Pages

Monday 31 December 2012

राज्यस्तरीय शुटींगबॉल स्पर्धेत शि.प्र.मं.कन्या शाळेच्या विद्यार्थीनींची बाजी



येथिल शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचालीत शि.प्र.मं.कन्या शाळेच्या विद्यार्थीनींनी यवतमाळ येथे झालेल्या ३१ व्या राज्यस्तरीय शुटींगबॉल स्पर्धेत सबज्युनियर व ज्युनियर गटात क्रमश: प्रथम व द्वितीय स्थान पटकावले. 
शाळेच्या विद्यार्थीनी अनुराधा र.निवल, मंजुषा सु.वखरे, रजनी प्र.वातीले, मयुरी प्र.वातीले, निकिता सु.गावंडे, काजल उ.राठोड, यांनी आपल्या संघाकडून खेळतांना उत्कृष्ट प्रदर्शन केले व वैय्यक्तीक खेळाच्या जोरावर आपल्या संघाला प्रथम व द्वितीय स्थान मिळवुन देण्यात मोलाची कामगिरी बजावली.
यवतमाळ जिल्ह्याला सबज्युनियर गटात प्रथम तर ज्युनियर गटात द्वितीय स्थान मिळाले. या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष एस.ए.गिलानी, उपाध्यक्ष संजय गढीया, अ‍ॅड.अनिरूद्ध लोणकर, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके, मुख्याध्यापीका संध्या कासलिकर, पर्यवेक्षक द.तु.जमदापुरे यांचेसह शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी वृंदाने या विद्यार्थीनींचे कौतुक केले आहे. या सर्व विद्यार्थीनींना शाळेच्या शारिरीक शिक्षण मार्गदर्शक शिक्षीका कु. केकापुरे व सहाय्यक शिक्षक अतुल ठाकरे यांचे मार्गदर्शन मिळाले.
साभार :- देशोन्नती 

स्व.प्रा.विनायक हटवारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिर



मानवी हक्क परिषद व शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालय रा.से.यो.पथकाच्या संयुक्त विद्यमाने स्व.प्रा.विनायक हटवारे यांचे स्मृतीप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विठ्ठल रूख्मीनी मंदिर मुरली ता.घाटंजी येथे उद्या दि.१ जानेवारीला सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत हे शिबिर घेण्यात येणार आहे. मुरली येथे सध्या गिलानी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर सुरू आहे. या शिबिराचा समारोप सुद्धा उद्या होणार आहे. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गिलानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए.शहेजाद राहतील. तर गटविकास अधिकारी रामदास गेडाम, रा.से.यो.चे क्षेत्रीय समन्वयक प्रा.आर.व्ही.राठोड, स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक जीवन वरठे, पोलीस पाटील राजु साठे, मुख्याध्यापीका सि.बी.ढोणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहिल. सकाळी १० ते ३ या वेळात रक्तदान शिबिर घेण्यात येईल. कै.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रक्तपेढी, यवतमाळ ची चमु या शिबिरासाठी येणार आहे. रक्तदात्यांनी या शिबिराच्या माध्यमातून रक्तदानाच्या या सामाजीक कर्तव्यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन गिलानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए.शहेजाद, प्रा.व्ही.एस.जगताप, अशोक ढवळे, आशिष साखरकर, केतन हटवारे, अनुप हटवारे, मनोज बाळे, विनोद साखरकर यांनी केले आहे.

For More Information Contact
Pro.V.S.Jagtap : 9423655145
Ashok Dhavle : 9423435616
Ashish Sakharkar : 8888464670
Ketan Hatware : 09618953795
Anup Hatware : 9405979794

Friday 28 December 2012

घाटंजीचे नगराध्यक्ष जगदिश पंजाबी यांचा राजीनामा



नगराध्यक्ष जगदिश पंजाबी यांनी आज सायंकाळी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सत्तास्थापनेच्या वेळी ठरल्याप्रमाणे जवळपास एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. आज सायंकाळी ७ वाजेदरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला राजीनामा सादर केला. यापुढे नगराध्यक्षपदी कॉंग्रेसचेच किशोर दावडा यांची वर्णी लागणार आहे. सहा महिन्यानंतर एका वर्षासाठी राष्ट्रवादीकडे नगराध्यक्षपद देण्यात येईल. तर पुढील अडीच वर्ष नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला साठी राखीव असल्याने ते राष्ट्रवादीकडेच राहणार आहे. सध्या घाटंजी नगर परिषदेत कॉंग्रेस आणी राष्ट्रवादीची सत्ता आहे.

साभार :- देशोन्नती 

घाटंजी येथे जिल्हास्तरीय माळी समाज वधु वर परिचय मेळावा


सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी भव्य आयोजन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या औचित्याने अ.भा.माळी महासंघ तालुका घाटंजीच्या वतीने जिल्हास्तरीय सर्वशाखेय माळी समाज उपवर वधु व पालक परिचय मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दि.६ जानेवारीला सकाळी ११ वाजता संत मारोती महाराज सांस्कृतिक भवन घाटंजी येथे हा मेळावा होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा.माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.राजेंद्र महाडोळे राहतील. उद्घाटन ज्ञानेश्वर गोबरे यांचे हस्ते होईल. यावेळी घाटंजीचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर, सा.बां.विभागाचे उपविभागीय अभियंता चंद्रकांत मेहेत्रे, न.प.यवतमाळच्या बांधकाम सभापती माधुरी अराठे, म.ज्योतीबा दिनबंधु कल्याण मंडळाचे अध्यक्ष अशोक तिखे, अ.भा.माळी महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर उडाखे, उपाध्यक्ष वसंत निरपासे, झिबल वाढई, जिल्हा प्रवक्ता काशिनाथ लाहोरे, घाटंजी पं.स.उपसभापती सुवर्णा निकोडे, उत्तम खंदारे, सावतामाळी नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष आत्माराम जाधव, अ.भा.महिला माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्ष माया गोबरे, गजानन चौधरी, रामभाऊ किरणापुरे, दत्ता सोनुले, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विवीध समित्यांचे गठण करण्यात आले आहे. स्वागत समितीमध्ये अविनाश घाटे, राजेंद्र घाटे, शैलेश हुड, प्रदिप चोपडे, कार्तीक शेंडे, राम भेंडारे, गजानन अनखुळे, निमंत्रक व आयोजन समिती मध्ये पांडूरंग निकोडे, झोलबाजी लेनगुरे, रामकृष्ण सोनुले, गजानन लेनगुरे, रमेश वाडगुरे, भारत वाडगुरे, बंडू निकोडे, चंद्रभान चौधरी, मनोहर वाडगुरे, सदाशिव ठाकरे, श्रीराम बोरूले, देवानंद गाऊत्रे, संजय ठाकरे, गणेश मोहुर्ले, पुंडलिक वाढई, विठ्ठल चौधरी, अजाब लेनगुरे, मोहन कोटरंगे, किसन गाऊत्रे, संतोष गुरनुले, नागोराव लेनगुरे, संतोष सोनुले, नरसिंग गुरनुले, चंद्रभान शेंडे, मनोहर चौधरी यांचा समावेश आहे. तालुक्यातील सर्व ग्रामशाखेचे पदाधिकारी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अथक परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व माळी समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन अ.भा.माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे निमंत्रक पांडूरंग निकोडे यांनी केले आहे.
साभार :- देशोन्नती 

घाटंजी येथे शिक्षक मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन



यवतमाळ जि.प.प्राथमिक शिक्षक संघ र.न.२३५ शाखा घाटंजीचे वतीने तालुकास्तरीय शिक्षक मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन दि.३० डिसेंबरला स्थानिक जलाराम मंदिरात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजुदास जाधव राहतील. यावेळी पं.स.सभापती शैलेष इंगोले, जि.प.सदस्य योगेश पारवेकर, उषा राठोड, पं.स.उपसभापती सुवर्णा निकोडे, सदस्य रूपेश कल्यमवार, रमेश धुर्वे, सुमित्रा पेंदोर, रत्नमाला कोंडेकर, गटविकास अधिकारी अजय राठोड, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके, विनोद गोडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात शिक्षकांच्या विवीध प्रलंबीत समस्यांवरही चर्चा होणार आहे. तालुक्यातील सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाला आवर्जुन हजर राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत, दिपक चौधरी, विजय डंभारे, शेख जलिल, नारायण भोयर, संजय इंगोले, काशिनाथ आडे, ज्ञानेश्वर पुसनाके, लक्ष्मण कुडमेथे, राजु हेमके, रामेश्वर भांडारवार, अशोक जिल्लडवार, सुभाष ठाकरे, किशोर मुनेश्वर, बाळु पवार, दिलीप संगनवार, मोहम्मद खान, आकाश ठाकरे, महादेव सोनटक्के, सुरेश वरगंटवार, अविनाश खरतडे यांनी केले आहे.
साभार :- देशोन्नती 

