Pages

Saturday 31 March 2012

आज घाटंजीत रामनवमीची भव्य शोभायात्रा

हजारो घाटंजीकरांना रामरथाची प्रतिक्षा 

रामनवमी निमित्य घाटंजी शहरात उद्या भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता स्थानिक जलाराम मंदिरातुन शोभायात्रेला सुरूवात होईल. शहरातील मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करीत शिवाजी चौकात शोभायात्रेचा समारोप होणार आहे. यावर्षी अनेक आकर्षक देखाव्यांसह अष्टधातुंचा रत्नजडीत रामरथ यंदाच्या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण आहे. हजारो घाटंजीकर शोभायात्रेला डोळे भरून पाहण्यासाठी रस्त्यावर येतात. कर्णमधुर रामधुन, ढोल ताशांचा गजर व नयनरम्य आतिषबाजी अनुभवण्याची पर्वणी यानिमित्य शहरवासियांना मिळते.
महिनाभरापासुन रामनवमी उत्सव समितीचे कार्यकर्ते जीवापाड मेहनत घेत आहेत. शहरातील रस्ते आकर्षक प्रवेशद्वार, रोशणाई व भगव्या झेंड्यांनी सजविण्यात आले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी शहरातील दानशुरांकडून ठिकठिकाणी थंड पेय, महाप्रसाद, थंड पाणी असे विवीध स्टॉल लावण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रिती कोल्ड्रींक्सचे भावेश सुचक, शुभमंगल बर्तन भंडार, रमेश सायरे, अशोक गावंडे, जलाराम मंदीर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शिवम हॉटेल, येथे पुरूषांसाठी तर शिव सायकल स्टोअर्स व डॉ. यमसनवार यांच्या घराजवळ महिलांसाठी स्टॉल लावण्यात येणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना घाटंजी तालुक्यातील सर्व नागरीकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन शोभायात्रेचे संयोजक विक्रम जयस्वाल यांनी केले आहे.

साभार :- देशोन्नती 


आता सरावासाठी मला ‘हक्काची’ सायकल मिळाली

राष्ट्रीय खेळाडू राजु मेश्रामची प्रतिक्रीया


सराव करण्यासाठी मला ईतरांवर अवलंबून राहावे लागत असे. ज्या खेळाडू जवळ स्वत:ची सायकल आहे ते  मला सरावासाठी सायकल देण्याच्या मोबदल्यात त्यांची कामे माझ्याकडून करवून घेत असत. मात्र यापुढे मी माझ्या हक्काच्या सायकलने सराव करून क्रिडा क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व निर्माण करून दाखवणार अशी भावपुर्ण प्रतिक्रीया राष्ट्रीय सायकलपटू राजु मेश्राम याने व्यक्त केली.
सामाजीक न्याय मंत्री ना. शिवाजीराव मोघे यांच्या निधीतून राजुला सायकल देण्यात आली. तत्पुर्वी पत्रकारांशी झालेल्या अनौपचारीक चर्चेत त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. घाटंजी तालुक्यातील ससाणी येथिल राजु गुलाब मेश्राम हा सायकलपटू पुण्यातील क्रिडा प्रबोधीनीमध्ये शिकत आहे. आजवर राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्ण, तसेच अनेक रजत व कांस्य पदक राजुने पटकावले आहेत. राज्यस्तरीय स्पर्धांमधील त्याची कामगीरी तर थक्क करायला लावणारी आहे. मात्र घरची परिस्थिती हलाखीची, आईचे छत्र हरविलेले. वडील असुन नसल्यासारखेच. अशा बिकट परिस्थितीत त्याचा आजी आजोबांनी सांभाळ केला. त्याचे शिक्षक विद्याधर राऊत व ससाणी येथिल माजी सरपंच प्रमोद ढवळे यांनी त्याच्यातील क्रिडा गुण ओळखले. त्यांनी राजुला प्रोत्साहन देऊन प्रत्येक क्षणी त्याच्या पाठीशी उभे राहिले.
त्याची निवड पुण्यातील प्रतिष्ठीत राष्ट्रीय क्रिडा प्रबोधीनीमध्ये झाली. मात्र सरावासाठी रेसिंगची सायकल नव्हती. काही मिनिटांच्या सरावासाठी त्याला बराच वेळ वाट पाहावी लागायची. शिवाय वेळोवेळी लागणा-या खर्चाचीही समस्या भेडसावत होती. राजुची ही घुसमट येथिल जि.प.शाळेचे शिक्षक गुलाब शिसले यांच्या लक्षात आली. एक अव्वल दर्जाचा खेळाडू केवळ पैशाच्या अडचणीमुळे मागे राहु नये या भावनेतून त्यांनी धडपड केली. राजुची समस्या प्रसिद्धीमाध्यमातून पुढे आली. त्यानंतर काही हात मदतीसाठी पुढे आले. मात्र ती मदत पुरेशी नव्हती. शिवणी जि.प.शाळेच्या मुख्याध्यापीका अनिता व-हाडे यांनी राजुला सायकल मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले. जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालयात पाठपुरावा केला. संवेदनशील अधिकारी अशी ख्याती असलेले जिल्हा क्रिडा अधिकारी विजय संतान यांनी सुद्धा याकडे विशेष लक्ष दिले. घाटंजीत झालेल्या शिवजयंती उत्सवात राजुच्या मागणीला ख-या अर्थाने बळ मिळाले. या व्यासपीठावर राजु मेश्राम याचा सत्कार केल्यावर ना.शिवाजीराव मोघे यांनी राजुला आठ दिवसांच्या आत सायकल उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.
अखेर ना.मोघेंच्या वाढदिवशी या आश्वासनाची पुर्तता झाली. राजुला ३ लाख १३ हजार रूपये किमतीची सायकल भेट देण्यात आली. या सायकलवर बसतांना राजुचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याला पाहण्यासाठी घाटंजीकरांनी गर्दी केली होती. आपली कहाणी जगापुढे मांडल्याबद्दल त्याने प्रसारमाध्यमांचे विशेष आभार मानले. तसेच आजवर प्रमोद ढवळे,  विद्याधर राऊत, गुलाब शिसले, जिल्हा क्रिडा अधिकारी विजय संतान, अनिता व-हाडे, पत्रकार विठ्ठल कांबळे, अमोल राऊत, पांडूरंग निवल, वामन ढवळे, शिवजयंती उत्सवाचे संयोजक राजेश उदार, स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक जीवन वरठे, नारायण भोयर, स्वप्नील भोंग, सुदर्शन कुंभेकर, निळकंठ टेकाम यांनी वेळोवेळी सहकार्य केल्याचे त्याने सांगीतले.
साभार :- देशोन्नती 

Thursday 29 March 2012

तोडफोड करण्याची वेळच कशाला येऊ देता ?

मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांचा सवाल

स्वत:चा खिसा भरण्यासाठी शासन व प्रशासनातील दलाल विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक पद्धतीनेच त्याचा निषेध करणार अशी संतप्त प्रतिक्रीया मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांनी दिली. आमच्या  आक्रमक पावित्र्यामुळे कर्मचा-यांची सुरक्षा धोक्यात आली आहे असे प्रशासनाला वाटते. त्याबद्दल त्यांनी आमच्या कृतीचा निषेधही नोंदवला आहे. मात्र गरीब विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरच हल्ला करण्याच्या प्रकारावर सगळेच आपली जबाबदारी का झटकत आहेत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शासकीय कार्यालयात निवेदने, तक्रारी कचराकुंडीतच जातात. त्यामुळेच आक्रमक पवित्रा घेण्याची वेळ येते असेही धांदे म्हणाले. आम्हाला तोडफोड करण्याची संधीच मिळु न दिल्यास आम्ही प्रशासनाचे आभारी राहु. प्रशासनच नियम कायदे बासनात गुंडाळून आपला खिसा गरम करण्यात व्यस्त असेल तर आमच्याकडून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
गरीब विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालणा-या या प्रकाराचे वृत्त ‘देशोन्नती’ मध्ये वाचताच तातडीने वसतिगृहात जाऊन अंथरूणाच्या साहित्याची प्रत्यक्ष पाहणी केली. तिथले भयावह चित्र पाहताच राहवले नाही आणी त्या गाद्या दाखविण्यासाठी यवतमाळ येथे आणल्या. राज्य आणी जि.प. समाजकल्याण विभागाचे अधिकारी या गंभिर प्रश्नाबाबत टोलवाटोलवीचे उत्तरे देत असल्याने मनसे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणी त्यामुळेच कार्यकर्त्यांनी या प्रकाराचा आक्रमक पद्धतीने निषेध नोंदविला. जनतेच्या प्रश्नांसाठी लढतांना आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मागे हटणार नाही. शासन व प्रशासनातील भ्रष्ट प्रवृत्तींना धडा शिकविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तत्पर राहील असे ते म्हणाले. या गैरप्रकारात दोषी असलेल्यांवर कार्यवाही न झाल्यास मनसे जिल्ह्यात सर्वत्र आक्रमक आंदोलन छेडणार असल्याचेही त्यांनी देशोन्नतीशी बोलतांना सांगीतले.
साभार :- देशोन्नती 

निकृष्ट अंथरूण पुरविल्याच्या निषेधार्थ समाजकल्याण कार्यालयात मनसेचे संतप्त आंदोलन




जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांनी साहित्याची तोडफोड केली. या विभागांतर्गत मागासवर्र्गीय विद्यार्थ्यांसाठी खासगी संस्थेमार्फत वसतिगृह चालविले जातात. तेथील विद्यार्थ्यांना नुकतेच गाद्या व इतर साहित्य पुरविण्यात आले. हे साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप मनसेने केला आहे. या प्रकरणी निवेदन देण्यासाठी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे सहकार्‍यांसह समाजकल्याण विभागात आले. यावेळी त्यांनी समाजकल्याण अधिकारी कुठे आहे, अशी विचारणा केली. तेथील कर्मचार्‍यांनी साहेब बैठकीला गेले असल्याची माहिती दिली. त्यानंतर लगेच कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खूच्र्यांची व टेबलाची तोडफोड सुरू केली. यावेळी त्यांनी सोबत आणलेल्या गाद्या फाडून त्यातील रुई भिरकावली. त्यानंतर कार्यालयाबाहेर जाऊन सोबत आणलेल्या साहित्याला आग लावली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. या आकस्मिक हल्ल्याने जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष व इतर काही कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागाचे कार्यालय गाठले. साहेब आहेत का अशी विचारणा करुन कार्यालयातील साहित्याची तोडफोड सुरू केली. यात समाजकल्याण अधिकारी अविनाश देवसटवार यांच्या कक्षातील खूच्र्या, टेबल तोडले. कक्षातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून देण्यात आले. त्यानंतर कर्मचार्‍यांचे टेबल व खूच्र्यांची फेकफाक करण्यात आली. एवढेच नाही तर सोबत आणलेल्या गाद्या फाडून त्यातील रुई कार्यालयात भिरकावली. यानंतर कार्यालयातून बाहेर पडून पटांगणात गाद्या जाळल्या. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे हा धुडगूस सुरू होता.
या प्रकाराची माहिती समाजकल्याण अधिकारी अविनाश देवसटवार यांना कळताच त्यांनी तातडीने कार्यालयात धाव घेतली. मात्र तोपर्यंत मनसेचे कार्यकर्ते निघून गेले होते. घटनेची माहिती पोलिसांना व वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक ठाकरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दीपक केदार यांनी घटनास्थळाला भेट दिली. वडगाव रोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सज्रेराव गायकवाड यांनीही पोलीस कुमकासह घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

शासन जबाबदार नाही - ना. शिवाजीराव मोघे 
समाज कल्याण विभागांतर्गत खासगी संस्थेमार्फत वसतिगृह चालविल्या जाते. वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आहारासाठी शासनातर्फे संस्थांना अनुदान दिल्या जाते. साहित्य खरेदी आणि निविदा या प्रक्रियेला शासन जबाबदार नसल्याची प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली.

हल्ले सहन करणार नाही - सीईओ राम
न्याय मागण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध असताना त्याचा वापर न करता गुंडागर्दी करुन अधिकारी व कर्मचार्‍यांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नाही. एकदाही तक्रार किंवा माहिती न देता थेट तोडफोड करण्याची ही पद्धत अत्यंत चुकीची आहे, अशी प्रतिक्रिया सीईओ नवलकिशोर राम यांनी दिली.

खरेदी राज्यस्तरावरून - अविनाश देवसटवार
वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेल्या गाद्यांचे कंत्राट राज्यस्तरावरुन देण्यात आले आहे. यात जिल्हा परिषद समाजकल्याण कार्यालयाचा काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया समाजकल्याण अधिकारी अविनाश देवसटवार यांनी दिली.

साभार :- लोकमत


Wednesday 28 March 2012

वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी जीवघेणे ‘अंथरूण’

