Pages

Tuesday 29 May 2012

भावापाठोपाठ आईनेही दिली तिला किडनी दान

घाटंजीतील कटकमवार परिवार जोपासतोय जिव्हाळ्याची अनोखी परंपरा

रक्ताच्या नात्यातील जिव्हाळा कधीही न तुटणारा आहे. या नात्यात कितीही मतभेद असले तरी प्रसंगी आपल्या माणसाप्रती ओढ वाटतेच. आजच्या युगात रक्ताची नातीही परक्यापेक्षा वाईट वागत असल्याची अनेक उदाहरणे असली तरी आपल्या जीवाभावाच्या माणसासाठी आपल्या शरीराचा एक भाग दान करणारे सुद्धा या समाजातच आहेत. जग कितीही स्वार्थी झाले तरीही हक्काच्या नात्याची नाळ अजुनही जुळलेलीच आहे. खापरी (घाटंजी) येथिल कटकमवार परिवाराने आपल्या कृतीतून समाजापुढे एक अनुकरणीय आदर्श ठेवला आहे. येथिल व्यावसायीक अभय कटकमवार यांच्या मातोश्री हिराबाई ब्रम्हानंद कटकमवार यांनी त्यांची मुलगी अश्विनी अनिल बेलगमवार रा. आर्णी हिला किडनी दान केली. अश्विनी ही गेल्या ११ वर्षांपासुन किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे. १० वर्षापुर्वी तिचे बंधु अभय कटकमवार यांनी तिला एक किडनी दान केली होती. पुन्हा किडनी खराब झाल्यामुळे आईने आपल्याच शरीराचा भाग असलेल्या लेकीसाठी किडनी दान दिली. हिराबाई ५८ वर्षांच्या आहेत. या वयातही अवघड शस्त्रक्रीयेला सामोरे जाऊन त्यांनी मातृत्वात असलेल्या अजोड जिव्हाळ्याचा परिचय दिला. 
काही महिन्यांपुर्वी हैदराबाद येथिल महाविर हॉस्पीटल मध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.
नुकत्याच कृषी भवन घाटंजी येथे झालेल्या एका कौटुंबीक कार्यक्रमात सहयोग नागरी सहकारी पतसंस्था व अभय कटकमवार मित्र परिवाराच्या वतीने हिराबाई कटकमवार यांचा 
सन्मान करण्यात आला. या भावनिक सोहळ्यात सहयोग पतसंस्थेचे विनोद गवळी, रविंद्र उमाटे, उत्तम कोवे, मोहन ढवळे, विशाल साबापुरे, तसेच अनिता सुधीर बोरगावकर, सखाराम निलावार, माला अवधुत बिजमवार, शितल अभय कटकमवार, विनोद गुज्जलवार, संस्कृती कटकमवार यांच्यासह मित्रपरिवाराची उपस्थिती होती.
साभार :- देशोन्नती 

ले-आऊट धारकांनी पाडले न.प.चे सार्वजनिक शौचालय


ले-आऊट मध्ये अडसर ठरत असलेले घाटंजी नगर परिषदेचे सार्वजनिक शौचालयच ले-आऊट धारकांनी पाडण्यास सुरूवात केल्याने न.प.प्रशासनाचा वचक नसल्याचे दिसुन येत आहे. काही नागरिकांनी ही बाब नगर परिषदेच्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांनी ले-आऊट धारक राजीव राधामोहन बजाज, प्रदिप पुरूषोत्तम लोयलका, वर्षा राजेश ठाकुर यांना थातुर मातूर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 
येथिल शेत सव्र्हे क्रं.५५/२ मध्ये या भागातील रहिवाशांसाठी अनेक वर्षांपुर्वी नगर परिषदेने सार्वजनिक शौचालय बांधलेले आहे. परिसरातील सर्वसामान्य नागरिक त्याचा उपयोगही करतात. या शौचालयाच्या मागील बाजुस असलेल्या शेतात ले-आऊट झाले आहे. या सार्वजनिक शौचालयामुळे प्लॉटचे भाव अपेक्षेप्रमाणे मिळणार नाहीत या उद्देशाने सदर ले-आऊटधारकांनी कोणताही विचार न करता शौचालयाचे बांधकाम पाडायला सुरूवात केली. सुमारे १० वर्षांपुर्वी तत्कालीन न.प.पदाधिका-यानी ले-आऊटधारकासोबत हे शौचालय पाडून दुस-या जागेवर दहा शौचालये बांधुन देण्याचा करार केला होता असे ले-आऊटधारकाचे म्हणणे आहे. 
मात्र दहा वर्षांपुर्वी केलेल्या तथाकथित कराराची अंमलबजावणी आजवर का केली नाही? तसेच न.प.ची मालमत्ता असलेल्या बांधकामाला पाडण्याचा अधिकार खासगी व्यक्तीला आहे का? असे प्रश्न उपस्थित केल्या जात आहेत.
मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे यांनी सदर ले-आऊटधारकांवर फौजदारी अथवा दंडात्मक कार्यवाही न करता थातुर मातूर कारणे दाखवा नोटीस बजावून औपचारीकता पुर्ण केली असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एवंâदरीतच नियमबाह्य होत असलेल्या कामांवर नगर परिषद प्रशासनाचे लक्ष नसुन सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीतच नियमांवर बोट ठेवुन काम केल्या जात असल्याची ओरड होत आहे.
साभार :- देशोन्नती 