वाढदिवसानिमित्य साड्यांचे वाटप



जिल्हा परिषद सदस्य योगेश पारवेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन पंगडी येथिल कार्यकर्त्यांनी गरजुंना साड्यांचे वाटप केले. गावातील मान्यवर व कॉंग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर चिंचुलवार, रवि मुनेश्वर, संजय माळोदे, देविदास किनेकार, निलेश राऊत, गजानन कुंभारे, अनिता चव्हाण, नामु घोडाम, लक्ष्मण मेश्राम, महादेव कोडापे, संजु काकडे, गजानन चिंचुलवार, गजानन काकडे, विनायक मुनेश्वर, दादाराव मुनेश्वर, जयवंत कनाके यांनी परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती 

वैभव राठोड याचे सुयश



येथिल नगर परिषद शाळा क्रं.५ चा विद्यार्थी वैभव देविदास राठोड याची केन्द्रीय नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. सध्या तो न.प.शाळेत ६ व्या वर्गात शिकत आहे. या यशासाठी त्याला मुख्याध्यापक प्र.ल.बोमिडवार, वर्गशिक्षक क.तु.कांबळे, ग.ग.बंडीवार, रूपेश कावलकर, तुषार बोबडे, न.उ.राठोड, स्विटी कपिले यांचे मार्गदर्शन लाभले.
साभार :- देशोन्नती 

राष्ट्रीय टि.२० सामन्यांसाठी ४ खेळाडूंची निवड



कुरूक्षेत्र (हरियाणा) येथे दि.२५, २६ व २७ डिसेंबरला होणा-या राष्ट्रीय टि.२० क्रिकेट सामन्यांसाठी घाटंजी तालुक्यातील २ विद्यार्थ्यांसह जिल्ह्यातील ४ खेळाडूंची निवड झाली आहे. यामध्ये शि.प्र.मं.विद्यालयाचा विद्यार्थी प्रणित घुगरे, समर्थ विद्यालयाचा राहुल राठोड, शिवछत्रपती विद्यालय पाटणबोरीचा अक्षय तोटावार, सावित्रीबाई फुले विद्यालय आर्णीचा रवि राठोड हे विद्यार्थी महाराष्ट्र राज्याच्या चमुत आहेत. नुकतेच ते कुरूक्षेत्र येथे रवाना झाले. या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय धावपटू राजन भुरे यांचे मार्गदर्शन लाभले.
साभार :- देशोन्नती 

बुद्धीष्ट पेंशनर्स सोशियल असोशिएशनची स्थापना


येथिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनात झालेल्या सभेत घाटंजी तालुका बुद्धीष्ट पेंशनर्स असोशिएशनची स्थापना करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी व्ही.पी.पाटील होते. संघटनेच्या अध्यक्षपदी क.वि.नगराळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी वि.टी.वाढवे व चंद्ररेखा रामटेके, सचिव ए.डी.मनोहर, सहसचिव आर.एन.घरडे, कोषाध्यक्ष डॉ.एस.बी.इंगोले, सल्लागार एस.एल.चुनारकर, के.सि.मानकर, सदस्यपदी का.वि.मुनेश्वर, के.एल.नैनपार, डि.एस.कांबळे यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा कार्यकारीणीचे सचिव रविंद्र टेंभुर्णे, उपाध्यक्ष के.पी.कांबळे, सहसचिव आर.बी.नाईक, सदस्य अनंत कांबळे उपस्थित होते.
साभार :- देशोन्नती 

Monday 24 December 2012

बेपत्ता सपना व गुप्तधन प्रकरणी सि.आय.डी.चौकशीचे संकेत


राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही घेतली दखल

तब्बल दोन महिन्यांपासुन रहस्यमयरित्या बेपत्ता असलेली चोरांबा येथिल सात वर्षीय चिमुकली सपना गोपाल पळसकर व मुरली येथे गुप्तधनासाठी झालेला प्रयत्न प्रकरणात पोलीस तपास अपयशी ठरल्याने आता सि.आय.डी.या दोन्ही प्रकरणी तपास करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. लोकसंग्राम पक्षाचे आमदार अनिल गोटे व गोंडवाना गणतंत्र पक्षाचे प्रदेश अध्यक्ष निरंजन मसराम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी तातडीने सि.आय.डी.चौकशीचे आदेश काढण्याचे आश्वासन दिल्याचे प्रसिद्धी पत्रकातून कळविण्यात आले आहे. या शिष्टमंडळात अनिल जवादे, विनोद सिंघानिया, कृष्णा भोंगाडे, श्रिराम तलांडे, महादेव चिकराम, लक्ष्मण भिवनकर, गंगाधर महाराज कोलाम, विठ्ठल धानोरकर, बंडू मसराम यांचा समावेश होता. हिवाळी अधिवेशनादरम्यान २० डिसेंबर रोजी या शिष्टमंडळाने गृहमंत्र्यांची भेट घेऊन या घटनेच्या तपासात पोलीसांनी दिरंगाई करून आरोपांrना पाठिशी घातल्याचा आरोप केला होता. तसेच पोलीस राजकीय दबावातून या प्रकरणी योग्य तपास करीत नसल्याची बाब सुद्धा गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणुन दिली होती. यापुर्वी गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने घाटंजी येथे मोर्चा काढण्यात आला होता. तसेच आमदार संजय राठोड, संदिप बाजोरीया, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, पुरोगामी युवक संघटना, आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, भाजपाच्या महिला प्रदेश अध्यक्ष निता केळकर महिला कॉंग्रेस यवतमाळ यांचेसह अनेकांनी विवीध माध्यमातून या प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग व विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीही या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे सि.आय.डी.चौकशी झाल्यावर या दोन्ही प्रकरणी निर्माण झालेले रहस्य उलगडणार अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.
साभार :- देशोन्नती 

मानोली येथिल मृतक बालकांच्या परिवाराचे जि.प.अध्यक्षांकडून सांत्वन



मानोली येथिल तिन शालेय विद्यार्थ्यांचा १६ डिसेंबर रोजी विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रविण देशमुख यांनी मोहुर्ले व निकोडे परिवाराच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच आपल्या परिने शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांचेसमवेत शिक्षण सभापती मनमोहनसिंग चव्हाण, रा.कॉ.चे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर, उपशिक्षणाधिकारी वा.ल. मोतीकर, बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, उपसभापती प्रकाश डंभारे हे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मिळणारी अपघात विम्याची रक्कम शक्य तितक्या लवकर देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी देशमुख यांनी सांगितले
साभार :- देशोन्नती 

विदर्भ क्षेत्रीय ग्रामिण बँकेतर्फे कर्ज वितरण मेळावा



तालुक्यातील नारायणपेठ येथे विदर्भ क्षेत्रीय ग्रामिण बँक शाखा कुर्ली तर्फे कर्ज वितरण व ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षथानी बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक बन्नोरे होते. प्रमुख पाहुण म्हणुन गटविकास अधिकारी अजय राठोड, पशुवैद्यकीय अधिकारी चव्हाण, रमेश आंबेपवार यांची उपस्थिती होती. 
या मेळाव्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र पारवा यांचे सौजन्याने श्री.खडसे व श्री.चिंतावार यांनी रक्त तपासणी करून रक्तगट परिक्षण व सिकलसेल आजारासंबंधी मार्गदर्शन केले.
बँकेतर्पेâ नारायणपेठ येथे जयदादाजी शेतकरी मंडळ स्थापन करण्यात आले. त्याचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. या मेळाव्यात संयुक्त देयता गट नारायणपेठ व राजापेठ येथे स्थापन करण्यात आले. प्रत्येक गटामध्ये पाच सदस्य असे एकुण बाविस गट स्थापन करण्यात आले. प्रत्येक गटाला २ लाख ५० हजार याप्रमाणे एकुण ५५ लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले. यामध्ये गटातील प्रत्येक सदस्याला ५ हजार रूपये कर्ज मंजुर झाले ज्यामध्ये शौचालय व स्नानगृह बांधणे, सौर उर्जेवर चालणारे दिवे विकत घेणे, व्यक्तीगत व्यवसाय व विमा अशा खर्चाचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन कुर्ली येथिल शाखा प्रबंधक प्रदिप बच्चुवार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.उम्रतकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.पुसनाके, काशिनाथ मेश्राम, दिपक सिडाम, सरपंच श्रिनिवास अंगावार, अरविंद कोंगलवार, वाघु रावते, संग्राम मुनेश्वर, किसन रावते, गजानन दपकलवार, भुमय्या बल्लावार, संतोष कोंगवार, भोजन्ना कोंगलवार, कुष्णा आबेपवार, सुदर्शन सवईवार, मल्लेशय, अजगर भाई, उर्मिला रावते, अंजु रावते, सुशिला मडगुलवार यांनी परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती 