समाजकल्याण विभागातर्फे कच-याच्या गाद्या
त्वचारोग व श्वसनाचे विकार बळावणार






समाजकल्याण विभागांतर्गत येणा-या वसतिगृहांसाठी अत्यंत सुमार दर्जाच्या गाद्या पुरविण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. घाटंजी तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतेक सर्व वसतिगृहांमध्ये नुकतेच प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी गादी व उशी असे साहित्य पाठविण्यात आले आहे.
या अंथरूणाच्या साहित्यामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचा कापुस वापरण्यात आला आहे. शिवाय भुसा, कचरा, गुटख्याच्या पुड्यांचे तुकडे हे सुद्धा कापसासोबत मिसळण्यात आले आहे. अतिशय जाड्यभरड्या कापडाचा वापर करून या गाद्या व उशा शिवण्यात आल्या आहेत. शिलाई तर एवढी कामचलाऊ आहे की, हाताने अलगद काढता येईल. कापड जाडाभरडा असल्याने आतील कचरा व धुळ बाहेर येते. ही गादी थोडी झटकली तरी ओंजळभर धुळ जमा होते. हे सत्र संपत असल्याने वसतिगृह व्यवस्थापनांनी या गाद्या अद्याप विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी दिलेल्या नाहीत. या साहित्याचा उग्र दर्प येत असल्याने ज्या खोलीत या गाद्या साठवुन ठेवण्यात आल्या आहेत तिथे जाताच शिंका यायला लागतात. एका वसतिगृहातील कर्मचा-याने एक दिवस ही गादी वापरल्याने त्याच्या अंगाला खाज सुटून त्वचेवर चट्टे निघाल्याचे त्याने सांगीतले. गादी जमिनीवर अंथरताच धुळयुक्त कापसाचे कण वातावरणात पसरतात. यामुळे त्वचाविकारांसोबतच श्वसनाचे रोग उद्भवुन जीवीतालाही धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत या गाद्यांवर माणसेच काय पण जनावरे सुद्धा झोपु शकणार नाहीत.
उल्लेखनिय म्हणजे दोन तिन वर्षांपुर्वीच वसतिगृहांना गाद्या पुरविण्यात आल्या होत्या. त्या गाद्यांना प्लास्टीकचे आवरण असलेला कापड वापरण्यात आल्याने अजुनही त्या गाद्या सुस्थितीत आहेत. त्यामुळे गरज नसतांना या जीवघेण्या अंथरूणाचा पुरवठा कशासाठी केला जात आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. तालुक्यातील अनेक वसतिगृह संचालक हे अंथरूणाचे साहित्य परत पाठविणार असल्याची माहिती आहे.
हे साहित्य समाजकल्याण विभागातर्फे पुरविण्यात येत असल्याने यवतमाळ जिल्ह्यासह राज्यातही अशाच प्रकारच्या गाद्यांचा पुरवठा करण्यात आला असावा अशी शक्यता आहे.
जिल्ह्यात पुरविण्यात आलेल्या गाद्या यवतमाळ येथेच तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक अधिका-यांनी या गाद्या वसतिगृहात पाठविण्यापुर्वी त्याचा दर्जा तपासला असणारच. मग आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक ठरू शकणा-या या गंभिर प्रकाराला मान्यता कशी मिळाली हा प्रश्न चर्चिल्या जात आहे. गाद्यांच्या या ‘धुळी’ मध्ये नेमके कोणाकोणाचे हात माखलेले आहेत याची चौकशी करण्याची गरज व्यक्त केल्या जात आहे.
अमोल राऊत
साभार :- देशोन्नती 




अष्टधातूंचा रत्नजडीत ‘रामरथ’ यंदाच्या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण

घाटंजीत रामनवमीची जय्यत तयारी

गत काही वर्षांपासुन घाटंजीकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या रामनवमी शोभायात्रेची जय्यत तयारी सध्या शहरात सुरू आहे. यावर्षीच्या शोभायात्रेमध्ये विवीध देखाव्यांसह 
अष्टधातुंनी बनविलेला रत्नजडीत रामरथ प्रमुख आकर्षण राहणार आहे. हा रथ बनविण्याचे काम दिल्ली येथे सुरू असुन काशी विश्वनाथ येथिल कारागीर त्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. या रथामध्ये आठ प्रकारचे मौल्यवान धातू, चंदनाचे लाकुड, हिरे, मोती व नवरत्न वापरण्यात येणार आहे. या रथासाठी सुमारे दहा लाख रूपये खर्च येणार आहे.
शिवाय शोभायात्रेमध्ये राधाकृष्ण, शिवाजी महाराज, रामभक्त हनुमान यासह विवीध प्रकारचे देखावे राहणार आहेत. परळी वैजनाथ येथिल ढोल ताशा यावर्षीही गुंजणार असुन सोबतीला लेझिम झांज पथकही राहणार आहे. रामनवमी शोभायात्रेचा भव्य सोहळा अनुभवण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक येतात. घाटंजीच्या रस्त्यांवर पाय ठेवायलाही जागा उरत नाही एवढी प्रचंड गर्दी राहते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी ठिकठिकाणी स्वयंसेवक राहणार आहेत.
घाटंजी शहराच्या मुख्य चौकात भव्य स्वागत कमानी उभारण्याचे काम सुरू असुन सर्वत्र भगवे झेंडे व पताका लावण्यात येत आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे मौल्यवान रामरथ ओढण्यासाठी भक्तांना संधी मिळणार असुन त्यासाठी राम अग्रवाल यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी शहरातील दानशुरांकडून ठिकठिकाणी थंड पेय, महाप्रसाद, थंड पाणी असे विवीध स्टॉल लावण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रिती कोल्ड्रींक्सचे भावेश सुचक, शुभमंगल बर्तन भंडार, रमेश सायरे, अशोक गावंडे, जलाराम मंदीर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शिवम हॉटेल, येथे पुरूषांसाठी तर शिव सायकल स्टोअर्स व डॉ. यमसनवार यांच्या घराजवळ महिलांसाठी स्टॉल लावण्यात येणार आहेत. 
या सर्व कार्यक्रमांना घाटंजी तालुक्यातील सर्व नागरीकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन शोभायात्रेचे संयोजक विक्रम जयस्वाल यांनी केले आहे. 
साभार :- देशोन्नती 


