवडीदरम्यान झालेल्या मतभेदांमुळे आजवर ना.मोघेंना समर्थन देणारे जि.प.सदस्य सुरेश लोणकर कॉंग्रेसमधुन रा.कॉ.मध्ये आले. त्यांच्यासोबत एक मोठा कार्यकर्ता वर्ग असल्याने राष्ट्रवादीमध्ये त्यांचा दबावगट वाढ़ला. त्यामुळे जिल्हा परिषदेत त्यांची उमेदवारी निश्चित समजल्या जात होती. मात्र त्या मतदार संघात आजवर कार्य करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहकोषाध्यक्ष व कुणबी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतिष भोयर हे या निर्णयामुळे दुखावल्या गेले. उमेदवारी मिळाली नाही तरी निवडणुक लढवायचीच असा चंग बांधुन ते आज नामांकन दाखल करणार आहेत. शिवणी मतदार संघासाठीच रा.कॉ.कडून उमेदवारी मिळावी यासाठी माजी खासदार सदाशीव ठाकरे यांचे पुत्र जितेंद्र ठाकरे हे सुद्धा मैदानात उतरले आहेत. ते सुद्धा आज उमेदवारी दाखल करतील. तर सुरेश लोणकरांनी काल मोठे शक्ती प्रदर्शन करीत नामांकन दाखल केले. त्यामुळे शिवणी मध्ये उमेदवारी मिळविण्यासाठीच जोरदार रस्सीखेच राहणार आहे. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांनी उमेदवारी कायम ठेवली नाही तरी ते पक्षाने निवडलेल्या उमेदवाराला साथ देणे कठीण आहे. ते तटस्थ राहिले तर ठिक मात्र जर त्यांनी पक्षाच्या विरोधात प्रचार केला तर प्रतिस्पर्धी उमेदवाराची वाट मोकळी होणार आहे.  नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या काही पदाधिका-यांनी पक्षविरोधी प्रचार करून प्रभाग २ मध्ये शिवसेनेला खुले सहकार्य केले होते. तसेच प्रभाग १ मध्येही राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांनी आपल्या विजयासाठी सेनेच्या ईतर उमेदवारांना सहकार्य केले. तिच परिस्थिती आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसुन येत आहे. पार्डी जि.प.गटात राष्ट्रवादीचे पं.स.सदस्य सहदेव राठोड यांच्या पत्नीला उमेदवारी मिळणार असा अंदाज बांधल्या जात होता. सहदेव राठोड हे पंचायत समितीत रा.कॉ.चे एकमेव सदस्य असुनही त्यांनी अत्यंत जबाबदारीने विरोधी भुमिका बजावली. एक अभ्यासू व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यास पुढ़े येणारे सदस्य अशी त्यांची ख्याती असल्याने पार्डी गटासाठी त्यांच्या पत्नीला जनसमर्थनही मिळू शकले असते. मात्र तेथे बाजार समितीचे उपसभापती प्रकाश डंभारे यांच्या पत्नीला संधी देण्यात आली. अण्णासाहेब पारवेकरांचा आदेशच सर्वस्व मानणारे असल्यामुळे डंभारे यांना त्याचे फळ मिळाले. सहदेव राठोड यांनीही मोठ्या मनाने पक्षाच्या आदेशाचा सन्मान राखत  पार्डी गणातून उमेदवारी घेऊन समाधान मानले. पारवा जि प  सर्कलमध्ये मागील निवडणुकीप्रमाणेच कॉंग्रेस अडचणीत सापडली आहे. कॉंग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश नसतानांही केवळ ना.मोघेंच्या कार्यक्रमात हजेरी लावणारे जि.प.सदस्य स्वामी काटपेल्लीवार व यवतमाळचे आमदार निलेश पारवेकर यांचे बंधु योगेश पारवेकर यांच्यात कॉंग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी तुल्यबळ स्पर्धा रंगली आहे. मागील निवडणुकीत निलेश पारवेकरांनी आपले राजकीय वजन वापरून वेळेवर ए.बी. फॉर्म आणल्याने काटपेल्लीवार यांची गोची झाली होती. मात्र ना.मोघेंनी हा विषय प्रतिष्ठेचा केल्याने तेव्हा स्वामी काटपेल्लीवार अवघ्या काही मतांच्या फरकाने निवडून आले होते. रा.कॉ.कडून सुहास पारवेकर व भाजपाकडून रमेश यमसनवार हे उमेदवार जवळजवळ निश्चित झाले आहे. 
राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांना गटबाजीने ग्रासले असल्याने नेमकी कोणाची काय भुमिका राहणार हे कळायला मार्ग नाही. उमेदवारी न मिळाल्याने दुखावलेले नेते तटस्थ राहणार, उमेदवारी कायम ठेवणार की, उमेदवारी मागे घेऊन विरोधी पक्षाच्या उमेदवाराला सहकार्य करून ‘कटस्थ’ होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
साभार :- देशोन्नती