घाटंजीत ‘तरूणाईच्या वेगळ्या वाटा’ शिबिराचे आयोजन  

‘चलो युवा कुछ कर दिखाये’ या चळवळीच्या वतीने येथिल रसिकाश्रय संस्थेच्या फार्म हाऊसवर दि.१ ते ३ जुन पर्यंत तरूणाईच्या वेगळ्या वाटा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हालाखीच्या परिस्थितीत युवकांनी न डगमगता कसे उभे रहावे? करीयर सोबतच समाजहिताच्या दृष्टीने कसे कार्य करावे याचे मार्गदर्शन या शिबिरात करण्यात येणार आहे.
या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी वसुंधरा पाणलोट विकास प्रकल्पाचे उपायुक्त इंद्रजीत देशमुख, पुणे, डॉ.राम पुनियानी, मुंबई, नरेश माहेश्वरी, आमगाव जि.गोंदीया, बंटी भांगडीया, चिमुर, जि.चंद्रपुर, नंदु माधव, गेवराई जि.बिड, दत्ता बाळसराफ, मुंबई, अ‍ॅड. असिम सरोदे, पुणे, चंद्रकांत वानखडे, नागपुर, विकास लवांडे, पुणे, आनंद पवार, पुणे, डॉ अविनाश सावजी, जिल्हाधिकारी डॉ.श्रावण हर्डीकर, दगडू लोमटे, अनिकेत लोहिया, संतोष गर्जे, डॉ.प्रियदर्शन तुरे, रवि बापटले, अ‍ॅड पल्लवी रेणके, छोटु काका वरणगावकर, डॉ.अशोक बेलखोडे, प्रकाश ढोबळे, प्रा.वर्षा निकम, अ‍ॅड सिमा तेलंगे, प्रविण देशमुख, आमदार संजय राठोड, मधुकर धस, किशोर मोघे, राम नायगावकर, अविनाश मारशटवार, डॉ.मधुकर गुमळे, प्रा.दिलीप अलोणे, हरिश ईथापे, प्रा.हेमंत कांबळे. बाळासाहेब सरोदे, संजय संगेकर, पुंडलीक वाघ, रमाकांत मस्के, विजय कडू हे विवीध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरात विवीध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिवाय युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणुन संगित रजनी, लावणी महोत्सव तसेच तरूणाईच्या वेगळ्या वाटा या विषयावर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात भाग घेण्यासाठी २०० रूपये नोंदणी शुल्क आकारण्यात येणार असुन या शिबीरात सहभागी होण्यास ईच्छुक असलेल्यांनी महेश पवार, देवेंद्र गणवीर यांचेशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.     
साभार :- देशोन्नती 

Tuesday 22 May 2012

उलट्या फिरणा-या ‘काट्यांमुळे’ घाटंजीत घड्याळीची ‘वेळ’ खराब


काही महिन्यांपुर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घाटंजी तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दयनीय पराभव झाला होता. जिल्हा परिषद तर सोडाच पण पंचायत समितीची एक जागाही रा.कॉ.ला पदरात पाडता आली नाही. तालुक्यातील दोन दिग्गज नेते एकत्र असतांना राष्ट्रवादीचा असा पराभव कदाचित विरोधकांनाही अपेक्षीत नव्हता. विजय व पराभव एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. मात्र पराभवानंतर त्याच्या कारणांचा शोध घेऊन त्यादृष्टीने उपाययोजना करण्याचा प्रघात राजकीय पक्षांमध्ये असतो. मात्र घाटंजी तालुक्यात तसे झालेले दिसत नाही. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरूद्ध आपली उमेदवारी दाखल करणारे व पक्षासोबत असल्याचे दाखवुन छुप्या पद्धतीने विरोधकाला सहकार्य करणारे तथाकथित पक्षनिष्ठ अजुनही राष्ट्रवादी मध्ये आहेत. त्यांच्यावर पक्षविरोधी कुरापती केल्यामुळे शिस्तभंगाची कार्यवाही झाल्याचे ऐकीवात नाही. तालुक्यात झालेल्या मानहानीजनक पराभवाची जबाबदारी स्विकारून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश डंभारे यांनी राजीनामा देण्याची औपचारीकता पुर्ण केली होती. मात्र नुकत्याच झालेल्या तालुकाध्यक्षांच्या निवडीत त्यांच्यावरच ती जबाबदारी पुन्हा एकदा सोपविण्यात आली. तालुक्यातील एक मोठा गट कॉंग्रेसमधुन राष्ट्रवादी मध्ये आला असला तरी तालुकाध्यक्ष पदासाठी पक्षाला माणसांची उणिव भासत असल्याचे प्रकर्षाने दिसत आहे. पक्षबांधणीसाठी सक्षम नेतृत्वाकडे जबाबदारी असणे गरजेचे असते. स्वतंत्र निर्णयक्षमता असल्याशिवाय कोणीही त्या पदाला न्याय देऊ शकत नाही. प्रकाश डंभारे हे माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांच्या अत्यंत जवळचे आहेत. ‘मालक’ म्हणतील तीच पुर्व दिशा असा त्यांचा ठाम विश्वास आहे. एकंदरीतच ते स्वतंत्र निर्णय घेण्यास सक्षम नाहीत. वाड्यावरून येणारा आदेशच शिरोधार्य मानुन ते काम करतील. त्यामुळे त्यांचा स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांवर वचक राहणे शक्यच नाही. राष्ट्रवादीतील नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी देण्या ऐवजी जे आहेत त्यांच्या पलीकडे न जाण्याच्या कार्यपद्धतीमुळे सध्या तालुक्यात राष्ट्रवादीवर खराब वेळ आली आहे.
नगर परिषद निवडणुकीत माजी खासदार पुत्राने दोन प्रभागात सेनेशी सलगी करून रा.कॉ. उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला होता. न.प.उपाध्यक्ष पद भोगलेल्या नगरसेवकानेही उमेदवारी मिळाली नाही म्हणुन पक्षविरोधी प्रचार केला. परिणामस्वरूप स्पष्ट बहुमत मिळेल अशी स्थिती असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला अवघ्या पाच जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम केले असते तर नगर परिषदेवर आज राष्ट्रवादीची एकहाती सत्ता राहीली असती. त्यावेळी सुद्धा पक्षासोबत दगा करणा-यांना अभय मिळाले.
पक्षात नव्याने आलेल्या सुरेश लोणकरांना पक्षाने शिवणी जि.प.गटात उमेदवारी दिली होती. त्यामुळे या जागेसाठी पुर्वीपासुन ईच्छुक असलेले राष्ट्रवादीचे दोन उमेदवार स्वाभाविकपणे दुखावल्या गेले. दोघांनीही उमेदवारी दाखल केली. त्यापैकी एकाने आपले बंड कायम ठेवले तर दुस-याने कथितपणे पक्षादेश शिरोधार्य मानुन माघार घेत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना तन मन धनाने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रचार कार्याच्या शुभारंभ प्रसंगी आपल्या ग्रामदैवतासमोर दिलेला शब्द मात्र त्यांनी पाळला नाही. पक्षाच्या उमेदवाराला सहकार्य करणे तर सोडाच पण त्यांचा पाडाव करण्यासाठी तन, मन, धनाने ते निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे संपुर्ण तालुक्याने अनुभवले. एवढ़ेच नव्हे तर निवडणुकीच्या एक दिवस आधी त्यांच्याच शिक्षण संस्थेच्या ईमारतीत विरोधी पक्षाच्या उमेदवारासोबत गुप्त बैठकी घेऊन पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी रणनीतीही आखली. या सर्व कुरापतींमुळे राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांचा दारूण पराभव झाला. जे झाले ते झाले. मात्र या सर्व अनुभवातून पक्षाने कोणताही धडा घेतल्याचे दिसत नाही. राष्ट्रवादीच्या घड्याळाला चालविण्याची जबाबदारी असलेले हे काटे असेच उलटे फिरत राहिले तर भविष्यामध्ये या पक्षाला तालुक्यात स्थान राहील की नाही अशी शंका निर्माण झाली आहे.

अमोल राऊत
साभार :- देशोन्नती 

नाभिक समाजाच्या समस्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडणार

घाटंजी येथे महामेळाव्यात ना.मोघेंचे प्रतिपादन

काळाच्या ओघात नाभिक समाज प्रगतीपासुन वंचित राहिला आहे. मुख्य प्रवाहात येण्यासाठी समाजाला लढा देण्याची गरज आहे. सर्व मागण्या व समस्या सहज सुटणार नाहीच. त्यासाठी योग्य पाठपुरावा करावा लागेल. नाभिक समाजाच्या मागाण्यांसंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करणार असे आश्वासन राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना. शिवाजीराव मोघे यांनी दिले. येथिल संत मारोती महाराज सांस्कृतीक भवनात आयोजीत नाभिक समाजाच्या महामेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे प्रांताध्यक्ष कल्याण तळे होते. प्रमुख अतिथी म्हणुन महामंडळाचे उपाध्यक्ष दामोधर बिडवे, कार्याध्यक्ष पुंडलीक केळझरकर, जि.प.सदस्य देवानंद पवार, योगेश देशमुख, पं.स.सभापती शैलेश इंगोले, उपसभापती सुवर्णा निकोडे, नगराध्यक्ष जगदिश पंजाबी, नगरसेवक किशोर दावडा, नाभिक महामंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय धारकर, राजेश नागतुरे, जिल्हाध्यक्ष संजय मादेशवार, सचिव संतोष मोतेवार, जिल्हा संघटक शशीकांत नक्षणे, श्री.पिस्तुलकर, दिलीप मादेशवार, अरूण ठणेकर यांचेसह घाटंजी पंचायत समितीचे सदस्य, न.प. सदस्य यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 
नाभिक महामंडळाच्या पदाधिका-यांनी समाजाच्या विवीध समस्या व मागण्या मंत्री महोदयांसमोर मांडल्या. त्यावर यथोचीत उपाययोजना करण्याचे तसेच नाभिक महामंडळाच्या पदाधिका-यांची मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन ना. मोघे यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. पिस्तुलकर यांनी केले. तर संचालन व आभारप्रदर्शन प्रदिप गड्डमवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाभिक महामंडळाचे जिल्हा संपर्क प्रमुख गजानन भालेकर, तालुकाध्यक्ष बाबाराव लिंगणवार, शहराध्यक्ष अमोल मोतेलवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या महामेळाव्याला मोठ्या प्रमाणात समाजबांधवांची उपस्थिती होती.
साभार :- देशोन्नती 

शेतक-यांच्या बांधावर खत वाटप योजनेचा शुभारंभ


थेट शेतीच्या बांधावर खत वाटप करण्याच्या योजनेचा शुभारंभ राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांचे हस्ते करण्यात आला. येथिल पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातून खताच्या पहिल्या वाहनाला त्यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी जि.प.सदस्य देवानंद पवार, योगेश देशमुख, पं.स.सभापती शैलेश इंगोले, उपसभापती सुवर्णा निकोडे, प्रभारी गटविकास अधिकारी अजय राठोड, तालुका कृषी अधिकारी पी.पी.घुले, पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय पवार, कृषी विस्तार अधिकारी राहुल डाखोरे यांचेसह पंचायत समिती सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
थेट शेतक-यांच्या शेताच्या बांधापर्यंत खत पोहचविण्याची ही योजना शेतक-यांच्या फायद्याची असुन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन ना.मोघे यांनी यावेळी केले.
गेल्या काही वर्षात खरीप हंगामात खतांची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असल्याने शेतक-यांना खत टंचाईला सामोरे जावे लागत असे. त्यामुळे यावर्षीपासुन शासनाने थेट बांधावर खत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खत पुरवठा संनियंत्रण समिती मार्फत खताचा पुरवठा व नियोजन याबाबत आढावा घेण्यात येणार आहे. केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी गटांच्या माध्यमातून खताचे वितरण होणार आहे.
या योजनेमुळे शेतक-यांना खताच्या टंचाईला सामोरे जावे लागणार नाही असे पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय पवार यांनी सांगीतले. 
साभार :- देशोन्नती 

Thursday 17 May 2012

घाटंजी तालुक्यातील जुगार व मटका अड्ड्यांवर विशेष पथकाच्या धाडी

२० जणांना अटक; ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त
घाटंजी, पारवा ठाणेदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
येथिल पोलीस स्टेशनपासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या दोन मटका अड्ड्यांवर विशेष पोलीस पथकाने धाड मारून तब्बल १२ आरोपींना अटक केली. परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक रूपाली दरेकर व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सारंग नवलकर  यांच्या पथकाने काल रात्री ही कार्यवाही केली.
या कार्यवाहीमध्ये १६ हजार ६८५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी मोहन बापुराव शिवणकर (४०), विश्वनाथ विष्णुजी रामटेके (६२), मारूती रोडबाजी पारधी (३६), रमेश काशीराम ठाकरे (५५), प्रशांत लक्ष्मण धोटे (५०), सुदाम शंकर वाडे (५०), विनायक माधव प्रसन्नकर, प्रताप प्रभाकर डंभारे (३५), राम किसन पेटेवार (२६), राजु विलास गावंडे (२०), सुधाकर शामराव कांबळे (३२), राहुल वसंत लढे (३५) यांना अटक करण्यात आली. तर मटका अड्डा चालविणारा सतिष यल्लरवार हा फरार आहे.
यापुर्वी दि.१४ ला पारवा येथे जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाने धाड मारून ४७ हजार रूपयांच्या मुद्देमालासह ८ जणांना ताब्यात घेतले. परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक दत्ता नलावडे यांच्या पथकाने ही कार्यवाही केली. यामध्ये जुगार अड्डा चालविणारा शेख आसिफ शेख चांद (२१) याचेसह शेख असलम शेख रेहमान (१९), उत्तम बापुराव तायडे (६२), राजु गंगाधर धवने (२८), मन्सुर अली अकबर अली लालानी (५८), आकाश रामराव मोहिते (२०), सुनिल डोमाजी शेंडे (३५) यांना अटक करण्यात आली. या दोन्ही कार्यवाहीमध्ये स.पो.नि.सारंग नवलकर, जमादार नरेंद्र मानकर, कैलास देवकर, विशाल भगत, सचिन आडे, भोजराज करपते, नितिन वास्टर, प्रमोद इंगोले, विवेक पेठे, प्रमोद मडावी,मयुरी मांगुळकर यांनी सहभाग घेतला.
जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या विशेष पोलीस पथकाने घाटंजी तालुक्यात राबविलेल्या धाडसत्रामुळे घाटंजी व पारवा पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सर्व अवैध व्यवसाय पुर्णपणे बंद करण्याच्या जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशाला कवडीचीही विंâमत न देता घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर व पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार वंजारे यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात अवैध व्यवसायांना जणु संरक्षणच दिले आहे. पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गावांमध्ये खुले आमपणे अवैध दारू विकल्या जाते. वाहतुकीची बेशिस्त तर अंगावर काटा आणणारी आहे. घाटंजी शहरात मुख्य बाजारपेठेच्या परिसरात खुलेआमपणे मटका अड्डे चालविल्या जातात. उल्लेखनिय म्हणजे नेहमी महाराष्ट्र बँक परिसरातील मटका अड्ड्यांवरच धाड पडते. मात्र कन्या शाळेच्या मागे, संत मारोती महाराज मंदीर परिसर, मटन मार्केट यासह विवीध भागात असलेल्या मटका अड्ड्यांवर कधी कार्यवाही होतांना दिसत नाही. महाराष्ट्र बँकेच्या परिसरात महिला व बालकल्याण विभागाचे कार्यालय आहे. बँक व या कार्यालयात महिलांची नेहमीच ये जा असते. मात्र मटका लावण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या परिसरात भटकत असल्याने महिलावर्गाची प्रचंड कुचंबना होते. तर कन्या शाळेच्या मागील भागातही मटकाबहाद्दरांची वदळ राहत असल्याने प्रसंगी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात चालणारे काही प्रमुख मटका व जुगार अड्डे राजकारणी व्यक्ती चालवित असल्याने पोलीस विभागाची त्याकडे मेहेरनजर असते असा नागरिकांचा आरोप आहे.
विशेष पथकाच्या कार्यवाही नंतर एक दोन दिवस हे व्यवसाय बंद राहतील व त्यानंतर पुन्हा जैसे थे स्थिती होईल. त्यामुळे अवैध व्यवसायांवर कायमस्वरूपी नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक पोलीसांच्या मुसक्या आवळण्याची गरज व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती 