Sunday 25 March 2012

ग्रामसेवक मृत्यूप्रकरणाचा तपास अद्याप अपघातावरच केंद्रित

मांडवा येथिल ग्रामस्थांचे तोंडावर बोट

ग्रामसेवक अमोल चांदेकर यांच्या संशयास्पद  मृत्यू प्रकरणी घाटंजी पोलीसांचा तपास संथगतीने होत असुन हा घातपात नव्हे तर अपघातच असल्याचा पोलीसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अपघातावरच घुटमळत असल्याने मोबाईलवरील संभाषणाचे ‘कॉल डीटेल्स’ पोलीसांकडे येईस्तोवर ठोस निष्कर्ष लागण्याची शक्यता मावळली आहे. 
बाभुळगाव तालुक्यातील ग्रामसेवक आशिष पाटील यांच्या खुनाच्या प्रकरणाची धग कमी होते न होते तोच मांडवा येथिल ग्रामसेवक अमोल चांदेकर यांचा मृतदेह दि. २१ मार्च रोजी एका शेतातील विहिरीत संशयास्पद स्थितीत आढळला. सुरूवातीला हा अपघातच असल्याच असावा असे सर्वांनाच वाटत होते. मात्र सकाळी मृतदेह बाहेर काढल्यावर हा घातपातच आहे असा सुर उमटला. मृतकाचे वडील व अकोला येथे तहसिलदार पदावर कार्यरत असलेले रामभाऊ चांदेकर यांनी सुद्धा आपल्या मुलाचा मृत्यू घातपातानेच झाल्याचा आरोप केला आहे. 
चांदेकर यांचा मृत्यू विहिरीत अपघाताने पडल्यामुळेच झाल्याचा अंदाज पोलीस वर्तवित आहेत. मात्र मृतकाच्या गळ्यावर आढळलेल्या जखमा, लाल खुणा, रक्ताने माखलेला चेहरा, विहिरीच्या बाजुला सुस्थितीत ठेवुन असलेली मोजपट्टी तसेच सर्व साहित्य व्यवस्थित ठेवलेले आढळले. शिवाय मृतक हा पट्टीचा पोहणारा होता असे त्याच्या वडीलांचे म्हणणे आहे. मग अपघाताने पडल्यास मृत्यू कसा होऊ शकतो या संशयालाही जागा निर्माण होते. या सर्व बाबींमुळे हा अपघात असल्याच्या शक्यतेवर विश्वास बसत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रामसेवक अमोल चांदेकर यांनी एकट्याने भल्या मोठ्या व अडचणीच्या जागी असलेल्या विहिरीचे तंतोतंत मोजमाप कसे केले ? हा देखिल प्रश्न चर्चिल्या जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यातील ग्रामसेवकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. तर दुसरीकडे मांडवा येथिल ग्रामस्थ या घटनेबाबत काहीही बोलायला तयार नाही. प्रस्तुत प्रतिनिधीने काही ग्रामस्थांशी या प्रकरणाबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला त्याबद्दल काहीच माहित नाही असा एकमुखी सुर मांडवा येथिल ग्रामस्थांनी आवळला. 
एकंदरीतच या घटनेने निर्माण झालेले संशयाचे मळभ हटवायचे असेल तर उच्चस्तरीय चौकशी करून नेमके तथ्य शोधुन काढण्याची गरज आहे. स्थानिक पोलीसांनी तर या घटनेमध्येही नेहमीप्रमाणे औपचारीक सोपस्कार पुर्ण करून प्रकरण थंडबस्त्यात ठेवले आहे.
ग्रामसेवक संघटनेने या घटनेच्या निषेधार्थ व उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीसाठी २६ मार्चला भव्य मोर्चाचे आयोजन केले असुन या मोर्चामध्ये जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या सर्वच संघटना सहभागी होणार आहेत. तसेच त्यानंतर ग्रामसेवक संघटना कामबंद आंदोलन करणार आहे. या आंदोलनामध्ये सर्व कर्मचा-यांनी सहभागी व्हावे असे आवाहन म.रा.ग्रामसेवक संघटनेचे घाटंजी तालुकाध्यक्ष विश्राम वाडगे, डी.पी.तनमने, डी.के.पाटील, ए.एस.गाणार यांनी केले आहे.
साभार :- देशोन्नती 



Friday 23 March 2012

ग्रामसेवकाचा विहिरीत पडून संशयास्पद मृत्यू

घातपाताची दाट शक्यता
पोलीसांनी दाखल केला मर्ग

तालुक्यातील मांडवा येथे कार्यरत असलेले अमोल रामभाऊ चांदेकर (वय २९) या ग्रामसेवकाचा काल (दि.२१) ला विहिरीत पडून अकस्मात मृत्यू झाला. घटनास्थळावरील परिस्थितीवरून हा अपघात नसुन घातपात असल्याचा दाट संशय व्यक्त केल्या जात असल्याने प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. दि. २१ मार्चला दुपारच्या सुमारास मांडवा शिवारात संजय पाचपोर यांच्या शेतात असलेल्या अधिग्रहीत विहिरीचे मोजमाप करण्यासाठी अमोल चांदेकर गेले होते. त्यांची दुचाकी ग्रा.पं.कार्यालयाबाहेर ठेवलेली होती. रात्री उशिरा पर्यंत ते न परतल्याने गावक-यांनी शोधाशोध सुरू केली. अखेर त्यांचा मृतदेहच विहिरीत आढळला.  या घटनेची माहिती होताच रात्री तालुक्यातील समस्त ग्रामसेवक, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा पदाधिकारी या सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. 
सकाळी पाच वाजताच्या सुमारास मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. हा मृत्यू अपघाती आहे अथवा यामागे काही घातपात आहे याबाबत शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. उत्तरीय तपासणी दरम्यान मृतकाच्या गळ्यावर जखमा व लाल व्रण असल्याचे आढळुन आले. मृत्यू मात्र फुफ्फुसात पाणी गेल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ग्रामसेवक अमोल चांदेकर हे अधिग्रहीत विहिरीचे मोजमाप करण्यासाठी एकटेच गेले होते. त्यांच्या डायरी मध्ये विहिरीच्या मोजमापाच्या नोंदी सुद्धा आहेत. मात्र विहिरीची मोजणी एकटा व्यक्ती करू शकत नाही. पोलीसांनी पंचनामा करतांना विहिरीची मोजणी करून डायरीतील नोंदींशी पडताळणी केली असता नोंदी तंतोतंत जुळल्या. विहिरीची खोली एकटा व्यक्ती मोजू शकतो. मात्र लांबी, रूंदी व व्यास मोजण्यासाठी मदतनिसाची गरज असते. 
मात्र घटनेच्या दिवशी गावातील सरपंच, ग्रा.पं.चा शिपाई एका प्रशिक्षणासाठी बाहेरगावी गेले होते. चांदेकर यांनी गावातीलच एका मुलाला विहिर नेमकी कुठे आहे हे विचारण्याच्या हेतूने सोबत नेले होते. मात्र त्यांनी त्या मुलाला अध्र्यावरच परत पाठविले. एवंâदरीतच घटनास्थळावरील परिस्थिती व साहित्यावरून हा अपघात अथवा आत्महत्या नसुन घातपातच असल्याचा आरोप मृतकाचे वडील रामभाऊ चांदेकर यांनी केला आहे. घाटंजी पोलीसांनी सदर प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून प्रकरण तपासात ठेवले आहे. पोलीसांचा तपास हत्येच्या दिशेने नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे घाटंजी पोलीस या प्रकरणात गांभिर्याने तपास करणार का याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामसेवक संघटनांनी या प्रकरणी आक्रमक भुमिका घेतली असुन सदर घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. मृतक अमोल चांदेकर यांचे वडील अकोला येथे तहसिलदार पदावर कार्यरत आहेत. ग्रामसेवकाच्या संशयास्पद मृत्युची ही जिल्ह्यातील दुसरी घटना असल्याने ग्रामसेवकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
साभार :- देशोन्नती 



Monday 19 March 2012

अमरावती विद्यापीठाचे संकेतस्थळ अतिरेक्यांकडून "हॅक"



संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक झाल्याचे आज अनेक विद्यार्थ्यांना आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे. विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ (http://www.sgbau.ac.in/) उघडण्याचा प्रयत्न केला असता मुस्लिम लिबरेशन आर्मी या अतिरेकी संघटनेने हे संकेतस्थळ ‘हॅक’ केल्याचा संदेश येतो. काळ्या पृष्ठभूमीच्या पानावर मोठ्या अक्षरात अतिरेक्याच्या प्रतिकात्मक चित्रासह विवीध संदेश या पानावर दिसतात. ‘स्वतंत्र काश्मिर हेच आमचे धेय्य’ असा संदेश अतिरेक्यांनी या संकेतस्थळावर दिला आहे. याच संघटनेने यापुर्वीही अनेकदा भारतातील शासकीय संकेतस्थळे हॅक केल्याची माहिती आहे.
काश्मिरला स्वतंत्र करा, स्वातंत्र्य हेच आमचे लक्ष्य आहे. जम्मु काश्मिर मधील अत्याचार थांबवा, येथिल सैन्य परत न्या, असे अनेक भारतविरोधी संदेश अमरावती विद्यापीठाच्या हॅक केलेल्या संकेतस्थळावर इंग्रजी भाषेत दिलेले आहेत.
शिवाय एका रणगाड्यावर दगड भिरकावणारा लहान मुलगा तसेच सैनिकांवर दगडफेक करणारे तरूण अशी दोन छायाचित्रे सुद्धा या पानावर आढळतात. यामध्ये खरे सैनिक कोण ? असा प्रश्न करण्यात आला आहे. संकेतस्थळ हॅक करणा-या आठ व्यक्तींची नावे सांकेतीक भाषेत पांढ-या आणी हिरव्या रंगात देण्यात आलेली आहेत. सध्या परिक्षांचा मौसम असल्यामुळे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून विवीध माहिती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होते. त्यामुळे अनेकदा या संकेतस्थळाचे सर्व्हर व्यस्त असते. यावेळी संकेतस्थळ चक्क अतिरेक्यांच्या तावडीत गेल्याने विद्यार्थ्यांची गोची झाली आहे. काही दिवसांपुर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाचे संकेतस्थळ सुद्धा अशाच प्रकारे हॅक झाले होते. गेल्या काही वर्षात विवीध शहरांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यांप्रमाणेच संकेतस्थळांवरील हल्ले रोखण्यासाठी सुद्धा यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास येत आहे.

अमोल राऊत
साभार :- देशोन्नती 


डी.पी.पेटल्याने फोटो स्टुडीओ भस्मसात




स्थानिक अग्रसेन चौकातील डीपी पेटल्याने संजय ढवळे यांच्या फोटो स्टुडिओला लागलेल्या आगीत सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत फोटो स्टुडिओतील झेरॉक्स मशीन, कॉम्प्युटर, प्रिंटर आदी साहित्य जळून खाक झाले.
आजुबाजूच्या नागरीकानी धावपळ करून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. विज वितरण  कंपनीची यंत्रणा वेळेवर न पोहचल्याने आग विझवायला विलंब झाला. या आगीमुळे शहरातील विद्युत पुरवठा सुमारे तिन तास खंडीत झाला होता.
  

Saturday 17 March 2012

विधानमंडळ सदस्यांच्या निधनाची माहिती तात्काळ कळवा

हयगय झाल्यास जिल्हाधिका-यांवर कार्यवाही
मुख्य सचिवांचे सक्त निर्देश

महाराष्ट्र विधानमंडळाच्या आजी-माजी सदस्यांचे निधन झाल्यास त्याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने विधानमंडळ सचिवालयास कळवावी असे सक्त आदेश राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी दिले आहेत. याबाबत हयगय झाल्यास थेट मुख्य सचिवांच्या स्तरावर जिल्हाधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कार्यवाही केली जाणार आहे. विधीमंडळाच्या आजी-माजी सदस्याचे निधन झाल्यास शोक प्रस्ताव सभागृहात मांडण्यात येतो. मात्र अनेकदा माहीती वेळेवर पोहचत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता सदस्यांच्या निधनाची माहीती अधिवेशन चालु असतांना २४ तासांच्या आत व ईतर वेळी १५ दिवसांच्या आत विधीमंडळ सचिवालयाला कळवावी लागणार आहे. यापुर्वीही अनेकदा याबाबत आदेश देण्यात आले होते. मात्र अनेक जिल्हाधिकारी कार्यालयांकडून त्याचे पालन होत नसल्याने २४ डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे प्रशासनाने याबाबत कठोर धोरण अवलंबून निधनाची माहिती वेळेवर न पोहचल्यास संबंधीत जिल्हाधिका-यांना व्यक्तीश: जबाबदार धरण्यात येणार आहे.  निधन झालेल्या आजी-माजी सदस्याची संपुर्ण माहिती, त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे नाव व पत्ता असा तपशील कळविण्यात यावा असे सक्त निर्देश मुख्य सचिवांनी निर्गमीत केले आहेत.


बियर बारमध्ये २० हजारांची चोरी

येथिल तहसिल समोर असलेल्या समाधान बियर बार मध्ये काल रात्री अज्ञात चोरट्याने शटरचे कुलूप फोडून २० हजार रूपये रोख लंपास केले. फिर्यादी विक्रम घनश्याम जयस्वाल यांच्या तक्रारीवरून घाटंजी पोलीसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असुन तपास सुरू आहे.
साभार :- देशोन्नती 



Friday 16 March 2012

श्री समर्थ विद्यालयात विवीध कार्यक्रम




 घाटंजी येथिल श्री समर्थ विद्यालयात नुकतेच विवीध कार्यक्रम घेण्यात आले. ईयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना निरोप, महिला दिनानिमित्य रॅली, वृक्षपुजन करून पर्यावरण पुरक होळी हे कार्यक्रम घेण्यात आले. या सर्व कार्यक्रमांना शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या सर्व कार्यक्रमांची ठळक छायाचित्रे खास आपल्यासाठी........!

Thursday 15 March 2012

घाटंजी पं.स.सभापतीपदी शैलेश इंगोले अविरोध सुवर्णा निकोडे उपसभापती


पंचायत समिती सभापती व उपसभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत घाटंजी पं.स.सभापतीपदी कॉंग्रेसचे शैलेश महादेव इंगोले व उपसभापतीपदी कॉंग्रेसच्याच सुवर्णा राजेश निकोडे यांची अविरोध निवड झाली.
सहा सदस्यीय घाटंजी पंचायत समिती मध्ये कॉंग्रेसचे ४ तर भाजपाकडे २ सदस्य आहेत. कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत असल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग सोपा झाला. कॉंग्रेसमधीलच पारवेकर गटाने रूपेश कल्यमवार यांच्यासाठी सुरूवातीला जोर दिला. मात्र चर्चेअंती ठराविक कालावधीनंतर सभापतीपद पारवेकर गटाकडे जाणार असल्याने कल्यमवार यांचे नामांकन दाखल करण्यात आले नाही.
विरोधी पक्ष भाजपाच्यावतीने सभापतीपदासाठी नामांकन दाखल करण्यात न आल्याने निवडणुक अविरोध झाली. यावेळी नवनिर्वाचीत पंचायत समिती सदस्य सुमित्रा पेंदोर, रूपेश कल्यमवार, भाजपाचे रमेश धुर्वे, रत्नमाला कोंडेकर यांची उपस्थिती होती. पीठासीन अधिकारी म्हणुन तहसिलदार संतोष शिंदे, सहाय्यक एस.व्ही.भरडे यांनी काम पाहिले.
साभार :- देशोन्नती 