नामांकन दाखल करतांना कॉंग्रेस रा.कॉ.चे शक्तीप्रदर्शन

शिवणी गट ठरतोय दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेचा 





नामांकन दाखल करण्याच्या तिस-या दिवशी जि.प.व पं.स. साठी १२ उमेदवारानी नामांकन अर्ज दाखल केले.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस साठी ही निवडणुक प्रतिष्ठेची झाली असल्याने नामांकन दाखल करतांना दोन्ही पक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आज दाखल झालेल्या नामांकनामध्ये पारवा जि.प.गटातून अयनुद्दीन सोलंकी, मधुसूदन मोहुर्ले, सुहास देशमुख, पारवा गणातून स्नेहा खडसे, कुर्ली गणातून नितीन नार्लावार, अयनुद्दीन सोलंकी, पार्डी गटातून मंदा डंभारे, पार्डी गणातून छाया सहदेव राठोड, शिवणी गटातून सुरेशबाबू लोणकर, देवानंद पवार, शिवणी गणातून संजय आडे, मानोली गणातून सिंधु मेश्राम यांचा समावेश आहे.
नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुमारे पाच हजार कार्यकर्त्यांसह भव्य रॅली काढ़ली होती. या रॅलीमध्ये माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, जि.प.सदस्य सुरेश लोणकर, बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, भुविकास बँकेचे अध्यक्ष शंकर ठाकरे, रमेश लोणकर, मारोती पवार यांचेसह नगर परिषद, पंचायत समिती, खरेदी विक्री संघ, बाजार समितीचे पदाधिकारी व सदस्यांसह  कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तर कॉंग्रेसच्या रॅलीमध्ये सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, योगेश पारवेकर, नगराध्यक्ष जगदिश पंजाबी, सुभाष गोडे, परेश कारीया, सुधाकर अक्कलवार यांचेसह पंचायत समिती, नगर परिषदेतील पदाधिकारी व सदस्यांसह सुमारे दोन हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ग्रामिण भागातून मोठ्या प्रमाणात नागरीक आल्याने तहसिल कार्यालय परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.

Thursday 19 January 2012

सावधान....! मोबाईलवर कॉल करून गंडविणारे आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रीय