भय्यासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्षानिमित्य विवीध कार्यक्रम



भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा घाटंजीच्यावतीने सुर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्य विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी नुकतीच एक सभा घेण्यात आली. जानेवारी २०१३ मध्ये बौद्ध वधुवर परिचय मेळावा, मे २०१३ मध्ये बुद्ध जयंतीच्या औचित्याने बालश्रामणेर शिबिर व भव्य धम्म परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांना सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन सभेमध्ये करण्यात आले.
या सभेला महासभेचे तालुकाध्यक्ष सुनिल नगराळे, सरचिटणीस नरेंद्र भगत, उपाध्यक्ष संतोष जिवने, विजय शिसले, मनोहर चांदेकर, रमेश गजबे, सतिष रामटेके, बळिराम वाढवे, अशोक जोगळेकर, अजय खोब्रागडे, अविनाश खरतडे, प्रदिप रामटेके, संजय मनवर, संजय कांबळे, विक्की शेंद्रे, कैलास  लोटे, विवेक ढोके, सुरेश भवरे, देवकुमार शेंडे उपस्थित होते.
साभार :- देशोन्नती 

राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन


येथिल शिवबा सामाजिक व बहुउद्देशिय ग्रामिण विकास संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम पारितोषीक ३ हजार रूपये, द्वितीय २ हजार रूपये, तिसरे पारितोषीक १ हजार रूपये व ५०० रूपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यास ईच्छुक असलेल्यांनी आपल्या सुवाच्य अक्षरातील स्वरचित कविता १०० रूपये प्रवेश फि व १ छायाचित्रासह ३० डिसेंबर पर्यंत संजय राऊत, नेहरू नगर, जलाराम प्रभाग, घाटंजी जिल्हा यवतमाळ या पत्त्यावर पाठवाव्या असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क 9404372701 , 9764096047


साभार :- देशोन्नती 

Friday 21 December 2012

सांगितली तेवढी कामे करा किंवा घरचा रस्ता धरा !

स्व.गणपतराव कांडूरवार अपंग विद्यालयातील मनमानीपणा
कर्मचा-यांची तक्रार वरिष्ठांकडूनही बेदखल

नेमणुक शिपाई पदासाठी पण काम मात्र हातात पुस्तक घेऊन विद्यार्थ्यांना शिकविण्याचे. कारण शिक्षकांच्या पदावर संस्थाचालकाचेच कुटूंबीय. अशीच परिस्थिती सफाईगार, स्वयंपाकी व पहारेकरी असलेल्या कर्मचा-यांची. ज्या पदासाठी नेमणुक आहे त्या कामासोबतच नेहमीसाठी अतिरिक्त कामाचा बोजा टाकुन कर्मचा-यांचे शोषण करण्याचा मनमानीपणा येथिल स्व.गणपतराव कांडूरवार निवासी अपंग विद्यालयात सुरू आहे. या प्रकाराचा अतिरेक सहन न झालेल्या कर्मचा-यानी जेव्हा याबाबत संस्थाचालक व मुख्याध्यापकांकडे लेखी स्वरूपात आपले गा-हाणे मांडले तेव्हा त्यांना ‘जेवढी कामे दिल्या जातात तेवढी करावीच लागतील. जर हे मान्य नसेल तर तुमच्यासाठी घरचा रस्ता मोकळा आहे’ असे उत्तर मिळाले. त्यानंतर गिरीधर वाटगुरे, राजेंद्र महाजन, किशोर नगराळे, सुनयना खेकारे, बेबी खंडारे या कर्मचा-यांनी वरिष्ठांकडेही दाद मागितली मात्र अद्याप त्यांना कोणाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. कर्मचा-यांच्या या पवित्र्यामुळे चिडलेल्या संस्थाचालकाने त्यांना विद्यालयात प्रवेशच नाकारला आहे. दि.७ डिसेंबर पासुन हे पाच कर्मचारी दररोज विद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर ठाण मांडून असतात. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.यवतमाळ, समाजकल्याण अधिकारी तसेच समाजकल्याण सभापतींना जि.प.सदस्य मिलिंद धुर्वे यांचे मार्फत भेटून या कर्मचा-यांनी आपली कैफियत मांडली. मात्र यावर अद्याप कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नाही. ऊलट संस्थाचालकाने या कर्मचा-यांना कामावरूनच काढुन टाकण्याचे कारस्थान सुरू केल्याची माहिती आहे. 
कर्मचा-यांना शाळेच्या आवारात प्रवेश द्यायचा नाही व त्यानंतर कामावर गैरहजर असल्याबाबत नोटीस देऊन कर्मचा-यांवरच दबाव टाकण्याचा संस्थाचालकाचा प्रयत्न आहे. आधीच अल्पवेतनावर काम करीत असलेल्या या कर्मचा-यांना दिवसातून चौदा तास राबविल्या जात असल्याची त्यांची तक्रार आहे. वरिष्ठांनीही अद्याप या गंभिर प्रकाराची दखल न घेतल्याने आता दाद मागावी तरी कुणाकडे असा प्रश्न या कर्मचा-यांपुढे निर्माण झाला आहे. 
साभार :- देशोन्नती 

घाटंजी पं.स.कर्मचारी रविंद्र उगले यांचे अपघाती निधन


अज्ञात मेटॅडोअरने दुचाकीला दिलेल्या धडकेत रविंद्र दिलीप उगले (२६) रा.मुरली याचा मृत्यू झाला. काल (दि.१९) ला रात्री ८.३० वाजेदरम्यान ही घटना घडली. तो घाटंजी पंचायत समिती मध्ये सर्व शिक्षा अभियान अंतर्गत फिरते विशेष शिक्षक पदावर कार्यरत होता. यवतमाळ येथुन परत येत असताना कोळंबी जवळ हा अपघात झाला. 
अपघातात गंभिर जखमी झाल्याने त्याला यवतमाळ येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. आज मुरली येथे शोकाकुल वातावरणात त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, पं.स.सभापती शैलेष इंगोले यांचेसह पंचायत समितीचे कर्मचारी, जिल्ह्यातील फिरते विशेष शिक्षक उपस्थित होते. वडील हयात नसल्याने रविंद्र हाच घरातील कर्ता होता. मनमिळावू स्वभावामुळे सर्वत्र ओळखल्या जाणा-या एका तरूण कर्मचा-याच्या अकाली मृत्यूबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती

Wednesday 19 December 2012

घाटंजी तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारीणीचे गठण

अध्यक्षपदी अमोल राऊत, उपाध्यक्ष अनंत नखाते, सचिव महेंद्र देवतळे

स्थानिक विश्राम भवनात आज दुपारी झालेल्या बैठकीत घाटंजी तालुका पत्रकार संघटनेच्या कार्यकारीणीचे गठण करण्यात आले. साप्ताहीक जनदक्षचे संपादक राजु चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते तालुका पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल राऊत (दै.देशोन्नती) यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी अनंत नखाते (दै.लोकशाही वार्ता), सचिवपदी महेंद्र देवतळे (दै.लोकमत), सहसचिव राजु चव्हाण (साप्ता.जनदक्ष), कोषाध्यक्षपदी सैय्यद आसिफ (दै.हिंदुस्थान) यांची निवड झाली. 
संघटनेच्या सल्लागार समितीमध्ये जेष्ठ पत्रकार विठ्ठलराव कांबळे (दै.लोकमत),  वामनराव ढवळे (दै.मातृभूमी) दिनकर मानकर (साप्ता.विकासाची पाऊले), बाळ ठाकरे (साप्ता.अंकुर) यांचा समावेश आहे. कार्यकारीणी सदस्यांमध्ये पांडूरंग निवल (दै.सकाळ), गणेश भोयर (दै.भास्कर), अमोल मोतेलवार (दै.परिवर्तन), सतिश रामगडे (दै.तरूण भारत), भरत ठाकरे (लोकदुत), जितेंद्र सहारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
साभार :- देशोन्नती 

