Pages

Thursday 19 January 2012

घरबसल्या शोधता येणार मतदार यादीतील नाव

काही वर्षांपुर्वी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी राजकीय पक्षांकडे असलेली मतदार यादी किंवा निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी मतदार याद्या  प्रसिद्ध केल्या आहेत त्या पाहणे असे दोनच पर्याय होते. मात्र आता निवडणूक आयोगानेही बदलत्या तंत्रज्ञानानुसार ‘हायटेक’ होत मतदार राजाला घरबसल्याच आपले नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही हे शोधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. फोन कॉल, एसएमएस आणि संकेतस्थळांच्या माध्यमातून आता मतदार यादीमध्ये नाव शोधता येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर म्हणजे (http://www.mahasec.com) वर निवडणूक हेल्पलाईन नंबर अशी लिंक असून त्या ठिकाणी ९२२५३२००११ या क्रमांकावर संपर्क साधून सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही हे जाणून घेता येणार आहे. त्याचप्रमाणे एसएमएसच्या माध्यमातूनही मतदारांना आपले नाव शोधण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी मतदारांनी आपले संपूर्ण नाव आणि वय आपल्या मोबाईलवरून टाईप करून तो एसएमएस ५६६७७ या क्रमांकावर पाठविल्यानंतर ही माहिती मिळू शकते. यवतमाळ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी खासकरून तयार करण्यात आलेल्या (http://www.zpyavatmalelection.org) या  संकेतस्थळावर सुद्धा मतदारांना आपले नाव शोधता येणार असून त्यासाठी नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव टाकल्यानंतर मतदाराला त्यांचे नाव कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे, प्रभाग क्रमांक कोणता आहे, वय, लिंग आणि मतदान ओळखपत्र क्रमांक याची माहिती मिळणे शक्य होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अशाप्रकारे प्रथमच मतदार राजाला घरबसल्या आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही हे पाहणे शक्य झाल्यामुळे संकेतस्थळाचा तसेच एसएमएस सुविधेचा लाभ मोठ्या प्रमाणात मतदार घेताना दिसत आहेत. नगर परिषद निवडणुकीनंतर जि.प.व पं.स. निवडणुकीसाठीही आयोगाने स्वतंत्र संकेतस्थळे सुरू केली आहेत. त्यामध्ये निवडणुक प्रक्रीया, मतदार याद्या, नामांकन अर्ज, मतदार संघाचा नकाशा यासह निवडणुकीशी संबंधीत सर्व माहिती प्रसिद्ध करण्यात यावी असे आयोगाचे निर्देश आहेत. सध्या संकेतस्थळ तयार असले तरी त्यामध्ये बरीच माहिती मात्र अद्याप टाकण्यात आलेली नाही. यवतमाळ जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या या संकेतस्थळावर जि.प.सर्कल, गण, नकाशा अशा प्रकारच्या माहितीसाठी लिंक दिलेल्या आहेत. मात्र त्यात माहिती उपलब्ध नाही. एकंदरीतच निवडणुक आयोग आता हायटेक होत असला तरी स्थानिक यंत्रणेमध्ये या आधुनिकतेला पुरक असा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे याची पुरेपूर अमलबजावणी होण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे.

No comments:

Post a Comment