फसवणुकीच्या गोरखधंद्याचे धागेदोरे पाकीस्तानात?
घाटंजी तालुक्यातील युवकाला १५ हजारांनी फसविले
मोबाईलवर आंतरराष्ट्रीय बारा अंकी क्रमांकावरून कॉल येतो, तुम्ही २५ लाख रूपये जिंकणारे भाग्यवान ठरले आहात. तुमचा मोबाईल नंबर लकी ड्रॉ मध्ये निवडल्या गेला आहे. मात्र हे बक्षीस मिळविण्यासाठी तुम्हाला अमुक ईतकी रक्कम आमच्या बँक खात्यात जमा करावी लागेल. रक्कम जमा होताच ती लगेच काढण्यात येते. त्यानंतर त्या मोबाईलवर संपर्क  होत नाही किंवा अश्लिल शिवीगाळ केल्या जाते. जास्त मेहनत न करता लाखो रूपयांनी फसवणुक करण्याचा हा गोरखधंदा गेल्या काही दिवसात चांगलाच चर्चेत आला आहे. फसगत झालेले लोक मात्र डोकेदुखी मागे लागू नये म्हणुन तक्रार करण्यास पुढे येत नाहीत
घाटंजी तालुक्यात सध्या अनेकांना असे कॉल येत असुन काही लोक फसवणुकीला बळी सुद्धा पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. घाटंजी तालुक्यातील येडशी गावचा एक युवक पैशाच्या लोभापायी तब्बल १५ हजारांनी गंडविल्या गेला आहे. या घटनेची पोलीस तक्रार झाली नसली तरी सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. सदर युवकाला मोबाईलवर ९२३०५८७३८५८७ या क्रमांकावरून कॉल आला. त्याचा मोबाईल नंबर लकी ड्रॉ मध्ये निवडल्या गेल्याचे सांगण्यात आले. याविषयी माहितीसाठी १०१००६२७२११० या क्रमांकावर कॉल करा अशी सुचना देण्यात आली. फक्त ठराविक १० जणांनाच प्रत्येकी २५ लाखांचे बक्षीस लागल्याचे त्याला सांगण्यात आले. मात्र त्यावरील करापोटी १५ हजार रूपये आधी भरावे लागतील अशी अशी अट ठेवण्यात आली. त्यामुळे सदर युवकाने अकोलाबाजार येथिल स्टेट बँकेमधुन त्याला सांगण्यात आलेल्या बँक खात्यात १५ हजार रूपये जमा केले. आपले बक्षीस आता मिळणार या अपेक्षेने त्याने संबंधीत मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याला अश्लिल शिव्या ऐकाव्या लागल्या. आपण फसविल्या गेल्याचे लक्षात आल्यावर त्याने पोलीस स्टेशनशी संपर्क केला.
येडशी हे गाव घाटंजी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत नसल्याने तक्रार नोंदविणे शक्य नव्हते. त्यामुळे येथिल नायक पोलीस कॉन्स्टेबल उमेश चंदन यांनी सदर युवकाची अडचण समजुन घेतली. ज्या खात्यावर युवकाने पैसे जमा केले ते खाते कुठले आहे याची चौकशी करण्यास ते युवकासोबत स्टेट बँकेच्या घाटंजी शाखेत गेले.
तिथे त्या बँक खात्याची चौकशी केली असता ते आंध्रप्रदेशातील एका शहरातील असल्याचे निदर्शनास आले. शिवाय त्या खात्यात टाकण्यात आलेले पैसे तिरूपती येथिल एका एटीएम मधुन काढ़ण्यात आल्याची माहिती पुढ़े आली. त्यामुळे चंदन यांनी सदर युवकाला संबंधीत पोलीस स्टेशनला तक्रार करण्यास सांगीतले. मात्र अद्याप त्या युवकाने तक्रार केली नाही. बारा अंकी मोबाईलवरून फोन येत असल्याने ही आंतरराष्ट्रीय टोळी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच आंध्रप्रदेशासह लगतच्या राज्यात या टोळीचे जाळे पसरले असल्याची शक्यता आहे. +९२ हा आय.एस.डी. कोड पाकीस्तानचा आहे. त्यामुळे हे रॅकेट  पाकीस्तानमधुन तर चालविल्या जात नाही ना असा संशय व्यक्त केल्या जात आहे. ‘फेक  लॉटरी’ च्या माध्यमातुन लाखो रूपयांनी गंडविण्याचा प्रकार नुकताच दिल्ली येथे उघडकीस आल्याची बाब प्रसिद्धी माध्यमांमध्ये चर्चेत आली आहे. तिथे चौकशी दरम्यान हे फसवणुक करणारे रॅकेट पाकीस्तानातुन चालविल्या जात असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पुढे आला आहे. या पृष्ठभुमीवर घाटंजी तालुक्यासह विदर्भात घडत असलेल्या घटनांना गंभिरतेने घेण्याची गरज असुन नागरीकांनीही अशा फसव्या कॉल पासुन सावध राहणे आवश्यक आहे.