दारू विक्रीच्या संशयातून पोलीसांचा साक्षगंधाच्या कार्यक्रमात गोंधळ


जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

घरात अवैध दारू विक्री केल्या जात असल्याचा संशय घेऊन घाटंजी पोलीसांनी भांबोरा येथे साक्षगंधाचा कार्यक्रम सुरू असतांना घरझडती घेतली. तसेच कुटूंबीयांना धाकदपट व मारहाण केल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, १४ डिसेंबर रोजी भांबोरा येथिल प्रेमसिंग चव्हाण यांचे घरी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मुलीच्या साक्षगंधाचा कार्यक्रम होता. यादरम्यान अचानक घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर, बिट जमादार गुल्हाणे, पोलीस कॉन्स्टेबल बोकडे तिथे आले. ‘तुम्ही दारूचा व्यवसाय करता, त्यामुळे तुमच्या घराची झडती घ्यायची आहे’ असे सांगुन पोलीस घरात घुसले. झडती दरम्यान घरातील सामानाची फेकाफेक  केली. यावेळी साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी चव्हाण यांचे घरी पाहुणे सुद्धा आलेले होते. पोलीसांनी संपुर्ण घराची झडती घेतली. प्रेमसिंग चव्हाण यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तडकाफडकी उपचारासाठी नेण्यात आले. या प्रकाराने घाबरलेले पोलीस तेथुन निघुन गेले. असे यशोदा प्रेमसिंग चव्हाण यांनी तक्रारीत नमुद केले आहे. उल्लेखनिय म्हणजे घरझडती मध्ये पोलीसांना काहीही गैर आढळले नसल्याची माहिती आहे. शिवाय ज्यांच्या घराची झडती घेण्यात आली त्यांच्यावर यापुर्वी अशा प्रकारच्या व्यवसायात लिप्त असल्याबाबत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही. मग पोलीसांनी अचानक अशी झडती घेण्याचे कारण काय? संपुर्ण तालुक्यात अवैध व्यवसायाचे नेटवर्क  व्यवस्थित सुरू आहे. अशा व्यवसायांची झडती पोलीसांनी अद्याप का घेतली नाही. पोलीस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरावर चालणारे मटका अड्डे पोलीसांना का दिसत नाहीत असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहे. अवैध व्यावसायीकांना पोलीसांचा धाक वाटत नसला तरी सर्वसामान्य नागरिकांना मात्र आता पोलीसांचीच भिती वाटायला लागली आहे. यावर प्रतिक्रीया घेण्यासाठी ठाणेदार अंबाडकर यांचेशी संपर्वâ होऊ शकला नाही. 
साभार :- देशोन्नती  

Monday 17 December 2012

त्या बालकांचे मृतदेह पाहुन चिताही गहिवरली.....

मानोली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार





काळीज चिरत जाणारा आक्रोश... हंबरडे अन आठवणींच्या हुंदक्यांनी व्यापलेले शोकमग्न वातावरण...  अशातच जेव्हा तिरडीवरील ते निरागस बालकांचे मृतदेह भडाग्नी देण्यासाठी चितेवर ठेवण्यात आले तेव्हा कदाचित त्या चितेलाही गहिवरून आले असेल. माणसाच्या देहाची काही क्षणातच राखरांगोळी करणारी ती निष्ठुर चिता देखिल ते निपचीत पडलेले देह पाहुन क्षणभर थांबली असणार. दोन भावांचे पार्थिव असलेली एक तिरडी व दुस-या तिरडीवर आणखी एका बालकाचे पार्थिव ठेवुन अंत्ययात्रा निघाली तेव्हा सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या. त्या मुलांच्या मातापित्यांचा आकांत तर पाहावल्या जात नव्हता. पोटचा गोळा गमावल्याने हतबल झालेल्या त्या दोन्ही मातांची अनेकदा शुद्ध हरपली. काल सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास विहिरीत बुडून मृत्यूमुखी पडलेल्या दोन सख्ख्या भावांसह तिघांवर आज मानोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आबालवृद्धांसह मानोली गावातील जवळजवळ प्रत्येक माणूसच यावेळी स्मशानभुमि मध्ये उपस्थित होता. 
आरती व रामदास मोहुर्ले या दाम्पत्याची तुषार व समय ही दोन मुले, तर कुसूम व ज्ञानेश्वर निकोडे यांचा मुलगा शुभम. बालपणाच्या स्वच्छंदीपणातच त्यांना आपला जीव गमवावा लागला. मानोली गावात काल रात्रीपासुनच भयाण शांतता होती. ऐकु येत होता तो फक्त रडण्याचा आवाज. मरण म्हणजे काय असते हे कळेल असेही ज्यांचे वय नाही ती गावातील बालके नेमके काय झाले हे न कळाल्याने चिंतातूर चेह-याने ईकडे तिकडे पाहतांना दिसत होती. तर मृतक विद्यार्थ्यांचे अनेक मित्र अक्षरश: ओक्साबोक्सी रडत होते. हे दृष्य पाहुन अनेकांच्या डोळ्यात आपसुकच अश्रु तराळले. 
या अंत्ययात्रेला तालुक्यातून अनेक लोक उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने अ.भा.माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे, प.स.सभापती शैलेष इंगोले, जि.प.सदस्य पवार, न.प.सदस्य किशोर दावडा, गटविकास अधिकारी अजय राठोड यांचेसह प्रशासकीय कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते. आज दिवसभर गावातील शाळा व दुकाने बंद होती. 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Sunday 16 December 2012

दोन भावंडांसह तिन बालकांचा विहिरीत पडून करूण अंत

मानोली येथिल हुदयद्रावक घटना  
घाटंजी तालुक्यात शोककळा


शेतात खेळायला गेलेल्या चार शालेय विद्यार्थ्यांपैकी तिघांचा विहिरीत पडून करूण अंत झाला. घाटंजी पासुन सुमारे ४ किलोमिटर अंतरावर असलेल्या मानोली येथे सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ही मन हेलावून टाकणारी घटना घडली.
तुषार रामदास मोहुर्ले (६) वर्ग १ ला, समय रामदास मोहुर्ले (९), शुभम ज्ञानेश्वर निकोडे (९) वर्ग ३ रा.यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबत असलेल्या तुषार लक्ष्मण पेटकुले (९) याने गावात येऊन घटनेची माहिती सांगितली. यामधील तुषार व समय मोहुर्ले हे दोघे सख्खे भाऊ होते. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दुपारच्या सुमारास हे चार सवंगडी जंगलात फिरायला गेले होते. बोरे तोडून आणल्यावर गावापासुन १ किलोमिटर अंतरावर असलेल्या कुंडलिक पेटकुले यांच्या शेतातील विहिरीजवळ ते खेळायला लागले. पक्के बांधकाम करून नसल्याने विहिरीच्या एका बाजुने आतमध्ये उतरण्यासाठी असलेल्या जागेतून ते विहिरीमध्ये उतरले. विहिरीमध्ये विसर्जीत करण्यात आलेल्या दुर्गा देविचा पाट वर तरंगत होता. गंमत म्हणुन ते एक एक करून त्यावर बसले. जास्त भार झाल्याने लाकडी पाट उलटला. बाहेर निघता न आल्याने विहिरीमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या तुषार पेटकुले याने गावात येऊन सर्वाना याबाबत माहिती दिली. लगेच गावक-यांनी शेताकडे धाव घेतली. मात्र तोवर खुप उशिर झाला होता. घटनास्थळावर ग्रामस्थांची प्रचंड गर्दी झाली होती. गावातील तिन बालकांवर काळाने क्रूर झडप घातल्याने मुरली गावासह संपुर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पंचायत समिती सभापती शैलेश इंगोले, सदस्य रूपेश कल्यमवार यांनी तातडीने गावात येऊन कुटूंबीयांची विचारपुस केली. तिनही बालकांना घाटंजी ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.

निस्तब्ध गाव अन पाणावलेले डोळे...
गावात खेळणारी बागडणारी तिन बालके दगावल्याची बातमी गावात कळताच सर्वत्र भयाण शांतता पसरली. चेहरे अबोल झाले अन अनेकांचे डोळे पाणावले. गावात कुणीही काही बोलण्याच्या स्थितीत नव्हते. अनेकांनी शेताकडे धाव घेतली तर आबालवृद्ध रस्त्याकडे डोळे लावुन बसले होते. बालकांचे मृतदेह असलेले वाहन गावात येताच सर्वांच्याच भावनांचा बांध पुâटला अन अनेकांचे डोळे आपसुकच पाणावले. या बालकांच्या मातापित्यांच्या आक्रोशाने तर सर्व वातावरणच गहिवरून गेले. काय करावे व काय बोलावे हे कुणालाच कळत नव्हते. मोहुर्ले कुटूंबावर तर आभाळच कोसळले. तुषार व समय या दोन्ही मुलांवर काळाने झडप घातल्याने त्यांचे सर्वस्वच गेले. तिन वर्षांपुर्वी घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा येथेही अशीच हुदयद्रावक घटना घडली होती. विहिरीत पडून तिन शालेय विद्यार्थ्यांचा करूण अंत झाला होता.
साभार :- देशोन्नती 