कुर्ली येथे हिंदु स्मशानभुमी देण्यास प्रशासनाची टाळाटाळ

तालुक्यातील कुर्ली येथे ब-याच कालावधीपासुन हिंदु स्मशानभुमीची गरज असताना प्रशासनाकडून त्यासाठी टाळाटाळ होत आहे. ग्रामपंचायतीच्या ठरावासह या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र राजकीय दबावातून याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी केला आहे. यासंदर्भात पालकमंत्री ना.नितीन राऊत, सामाजीक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, विभागीय आयुक्त, अमरावती, जिल्हाधिकारी, यवतमाळ यांचेसह संबंधीतांकडे तक्रारीही करण्यात आल्या आहेत. मात्र एक वर्षाचा कालावधी होऊनही स्मशानभुमीबाबत प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही असा सोलंकी यांचा आरोप आहे. मौजा कुर्ली येथे हिंदु समाजाकरीता अनेक वर्षांपासुन स्मशानभुमी नसल्याने ग्रामपंचायतीने रितसर ठराव घेतला. मात्र, कुर्ली येथे पुर्वीपासुनच हिंदु स्मशानभुमी असल्याचे महसुल विभागाच्या फेरफार, हक्क नोंदणीनुसार निष्पन्न झाले आहे. कुर्ली येथे गट क्र. ४/१ मध्ये माजी जि.प.सदस्य जयप्रकाश आशारेड्डी काटपेल्लीवार यांच्या शेतजमीनीमध्ये ०.४० आर जागेवर हिंदुंची स्मशानभुमी असतांना तसेच तत्कालीन नायब तहसिलदार पंधरे यांना हिंदु स्मशानभुमीच्या प्रकरणात कोणताही आदेश देण्याचा अधिकार नसतांना त्यांनी ७/१२ उता-यावरील इतर अधिकारात नमुद असलेल्या ०.४० आर हिंदु स्मशानभुमीची जागा प्रकरणात प्रस्तुत ३/कली/क्रमांक/कावि/९५१/२००४, दि.१९/०६/२००४ रोजी आदेश काढुन गट क्र.४/१ जयप्रकाश आशारेड्डी काटपेल्लीवार यांच्या ७/१२ उता-यातील इतर अधिकार मधील नोंदी काढुन आदेश पारित केला आहे. जो नियमबाह्य आहे. स्मशानभुमीच्या प्रकरणात कोणताही आदेश रद्द अथवा पारित करण्याचा अधिकार केवळ जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिका-यांनाच आहे. त्यामुळे या प्रकरणात नायब तहसिलदार पंधरे यांच्यासह संबधीत तलाठीही दोषी असल्याने त्यांच्याविरूद्धही कार्यवाही करावी अशी सोलंकी यांची मागणी आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पंधरे यांनी काढलेला तो बेकायदेशीर आदेश तहसिल कार्यालयात उपलब्ध नसल्याचे जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार पारवा यांनी माहितीच्या अधिकारान्वये मागीतलेल्या माहितीमध्ये कळविले आहे. एकंदरीतच स्मशानभुमीच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट असुन प्रशासन मात्र त्याकडे डोळेझाक करीत आहे. कुर्ली येथे हिंदु स्मशानभुमीची अत्यंत आवश्यकता असतांना शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करून दोषींना पाठीशी घालत असल्याने आता याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सोलंकी यांनी सांगीतले.
साभार :- देशोन्नती 


जि.प.प्राथमिक शिक्षक संघ (र.नं.२३५) ची कार्यकारीणी गठीत


यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ र.नं.२३५ शाखा घाटंजीच्या कार्यकारीणीचे नुकतेच गठण करण्यात आले. समितीच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या या निवडीमध्ये अध्यक्षपदी सुधाकर राऊत, सचिव दिपक चौधरी, कार्याध्यक्ष डी.डी.पुसनाके तर सल्लागार म्हणुन विजय डंभारे, नारायण भोयर, संजय इंगोले यांची निवड करण्यात आली.
याशिवाय जिल्हाप्रतिनिधीपदी विकास डंभारे, शेख जलील, काशिनाथ आडे, उपाध्यक्ष जगन्नाथ गावंडे, महादेव सोनटक्के, अनिल तिडके, भारत राठोड, प्रशांत बोमिडवार, रविंद्र आडे, अशोक जिल्लडवार, सहसचिव विठ्ठल राठोड, सुभाष ठाकरे, कोषाध्यक्ष अभिजीत ठाकरे, सहकोषाध्यक्ष भारत लोखंडे, विकेश दावडा, मुख्य संघटक लक्ष्मण कुडमते, सहसंघटक संजय तुरक, महेंद्र खडसे, कार्यालयीन संपर्वâ प्रमुख रामेश्वर भांडारवार, कार्यालयीन संपर्वâ सहाय्यक गजानन तुरी, नंदकिशोर खडसे, प्रकाशक अविनाश खरतडे, सहप्रकाशक दिवाकर हेमके, विशाल गोडे, प्रसिद्धी प्रमुख किशोर मुनेश्वर, प्रसिद्धी सहाय्यक व्ही. आर. चिलकावार, जे.के.भुरे मुख्याध्यापक प्रतिनिधी राजु हेमके, एस.जी.बेंडे, विलास गुरडवार, पदवीधर प्रतिनिधी किसन किनाके, रूपेश बेलसरे, महिला प्रतिनिधी उज्वला सिडाम, माया भोयर, संगिता चव्हाण, वर्षा कटकमवार, शिक्षण सेवक प्रतिनिधी प्राजक्ता निकम, गायत्री भोयर, अमोल चौधरी यांचेसह कार्यकारीणी सदस्यांमध्ये कमल आगलावे, ओमप्रकाश भवरे, सिमा पिसाळकर, किशोर भोयर, पी.जी.चांदेकर, तृप्ती ठाकरे, अल्का गोटफोडे, बी.एल.राठोड, विनोद महल्ले, माधुरी रामटेके, प्रिया डफरे, दिनकर चौधरी, रमेश राठोड, कल्पना मेश्राम, अल्का कुडमते, संजय भवरे, सुरेश चव्हाण, अनिल चांदेकर, अरूणा धोंगडे, सुधाकर राठोड, पुंडलीक कुलमेलकर, ओमप्रकाश कुपटेकर, जयंत दिकोंडवार, प्रतिभा प्रतापवार, सुरेश वरगंटवार, रामलाल राठोड, पी.पी. राठोड, अविनाश मनवर, अरूणा चिंतावार, तारा मसराम, मोहम्मद इरफान खान, शकील अहमद, विनोद सुरपाम, श्रद्धा ढवळे, बाळु पवार, अजाब ऊईके, दिलीप राठोड, अशोक राठोड, दत्तात्रय आडे, सिंधु टेकाम, अर्चना झाडे, भाऊराव मेंगेवार, अच्युत पेंचेलवार, संदिप अंदुरकर, गजानन राऊत, आकाश ठाकरे, ईश्वर बिरकुटवार यांचा समावेश आहे.
साभार :- देशोन्नती 



Friday 11 May 2012

घाटंजीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किशोर खडसे यांना लाच घेताना अटक


येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किशोर खडसे यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचतप प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक ए. डी. जहरवाल यांनी गुरुवारी अटक केली.
घाटंजी तालुक्यात एकूण ४ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. यापैकी रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. संजय पुराम कार्यरत आहेत. या चारही केंद्रावर देखरेख करण्याकसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किशोर खडसे पाच वर्षांपासून कार्यरत आहेत. रुग्णांच्या सोयी सुविधेसाठी दोन समित्या असतात. त्यापैकी एक नियामक मंडळ व दुसरी कार्यकारी समिती असते. या समितीवर अध्यक्ष तालुका आरोग्य अधिकारी तर सचिव संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी असतात. इंडियन पब्लिक हेल्थ स्टॅण्डर्डचा निधी अध्यक्ष व सचिव यांच्या संयुक्त सहीने धनादेशाद्वारे वटविला जातो. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढविणे, रंगरंगोटी करणे, मेडिकेअर आणि गॅसेस, अंगणवाडी, कार्यशाळा, वैद्यकीय कामासाठी कपडे खरेदी व शिलाई इत्यादी कामे होत असतात. रामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले डॉ. संजय पुराम यांनी आयपीएचएस अंतर्गत येणार्‍या निधीमधून १ लाख 0३ हजार ६८३ रुपये ३0 मार्चपर्यंत खर्च केले. हा खर्च केलेल्या रकमेच्या १0 टक्के रक्कम कमीशन म्हणून तालुका आरोग्य अधिकारी के. एन. खडसे यांनी मागितले.
नेहमीच्या त्रासाला कंटाळून डॉ. पुराम यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्या अनुषंगाने गुरुवारी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात असताना डॉ. पुराम यांच्याकडून ५000 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले. 
साभार :- देशोन्नती 


चिमुकलीला पळविण्याच्या बेतात असलेल्या तरूणीस अटक

भरवस्तीतील घटनेने घाटंजीत खळबळ
शेकडो लोकांनी केला तरूणीचा पाठलाग



पाच वर्षांच्या चिमुकलीस पळवुन नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरूणीला नागरिकांनी शिताफिने पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले. घाटंजीतील नेहरूनगर भागात सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. 
अश्विनी विठ्ठल गायकवाड (२३) रा.मांडवा ता.घाटंजी असे अटक करण्यात आलेल्या तरूणीचे नाव आहे. आज सकाळी ११ वाजेदरम्यान नेहरूनगर भागातील सुमारे पाच वर्षांची चिमुकली घरी न आढळल्याने तिच्या कुटूंबीयांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. तेवढ्यात मुलीच्या आजीला ती एका अनोळखी तरूणीजवळ दिसली. म्हातारी आपल्याकडे येत असल्याचे दिसताच सदर तरूणीने मुलीला घेऊन तिथुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या वृद्धेने तरूणीचा पाठलाग करून तिला गाठले. मुलगी बेपत्ता असल्याची वार्ता परिसरात वा-यासारखी पसरल्याने अनेक नागरिक घराबाहेर आले होते. त्यामुळे शेकडो लोकांच्या जमावाने त्या तरूणीस घेरले व तिच्या तावडीतून चिमुकलीची सुटका केली. यावेळी जमाव संतप्त झाला होता.  त्यानंतर पोलीसांना सुचना देण्यात आली. घाटंजी पोलीसांनी सदर तरूणीस ताब्यात घेऊन तिला ‘मायापाखर’ सुधारगृहात रवाना केल्याची माहिती आहे. ही तरूणी गुन्हेगारी प्रवृत्तीची असुन यापुर्वीही तिला काही ठिकाणी चोरी करतांना नागरीकांनी पकडून दिल्याचे यावेळी काही नागरिकांनी सांगीतले.
पोलीसांनी या प्रकरणात कसुन चौकशी करून यामागे मुले पळविणारी टोळी तर नाही ना याबाबत तपास करावा अशी मागणी होत आहे.


कुलरचा शॉक लागुन नवविवाहितेचा मृत्यू

तालुक्यातील पांढुर्णा (बु.) येथे दिपाली नितिन देठे (२३) या नवविवाहीतेचा कुलरचा शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी १०.३० वाजेदरम्यान ही घटना घडली. विजेचा झटका लागल्यावर उपचारासाठी यवतमाळ येथे नेतेवेळी रस्त्यातच तिची प्राणज्योत मालवली. सुमारे एक महिन्यापुर्वीच दिपाली हिचे गावातीलच नितिन देठे याचेशी लग्न झाले होते. या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती 

Thursday 10 May 2012

घाटंजीत गॅस सिलेंडर लिकेजमुळे घराला भिषण आग

घरातील साहित्य भस्मसात
३ लाख ५० हजारांचे नुकसान








स्थानिक आनंदनगर भागात वसंत वडतकर यांचे घरी गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत घरातील संपुर्ण साहित्य जळाले. आज सकाळी ११ वाजेदरम्यान ही घटना घडली. यामध्ये सुमारे ३ लाख ५० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. 
श्री गजानन महाराज मंदिराच्या मागे असलेल्या आनंदनगरात वसंत नारायण वडतकर यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर राम बापुराव करपते हे भाड्याने राहतात. सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते देवघरात दिवा लावण्यास गेले. सिलेंडर लिक असल्यामुळे गॅस घरात पसरलेला होता. ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही. माचीस पेटवताच अचानक मोठा भडका झाला. राम करपते यांनी आग लागलेला सिलींडर घराबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यादरम्यान घरातील साहित्याने पेट घेतला. टि.व्ही, सोफा, फ्रीज, कुलर, पलंग यासह दरवाजे, खिडक्या जळुन खाक झाले. आजुबाजूच्या नागरीकांनी धावपळ करून आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र तोवर घरातील बहुतेक सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. घटनेच्या वेळी घरात राम करपते यांची पत्नी प्रतिभा, २ वर्षांचा चिमुकला दिपेश हे होते. मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. आगीच्या तिव्रतेने खिडक्यांची तावदाने फुटली. नागरीकांनी वेळीच आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला. सिलींडरचा स्फोट झाला असता तर मोठ्या प्रमाणावर हानी झाली असती. महसुल विभागाचे एस.वाय गुघाणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. करपते दाम्पत्याचे तिन वर्षांपुर्वीच लग्न झाले असुन दोन वर्षांपासुन ते वडतकर यांचे घरी भाड्याने राहात आहेत. गॅस कंपन्यांकडून देण्यात येत असलेले अनेक रेग्युलेटर तकलादु असल्याने काही दिवसांनी त्यातून कमी अधिक प्रमाणात गॅस लिक होत असल्याच्या तक्रारी आहेत.
साभार :- देशोन्नती 