अमोल राऊत
साभार :- देशोन्नती

घरबसल्या शोधता येणार मतदार यादीतील नाव

काही वर्षांपुर्वी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी राजकीय पक्षांकडे असलेली मतदार यादी किंवा निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी मतदार याद्या  प्रसिद्ध केल्या आहेत त्या पाहणे असे दोनच पर्याय होते. मात्र आता निवडणूक आयोगानेही बदलत्या तंत्रज्ञानानुसार ‘हायटेक’ होत मतदार राजाला घरबसल्याच आपले नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही हे शोधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. फोन कॉल, एसएमएस आणि संकेतस्थळांच्या माध्यमातून आता मतदार यादीमध्ये नाव शोधता येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर म्हणजे (http://www.mahasec.com) वर निवडणूक हेल्पलाईन नंबर अशी लिंक असून त्या ठिकाणी ९२२५३२००११ या क्रमांकावर संपर्क साधून सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही हे जाणून घेता येणार आहे. त्याचप्रमाणे एसएमएसच्या माध्यमातूनही मतदारांना आपले नाव शोधण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी मतदारांनी आपले संपूर्ण नाव आणि वय आपल्या मोबाईलवरून टाईप करून तो एसएमएस ५६६७७ या क्रमांकावर पाठविल्यानंतर ही माहिती मिळू शकते. यवतमाळ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी खासकरून तयार करण्यात आलेल्या (http://www.zpyavatmalelection.org) या  संकेतस्थळावर सुद्धा मतदारांना आपले नाव शोधता येणार असून त्यासाठी नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव टाकल्यानंतर मतदाराला त्यांचे नाव कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे, प्रभाग क्रमांक कोणता आहे, वय, लिंग आणि मतदान ओळखपत्र क्रमांक याची माहिती मिळणे शक्य होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अशाप्रकारे प्रथमच मतदार राजाला घरबसल्या आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही हे पाहणे शक्य झाल्यामुळे संकेतस्थळाचा तसेच एसएमएस सुविधेचा लाभ मोठ्या प्रमाणात मतदार घेताना दिसत आहेत. नगर परिषद निवडणुकीनंतर जि.प.व पं.स. निवडणुकीसाठीही आयोगाने स्वतंत्र संकेतस्थळे सुरू केली आहेत. त्यामध्ये निवडणुक प्रक्रीया, मतदार याद्या, नामांकन अर्ज, मतदार संघाचा नकाशा यासह निवडणुकीशी संबंधीत सर्व माहिती प्रसिद्ध करण्यात यावी असे आयोगाचे निर्देश आहेत. सध्या संकेतस्थळ तयार असले तरी त्यामध्ये बरीच माहिती मात्र अद्याप टाकण्यात आलेली नाही. यवतमाळ जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या या संकेतस्थळावर जि.प.सर्कल, गण, नकाशा अशा प्रकारच्या माहितीसाठी लिंक दिलेल्या आहेत. मात्र त्यात माहिती उपलब्ध नाही. एकंदरीतच निवडणुक आयोग आता हायटेक होत असला तरी स्थानिक यंत्रणेमध्ये या आधुनिकतेला पुरक असा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे याची पुरेपूर अमलबजावणी होण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे.

Tuesday 17 January 2012

विद्युत पारेषण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यावर गुन्हा दाखल

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे सहाय्यक अभियंता अनिल बागडे यांच्यावर घरात घुसून शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. घाटंजी पोलीसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल न केल्याने फिर्यादी राजेश जाधव यांनी येथिल प्रथम श्रेणी न्यायालयात दाद मागीतली होती.
याबाबत विस्तृत वृत्त असे की, विद्युत पारेषण कंपनी कडून घाटंजी तालुक्यात टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. फिर्यादी जाधव यांच्या शेतातुनही टॉवर उभारणी करण्यात येणार होती. मात्र त्यांनी याप्रकरणी कायदेशीर मार्गाने विरोध केला. उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात याप्रकरणी याचीका दाखल आहे. यामुळे चिडलेल्या सहाय्यक अभियंता बागडे यांनी १० मे २०११ रोजी जाधव यांच्या घरात घुसून शिवीगाळ तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार जाधव यांनी घाटंजी पोलीस स्टेशनला केली होती.
मात्र घाटंजी पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे राजेश जाधव यांनी न्यायालयात दाद मागीतली होती. अखेर सहाय्यक अभियंता अनिल बागडे यांचेवर कलम ४४८, २९४, ५०६ भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शेतात उभ्या असलेल्या पिकांची पर्वा न करता विज पारेषण कंपनीचे अधिकारी पोलीस बंदोबस्ताचा दबाव शेतक-यांवर टाकुन टॉवर उभारणीचे काम करीत आहेत. यामध्ये शेतक-यांना नुकसान झालेल्या पिकाची भरपाई सुद्धा योग्य वेळेत देण्यात येत नाही. विज पारेषण कंपनीच्या दंडूकेशाहीच्या विरोधात तालुक्यातील शेतक-यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण होत आहे.
साभार :- देशोन्नती