Wednesday 12 December 2012

........यापुढे सपनाच्या शोधासाठी एस.पी. व जिल्हाधिका-यांना घेराव

न्याय द्या मोर्चामध्ये निरंजन मसराम यांचा ईशारा


गेल्या दोन महिन्यांपासुन रहस्यमयरित्या बेपत्ता असलेल्या सपनाचा शोध पोलीसांना घेता आला नाही. तर गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न करणा-या व पळुन गेलेल्या आरोपीनाही पोलीस शोधु शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा धुसर झाल्याने पुढची दिशा म्हणुन आठवडाभरानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांना आदिवासी बांधवांना नाईलाजास्तव घेराव घालावा लागणार असा ईशारा गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेश अध्यक्ष निरंजन मसराम यांनी आज घाटंजी येथे दिला.
ते गों.ग.पा.तर्फे घाटंजी तहसिलवर काढण्यात आलेल्या न्याय द्या धडक मोर्चाला संबोधीत करत होते. त्यांनी पुढे सांगितले की, सपनाचे आईवडील मजुरी करतात. ते परिस्थितीने गरिब आहेत. सपना ही चिमुकली बालिका आहे. त्यामुळे तिचे अपहरण खंडणी अथवा अनैतिक कारणासाठी झाले असे म्हणता येणार नाही. ती गावातून साणासुदीच्या दिवशी रहस्यमयरित्या बेपत्ता झाली. त्यावेळी संशयास्पदपणे गावातील विज गेली होती. तसेच तिला पळवुन नेत असतांना कदाचीत ती ओरडू नये म्हणुन तिला खाण्यातून अथवा प्रसादातून गुंगीचे औषध दिले असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. या दरम्यान दि.१७ ऑक्टोबर रोजी मुरली येथे रात्रीच्या सुमारास गावाबाहेर असलेल्या एकहात्या मारोती मंदिराजवळ एका बालिकेचा किंकाळीचा आवाज विजय चव्हाण या नागरिकाने ऐकल्यावर गावकरी तेथे धावुन गेले. त्यामुळे गुप्तधन शोधणा-या टोळीतील दोन आरोपी सापडले. आता चार आरोपी अटकेत आहेत. पोलीसांनी सपना पळसकर हिच्या अपहरणाचा व गुप्तधनाच्या प्रकरणाचा परस्पर संबंधाची शक्यताही तपासली नाही. या घटनेतील अनेक अज्ञात आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचाही शोध घेण्याची मानसिकता पोलीसांमध्ये दिसत नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला. आदिवासी बांधवांवर कितीही अन्याय झाला विंâवा त्याला कापुन टाकण्याचाही प्रयत्न झाला तरी तो पेटून ऊठणार नाही ही भावना तुमच्याप्रती एकप्रकारची रूढ झालेली आहे. म्हणुन आदिवासींवरील अन्यायाला शासनही गांभिर्याने घेत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या विचारात क्रांतीची ठिणगी टाकुन न्यायासाठी पेटून ऊठले पाहिजे तरच तुम्हाला न्याय मिळेल असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. मतदार संघातील आपलेच आदिवासी नेते व सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे दोन महिन्यात एकदाही सपनाच्या आईवडीलांचे सांत्वन करण्यासाठी गेले नाहीत. यावरून त्यांना आदिवासी बांधवांविषयी किती कळवळा आहे हे दिसुन येते. एवढ्या गंभिर घटनेबद्दल त्याना गांभिर्य नसल्याबद्दल मसराम यांनी आश्चर्य व्यक्त केले. सपनाचा त्वरीत शोध न घेतल्यास विधानसभेवर मशाल मोर्चा काढण्याचा ईशाराही त्यानी यावेळी दिला. या मोर्चाला गों.ग.पा.चे जिल्हाध्यक्ष श्रिराम तलांडे, माजी तहसिलदार रामचंद्र मडावी, विठ्ठल धानोरकर, नाना टेकाम, जितेंद्र धुर्वे, सुदर्शन टेकाम, निमपाल राजगडकर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर निरंजन मसराम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने तहसिलदार प्रकाश राऊत यांना निवेदन दिले.
साभार :- देशोन्नती 

कुर्ली पाणी पुरवठा समितीविरूद्ध एफ.आय.आर.दाखल करा

मुख्य कार्यकारी अधिका-यांचे आदेश
भारत निर्माण योजना अपहार प्रकरण

तालुक्यातील कुर्लीच्या पाणी पुरवठा व स्वच्छता समितीविरूद्ध तातडीने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिका-यांनी घाटंजी गटविकास अधिका-यांना दिले आहेत. भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा योजनेमध्ये समितीच्या पदाधिका-यांनी १ लाख ५५ हजार ९१८ रूपयांचा अपहार केल्याची बाब उपअभियंता, पांढरकवडा यांनी केलेल्या तपासणीत पुढे आली आहे. या योजनेत अपहार झाल्याची तक्रार कुर्लीचे सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी संबंधीतांकडे केली होती. माजी सरपंच व पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष विलास बडगुलवार तसेच समितीच्या सदस्यांनी हा अपहार केल्याचा त्यांचा आरोप आहे. राजकीय दबावामुळे या प्रकरणाच्या चौकशीत व कार्यवाहीमध्ये प्रशासनाकडून जाणीवपुर्वक टाळाटाळ करण्यात येत असल्याचा सोलंकी यांचा आरोप आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम यांनी ३१ ऑक्टोबरला गटविकास अधिकारी घाटंजी यांना या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्यापही त्यावर कार्यवाही न झाल्याने प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचा आरोप सोलंकी यांनी केला आहे.
साभार :- देशोन्नती 

गुप्तधन व नरबळी प्रकरणी हयगय करणा-यांची ‘वाट’ लावू - निता केळकर

पोलीस तपासाबाबत व्यक्त केले आश्चर्य

गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न व सपना पळसकर या चिमुकलीच्या अपहरण प्रकरणी तपासात हयगय करणा-या पोलीस अधिका-यांची वाट लावू अशा संतप्त शब्दात भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निता केळकर यांनी तपासाबाबत आपली नाराजी व्यक्त केली.
राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांना प्रत्यक्ष भेटून या प्रकरणात कार्यवाहीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चोरांबा येथे पळसकर कुटूंबीयांना दिलेल्या भेटीच्या वेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. हे प्रकरण अतिशय गंभिर असुन पोलीसांनी अद्याप या प्रकरणी केलेला तपास प्रथमदर्शनी संशयास्पद दिसत असल्याचे त्या म्हणाल्या. जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या नकारात्मक भुमिकेबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. हा सर्व प्रकार गृहमंत्र्यांच्या कानावर घालणार असुन भाजपाच्यावतीने अधिवेशनात हा मुद्दा उचलण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. या घटनेच्या तपासात जाणीवपुर्वक विलंब करणा-या पोलीस अधिका-यांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांचेवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पळसकर यांचे घरी जाऊन त्यांची विचारपुस केली व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांचेसोबत भाजपा महिला मोर्चाच्या राज्य सरचिटणीस उमा खापरे, माधवी नाईक, देवयानी फरोडे, वनीता कानडे, शैला सामंत, मंजु वैष्णव, शिल्पा गणपते, शैला साळवी, रेखा कोठेकर यांची उपस्थिती होती.
साभार :- देशोन्नती 

बेपत्ता सपनाच्या पालकांचे अखेर देवालाच साकडे !