शेतक-यांच्या हितासाठी घाटंजी बाजार समिती कटीबद्ध - अभिषेक ठाकरे



शेतक-यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांच्या मुलभूत गरजांच्या पुर्ततेसाठी घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती सदैव तत्पर राहिल असे आश्वासन सभापती अभिषेक ठाकरे यांनी दिले. बाजार समिती मार्केट यार्डावर आयोजीत विवीध विकासकामांच्या भुमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. पायाभुत सुविधांची उभारणी होताच बाजार समितीला ‘ऑनलाईन’ करून शेतक-यांना जगभरातील बाजारभावाची माहिती देण्याची सुविधाही कार्यान्वयीत करण्यात येईल असे ते म्हणाले. शासनाने वारंवार कापुस उत्पादक शेतक-यांची थट्टा करू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कापुस पणन महासंघाचे संचालक अण्णासाहेब पारवेकर होते. तर जिल्हा बँकेचे संचालक सुरेश लोणकर, पांढरकवडा बाजार समितीचे उपसभापती जानुसेठ जिवानी, भुविकास बँकेचे अध्यक्ष शंकर ठाकरे, माजी नगराध्यक्ष श्याम बेलोरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी बोलतांना लोकनेते सुरेश लोणकर यांनी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर सडकुन टिका केली. शेतकरी आत्महत्या का होत आहेत याचा अभ्यास करण्यासाठी संसदीय समिती जिल्हा दौ-यावर असताना कापुस निर्यातबंदीचा निर्णय घेऊन शासनाने आपली बौद्धीक दिवाळखोरीच सिद्ध केली असे ते म्हणाले. सांसदीय समितीचा अहवाल जाण्यापुर्वीच कापुस निर्यातबंदीचा निर्णय घेणे म्हणजे दाक्षीणात्य राज्यातील भांडवलदारांचा गल्ला भरण्याचा डाव असल्याचे त्यांनी सांगीतले. कृषी क्षेत्राशी संबंधीत एवढा महत्वाचा निर्णय घेतांना देशाचे कृषी मंत्री शरद पवार यांनाही कल्पना देण्यात आली नव्हती याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. देशातील एकुण ९० टक्के कापसाचे उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. मात्र राज्यात केवळ १० टक्के मिल आहेत. तर ज्या केरळ राज्यात १० टक्के कापुस उत्पादन होत नाही तिथे ९० टक्के मिल आहेत. त्यामुळेच वस्त्रोद्योग मंत्र्यांनी कापुस उत्पादक शेतक-यांवर निर्यातबंदीची कु-हाड चालवली असे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात अण्णासाहेब पारवेकर यांनी शेतक-यांच्या होत असलेल्या मुस्कटदाबीबद्दल निषेध नोंदविला. शेतक-यांना आपले हक्क मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले. सी.सी.आय.ने यावेळी कापुस खरेदी का केली नाही असा प्रश्न त्यानी उपस्थित केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विकासकामांचे भुमीपूजन करण्यात आले. घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीला महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत २ कोटी ८ लाख ८७ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामध्ये मुलभूत सुविधांमध्ये लिलाव ओटा (धान्य यार्ड) करीता ११.७० लाख, पिण्याच्या पाण्याची सुविधा १ लाख, संरक्षण भिंत २४.१५ लाख, सिमेंट रस्ते २७.६४ लाख, ईलेक्ट्रीक सुविधा ३.५३ लाख, पाण्याची टाकी १२.९७ लाख, सांडपाण्याची व्यवस्था ३.१४ लाख, तर उत्पादीत सुविधांमध्ये धान्य चाळणी यंत्र ३०.६८ लाख, घनकचरा व्यवस्थापन १५.४८ लाख, गोदाम (धान्ययार्ड) २२.७० लाख, गोदाम (कापुस यार्ड) ४५.४१ लाख, भुईकाटा (५० मेट्रीक टन) १०.४२ लाख असा निधी बाजार समितीला प्राप्त झाला आहे. ही सर्व कामे ९ महिन्यांच्या कालावधीत पुर्ण होतील असा विश्वास सभापती अभिषेक ठाकरे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती सचिन पारवेकर यांनी केले. संचालन बाजार समितीचे सचिव कपील चन्नावार व आभार प्रदर्शन प्रकाश डंभारे यांनी केले.
साभार :- देशोन्नती

Wednesday 14 March 2012

ना.मोघेंच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना धनादेश वाटप



नगर परिषदे अंतर्गत राबविण्यात येणा-या घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना नुकतेच मंजुर झालेल्या घरकुलाच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले. घाटंजी नगर परिषदेच्या सभागृहात आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन जि.प.सदस्य देवानंद पवार, नगराध्यक्ष जगदिश पंजाबी, उपाध्यक्ष अकबर तंव्वर, बांधकाम सभापती परेश कारीया, शिक्षण सभापती राम खांडरे, महिला व बालकल्याण सभापती शोभा ठाकरे, नगरसेवक किशोर दावडा, संदीप बिबेकार, स्विकृत सदस्य सुभाष गोडे, पं.स.सदस्य शैलेष इंगोले यांचेसह सर्व नगरसेवकांची उपस्थिती होती यावेळी बोलतांना ना.शिवाजीराव मोघे यांनी घाटंजी नगर परिषदेला निधीची कमतरता भासू देणार नाही असे आश्वासन दिले. नागरिकांच्या मुलभूत समस्यांवर प्रामुख्याने लक्ष देऊन त्या सोडविण्यावर भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणा-या घरकुल योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळावा यासाठी यंत्रणेने काटेकोरपणे योजनांची अंमलबजावणी करावी असेही ते म्हणाले.
याप्रसंगी १५ लाभार्थ्यांना घरकुलाच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले. मान्यवरांची समायोचीत भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन संजय भोंग व  आभार प्रदर्शन महादेव डंभारे यांनी केले.
साभार :- देशोन्नती 

ससाणी येथे पर्यावरण जनजागृती पदयात्रा





तालुक्यातील ससाणी येथे पर्यावरण मंत्रालय भारत सरकार, बायफ पुणे, नवचैतन्य बहुउद्देशीय विकास युवा मंडळ शिरोली व जिल्हा परिषद उच्च प्राथमीक मराठी शाळा ससाणी याच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जि.प. शाळेच्या आवारातून पदयात्रेला सुरूवात झाली.  संपुर्ण गावात या पदयात्रेच्या माध्यमातून पर्यावरणाच्या महत्वाविषयी ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्याथ्र्यांना झाडांची रोपटी दत्तक देण्यात आली. या कार्यक्रमाला घाटंजी केंद्राचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी (बायफ मित्र) संजय बाभुळकर, गुलाब शिसले, राहुल जिवने यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश गायकवाड होते. तर माधव कातकडे, प्रमोद ढवळे, संजय काळे, आर.बी.गोलाईत यांची प्रमुख उपस्थिती होती. ससाणी शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एस.डोमाळे यांचे या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले. संचालन बि.एन.राठोड तर आभार प्रदर्शन रूपेश बेलसरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रविण सहारे, प्रफुल्ल राऊत, तुषार सिसले, जिव्हाळा मित्र मंडळाचे मिलींद लोहकरे यांनी परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती 