Saturday 14 January 2012

पत्नीची क्रूर हत्या करणा-या नराधम पतीस अटक

आमडी येथिल घटनेने घाटंजी तालुक्यात खळबळ
जिच्याशी साता जन्माची गाठ बांधली त्या पत्नीला विष पाजुन व त्यानंतर गळा दाबुन अत्यंत निर्घुणपणे हत्या करणा-या नराधम पतीला घाटंजी पोलीसांनी अटक केली. त्याचेवर कलम ४९८ (अ), ३०२, २०१ भा.दं.वी.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १२ जानेवारीच्या दुपारी पती संजय नामदेव महल्ले (४५) रा.आमडी याने सौ.सुनिता हिला शेतात नेले. सुनिता हिच्या वडीलांच्या शेतातून आरोपीच्या शेतात पाईपलाईन टाकण्यावरून दोन कुटूंबात वाद सुरू होता. शिवाय आरोपी त्याच्या पत्नीला नेहमीच सासरवरून या ना त्या कारणावरून पैसे आणण्यासाठी शारिरीक व मानसिकदृष्टीने छळ करीत होता. लग्न झाल्यापासुनच सदर विवाहितेला असा त्रास सुरू होता. मात्र नेहमीच मागण्या पुर्ण होत असल्याने त्याला ती सवयच जडली. लग्नाला तब्बल विस वर्ष होऊनही त्याच्या मागण्या वाढतच चालल्या होत्या. अगदी काही दिवसांपुर्वीच त्याने मुलीच्या वडीलांना को-या स्टॅम्प पेपरवर स्वाक्षरी मागीतली होती. मात्र त्यांनी नकार दिल्याने त्याचा पारा भडकला. त्यावेळी सर्वांसमक्ष त्याने ‘आता तुमचे आमचे नाते संपले, याचा परिणाम तुमच्या मुलीला भोगावा लागेल’ अशी धमकीही दिली होती. अखेर १२ जानेवारीला त्याने पत्नीला शेतात नेऊन निर्दयीपणे खुन केला. पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली असा बनाव निर्माण करण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र घटनास्थळावरील परिस्थितीवरून ती आत्महत्या नसुन खुनच आहे हे निदर्शनास आले. मृतक महिलेचा गळा दाबुन नंतर विष पाजण्यात आले असावे असा अंदाज सुत्रांनी व्यक्त केला. शवविच्छेदनातही अंगावर जखमा तसेच गळा आवळल्याच्या खुना दिसुन आल्याने ही हत्या असल्याचे प्राथमिक दृष्ट्या सिद्ध झाले. घटनेचा तपास प्रभारी ठाणेदार अरूण गुरूनूले करीत आहेत. सदर विवाहितेवर आमडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
वडीलांच्या या कृत्यामुळे मुलगी सोनू (वय १५) व मुलगा योगेश (वय ७) यांच्यावरील मायेची सावली निघुन गेली आहे. आपल्या मुलीचा निर्घुणपणे खुन करणा-या नराधमाला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी मुलीचे वडील जयवंत महादेव निवल यांनी केली आहे.