दिड महिन्यात पोलीस तपास शुन्य

बेपत्ता सपनाचा शोध घेऊन थकलेल्या पळसकर कुटूंबीयांनी पोलीस तपासातील अपयश बघता अखेर देवालाच तिला  वाचविण्यासाठी साकडे घातले आहे. त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या अजनसरा येथिल भोजाजी महाराज देवस्थानाला जाऊन पळसकर कुटूंबीयांनी सपनासाठी नवस केला. सपनाच्या काळजीपोटी चिंतातूर तिचे आईवडील अजुनही आपल्या परिने शोध घेत आहेत.
अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेले मुरली येथिल गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न व सपना पळसकर बेपत्ता प्रकरण पोलीसांच्या दिरंगाईमुळे तपासशुन्य ठरले आहे. दस-याच्या दिवसापासुन चोरांबा येथिल सपना पळसकर ही चिमुकली बेपत्ता आहे. तर गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न १७ नोव्हेंबरला झाला. ग्रामस्थांनी पकडून दिलेले २ आरोपी व ईतर दोघे असे अटकेत असलेल्या चार आरोपींच्या पलिकडे प्रकरण सरकलेच नाही. गेल्या विस दिवसांपासुन केवळ बयाण घेणे, गावोगावी तपास पथक पाठविणे अन फिर्यादी, वकील, पत्रकार यांची चौकशी यापलीकडे पोलीस तपास झाल्याचे दिसत नाही.
संशय हे पोलीसांचे प्रमुख शस्त्र. मात्र या प्रकरणात पोलीसांनी हे शस्त्रच म्यान केले की काय अशी परिस्थिती आहे. कारण पोलीस अधिक्षक, एस.डी.पी.ओ. व ठाणेदार यांनी सुरूवाती पासुनच या प्रकरणातील आरोपींवर साधा संशय घेतला नाही. त्यांच्या जवळ मुलगी नव्हतीच हिच गोष्ट पोलीस विश्वासाने सांगत आहेत. कदाचीत तसे असेलही. मग सपना कुठे आहे? प्रकरणातील आरोपींविषयी घटनेच्या दिवसापासुन पोलीसांना असलेली सहानुभूती चर्चेचा विषय ठरली आहे. थातूर मातूर चौकशी करून सोडून देणे, जाणिवपुर्वक एकाच दिवसाचा पी.सी.आर, न्यायालयीन कोठडीत पाठवितांना आरोपींना ‘व्हर्टीगो’ ही आलिशान कार वापरण्याची देण्यात आलेली मुभा पोलीसांविषयी संशय निर्माण करण्यास पुरेसे आहे. 
केवळ प्रसार माध्यमे व विवीध संघटना यांचा दबाव आहे म्हणुनच पोलीस तेवढ्यापुरता तपास करीत असल्याचे दिसत आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, विवीध आदिवासी संघटना, रा.कॉं.चे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर, महिला कॉंग्रेस, यवतमाळ यांनी या प्रकरणात प्राधान्याने लक्ष दिले आहे. जनमानसात सध्या केवळ याच प्रकरणाची चर्चा आहे. मात्र तरिही तपास सुरू आहे यापलिकडे कोणतेही उत्तर पोलीस देऊ शकले नाहीत.
बेपत्ता सपना व गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न या दोन्ही प्रकरणात तपासामध्ये दिरंगाई करणा-या पोलीस अधिका-यांवर कोणतीही कार्यवाही झाली नाही. ते पोलीस स्टेशनला असतांना तपास योग्य रितीने होईल का? सध्याचे तपास अधिकारी भालचंद्र महाजन यांनाही अद्याप प्रकरणातील एकही धागा सापडला नाही. त्यामुळे केवळ दबाव आहे म्हणुन तपास करीत असल्याचे  दाखवायचे असा प्रकार तर सुरू नाही ना? याच पद्धतीने तपास सुरू राहिला तर सपनाचा शोध लागणार का? व पैशाच्या लालसेने झपाटलेले गुप्तधन प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीसांच्या तावडीत सापडणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
साभार :- देशोन्नती 

Thursday 6 December 2012

मुरली येथिल गुप्तधन प्रकरणाची ईलेक्ट्रॉनिक माध्यमांनी घेतली दखल


मुरली येथिल गुप्तधनासाठी नरबळीचा झालेला प्रयत्न वृत्तपत्रांनी प्रखरतेने मांडल्यावर ईलेक्ट्रॉनिक मिडीयानेही त्याची प्राधान्याने दखल घेतली. 
झी २४ तास, ए.बी.पी.माझा, आय.बी.एन.लोकमत, टि.व्ही.९ मराठी यासह विवीध चॅनल्सवर या घटनेच्या बातम्या झळकल्या. त्यापैकी ए.बी.पी.माझा वरील बातमी व टि.व्ही.९ मराठीवरील चर्चासत्राचे व्हीडीओ घाटंजी न्युजच्या वाचकांसाठी.........


ए.बी.पी.माझा

टि.व्ही.९ मराठी चर्चासत्र
सहभाग ( डॉ.नरेंद्र दाभोळकर, कार्यकारी अध्यक्ष, समिती, अंधश्रद्धा निर्मुलन समिती),
शितल करदेकर ( पत्रकार व सामाजीक कार्यकर्त्या ) , मैथिली जावकर (अभिनेत्री)  





Wednesday 5 December 2012

सपना अपहरण व गुप्तधन प्रकरणी गुप्तचर विभागाकडून चौकशीची मागणी

१२ डिसेंबरला गोंडवाना गणतंत्र पार्टीचा घाटंजीत धडक मोर्चा 

गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न व दिड महिन्यांपासुन बेपत्ता असलेली सपना पळसकर हिचा शोध घ्यावा. तसेच संपुर्ण प्रकरणाची गुप्तचर विभागामार्फत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी गोंडवाना गणतंत्र पार्टी व लोकसंग्राम पक्षाच्या वतीने दि.१२ डिसेंबरला दुपारी १२ वाजता तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष निरंजन मसराम यांचे नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सपनाचे अपहरण होऊन तब्बल दिड महिना उलटला तरी देखिल पोलीस विभागाला तिचा शोध घेण्यास यश आलेले नाही. एक गरिब आदिवासी कुटूंबातील मुलगी असल्याने पोलीस या तपासात गंभिर दिसत नाहीत. शिवाय गुप्तधन प्रकरणात देखिल पोलीस तपास संशयास्पद आहे. त्यामुळे या प्रकरणाची गुप्तचर विभागामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी या आंदोलनातून केल्या जाणार आहे. अशा प्रवृत्तीना वेळीच पायबंद न घातल्या गेल्यास भविष्यात हा प्रकार आणखी वाढु शकतो. यावेळी एका गरिब आदिवासी मुलीचे अपहरण झाले आहे. 
भविष्यात आपल्याही मुलाबाळांचे अपहरण अशा विकृत कामांसाठी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आदिवासी बांधवांसह सर्वांनीच या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. या मोर्चाला गों.ग.पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीराम तलांडे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव धानोरकर, महासचिव बंडू मसराम, जिल्हा उपाध्यक्ष निमपाल राजगडकर, अनिल गेडाम, तालुकाध्यक्ष महादेव चिकराम, तालुका सचिव महादेव वेट्टी, जितेंद्र धुर्वे, मोहन कोटरंगे, देवजी गेडाम, सहाय्यक सचिव दत्ता मडावी, लोकसंग्राम पक्षाचे सरचिटणीस विनोद सिंघानिया, नानाजी कोवे, लेतूजी जुनघरे, उरकुंडा जांभुळकर, माजी तहसिलदार रामचंद्र मडावी हे मार्गदर्शन करणार आहेत. या मोर्चामध्ये सर्व समाजबांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन घाटंजी तालुका कार्यकारी अध्यक्ष महादेव मैंद, नाना धुर्वे, कवडू मरापे, बाबुराव कोवे, शंकर कोरवते, कर्णूजी नैताम महाराज, कृष्णा आडे, गुलाब घोडाम, अमृत पेंदोर, अनिल गेडाम, संभा कोवे, नागोराव शेडमाके, लक्ष्मण अनाके, मारोती पेंदोर, शंकर वेलादी, नामदेव मरापे, अजय ताडपेल्लीवार, कवडू पेंदोर, खुशाल देडाम, विजय मेश्राम, बंडू सिडाम, देवजी गेडाम, विजय मसराम, नारायण कुळसंगे, प्रमोद ईळपाते, श्रावण किनाके, दत्ता मडावी, नानाजी किनाके, शंकर गेडाम, ज्ञानबा मसराम, शत्रुघ्न पेंदोर, सिताराम पराचे, काशिनाथ कनाके, संतु पेंदोर, अभिमान कातले, लक्ष्मण अनाके, भगवान उईके, राजु मडावी, अजाब सलाम, कवडू सुरपाम, शालिक मडावी, भानुदास सुरपाम, भाऊराव मेश्राम, शंकर अनाके, पुरूषोत्तम मडावी, अर्जुन कोरवते, गोकुल मेश्राम, मुनीरोद्दीन, ज्ञानेश्वर सिडाम, शेषराम आत्राम, हरिभाऊ सलाम, पुरूषोत्तम मडावी, दामोधर ऊईके, रामदास ऊईके, गुलाब कोडापे, शंकर कोरवे, अनिल गेडाम, जितेंद्र धुर्वे, रायबा आत्राम, रमजान जाटू, विलास चांदुरकर, सुबान जाटू, तुकाराम नेहारे, गोविंद तिरमानवार, दिलीप पेगर्लावार, ज्ञानेश्वर चितकुंटलवार, दत्तू पालेपवार, शरद खोडपे, मज्जीद बैलीम, दत्ता मडावी, कवडू मरापे, शंकर सोयाम, सलिम मनियार, शंकर गेडाम यांनी केले आहे.
साभार :- देशोन्नती 

तंटेबखेटे निस्तरायला महापंचायत मग बेपत्ता सपनासाठी काय?