Saturday 10 March 2012

उत्तमराव पाटील यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा

आज लोणी येथे अंत्यसंस्कार

राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेकांचे आधारस्तंभ, सहकार क्षेत्रातील मुरब्बी नेते, लोणी या छोट्याश्या गावातील सरपंच ते लोकसभेचे सलग पाच वेळा खासदार असा प्रदीर्घ राजकीय प्रवास केलेले उत्तमराव पाटील उपाख्य 'दादा' यांचे नागपूर येथील आदित्य हॉस्पिटलमध्ये काल सायंकाळी ६.३0 वाजता निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी येथे धडकताच जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली.
उत्तमरावदादा यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या आर्णी रोड स्थित 'देवकृपा' या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती. नागपूर येथून रात्री त्यांचे पार्थिव यवतमाळात आणण्यात आले. रविवार ११ मार्च रोजी सकाळी १0 वाजेपर्यंत दादांचे पार्थिव त्यांच्या येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता त्यांच्या मूळ गावी लोणी येथे (ता. आर्णी) अंत्यसंस्कार केले जातील. दादांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकीय व सहकार क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
२ मार्चला येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात रक्तदाब कमी झाल्याने अचानक ते मंचावर कोसळले. त्यांना येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना ६ मार्चला नागपूर येथील डॉ.राजन मारोकार यांच्या आदित्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे आज सायंकाळी ६.३0 वाजता त्यांचे निधन झाले. सन १९६९ मध्ये लोणी (ता.आर्णी) येथील सरपंच पदापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. दिग्रस पंचायत समितीचे सदस्य, यवतमाळ जिल्हा परिषदेचे सदस्य त्यानंतर १९७२ ते ७८ या कालावधीत ते विधानसभेचे आमदार होते. त्यानंतर १९८0 ते २00३ अशी सलग २३ वर्षे ते काँग्रेस पक्षाचे पाच टर्म खासदार राहिले. १४ नोव्हेंबर २0११ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.


दादांच्या निधनावर मान्यवरांच्या प्रतिक्रिया


जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण
असलेला नेता हरवला - मुख्यमंत्री 
जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता हरविला, अशा शब्दात माजी खासदार उत्तमराव पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

विदर्भातील बहुजन समाजाला घेवून चालणारा नेता उत्तमराव पाटील यांच्या रूपाने आपल्यातून निघून गेला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
- सदाशिवराव ठाकरे
माजी खासदार

जिल्ह्याला व राष्ट्रवादी पक्षाला उत्तमरावदादांची आवश्यकता होती. माझा हितचिंतक काळाने हिरावला आहे. काँग्रेसमध्ये असूनसुध्दा दादांसोबत स्नेहाचे संबंध होते. कौटुंबिक दृष्ट्याही अतिशय जवळ होते. परिवारातीलच व्यक्ती हिरावली आहे. या घटनेने कधीही भरून न निघणारी पोकळी वैयक्तिक जीवनात निर्माण झाली आहे.
- मनोहरराव नाईक
अन्न व औषध प्रशासन मंत्री

राजकीय कृपाछत्र हिरावले. उत्तमरावदादा हे अतिशय सरळ व सर्वसामान्य माणसाला घेवून चालणारे लोकनेते होते. विदर्भातील आघाडीच्या मोजक्या नेत्यांपैकी ते एक होते. काळाने आपल्यातील एक प्रामाणिक नेतृत्व हिरावले आहे.
- आमदार वसंतराव पुरके
विधानसभा उपाध्यक्ष

दादांनी व्यक्तिगतरीत्या केलेल्या मदतीमुळेच अनेक पदांपर्यत पोहोचू शकलो. सामाजिक व राजकीय क्षेत्रात दादांचे फार मोठे कार्य आहे. दादांनी जिल्ह्यात माझ्यासारख्या अनेकांना घडविले. निधनाची वार्ता कळताच मला व माझ्या कुटुंबीयांना दु:ख झाले आहे. दादांच्या निधनाने जिल्ह्यात एक पोकळी निर्माण झाली असून कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.
- आमदार माणिकराव ठाकरे
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

सामाजिक जाण असणारी व्यक्ती गेली. दादांच्या काम करण्याच्या शैलीमुळे विरोधकांनाही ते आपलेसे वाटायचे. दादा आपल्यातून निघून गेले यावर विश्‍वास बसत नाही. ही घटनाच माझ्यासाठी धक्कादायक आहे. जिल्ह्याचे पितृतुल्य नेतृत्व गमावले आहे. पाटील कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.
- भावनाताई गवळी
खासदार

दादांच्या निधनाने राजकीय पोकळी तयार झाली आहे. श्रेष्ठ मार्गदर्शक निघून गेले. विरोधकांनाही सन्मानपूर्वक वागणूक देणारा द्रष्टा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
- हरिभाऊ राठोड
माजी खासदार

उत्कृष्ट संघटक जिल्ह्याने गमावला आहे. उत्तमराव पाटील हे माझ्या मुलासारखे होते. त्यांचे वडील देवराव पाटील व त्यानंतर उत्तमराव पाटील यांची काँग्रेसवर निष्ठा होती. कालपरवाच ते राष्ट्रवादीत दाखल झाले आणि काळाने त्यांना आपल्यातून हिरावले आहे. माझ्या कुटुंबातलाच माणूस गेल्याने अतिव दु:ख झाले आहे.
- जांबुवंतराव धोटे
माजी खासदार

माझी राजकीय कारकीर्द घडविण्यात उत्तमरावदादांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे निधन ही सर्वांसाठीच दु:खद घटना आहे. काँग्रेस कमिटीचा जिल्हाध्यक्ष या नात्याने सर्वांच्यावतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली.
- आ.वामनराव कासावार
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी

दूरदृष्टी ठेवणारा, राजकारणात राहून स्पष्ट भूमिका असलेला खुल्या दिलाचा नेता उत्तमरावदादा होते. त्यामुळेच विरोधी पक्षातही माणणारा वर्ग जिल्ह्यात आहे. स्वाभिमानी व राजकारणात राहुनही कटकारस्थान, हुजरेगिरी यापासून दादा कोसो दूर होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील स्वाभिमानी नेता हरविला आहे. माझे त्यांच्याशी पारिवारिक संबंध असल्याने ही घटना माझ्यासाठी कौटुंबिक आघात आहे. दारव्हा व दिग्रस येथील शिवजयंतीच्या मिरवणुकीत निधनाची दु:खद वार्ता कळाली. कार्यकर्त्यांनी लगेच दादांना श्रध्दांजली अर्पण करून मिरवणूक आटोपती घेतली. यातच त्यांचे थोरपण दिसून येते.
- आमदार संजय राठोड
जिल्हा प्रमुख, शिवसेना

शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी दादा सदैव भांडत होते. कृषी क्षेत्रात दादांचे भरीव योगदान आहे. जिल्ह्याच्या राजकारणातील ते अजात शत्रू होते. विदर्भासह जिल्ह्यातील ज्येष्ठ नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. या घटनेने प्रचंड असे नुकसान झाले आहे.
- आमदार निलेश पारवेकर

दादांचे निधन ही आम्हा सर्वांसाठीच अतिशय दु:खद घटना आहे. या पलिकडे कुठलेही शब्द मला सूचत नाही.
- आमदार संदीप बाजोरिया

