Pages

Saturday 3 March 2012

बांधकाम करतांना शेतात कंत्राटदाराचा हैदोस

बंधारा फोडला, झाडांची कत्तल
घाटंजी सा.बां.विभागाचे अभय


शहराला लागुनच असलेल्या घाटी मोहदा रस्त्याचे बांधकाम करतांना कंत्राटदाराने नियमांची पायमल्ली करीत धिंगाणा घातल्याने सा.बां.विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियमबाह्य कामाच्या पद्धतीमुळे रस्त्याच्या बाजुला असणा-या शेतमालकांना त्याचा फटका बसत आहे. अशाच आशयाची तक्रार अनिल भोयर व सरस्वताबाई भोयर यांनी जिल्हाधिकारी तसेच संबंधीतांना केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घाटी ते मोहदा रस्ता व नाल्यावरील सिमेंट पुलाच्या बांधकामाचे कंत्राट यवतमाळ येथिल गादेवार नामक कंत्राटदाराला देण्यात आले आहे. बांधकामादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुने नाली खोदुन ती माती रस्त्यावर भर म्हणुन टाकण्यात आली. त्यामुळे रस्त्याच्या बाजुला असलेल्या शेतक-यांना शेतात जाणेही शक्य होत नाही. बांधकाम करतांना सदर कंत्राटदाराने सिमेंटचे पाईप टाकुन रहदारीची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. सदर शेतक-याने याबाबत बांधकाम विभागाचे अभियंता बाराहाते यांना कळविले असता त्यांनी कंत्राटदाराचीच पाठराखण केल्याचा भोयर यांचा आरोप आहे. 
या शेतामधुन वाहात असलेल्या नाल्यावर जि.प.मार्फत बांधण्यात आलेला जलधारा बंधारा पुलाच्या बांधकामास पाण्याचा अडथळा होत असल्याने फोडून टाकण्यात आला. तो दुरूस्त करण्यात आलेला नाही. तसेच शेतामध्ये असलेली सुमारे २० ते २५ वर्षांपुर्वीची सागवानाची झाडे वनविभाग अथवा शेतक-यांची परवानगी न घेता कंत्राटदाराने परस्पर तोडून टाकली. त्यामुळे सदर शेतक-याचे आर्थिक नुकसान झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला खोदण्यात आलेल्या नाल्यांची पातळी सारखी आहे. त्याचा योग्य उतार काढण्यात आलेला नाही. शेतामधुन जात असलेला नाला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहतो. त्याचे पाणी या नाल्यांमधुन येण्याची शक्यता असल्याने पाणी थेट शेतात घुसणार आहे. त्यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भिती व्यक्त केल्या जात आहे. घाटी-मोहदा रस्त्याचे करण्यात येत असलेले डांबरीकरण अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असुन नियमाला अनुसरून साहित्याचा वापर होत नसल्याचाही आरोप होत आहे. या सर्व नियमबाह्य बाबींकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सपशेल दुर्लक्ष करीत असल्याने कंत्राटदारांचा मनमानीपणा बिनदिक्कतपणे सुरू आहे. याकडे वरीष्ठांनी लक्ष देऊन गुणनियंत्रण विभागातर्फे पाहणी करावी अशी मागणी होत आहे. विनापरवानगी सागवान वृक्षांची तोड करण्यात आल्याबद्दल कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी अनिल भोयर यांनी केली आहे.
साभार :- देशोन्नती  

No comments:

Post a Comment