सपनाच्या निर्धन मायबापाचा सवाल

गुप्तधनासाठी नरबळी...माणुसकीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार. मात्र पैशाच्या लालसेने तोंडाला पाणी सुटणा-या व चुकीने मनुष्य योनित जन्मलेल्या त्या लांडग्यांना त्याचे काय? अंधश्रद्धेचे भुत मानगुटीवर घेऊन ते एक चिमुकला जीव संपवायला निघाले होते. माणुसपण जीवंत असलेल्या ग्रामस्थांनी तो प्रकार हाणुन पाडला.
हे प्रकरण जेवढे घृणास्पद आहे त्यापेक्षा जास्त त्यानंतर झालेल्या घडामोडींनी संपुर्ण समाजाला कोड्यात टाकले आहे. एक आदिवासी समाजातील मुलगी दिड महिन्यापासुन बेपत्ता होते. त्यातच गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न उजेडात येतो. मात्र पोलीस एवढ्या गंभिर प्रकरणातही नेहमीची ‘रफादफा’ भुमिका घेतात. आधी तर आरोपी गुप्तधनासाठी गेलेच नव्हते असा पवित्रा पोलीस घेतात. पण प्रकरण अंगलट आल्यावर गुप्तधनाचा प्रयत्न कबुल होतो. मात्र बेपत्ता सपनाच्या बाबत सर्वच कानावर हात ठेवतात. खुनासाठी अपहरणाचा प्रयत्न असा गंभिर गुन्हा, बेपत्ता मुलीचा नसलेला सुगावा व गुप्तधन प्रकरणातील पुढे न आलेले आरोपी अशी परिस्थिती असतानांही पोलीसांना केवळ एकाच दिवसाची कोठडी मिळवता येते. आरोपींच्या वकीलाने केलेल्या युक्तीवादावर पोलीस गप्प बसतात. आरोपींना न्यायालयीन कोठडीत नेतांना खासगी वाहनातून नेण्यात येते. गुप्तधन प्रकरण हाणुन पाडणारे ग्रामस्थ, फिर्यादी, मुलीच्या आईला तक्रार लिहुन देणारे वकील, पोलीस तपासात मदत व्हावी या दृष्टीने वृत्तांकन करणारे पत्रकार या सर्वांची पोलीस सखोल चौकशी करतात. मात्र आरोपींचीही अशा प्रकरणी प्रसंगी पोलीसी खाक्या दाखवुन ऊलटतपासणी करायची असते ही गोष्ट सोयीस्कररित्या दुर्लक्षीत केल्या जाते. गुप्तधन शोधणा-या टोळ्यांमध्ये केवळ चार पाच सदस्य नसतात ही गोष्ट पोलीसांना सांगण्याची गरज नसावी. दस-याच्या दिवशी चोरांबा येथिल विज बंद होते, कोणीतरी डि.पी.वरील फ्युज काढुन ठेवतो. अन त्याच दिवशी सपना बेपत्ता होते. 
हा केवळ एक योगायोग की कटाचा भाग याचा तपास करणेही पोलीसांना गरजेचे वाटू नये का? फिर्यादीचे वारंवार बयाण घेऊन त्यातील विसंगती शोधण्यापलिकडे तपास गेलेला नाही. अशीच भुमिका राहिली तर यापुढे कोणी अशा घटनांमध्ये पोलीसांची मदत करायला पुढे येणार का?
पोलीस अधिक्षकांपासुन ते ठाण्यातील शिपायापर्यंत सर्वच याप्रकरणी नकारात्मक विचार करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलीसांना नेमके सिद्ध काय करायचे आहे? गुप्तधनाची घटनाच झाली नाही का? पण आरोपींनी तर त्यासाठीच गेलो होतो अशी कबुली दिली आहे. सपना नावाची चिमुकली बेपत्ता नाही का? जर या आरोपांrनी तिला नेले नाही तर मग ती कुठे आहे? या दोन्ही प्रकरणातील किमान एकतरी बाजु पोलीसांनी स्पष्ट करून त्यांचे अस्तित्व आहे हे दाखवायला नको का? असे प्रश्न आता जनसामान्यांमध्ये चर्चिल्या जात आहे. सामाजीक न्यायमंत्री ना.शिवाजीराव मोघेंना पत्रपरिषदेत या विषयावर छेडल्यावर त्यांनी थेट पोलीस अधिक्षकांना या प्रकरणाचा गंभिरतेने तपास करण्याचे आदेश दिले. मात्र त्याचाही फारसा उपयोग झाल्याचे दिसत नाही. तालुका कॉंग्रेस मधील काही कार्यकर्ते या प्रकरणात गुंतले असल्याचीही चर्चा आहे. पण ते अद्याप चौकशीच्याही फे-यात आले नाहीत. ऊलट फिर्यादी व सपनाच्या परिवाराला तक्रार मागे घेण्यासाठी दडपणात आणल्या जात आहे. पोलीसांशी संबंधीत एक व्यक्ती पळसकर परिवाराला तुम्हाला मुलगी पाहिजे की पैसा असा प्रश्न विचारतो याचा अर्थ काय? घटनेच्या संशयास्पद तपासाची सुरूवात करणारे पोलीस अधिकारी अरूण गुरनूले तणावात का आहेत? हे सर्व प्रश्न तपासाबाबत संशय निर्माण करणारे आहेत.
सर्वसामान्यांना न्यायासाठी भटकावे लागू नये यासाठी उद्या घाटंजी येथे महापंचायत आयोजीत केली आहे. तर संपुर्ण राज्याला सामाजीक न्याय देण्याची जबाबदारी असलेले ना.शिवाजीराव मोघे व जिल्ह्याचे पालकत्व स्विकारलेले ना.नितिन राऊत याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. यावेळी तरी दिड महिन्यांपासुन न्यायासाठी वणवण भटकणा-या त्या मातेला दिलासा मिळणार का? गरिब असल्याने दुर्लक्षीत असल्याची तिची खंत दुर होणार का? याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
साभार :- देशोन्नती 

महापंचायतीतील तक्रारींचा निपटारा करण्याचे आव्हान - ना.मोघे



लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व जनतेमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी महापंचायतीचा हा उपक्रम अतिशय चांगला आहे. यामध्ये सातत्य ठेवुन आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्याचे आव्हान पेलणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनी केले. घाटंजी पंचायत समितीमध्ये आयोजीत महापंचायतीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार वामनराव कासावार होते. विभागीय आयुक्त डि.आर.बनसोड, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, उपविभागीय अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष ईकलाख खान, पांढरकवड्याचे नगराध्यक्ष शंकर बडे, घाटंजीचे नगराध्यक्ष जगदिश पंजाबी, पंचायत समिती सभापती शैलेश इंगोले यांचेसह मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना मोघे म्हणाले की, पंचायतीची परंपरा ब-याच काळापासुन अस्तित्वात आहे. विवीध समस्यांसाठी नागरिकांना भटकावे लागु नये यासाठी हा उपक्रम चांगला आहे असे ते म्हणाले. अधिकाधीक लोकांपर्यंत हा विषय जावा यासाठी जनजाग्रृतीची गरज त्यांनी प्रतिपादीत केली. शेतक-यांनी जोडधंदे केल्यास शेतीसाठी ते पुरक ठरेल. शेळीपालन, दुग्धव्यवसाय यासह अनेक व्यवसायांची कास शेतक-यांना धरता येईल. आपल्या भागातील नागरिक सक्षम व्हावे याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्थानिक पदाधिका-यांची असल्याचे ते म्हणाले. येत्या सहा महिन्यात मतदार संघातील डोळ्यांच्या विकाराने पीडीत असलेल्या रूग्णांवर उपचार व चष्मे वितरीत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांची समायोचीत भाषणे झालीत. कार्यक्रमाच्या सुरूवातीला पथनाट्य सादर करण्यात आले. या महापंचायतीत काही नागरीकांच्या तक्रारींचे प्रातिनिधीक स्वरूपात वाचन करण्यात आले. आपली तक्रार सोडविली जाणार या अपेक्षेने अनेक नागरिकांनी तक्रार अर्ज भरून दिले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तहसिलदार प्रकाश राऊत, गटविकास अधिकारी अजय राठोड यांच्या मार्गदर्शनात कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती 

तोडफोडीचा खटला मागे घेण्यासाठी मनसेचे ‘ब्लॅकमेलिंग’