लोकनेता काळाने हिरावून घेतला आहे. सर्वसामान्यांना समान वागणूक देणारा नेता आपल्यातून निघून गेला आहे. विकासाची दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व उत्तमरावदादा होते. संयमाचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून दादांवर सर्वांचेच प्रेम होते. त्यांच्या निधनाने आज मोठी हानी झाली आहे.
- योगेश गढिया
नगराध्यक्ष, यवतमाळ

उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. दादांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने पक्षाला चांगली उभारी मिळणार होती. मात्र दु:खद घटनेने कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.
- प्रकाश पाटील देवसरकर
माजी आमदार





साभार:- लोकमत

उत्तमरावदादा पाटील यांचा जीवनपट

जन्म : २५ डिसेंबर १९४४
शिक्षण : बी. एससी (कृषी) नागपूर विद्यापीठ
व्यवसाय : शेती
विद्यार्थि दशेतील कार्य 
कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष (१९६६)
नागपूर विद्यापीठात विद्यार्थी प्रतिनिधी (१९६७)
राजकीय कारकीर्द 
सरपंच, ग्रामपंचायत लोणी (सन १९६९)
सदस्य, पंचायत समिती दिग्रस (सन १९७0)
सदस्य, जिल्हा परिषद यवतमाळ (सन १९७९)
सदस्य, महाराष्ट्र विधानसभा (सन १९७२ ते १९७८)
सदस्य, उपविधान कार्य समिती (सन १९७४)
सदस्य, शासकीय आश्‍वासन समिती (सन १९७५)
सदस्य, पंचायत राज समिती (१९७६)
सलग पाच वेळा लोकसभा सदस्य 
अ) सातवी लोकसभा - सन १९८0 ते १९८४
ब) आठवी लोकसभा - सन १९८४ ते १९८९
क) नववी लोकसभा - सन १९८९ ते १९९१
ड) दहावी लोकसभा - सन १९९१ ते १९९६
इ) बारावी लोकसभा - सन १९९८ ते २00३
भूषविलेली पदे
सदस्य लोकसभा अंदाज समिती, दिल्ली
सदस्य, विदेश पर्यटन महामंडळ दिल्ली
सदस्य, बँकींग व विमा उद्दोग विभागीय विचार विर्मश समिती, दिल्ली
सचिव, अखिलभारतीय शेतकरी सांसदीय मंच, दिल्ली
संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबई
उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्य (२00८)
अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, यवतमाळ (२00२)
अध्यक्ष, आरोग्य विचार विर्मश समिती, शासकीय रुग्णालय यवतमाळ
सदस्य, दूरभाष सल्लागार मंडळ, अमरावती विभाग, अमरावती
अध्यक्ष, श्री शंकर शेतकरी सहकारी साखर कारखाना, मंगरुळ
अध्यक्ष, जि. मध्यवर्ती जनहित सहकारी घाऊक व किरकोळ ग्राहक भंडार
उपाध्यक्ष, यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेस कमेटी (१९७४ ते १९७७)
सहसचिव, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटी (१९७७ ते १९८0)
अन्य कार्ये 
* श्रीमती इंदिरा गांधी अटकेच्या निषेधार्थ पदयात्रा, सत्याग्रह व अटक
* २0 कलमी कार्यक्रमाच्या प्रचारासाठी १५0 किलोमीटरची पदयात्रा
सामाजिक व शैक्षणिक कार्ये 
राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ, लोणी द्वारा संचालित, पोस्ट बेसिक आश्रमशाळा, लोणी, पोस्ट बेसिक वसतीगृह, लोणी, स्व. देवराव पाटीलप्रतिष्ठाण, यवतमाळ द्वारा संचालित, आदिवासी आश्रमशाळा खटेश्‍वर, पोस्ट बेसिक आदिवासी आश्रमशाळा, खटेश्‍वर, आदिवासी आश्रमशाळा वसतीगृह, खटेश्‍वर, पोस्ट बेसिक आदिवासी आश्रमशाळा वसतीगृह, खटेश्‍वर स्व. देवराव पाटीलकन्या शाळा, आर्णी, सदाशिव अनंत भागवत, विद्यालय, म्हसोला (का), स्व. देवराव पाटील वसतीगृह, आर्णी
साभार:- लोकमत

माजी खासदार उत्तमराव पाटील यांचे दु:खद निधन


यवतमाळ लोकसभा मतदार संघाचे तब्बल पाच वेळा प्रतिनिधीत्व करणारे माजी खासदार उत्तमराव पाटील यांचे आज दुपारी नागपुर येथे दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी ते ६८ वर्षांचे होते. काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यक्रमादरम्यान त्यांना भोवळ आल्याने रूग्णालयात भरती करण्यात आले होते. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना नागपुरला हलविण्यात आले होते. त्यांच्या निधनाने संपुर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली असुन जिल्ह्यातील एक दिग्गज राजकीय नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र दु:खद वातावरण आहे.

Wednesday 7 March 2012

शेतक-यांच्या पायाभूत सुविधांसाठी दोन कोटींचा निधी

बाजार समितीला प्रगतीपथावर नेऊ- अभिषेक ठाकरे 
घाटंजी बाजार समिती यार्डावर उद्या विकासकामांचे भुमिपूजन

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी प्रकल्प योजनेंतर्गत घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीला पहिल्या टप्प्यात दोन कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून येथिल मार्केट यार्डामध्ये शेतक-यांसाठी पायाभुत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. दि. ९ मार्चला सकाळी ८.३० वाजता या विकासकामांचे भुमिपूजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन लोकनेते सुरेश लोणकर, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, उपसभापती प्रकाश डंभारे, भुविकास बँकेचे अध्यक्ष शंकर ठाकरे यांचेसह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. 
या निधीतून मार्केट यार्डाला संरक्षक भिंत, २ गोडाऊन, हर्रास शेड, पाण्याची टाकी, धान्य चाळणी यंत्र, ५० टन वजन काटा, प्रसाधनगृह यासह यार्डाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. तर दुस-या टप्प्यात ऑनलाईन संगणकीकृत लिलाव सुविधा सुरू करण्यात येणार असुन निवडणुकीच्या वेळी शेतक-यांना दिलेल्या प्रत्येक आश्वासनांची पुर्तता करणार असल्याचे सभापती अभिषेक ठाकरे यांनी सांगीतले.  या कार्यक्रमाला शेतक-यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
साभार :- देशोन्नती 

विदर्भातील प्रथम क्रमांकाचा गुरांचा बाजार घाटंजीत
















विदर्भातील सर्वात मोठा गुरांचा बाजार घाटंजी येथे भरतो. संत मारोती महाराजांची यात्रा व गुरांचा भव्य बाजार तब्बल एक महिन्यांपर्यंत राहतो. यादरम्यान महाराष्ट्र तसेच शेजारील राज्यातून मोठ्या प्रमाणात गुरे आणण्यात येतात. या बाजारात कोट्यवधींची उलाढाल होते. दर्जेदार बैलजोड्यांसाठी हा बाजार विशेष प्रसिद्ध आहे. दहा हजार रूपयांपासुन २ लाखांपर्यंत किमतीच्या बैलजोड्या येथे विकायला येतात. नुकत्याच झालेल्या या बाजारातील काही छायाचित्रे आपल्यासाठी.