Tuesday 8 May 2012

धरणविरोधी संघर्ष समितीने बंद पाडले निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम












निम्न पैनगंगा प्रकल्पाचे (चिमटा धरण) काम  धरणविरोधी संघर्ष समितीने बंद पाडले.  आमदार संजय राठोड यांच्या नेतृत्वात समितीने हा पवित्रा घेतला. 
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा नदीवर चिमटा धरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. दि. ७ मे २०१२ रोजी दिग्रस मतदार संघाचे आमदार संजय राठोड यांनी धरण विरोधी समितीसह निम्न पैनगंगा  प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी करून उप अभियंता राजपाल वाणी यांचे कडून सदर प्रकल्पाचे काम बंद करण्याचे लेखी आश्वासन घेतले.
सातबारा खोडताड करणे, बंजर जमिन ओलीताची दाखविणे यासह खोटे कागदपत्रे दाखल करून करोडो रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या दै.देशोन्नती मध्ये प्रसिद्ध झाल्यावरून आमदार संजय राठोड आणी धरणविरोधी समितीने हा मुद्दा उचलुन धरला आणी दि. ७ मे रोजी प्रकल्पाच्या ठिकाणी शेकडो बुडीत क्षेत्रातील शेतक-यांसह भर उन्हात दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान दाखल झाले. यावेळी पोलीसांच्या गराड्याने प्रकल्पाच्या आवारात संबंधीतांना जाण्यास मज्जाव केला. त्यांचे म्हणणे ऐकुन घेण्याकरीता शिष्टमंडळास जाण्याची परवानगी दिली. तब्बल तासभर झालेल्या चर्चेदरम्यान उप अभियंता राजपाल वाणी हे पाऊण तास अबोल राहिले. शेवटी एक तासाच्या चर्चेनंतर सदर काम बंद करण्याचे लेखी आश्वासन त्यांनी शिष्टमंडळास दिले.
यावेळी माजी आमदार विश्वास नांदेकर, श्रीकांत मुनगिनवार, जि.प.सभापती मनमोहनसिंग चव्हाण, माजी न.प.अध्यक्ष रविंद्र अरगडे, शहर प्रमुख दिनेश मेहेंद्रे, न.प.सदस्य बापु देशमुख यांचेसह धरण विरोधी समितीचे प्रल्हाद पाटील जगताप, मुबारक तंवर, गावंडे सर व सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच किनवटचे तहसिलदार अविनाश कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी लोखंडे यांचीही यावेळी उपस्थिती होती.
साभार :- देशोन्नती 


छायाचित्र :- कैलास कोरवते, निलेश जुनगरे


Saturday 5 May 2012

बैलबाजार मैदानातील कच-यांच्या ढिगा-यांना आग

गुरूदेव वार्ड थोडक्यात बचावला 
बाजार समितीचा दुर्लक्षीतपणा


कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने ज्या मैदानात बैलबाजार भरविण्यात येतो तिथे असलेल्या कचरा व खताच्या ढिगा-यांना आज दुपारी आग लागली. दुपारच्या सुमारास सोसाट्याचा वारा असल्याने मैदानात ठिकठिकाणी साठवुन असलेल्या ढिगांनी पेट घेतला. झपाट्याने पसरत चाललेली आग बाजुलाच असलेल्या गुरूदेव वार्डातही पसरण्याची भिती निर्माण झाल्याने येथिल नागरीकांनी तातडीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. नगर परिषदेचा टँकर बोलविण्यात आला. वार्डातील नागरीकांनी वेळीच धावपळ केल्याने आग लवकर आटोक्यात आली. अन्यथा दुपारी असलेल्या सुसाट वा-यामुळे लोकवस्तीपासुन अवघ्या २० ते २५ फुट अंतरावर असलेल्या या कच-याच्या जळत्या ढिगा-यांनी संपुर्ण गुरूदेव वार्डालाच आगीच्या भक्ष्यस्थानी घेतले असते. कृषी उत्पन्न बाजार समितीने तातडीने हे कच-याचे ढिगारे न उचलल्यास तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा येथिल संतप्त नागरीकांनी दिला आहे. घाटी (घाटंजी) भागातील गुरूदेव वार्डाच्या बाजुला बाजार समितीच्यावतीने बैलबाजार भरविण्यात येतो. यादरम्यान येथे जमा होणा-या शेण, कचरा व वैरणीच्या खताचा लिलाव केल्या जातो. हे जमा झालेले खत व कचरा संबंधीत कंत्राटदाराने मैदानातून न्यावयास पाहिजे होता. मात्र त्याच्या अक्षम्य दुर्लक्षीतपणामुळे आजुबाजूच्या परिसराला धोका निर्माण झाला आहे. बैलबाजारानंतर बाजार समितीने साफसफाई न केल्याने सर्वत्र वैरणाचा कचरा पसरला आहे. एका ठिणगीनेही या भागात भिषण आग पसरण्याची भिती आहे. दोन दिवसांपुर्वी येथिल दोन कच-याच्या ढिगा-यांनी पेट घेतला होता. त्यावेळी एक मुलगा जळता जळता सुदैवाने वाचला.
आज दुपारीही दोन ढिगा-यांना आग लागली. वारा सुसाट असल्याने विस्तव सर्वत्र उडाला. त्यामुळे सुमारे आठ ते दहा ठिकाणी आग लागली. या मैदानात असलेल्या बाजार समितीच्या शेड मध्ये गवताच्या पेंढ्या ठेवुन आहेत. वारा विरूद्ध बाजुने असता तर प्रचंड नुकसान झाले असते. या आगीबाबत माहिती देण्यासाठी काही नागरीकांनी बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे यांना मोबाईलवर संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही असे नागरिकांनी सांगीतले. या प्रकारामुळे नागरिक संतप्त झाले होते. आग विझविण्यासाठी विनोद मोहिजे, मंगल मोहिजे, अभय मोहिजे, विठ्ठल ससाणे, अंकुश ठाकरे यांचेसह अनेकांनी प्रयत्न केले. येथे भरविण्यात येत असलेल्या बैलबाजाराचा परिसरातील नागरीकांना नेहमीच त्रास होतो. त्यामुळे बैलबाजाराचे ठिकाण बदलावे किंवा संरक्षक भिंत बांधावी अशी येथिल नागरिकांची मागणी आहे.
साभार :- देशोन्नती 