कृऊबास सभापती अभिषेक ठाकरे यांचा आरोप

दोन वर्षांपुर्वी मनसे कार्यकर्त्यांनी बाजार समिती मार्केट यार्ड व कार्यालयात केलेल्या तोडफोडप्रकरणी न्यायालयात सुरू असलेला खटला मागे घ्यावा यासाठीच मनसे तक्रारींच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करीत असल्याचा आरोप कृ.ऊ.बा.स.सभापती अभिषेक ठाकरे यांनी पत्रपरिषदेत केला. आधारहीन तक्रारींमुळे केवळ कामात अडथळे निर्माण होत असुन त्यामुळे शेतक-यांचेच नुकसान होत आहे. घाटंजी बाजार समिती शेतक-यांच्या फायद्याचे उपक्रम राबवित आहे. अडते, व्यापारी व शेतकरी यांच्यात समन्वय राहावा कोणत्याही घटकाचे नुकसान होऊ नये यासाठी बाजार समिती प्रयत्नशिल आहे. व्यापा-यांवर आमचे पुर्ण नियंत्रण आहे. शेतक-यांवर कुठेही अन्याय होऊ नये यासाठी आम्ही दक्ष आहोत. खासगी बाजार समित्यांमुळे बाजारात स्पर्धा वाढल्याने व्यापा-यांप्रती टोकाच्या सक्तीचे धोरण अवलंबिता येत नाही. कारण व्यापारीच नसतील तर माल खरेदी कोण करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तब्बल दोन कोटी रूपयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प बाजार समितीने सुरू केला आहे. हा प्रकल्प पुर्णत्वास आल्यावर शेतक-यांना सर्व सुविधा प्राप्त होतील. मात्र मनसेचे पदाधिकारी तसेच काही शेतकरी विरोधकांनी केलेल्या अर्थहीन तक्रारींमुळे हे काम रखडले. राजकीय दबावातून चुकीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला. ठरलेल्या वेळापत्रकानुसार काम झाले असते तर ईलेक्ट्रॉनिक काट्यांच्या सहाय्याने कापुस मोजूनच थेट जिनिंगमध्ये पाठविता आला असता. एकीकडे मनसेचे कार्यकर्ते जिनिंगचे वजनकाटे सदोष असल्याच्या तक्रारी करतात. तर दुसरीकडे बाजार समिती मार्केट यार्डमध्ये उभारत असलेल्या ईलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांसह ईतर विकासकामांच्या तक्रारी करतात. त्यामुळे त्यांना नेमके काय अपेक्षीत आहे? याबाबत मनसेने आपली भुमिका स्पष्ट करावी असे ते म्हणाले. न.प.ने आरक्षण वगळण्याचा निर्णय घेतला आहे. मग यावर आता तक्रारकर्त्यांनी माघार का घेऊ नये? या तक्रारींमुळे विधी विषयक कामांमध्ये बाजार समितीचा व्यर्थ खर्च होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावर्षी शेतमाल तारण योजनेला शेतक-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रकल्पातील गोदाम पुर्णत्वास आले असते तर तिप्पट शेतक-यांना त्याचा फायदा झाला असता. व्यापा-यांकडून शेतक-यांचे शोषण होऊ नये म्हणुन सर्वत्र माहिती फलक लावण्यात आले आहेत. वजनकाट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी निरिक्षक नेमण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. 
बाजार समितीच्या होत असलेल्या तक्रारी केवळ राजकीय हेतूने प्रेरीत व स्वत:च्या फायद्यासाठी असुन त्यामुळे शेतक-यांचे नुकसानच होत असल्याने शेतक-यांनीच याचा विचार करावा असेही ठाकरे म्हणाले. यावेळी उपसभापती प्रकाश डंभारे, सचिव कपिल चन्नावार उपस्थित होते.
साभार :- देशोन्नती 


आजच्या काळात माणुसकीचाही ‘भाव’ लागतो - न्यायमुर्ती एम.एन.गिलानी


सध्याच्या काळात माणुसकीचाही भाव लागत आहे. कुठे अपघात झाला तर त्यामध्ये मृत्युमूखी पडलेल्यांच्या व्यक्तीमत्वानुसार कुणाचा एक लाखाचा तर कुणाचा दिड लाखांचा भाव लागतो. जर कुणी अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रातील असेल तर चार पाच लाखांचा भाव लागतो. एवंâदरीतच आता माणसाचा भाव कमी होत चाललाय असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाचे न्यायमुर्ती एम.एन.गिलानी यांनी केले. येथिल सोनु मंगलम मध्ये आयोजीत कायदेविषयक समस्यांवर मार्गदर्शन शिबिरात ते उद्घाटक म्हणुन बोलत होते. 
माणुस जेव्हा व्यावहारीक वागत नाही व जिथे अधर्म शिरतो तेव्हा वाद निर्माण होतात. कौटूंबिक वाद जेव्हा विकोपाला जातात तेव्हा नाते संबध तुटल्या जातात. स्त्रियांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहेत. बलात्कार, हुंडाबळी, नव-याकडून प्रताडना यासह वेगवेगळ्या माध्यमातुन स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे आपण संगणकाच्या युगात वावरतो आहोत का असा प्रश्न निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर पांढरकवडा येथिल जिल्हा व सत्र न्यायाधिश १ न्या.व्ही.एस.पाटील, बार काऊन्सील ऑफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवा चे सदस्य आशिष देशमुख, जिल्हा विधी समिती, तालुका न्यायालय घाटंजीचे अध्यक्ष न्या.तेजवंतसिंघ संधु, तहसिलदार प्रकाश राऊत, मुख्याधिकारी गिरिष बन्नोरे, गटविकास अधिकारी अजय राठोड, तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड विजय भुरे, जेष्ठ विधिज्ञ अ‍ॅड आर. के. मनक्षे, अ‍ॅड, भैय्यासाहेब उपलेंचवार, अ‍ॅड सुरेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक घाटंजी न्यायालयाचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी तेजवंतसिंघ संधु यांनी केले. संचालन सरकारी वकील अ‍ॅड संजय राऊत तर आभार प्रदर्शन अ‍ॅड विजय भुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस.आर.तांबोळी, वकील संघाचे सचिव अ‍ॅड मनोज राठोड, अ‍ॅड अनंत पांडे, अ‍ॅड विनय चव्हाण, अ‍ॅड नेताजी राऊत, अ‍ॅड निलेश शुक्ला, अ‍ॅड निलेश चवरडोल, अ‍ॅड प्रेम राऊत, अ‍ॅड चंद्रकांत मरगडे, अ‍ॅड अनुपमा दाते यांनी परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती 

भारत निर्माण गैरव्यवहार प्रकरणी सात दिवसात ‘एफआयआर’ दाखल करा

मुख्य कार्यकारी अधिका-यांचे निर्देश
अंजी (नृ.) येथिल गैरप्रकार

तालुक्यातील अंजी (नृ.) येथे भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी सात दिवसात दप्तर तपासणी करून एफ.आय.आर.दाखल करावा असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.यवतमाळ यांनी गटविकास अधिका-यांना दिले आहेत. पाणी पुरवठा समितीने केलेल्या आर्थिक अनियमिततेमुळे योजनेची कामे पुर्णत्वास गेली नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना योजनेचा लाभ मिळाला नाही. याबाबत कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी कारवाई करावी. तसेच संबंधीतांच्या मालमत्तेतून वसुली पात्र रकमेचा बोजा चढविण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश यापुर्वी गटविकास अधिका-यांना देण्यात आले होते. मात्र यावर अद्याप कार्यवाही करून अहवाल सादर करण्यात आला नाही. त्यामुळे सात दिवसांच्या आत योजनेची दप्तर तपासणी करून एफ.आय.आर.दाखल करण्यात यावा असे आदेशात नमुद करण्यात आल आहे. 
अंजी (नृ.) येथे पाणी पुरवठा करण्यासाठी भारत निर्माण योजनेंतर्गत २० लाख ६७ हजार रूपये निधी मंजुर करण्यात आला होता. मात्र पाणी पुरवठा समितीने या निधी मध्ये अफरातफर केली असा आरोप आहे. सरपंच गजानन भोयर यांच्या पत्नी छाया भोयर या समितीच्या अध्यक्ष आहेत. तत्कालीन सचिव ए.के.राजुरकर यांनी दबावातून सरपंचाच्या पत्नीलाच समितीचे अध्यक्ष केले असा ग्रामस्थांचा 
आरोप आहे. समितीचे सचिव किसन मडावी, तर सरपंच गजानन भोयर, पं.स.चे माजी सभापती माणिक मेश्राम, वर्षा कांबळे, साहेबराव राऊत, दिलीप जगताप, राहुल अंजीकर, सुनिता जगताप, माया बुर्रेवार, वैशाली बेले, आशा बुरबुरे, सुशिला किनाके, सतिश पडगिलवार हे समिती सदस्य आहेत. 
कामात झालेल्या अनियमिततेप्रकरणी एफ.आय.आर.दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिका-यांनी १८ नोव्हेंबरला दिले होते. त्यानंतर ३० नोव्हेंबर पर्यंत काम पुर्ण करण्याचे हमीपत्र पाणी पुरवठा समितीने दिले होते. मात्र काम अद्यापही जैसे थे च आहे. वरिष्ठांचा आदेश असुनही गटविकास अधिकारी या प्रकरणात कार्यवाही करण्यास हयगय करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. पाणी पुरवठा योजनेत गैरव्यवहार करणा-यांविरूद्ध कार्यवाही करावी व योजनेचे काम तातडीने पुर्ण करण्यात यावे अन्यथा तालाबंद आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
साभार :- देशोन्नती