Friday 13 January 2012

आता घाटंजी तालुक्यातील नेत्यांच्या अस्तित्वाची परिक्षा

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच पक्ष, नेते व कार्यकर्त्यांची लगबग वाढ़ली आहे. काही नेत्यांना तर निवडणुक पुढे दिसताच ग्रामिण भागातील जनतेचा पुळका येतो. मात्र निवडणुकीच्या अगोदर विकासकामांचा देखावा उभा केला तर काय होते हे नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या निकालावरून लक्षात येईल. मात्र नेते परिणामांची चिंता न करता पाऊले उचलत आहेत ही त्यांच्यासाठीच धोक्याची घंटा आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांवर पकड असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तालुक्यातील आमदार खासदारांच्या अस्तित्वाचीच परिक्षा या निवडणुकीतुन होणार आहे. तिन जिल्हा परिषद व सहा पंचायत समितीच्या जागांसाठी ही निवडणुक होणार आहे. नगर परिषद निवडणुकीपुर्वी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते सुरेश लोणकर आपल्या कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादीमध्ये आल्याने कॉंग्रेसची ताकत अर्ध्यावर आली असे मानल्या जात आहे. मात्र असे असले तरी नगर परिषद निवडणुकीमध्ये या अपेक्षीत असा पक्षांतराचा काहीच प्रभाव दिसला नाही. उलट राष्ट्रवादीला एका जागेचे नुकसान झाले. लोणकरांची शहरात फारसी पकड नसली तरी ग्रामिण भागात त्यांना मानणारा एक वर्ग आहे. सध्या तालुक्यातील सहकारी संस्थांवर त्यांचेच वर्चस्व आहे. लोणकरांना शिवणी सर्कलमधुन राष्ट्रवादीची उमेदवारी जवळजवळ निश्चित समजल्या जात आहे. मात्र त्यामुळे या जागेसाठी ईच्छुक असणारे राष्ट्रवादीतील मुळचे दावेदार दुखावल्या जाणार हे निश्चित. ते खुल्या दिलाने सहकार्य करणार का यावरही बरेच काही अवलंबुन राहणार आहे. मागील निवडणुकीत  पारवा सर्कलमधुन कॉंग्रेसच्या उमेदवाराला पराभुत करून निवडुन आलेले अपक्ष जि.प.सदस्य स्वामी काटपेल्लीवार सध्या कॉंग्रेसच्याच गोतावळ्यात मिरवतांना दिसतात. कॉंग्रेस पक्षात प्रवेश झालेला नसला तरी कॉंग्रेसच्या प्रत्येकच कार्यक्रमात त्यांची आवर्जुन हजेरी असते. यावेळी पारवा सर्कलमधुन आमदार निलेश पारवेकर यांचे बंधु योगेश पारवेकर यांना कॉंग्रेसची उमेदवारी मिळणार हे जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळे काटपेल्लीवार यावेळीही अपक्ष उमेदवारी दाखल करणार की त्यांच्या ‘पुनर्वसनाची’ व्यवस्था करण्यात आली आहे हे लवकरच स्पष्ट होईल. सध्याच्या परिस्थितीवरून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात तुल्यबळ लढत होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांचेसह जि.प. व पंचायत समिती मध्ये मनसे आपले उमेदवार उभे करणार आहे.
या भागाचे लोकप्रतिनिधी व सामाजीक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, लोकनेते असे बिरूद लावणारे जि.प.सदस्य सुरेश लोणकर व अण्णासाहेब पारवेकर, तसेच तालुक्यातील एक वजनदार व्यक्तीमत्व तथा यवतमाळचे आमदार निलेश पारवेकर यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागणार आहे.

Wednesday 11 January 2012

ना.शिवाजीराव मोघेंकडून आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार



स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतांना सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनी घाटंजी तालुक्यातील ग्रामिण भागात भुमिपुजन व नागरिकांना प्रलोभन दाखविणारे कार्यक्रम घेतल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे व कुर्ली येथिल सरपंच सोलंकी यांनी राज्य निवडणुक आयोग व संबंधीतांकडे केली आहे.
विशेष उल्लेखनिय म्हणजे या भुमिपूजन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. दि.८ व १० जानेवारीला हा धडक कार्यक्रम राबविण्यात आला. तब्बल २ कोटी ११ लाख रूपयांच्या कामांचे भुमिपूजन यादरम्यान करण्यात आले अशी माहिती आहे. उल्लेखनिय म्हणजे प्रत्यक्ष कुदळ मारून औपचारीकपणे भुमिपूजन करण्यात आले नसले तरी निमंत्रण पत्रिकेत नमुद असलेल्या गावामध्ये सभा घेऊन मंजुर झालेल्या कामांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. तसेच कोणती कामे मंजुर करण्यात आली आहेत ते प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन ग्रामस्थांना सांगण्यात आले. त्यामुळे हा देखिल आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी नागरिकांनी छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केला असता आयोजकांनी त्यांना मज्जाव केल्याची माहिती आहे.
या सर्व कार्यक्रमांना ना.शिवाजीराव मोघे, जिल्हा परिषद सदस्य जयप्रकाश काटपेल्लीवार, देवानंद पवार यांचेसह पंचायत समितीचे काही पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. भुमिपूजन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका आचारसंहिता लागल्यावर ग्रामिण भागात वाटण्यात आल्या. निमंत्रण पत्रिकेत नमुद कार्यक्रमाप्रमाणे दि.८ जानेवारीला सकाळी १० वाजेपासुन पंगडी, सायतखर्डा, बोधडी, झटाळा, तरोडा, वघारा, सावंगा, कालेश्वर, माथनी, जांब, पार्डी, किन्ही, वाढोणा, लिंगापुर येथे कार्यक्रम झाले. त्यानंतर दि. १० जानेवारीला सायफळ, ताडसावळी, चिखलवर्धा येथे नियोजीत वेळेवर कार्यक्रम झाले. आचारसंहितेच्या काळात विकासकामाचे भुमिपूजन केल्याच्या कारणावरून राज्य निवडणुक आयोगाने राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजीत पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असताना राज्याचे आणखी एक कॅबिनेट मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनीही मतदारांना प्रलोभन दाखविण्याच्या उद्देशाने आचारसंहितेच्या काळात अशाप्रकारचा कार्यक्रम घेतल्याने विरोधकांच्या हाती आयताच मुद्दा मिळाला आहे. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकषी करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी संबंधीतांवर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
साभार :- देशोन्नती

Monday 9 January 2012

वनविभागातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांसाठी भिक मांगो आंदोलन

तेंदुपत्ता बोनस वाटपातील गैरप्रकाराचा अभिनव निषेध














ख-या तेंदुपत्ता मजुरांना वगळून बोगस मजुरांची नावे लाभार्थ्यांच्या यादीत टाकुन लाखो रूपयांचा भ्रष्टाचार करणा-या वनविभागाच्या अधिका-यांवर कार्यवाहीच्या मागणीसाठी घाटंजीत आज अभिनव पद्धतीने भिक मांगो आंदोलन करण्यात आले. प्राऊटीस्ट ब्लॉक संघटनेच्यावतीने येथिल हुतात्मा स्मारकापासुन आंदोलनाला सुरूवात झाली. व्यापारपेठेत सर्वत्र झोळी पसरून भ्रष्टाचारी वनाधिका-यांसाठी भिक मागण्यात आली. गरीब मजुरांनीही आपल्या ऐपतीप्रमाणे झोळीत भिक टाकली.
घाटंजी तालुक्यातील अनेक तेंदुपत्ता मजुरांच्या बँक खात्यामध्ये बोनस जमा झाला नाही. त्यांच्याऐवजी तेंदुपत्ता मजुरीशी ज्या लोकांचा संबंधच आला नाही अशा खळेदार व वनकर्मचा-यांच्या नातलगांची नावे लाभार्थ्यांच्या यादीत आढळली. याबाबत मजुरांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. एका मजुराचे सुमारे २५ हजार रूपयांचे बोनस याप्रमाणे अनेक मजुरांचे बोनस बोगस नावांनी वनाधिका-यांनी गडप केले अशी आंदोलकांची तक्रार आहे. या प्रकाराची चौकषी करून दोषी वनाधिका-यांवर फौजदारी कार्यवही करण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व प्राऊटीस्ट ब्लॉकचे मधुकर निस्ताने यांचेसह देवानंद गेडाम, मोरेश्वर वातीले, अजय गजभिये, अशोक जयस्वाल, दिनकर मानकर, संजय पाईकराव यानी केले. परसराम म्हरस्कोल्हे, सुशिला मेश्राम, बेबी पेंदोर, शोभा म्हरस्कोल्हे, फयमीदा खैरकार, भागीरथा वाघाडे, शंकर केराम, सुभाष गेडाम नरेश पेन्दोर, भास्कर वडदे, महादेव गजभिये यानी आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला.

साभार:- देशोन्नती