Wednesday 2 May 2012

पाणी टंचाई निवारणासाठी प्रशासनाने सजग राहावे - ना.शिवाजीराव मोघे






पिण्याच्या पाण्याचे महत्व लक्षात घेता जिल्हा, तालुका प्रशासन तसेच पाणी समस्येशी थेट संबंध येणारे ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिवांनी सजग राहुन काम करावे. प्रत्येक नागरिकाला स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात यावे असे आदेश राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनी दिले. स्थानिक संत मारोती महाराज सांस्कृतीक भवनात आयोजीत पाणी टंचाई आढावा बैठकीत ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष ईकलाख खान पटेल, जि.प.सदस्य योगेश देशमुख, देवानंद पवार, पं.स.सभापती शैलेश इंगोले, उपसभापती सुवर्णा निकोडे, उपविभागीय अधिकारी एस.व्ही.खांदवे, तहसिलदार संतोष शिंदे, गटविकास अधिकारी रामचंद्र गेडाम यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारत निर्माण योजनेंतर्गत झालेल्या गैरप्रकारासंदर्भात यवतमाळ येथे विशेष बैठक बोलविण्याचे आश्वासन मोघे यांनी तक्रारकर्त्यांना दिले. पाणी टंचाई समस्या सोडविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर प्रामुख्याने लक्ष देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तालुक्यातील विवीध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसचिवांनी पाणी टंचाई संदर्भात आपल्या अडचणी मंत्री महोदयांसमोर व्यक्त केल्या. पाणी टंचाईच्या तिव्रतेनुसार त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचना ना.मोघे यांनी प्रशासनाला दिल्या. अनेक ग्रामसेवक पाणी टंचाई संदर्भात प्रस्ताव सादर करीत नसल्याची समस्याही यावेळी मांडण्यात आली. प्रा.डॉ.प्रदिप राऊत यांनी आढावा बैठकीत पाणी टंचाई बरोबरच तालुक्यातील फ्लोराईडयुक्त पाणी व जलपुनर्भरणाचाही अग्रक्रमाने विचार व्हावा अशी मागणी केली. घाटंजी, आर्णी व पांढरकवडा तालुक्यातील अनुक्रमे २५, ४५, ३० अशी एकुण १०० गावे फ्लोराईडच्या विळख्यात असुन या परिसरातील हजारो नागरीक फ्लोरोसिस या आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी अशी आग्रही मागणी प्रा.डॉ.राऊत यांनी ना.मोघेंना दिलेल्या निवेदनातून केली.
विरूळ, मांडवा, मारेगाव येथिल पाणी समस्या यावेळी मांडण्यात आली. रत्नापुर येथे पाईपलाईन, माणूसधरी येथे विहिर अधिग्रहण, कोपरी खुर्द, कुर्ली यासह काही गावातील भारत निर्माण योजनेच्या पाण्याच्या संदर्भात तक्रारी येथिल सरपंचांनी केल्या. कुर्लीचे सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी भारत निर्माण योजनेतील गैरव्यवहाराचा प्रश्न उपस्थित केला. पाणी पुरवठा समितीच्या पदाधिका-यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे कुर्ली येथिल नागरीक मुबलक पाण्यापासुन वंचित आहेत. प्रशासन मात्र या पदाधिका-यांना पाठीशी घालीत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. दत्तापुर येथिल जुनी पाईपलाईन बदलविण्याची मागणी येथिल सरपंचांनी केली. मोवाडा येथे बोअरवेल, करमना येथे नळ योजना, लहान मोवाडा येथे हातपंप, पारवा येथे नळयोजनेची टाकी लिक असल्याची समस्या व विहीर अधिग्रहण, पांढुर्णा खुर्द येथे स्मशानभुमीमध्ये बोअरवेल व विहिर अधिग्रहण, सोनखास येथे टँकर द्वारे पाणी पुरवठा, २२ लाख रूपये खर्च होऊनही अपुर्ण असलेली पिंपरी येथिल भारत निर्माण योजना, यासह पंगडी, राजापेठ, पाटापांगरा, रामपुर, शिवणी, भुताई पोड, पोताई पोड, दडपापुर, साखरा खुद, सावंगी संगम, शरद, नागेझरी, भिमकुंड, सावरगाव (मंगी), तरोडा, वाढोणा (खु.) कोलाम पोड, वघारा येथिल सरपंच, उपसरपंच व सचिवांनी पाणी टंचाई संदर्भातील समस्या सांगीतल्या. कार्यक्रमाचे संचालन अरविंद झाडे तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी योगेश उडाखे यांनी केले.
साभार :- देशोन्नती