Pages

Saturday 31 March 2012

आता सरावासाठी मला ‘हक्काची’ सायकल मिळाली

राष्ट्रीय खेळाडू राजु मेश्रामची प्रतिक्रीया


सराव करण्यासाठी मला ईतरांवर अवलंबून राहावे लागत असे. ज्या खेळाडू जवळ स्वत:ची सायकल आहे ते  मला सरावासाठी सायकल देण्याच्या मोबदल्यात त्यांची कामे माझ्याकडून करवून घेत असत. मात्र यापुढे मी माझ्या हक्काच्या सायकलने सराव करून क्रिडा क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व निर्माण करून दाखवणार अशी भावपुर्ण प्रतिक्रीया राष्ट्रीय सायकलपटू राजु मेश्राम याने व्यक्त केली.
सामाजीक न्याय मंत्री ना. शिवाजीराव मोघे यांच्या निधीतून राजुला सायकल देण्यात आली. तत्पुर्वी पत्रकारांशी झालेल्या अनौपचारीक चर्चेत त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. घाटंजी तालुक्यातील ससाणी येथिल राजु गुलाब मेश्राम हा सायकलपटू पुण्यातील क्रिडा प्रबोधीनीमध्ये शिकत आहे. आजवर राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्ण, तसेच अनेक रजत व कांस्य पदक राजुने पटकावले आहेत. राज्यस्तरीय स्पर्धांमधील त्याची कामगीरी तर थक्क करायला लावणारी आहे. मात्र घरची परिस्थिती हलाखीची, आईचे छत्र हरविलेले. वडील असुन नसल्यासारखेच. अशा बिकट परिस्थितीत त्याचा आजी आजोबांनी सांभाळ केला. त्याचे शिक्षक विद्याधर राऊत व ससाणी येथिल माजी सरपंच प्रमोद ढवळे यांनी त्याच्यातील क्रिडा गुण ओळखले. त्यांनी राजुला प्रोत्साहन देऊन प्रत्येक क्षणी त्याच्या पाठीशी उभे राहिले.
त्याची निवड पुण्यातील प्रतिष्ठीत राष्ट्रीय क्रिडा प्रबोधीनीमध्ये झाली. मात्र सरावासाठी रेसिंगची सायकल नव्हती. काही मिनिटांच्या सरावासाठी त्याला बराच वेळ वाट पाहावी लागायची. शिवाय वेळोवेळी लागणा-या खर्चाचीही समस्या भेडसावत होती. राजुची ही घुसमट येथिल जि.प.शाळेचे शिक्षक गुलाब शिसले यांच्या लक्षात आली. एक अव्वल दर्जाचा खेळाडू केवळ पैशाच्या अडचणीमुळे मागे राहु नये या भावनेतून त्यांनी धडपड केली. राजुची समस्या प्रसिद्धीमाध्यमातून पुढे आली. त्यानंतर काही हात मदतीसाठी पुढे आले. मात्र ती मदत पुरेशी नव्हती. शिवणी जि.प.शाळेच्या मुख्याध्यापीका अनिता व-हाडे यांनी राजुला सायकल मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले. जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालयात पाठपुरावा केला. संवेदनशील अधिकारी अशी ख्याती असलेले जिल्हा क्रिडा अधिकारी विजय संतान यांनी सुद्धा याकडे विशेष लक्ष दिले. घाटंजीत झालेल्या शिवजयंती उत्सवात राजुच्या मागणीला ख-या अर्थाने बळ मिळाले. या व्यासपीठावर राजु मेश्राम याचा सत्कार केल्यावर ना.शिवाजीराव मोघे यांनी राजुला आठ दिवसांच्या आत सायकल उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.
अखेर ना.मोघेंच्या वाढदिवशी या आश्वासनाची पुर्तता झाली. राजुला ३ लाख १३ हजार रूपये किमतीची सायकल भेट देण्यात आली. या सायकलवर बसतांना राजुचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याला पाहण्यासाठी घाटंजीकरांनी गर्दी केली होती. आपली कहाणी जगापुढे मांडल्याबद्दल त्याने प्रसारमाध्यमांचे विशेष आभार मानले. तसेच आजवर प्रमोद ढवळे,  विद्याधर राऊत, गुलाब शिसले, जिल्हा क्रिडा अधिकारी विजय संतान, अनिता व-हाडे, पत्रकार विठ्ठल कांबळे, अमोल राऊत, पांडूरंग निवल, वामन ढवळे, शिवजयंती उत्सवाचे संयोजक राजेश उदार, स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक जीवन वरठे, नारायण भोयर, स्वप्नील भोंग, सुदर्शन कुंभेकर, निळकंठ टेकाम यांनी वेळोवेळी सहकार्य केल्याचे त्याने सांगीतले.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment