Pages

Wednesday 12 December 2012

बेपत्ता सपनाच्या पालकांचे अखेर देवालाच साकडे !


दिड महिन्यात पोलीस तपास शुन्य

बेपत्ता सपनाचा शोध घेऊन थकलेल्या पळसकर कुटूंबीयांनी पोलीस तपासातील अपयश बघता अखेर देवालाच तिला  वाचविण्यासाठी साकडे घातले आहे. त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या अजनसरा येथिल भोजाजी महाराज देवस्थानाला जाऊन पळसकर कुटूंबीयांनी सपनासाठी नवस केला. सपनाच्या काळजीपोटी चिंतातूर तिचे आईवडील अजुनही आपल्या परिने शोध घेत आहेत.
अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेले मुरली येथिल गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न व सपना पळसकर बेपत्ता प्रकरण पोलीसांच्या दिरंगाईमुळे तपासशुन्य ठरले आहे. दस-याच्या दिवसापासुन चोरांबा येथिल सपना पळसकर ही चिमुकली बेपत्ता आहे. तर गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न १७ नोव्हेंबरला झाला. ग्रामस्थांनी पकडून दिलेले २ आरोपी व ईतर दोघे असे अटकेत असलेल्या चार आरोपींच्या पलिकडे प्रकरण सरकलेच नाही. गेल्या विस दिवसांपासुन केवळ बयाण घेणे, गावोगावी तपास पथक पाठविणे अन फिर्यादी, वकील, पत्रकार यांची चौकशी यापलीकडे पोलीस तपास झाल्याचे दिसत नाही.
संशय हे पोलीसांचे प्रमुख शस्त्र. मात्र या प्रकरणात पोलीसांनी हे शस्त्रच म्यान केले की काय अशी परिस्थिती आहे. कारण पोलीस अधिक्षक, एस.डी.पी.ओ. व ठाणेदार यांनी सुरूवाती पासुनच या प्रकरणातील आरोपींवर साधा संशय घेतला नाही. त्यांच्या जवळ मुलगी नव्हतीच हिच गोष्ट पोलीस विश्वासाने सांगत आहेत. कदाचीत तसे असेलही. मग सपना कुठे आहे? प्रकरणातील आरोपींविषयी घटनेच्या दिवसापासुन पोलीसांना असलेली सहानुभूती चर्चेचा विषय ठरली आहे. थातूर मातूर चौकशी करून सोडून देणे, जाणिवपुर्वक एकाच दिवसाचा पी.सी.आर, न्यायालयीन कोठडीत पाठवितांना आरोपींना ‘व्हर्टीगो’ ही आलिशान कार वापरण्याची देण्यात आलेली मुभा पोलीसांविषयी संशय निर्माण करण्यास पुरेसे आहे. 
केवळ प्रसार माध्यमे व विवीध संघटना यांचा दबाव आहे म्हणुनच पोलीस तेवढ्यापुरता तपास करीत असल्याचे दिसत आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, विवीध आदिवासी संघटना, रा.कॉं.चे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर, महिला कॉंग्रेस, यवतमाळ यांनी या प्रकरणात प्राधान्याने लक्ष दिले आहे. जनमानसात सध्या केवळ याच प्रकरणाची चर्चा आहे. मात्र तरिही तपास सुरू आहे यापलिकडे कोणतेही उत्तर पोलीस देऊ शकले नाहीत.
बेपत्ता सपना व गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न या दोन्ही प्रकरणात तपासामध्ये दिरंगाई करणा-या पोलीस अधिका-यांवर कोणतीही कार्यवाही झाली नाही. ते पोलीस स्टेशनला असतांना तपास योग्य रितीने होईल का? सध्याचे तपास अधिकारी भालचंद्र महाजन यांनाही अद्याप प्रकरणातील एकही धागा सापडला नाही. त्यामुळे केवळ दबाव आहे म्हणुन तपास करीत असल्याचे  दाखवायचे असा प्रकार तर सुरू नाही ना? याच पद्धतीने तपास सुरू राहिला तर सपनाचा शोध लागणार का? व पैशाच्या लालसेने झपाटलेले गुप्तधन प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीसांच्या तावडीत सापडणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment