Pages

Friday 10 February 2012

निवडणुक झाली...आता व्हायचे ते होईल....!

उमेदवारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
मतदार राजा पुन्हा कंगाल 
भल्या पहाटे उठुन रात्री उशिरापर्यंत धावपळ...गृहभेटी, प्रचार...  कार्यकर्त्यांची मर्जी -मतदारांचा मुड सांभाळणे... प्रत्येकालाच भाऊ-दादा ...करुन मानपान करणे...झाले एकदाचे.  हुश्श..! आता मतदान आटोपले... पुढे काय होईल ते होईल...
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत रिंगणात असलेले उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीची धावपळ आटोपताच सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. दहा ते १५ दिवस प्रचंड दगदग व धावपळीचे गेले. तिकीट मिळविण्यापासुन सुरू झालेली कसरत मतदारांकडून मतदान करुन घेण्यापर्यंत कायम होती. या काळात मर्जी सांभाळायची तरी कोणाकोणाची? दररोज नेत्यांच्या घराचे दरवाजे ठोठवायचे. दारात उभे राहून तिकीट मागायचे. पक्षाचे तिकीट पदरात घेण्याचे दिव्य पार पाडल्यावर लक्षात आले की अजुन तर मोठा पल्ला गाठायचा आहे. प्रत्यक्ष रिंगणात उतरल्यावर एका दरवाजाचे हजारो दरवाजे झाले. प्रत्येक कार्यकर्ता, मतदार यांच्या घरी फेऱ्या माराव्या लागल्या.  दारोदारी भटकावे लागले. हाडवै-यालाही ‘भाऊ लक्ष ठेवजो’ म्हणुन हात जोडावे लागले. दिवसाची सुरूवात भल्या पहाटे होत असली तरी झोपण्याची वेळ मात्र निश्चित ठरलेली राहात नव्हती. कधी एक वाजायचा. कधी तीन वाजायचे. कधी-कधी तर अंथरुणाला पाठ टेकते न टेकते तोच मोबाईल वाजायचा, ‘भाऊ तुमाले चाला लागते, दुस-या पार्टीवाले आपल्या एरीयात घुसले. आपले मतदार मॅनेज करने सुरू आहे’. अशी वार्ता कानी पडली की, एक एक दिवस झोपही नाही. स्वत:चा प्रचार करत असतांनाच विरोधी उमेदवारांच्या कुरापतींकडे लक्ष ठेवणे. या दरम्यान कुटूंब, जबाबदा-या, कामधंदा सगळं काही जागेवर. प्रचाराची धामधुम संपताच पोलचिटच्या निमित्ताने पुन्हा मतदारांचे घर गाठायचे. काही कमी पडले का विचारायचे. याच धावपळीत मतदानाचा दिवस आला. पुन्हा पहाटे उठून राहिलेल्यांच्या भेटी. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्याची व्यवस्था करणे यातच ५.३० ची वेळ संपून गेली. पुन्हा कार्यकर्त्यांच्या भेटी, कुठे काय झाले, मतदान कसे झाले, कुणाला झाले, त्यांनी मतदार आणण्यासाठी केलेली व्यवस्था, त्यांचे हिशोब, देणे-घेणे या सगळ्यात मतदानाच्या दिवशीही वेळेचे भान राहिले नाही. अखेर सर्व काही व्यवस्थित पार पडले अन् मोबाईल बंद करुन शांत झोप लागली ती दिवस केंव्हा वर आला हे कळलेच नाही. ही अवस्था निवडणूकीत जवळपास प्रत्येक उमेदवार व त्यांच्या सोबत राबणा-या कार्यकर्त्यांची होती. मतदान संपले आणि त्यांनी सुस्कारा सोडला. धावपळ थांबली. आता फक्त निकालाची प्रतिक्षा राहीली आहे. येत्या १७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी  होणार आहे. त्यात मतदारांनी काय कौल दिला याची धाकधुक असली तरी बहुतांश उमेदवारांनी आता जे व्हायचे ते होईल. उगीच टेंशन घेऊन फायदा काय? अशी मानसिकता करुन घेतली आहे. आता रिलॅक्स मुडमध्ये हे उमेदवार राहणार आहेत या कालावधीत पुन्हा कार्यकर्ते व मतदारांची कटकट नको म्हणून अनेकांनी आपले मोबाईलसुद्धा बंद करुन ठेवले आहेत. कांहींनी  हवापालट करण्यासाठी नियोजनही केले आहे. तर कोणी देवदर्शनालाही निघुन गेले आहे. ग्रामिण भागात नेत्यांच्या भरधाव गाड्यांनी उडणारा धुरळा आता दिसेनासा झाला आहे. निवडणुकीच्या झगमगाटात झाकल्या गेलेली ग्रामिण भागाची बिकट अवस्था, ग्रामस्थांना भेडसावणा-या समस्या पुन्हा नजरेस पडत आहेत. मात्र आता त्याचे कुणाला काय? अखेर गेल्या महिनाभरात सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला मतदार राजा मताचे दान देऊन कंगाल झाला आहे.
साभार :- देशोन्नती

No comments:

Post a Comment